पार्लेकरांचा अभिमान असलेल्या सर्वात यशस्वी उद्योगाची गोष्ट… पार्ले बिस्कीट फॅक्टरीचा इतिहास ….

पार्ले प्रोडक्ट्स (पार्ले बिस्कीट फॅक्टरी)
सन १९२९ साली श्री. नरोत्तम मोहनलाल चोहान हे जर्मनीहून चॉकलेट, साखरगोळ्या (पेपरमिंट ) करण्याचे शिक्षण घेऊन आले. आणि विलेपार्ल्यात त्यांनी पार्ले प्रोडक्ट्स या कारखान्याची स्थापना केली. त्यांचे वडील मोहन दयाळजी यांचा मूळ धंदा विदेशी रेशीम साड्या आणून कशिद्याचे भरतकाम करून विकणे आसा होता. एक प्रकारे हि दळलीच असल्याने त्यामध्ये त्यांना समाधान नव्हते. देशाच्या उत्पादनात भर घालणारा उद्योग सुरु करण्याचे त्यांच्या मनात घोळत होते. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाला जर्मनीस पाठवून साखरेच्या आरोग्यदायक टिकाऊ गोळ्या करण्याच्या तेथील कारखान्यात ठेवले. कारखाना उभारणीपासून तयार माल कारण्यापर्यंचे तांत्रिक शिक्षण नरोत्तमला मिळाले. कारखान्याची यंत्रसामुग्री घेऊनच ते भारतात आले. सुरुवातीला विलेपार्ले येथील आपल्या गुरांच्या गोठ्यात त्यांनी कारखान्याची उभारणी केली.

त्यांचे बंधू जयंतीलाल यांनी आपल्या नरोत्तम भाईला फार मदत केली. इंजिनीर मंडळींकडून कारखाना उभारायचा तर खर्चाचे हे काम परवडण्यासारखे नव्हते. सुरुवातीला या कारखान्याला नावही दिलेले नव्हते. पेपरमिंटच्या गोळ्यांना कागदाचे वेष्टन नव्हते. या गोळ्या बरणीत भरून विक्रीला जात. सन १९३३ साली डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीजचे अधिकारी श्री अडवानी यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर सर फ्रेडरिक साईक्स यांनी दिल्लीहून मुंबईला येत असता या कारखान्याला धावती भेट दिली राजमान्यातच जणू मिळाली अशी ही घटना.

कारखाना सुरु झाला , मालही निघू लागला पण बाजारात म्हणून कोणी घेईना. श्री पितांबर मोहनलाल दुकानदुकानातून माल दाखवीत होते. परदेशी मालाच्या तोडीचा माल आहे हे पटवून देत होते. त्यांनी अविश्रांत श्रम केले. माल बाजारात येऊ लागला व ग्राहकांनीही प्रतिसाद दिल्यामुळे धंदा लागला. या धंद्याला लागणारा पैसा कै. माणिकलाल मोहनलाल यांनी उभा केला. तरीही वेळ अशी आली कि साखरेचे भाव कडाडले , आर्थिक बाळ मिळेना. शेवटी कारखाना ब्रँडी आणि कंपनी ला विकावा असे विचार सुरु झाले. परंतु १९३४ च्या दिवाळीत कारखान्याला रु. ३०००/- नफा झाला असे हिशोबावरून आढळले. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरु झाला.
सुरुवातीला निर्मितीचा भर निरनिराळ्या टिकाऊ गोळ्या तयार करण्यातच होता . सन १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध सुरु झाले तेंव्हा बिस्किटे बनवण्याचे ठरले. पुन्हा बिस्कीट फॅक्टरीचे अद्ययावत तंत्रज्ञान शिकण्यासाठी श्री. नरोत्तमदास पुन्हा एकदा पश्चिमेस युरोपमध्ये गेले. लंडनच्या मी. कर्ली टोंग्यात या कंपनीमध्ये नोकरी धरली. त्या कंपनीचे श्री. शीट्स यांनी सर्वतोपरी शिक्षण दिले , एवढेच नव्हे तर मोकळेपणाने मिश्रणाच्या रीती सांगितल्या. नरोत्तमदास या संबंधी नेहमी आदराने उल्लेख करतात. श्री नरोत्तमदासांनी बिस्किटे तयार करण्याचा संच व मशिनरी भारतात पाठवून दिली व स्वत: बोटीने परत हिंदुस्तानात आले. सन १९३९ मध्ये लढाई युरोपात सुरु झाली व हिंदुस्तानात वन ओव्हन बिस्कीट फॅक्टरी विलेपार्ल्याला सुरु झाली. ग्लुको बिस्किटे तयार होत होती. हि एक नवीन प्रक्रिया होती. पुढे ती अनेकांनी आत्मसात केली. सहा महिन्यानंतर मोनॅको बिस्किटे तयार होऊ लागली. मोनॅको हे नाव माणिकलाल याना सुचले. बिस्किटांचा खप विशेष नव्हता. ८० मीटर लांबीच्या भट्टीवर बिस्किटे तयार करण्याची क्षमता हिंदुस्तानात याच कंपनीची होती . 

१९४६ साली महायुद्ध संपले आणि सुरळीत जीवनाला सुरुवात झाली गव्हाची टंचाई निर्माण झाली त्यामुळे बिस्किटे तयार करणे अवघड वाटू लागले. तेंव्हा पुन्हा एकदा निराळ्या दिशेने उत्पादनाच्या दृष्टीने विचार होऊ लागला. श्री. जयंतीलाल हे अमेरिकेला गेले व त्यांनी सॉफ्ट ड्रिंक्सचा कारखाना काढण्याच्या दृष्टीने माहिती व तंत्रज्ञान मिळवले. तसेच यंत्रसामुग्रीही त्यांनी हिंदुस्तानांत आणली आणि अशा रीतीने ‘गोल्ड स्पॉटचा’ जन्म झाला.
सुरुवातीपासूनच कारखान्याचा विकास होत होता. १९३९ चा बांधलेला कारखाना १९४९ साली विस्तृत करण्यात आला. १९७८ साली तो अद्यावत झाला. कागद वेष्टन मशीनवर होऊ लागले. प्रिंटिंग ( छपाई ) वेष्टन , निरनिराळ्या प्रकारची बिस्किटे , पेये ,गोळ्या वगैरे सर्व बाबतीत स्वयंपूर्णता आणण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. श्री. शरद चौहान म्हणतात कि ज्या पॅकिंग मशीनचे आम्ही पेटंट घेतले त्याचे अधिकार अमेरिकेतील कंपनीने त्यांच्यासाठी आमच्याकडून विकत घेतले. सतत १२ वर्षे जागतिक स्तरावर सुवर्ण व रौप्य पदके जागतिक स्तरावर आमच्या मालाला मिळत गेली.
कै. मोहनलाल दयाळजी (जन्म १८७३) यांनी दूरदृष्टीने या संस्थेची स्थापना केली. तिला उर्जितावस्था आणून मुलांना धंदे शिक्षण देऊन आज या संस्थेस जागतिक कीर्ती लाभली. हि पुण्याई केवळ त्यांची होय . या संस्थेने आपला सुवर्ण महोत्सव १९७९ साली साजरा केला.

सौजन्य : विलेपार्ले स्मृती ग्रंथ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu