दिवाळीचा फराळ

दिवाळी म्हटलं की खरेदी पाठोपाठ पोटपूजाही आलीच. आणि आता दिवाळी आलीच आहे. घराघरातून खमंग वास येऊ लागलेत. दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.हल्ली गोडधोड डाएटींग मुळे मागेच पडलेय. पण वर्षभर डाएटबिएट करावे आणि दिवाळीत मात्र भरपूर खावे. 
म्हणूनच तुमच्यासाठी खास आणल्या आह्रेत दिवाळी च्या खास रेसिपीस … 
बेसनाचे लाडू:
साहित्य : बेसन २ वाट्या , अर्धी वाटी बारीक रवा , अडीच वाट्या पिठी साखर, वेलची पूड , काजू काप, बदाम काप, मनुका, बेदाणे व साजूक तूप. 
कृती : बेसन तुपात छान भाजून घ्यावे, भाजल्यावर छान खमंग वास आला पाहिजे, रवा सुद्धा छान भाजून घ्यावा.रवा व बेसन छान एकत्र करावे व थोडेसे कोमट  होऊ द्यावे.मग पिठी साखर घालून छान मळावे. नंतर वेलचीपूड ,काजू काप , मनुका, बेदाणे टाकून छान बारीक लाडू वळावेत.

झटपट लाडू :
साहित्य : १ ते दीड वाटी बारीक रवा , १ वाटी ओले खोबरे, १ ते अडीच वाट्या साखर , जायफळ पूड, काजू , किसमिस , १ कप साई सकट दुध.
कृती : रवा गॅस वर नुसताच भाजा. रव्यात खोबरे, साखर व सायीचे दुध घालून चांगले हलवून मंद गॅस वर शिजायला ठेवा. मधून हलवत रहा.घट्ट होत आले की त्यात एक चमचा जायफळ पूड ,काजू किसमिस घाला. मिक्ष करून लाडू वळा.

रव्याचे लाडू :
साहित्य :तीन वाट्या बारीक रवा,अडीच वाट्या साखर,पाऊण नारळाचा चव,एक वाटी पातळ केलेले तूप,आठ दहा वेलदोड्याची पूड,थोडे बेदाणे.

कृती :पातळ केलेल्या तुपात रवा मध्यम आचेवर खमंग भाजावा. एकीकडे वेलदोड्याची पूड करून घ्यावी. रव्याचा रंग थोडासा तांबूस दिसू लागला की खवलेले खोबरे घालून नीट एकत्र करून मिश्रण पुन्हा भाजावे. खोबरे गरम रव्यात घालताच रवा एकदम फुलल्यासारखा दिसू लागेल. खोबर्‍यातला ओलेपणा पूर्णतः जाईल इतके पक्के मिश्रण भाजायला हवे.
एका भांड्यात साखर घेऊन त्यात वाटीभर पाणी घालून एकतारी पाक करावा. पाक करताना गॅस समोरून हालू नये.साखर विरघळली की चार -पाच मिनिटातच किंचित किंचित बुडबुडे येऊ लागतील. अजून दोन मिनिटांनी दोनबोटांमध्ये पाकाचा थेंब घेऊन तार येतेय का पाहावे. पाक पक्का एकतारी झाल्यावर एखादा मिनिटभर आंचेवर ठेवून बंद करावा.

वेलदोड्याची पूड व भाजलेले खोबरे-रव्याचे मिश्रण पाकात घालून एकत्र करून ठेवावे. दर पंधरा-वीस मिनिटांनी मिश्रण पुन्हा नीट एकत्र करावे. तीनेक तासात लाडू वळता येण्यासारखे होईल. वळायला घेण्याआधी हे मिश्रण खूप मळून घ्यावे. मिश्रण मळल्यामुळे हलके होऊन तूप सुटते. मग प्रत्येक लाडवाला बेदाणे लावून लाडू वळावा.

Olya Naralachi Karanjiओल्या नारळाच्या करंज्या :
साहित्य : एक नारळ खवलेला, एक वाटी भरून साखर, वेलदोडा पूड, एक वाटी मैदा, वनस्पती तूप , चवीसाठी मीठ.
कृती : नारळ व साखर यांचे मिश्रण गॅसवर ठेवावे व सारखे हलवत राहावे.मिश्रण एकजीव होऊन घट्ट गोळा झाल्यावर वेलचीपूड टाकून खाली उतरवावे.मैदा चाळून घेणे , एक चमचा तूप गरम करून मोहनासाठी मैद्यात टाकणे.चिमुटभर मीठ टाकून लगेच मळण्यास घ्यावे. पीठ घट्टच मळावे. लगेच छोट्या छोट्या गोळ्या करून लाट्या लाटणे व सारण भरून करंज्या करणे. करंज्या तुपातच तळाव्यात.जरा गुलाबीसर ठेवाव्यात. छान खुसखुशीत लागतात.

Shankarpaleखुसखुशीत शंकरपाळे :
साहित्य : १ वाटी दुध, १ वाटी तूप, १ ते दीड वाटी साखर , मीठ , मैदा , तळण्यासाठी तेल.
कृती : १ वाटी दुध, तूप ,साखर , किंचित मीठ घालून उकळा. त्यात मावेल एवढा मैदा घाला. चांगले मळून थंड झाल्यावर पोळी लाटून त्रिकोणी वा चौकोनी आकारात शंकरपाळे कापून तेलात टाळून काढा.

पातळ पोह्यांचा चिवडा: 
साहीत्य:
अर्धा किलो पातळ पोहे,पाउण वाटी गोडे तेल,पाव वाटी रिफाईंड तेल,१ वाटी भाजून सोललेले शेंगदाणे,अर्धा वाटी काजूचे तूकडे,१ वाटी डाळे,पाव वाटी वाळलेल्या (सुक्या) खोबर्‍याचे पातळ काप,पाव वाटी तीळ,१ टेबल चमचा धणे–जीरे पावडर,१५–२० कढिलिंबाची पाने,फोड्णीसाठी जिरे, हिंग व हळद,अर्धा टेबल चमचा मीठ,४–५ हिरव्या मिरच्या
कृती:
पोहे चाळून स्वच्छ निवडणे. एका छोट्या कढईत १ टी चमचा रिफाईंड तेल घालून त्यात एक वाटी पोहे घालून गॅसवर मंद आचेवर १ मिनिट कुरकुरीरत होईपर्यंत परतणे. (पोहा हातावर घेउन दाबल्यास त्याचे सहज तूकडे पडतात) असे सर्व पोहे थोडे-थोडे घेवुन कुरकुरीत करुन बाजूला ठेवुन देणे.एका मोठ्या भांड्यात तेल तापवत ठेवून त्यात फोडणीचे साहीत्य घालणे. फोडणी झाल्यावर (हळद न घालता) तीळपण फोडणीत घालणे. तीळ तडतडल्यावर मिरच्यांचे बारीक तूकडे व कढीलिंबाची पाने कुरकुरीत होईपर्यंत परतणे. नंतर खोबर्‍याचे काप घालणे. ते लालसर झाल्यावर काजू घालणे. अर्ध्या मिनिटांनी डाळे व शेंगदाणे घालणे. नंतर त्यात अर्धा टेबल चमचा हळद घालणे. (आंबट स्वाद आवडत असल्यास एक लिंबू पिळणे) वरून मीठ घालून सर्व चांगले हलवणे व कुरकुरीरत केलेले पोहे घालणे. सर्व पोह्यांना मीठ लागेपर्य़ंत मंद आचेवर १ मिनिट परतून त्यात धणे–जीरे पावडर घालून चांगले हलवणे व गॅसवरून उतरवणे.

PC:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu