पावसाळ्यात घ्या ही काळजी खास…

पावसाळा जवळजवळ सुरु झाल्यात जमा आहे. त्यामुळे आज आपण ह्या ऋतूत घ्यायच्या काळजी बद्दल बोलूया. डॉक्टर  आणि आहारतज्ञ ह्या दोन्ही भूमिका निभावताना मला ह्या ऋतूत अनेक विविध समस्या बघायला मिळतात. अनेकदा लक्षात येते कि औषधाची गरज नाहीये, काही सध्या सोप्या गोष्टींची काळजी घेतली तर अनेक आजार आणि समस्या टाळता येण्या सारख्या आहेत. अगदीच आजार झाल्यावरच लक्षात आले तर मग आम्ही डॉक्टर  आहोतच मदती साठी.

खरे सांगायचे तर तापदायक रखरखीत उन्हाळ्यानंतर हा पावसाळा जेव्हा सुरु होतो तेव्हा खूपच आनंददायक वातावरण निर्माण होते. पुन्हा हिरवीगार झाडे दिसू लागतात, हवा थंड होते.

पण ह्याच पावसाळ्यात दमट हवे मुळे ब्याक्टेरिया, वायरसेस, फंगस चे प्रमाण वाढते. अक्षरशः पावसाळ्यात हे जंतू ओवरटाइम काम करत असतात असे म्हंटले तरी चालेल. पावसाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे काहीप्रमाणावर काळजी घेणे आवश्यक होते. आज आपण ह्याच बद्दल बोलूया.

१] ‘हात स्वच्छ धुणे’ ह्याचे महत्व आपल्याला लहान असल्यापासून शिकवलेले आहे. पण काळाच्या ओघात, घाईगडबडीच्या, कामाच्या नादात आपण बऱ्याचदा हि शिकवण विसरतो. पण पावसाळ्यात असे करून चालणारे नसते. आपण प्रवासात, बस, ट्रेन मध्ये चढता-उतरताना, ऑफिसमध्ये, मार्केटात, शाळेत, कॉलेजात, आपले हात आपल्या नकळत ब्याक्टेरिया, वायरसेस जमा करत असतात. त्यामुळे बाहेरून घरी पोचल्यावर, प्रत्येक जेवणाआधी, काहीही खाण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुवा. दिवसभरात सुद्धा जमेल तेव्हा हात धुवा. आजकाल आपल्याला hand sanitizer सहज उपलब्ध असतात. ते जवळ बाळगा आणि त्याचा योग्य वापर करा.

२] पावसाळ्यात रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावे. पुन्हा कारण तेच ब्याक्टेरिया, वायरसेस चे वाढलेले प्रमाण. तसेच अनेकदा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट गाळलेले, उकळवलेले  नसते त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माश्या बसून ते अन्न दुषित करतात. कचरा, घाणीवर बसल्याने माश्यांच्या पंखाना पायांना ते कण आणि जंतू चिकटतात आणि मग उघ्यावर ठेवलेल्या अन्नावर माश्या बसल्या कि ते कण अन्नपदार्थांवर पडतात.

३] आपल्याकडे पाऊस बेभरवशी आणि जोरदार असतो हे विसरू नये. पावसाळ्यात बाहेर पडताना रेनकोट, छत्री सतत बरोबर ठेवावी. किंवा एक छत्री घरी आणि एक ऑफिसमध्ये कायम ठेवावी. म्हणजे जिथून निघताना पाऊस असेल तेव्हा तिथली छत्री घेऊन निघता येईल. आता तुम्ही म्हणाल, “पाउसाळ्यात छत्री वापरा हे सांगायला कशाला पाहिजे? आम्हाला माहित नाही कि काय हे ? “ अनेकदा असे होते की  आपण बाहेर पडतो तेव्हा आकाश अगदी निरभ्र असते, पाऊस पडत नसतो पण काम आटोपून किंवा ऑफिस सुटून परत येई पर्यंत जोरदार पाऊस पडू लागलेला असतो. अश्यावेळी पावसात  भिजून सर्दी खोकला ताप येण्याची अनेक उदाहरणे मला क्लिनिक मध्ये दर वर्षी बघायला मिळतात.

४] शक्य असेल तर ऑफिस, कॉलेज मध्ये लॉकर मध्ये कपड्याचा एक एक्सट्रा सेट नेऊन ठेवावा. म्हणजे तिथे जाताना जर अचानक आलेल्या पावसाने भिजायला झाले तर दिवसभर तश्या ओल्या कपड्यांमध्ये राहून ताप, सर्दी खोकला होण्याची शक्यता वाढते.

५] बाहेरून घरी आल्यावर पाय साबणाने पाय स्वच्छ धुवून घ्या. बोटांच्या पेरामध्ये, खोबणी मध्ये, नखांच्या भोवती नीट साबण लावून धुवा. कारण पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पाय ओले झाल्याने किंवा चिखल उडल्याने पायाला फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. शक्यतो पाय ओले राहू देऊ नका. ऑफिस मध्ये किंवा शाळा कॉलेजमध्ये पोचल्यावर पाय स्वच्छ कपड्याने पुसून कोरडे करा.

६] पावसाळ्याच्या दिवसात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे डासांपासून सुरक्षेची काळजी घ्या. डासांना दूर ठेवणारे क्रीम [mosquito repellent ] चा वापर करा. तसेच घरात किंवा घराच्या आसपास पाणी फार काळ साठून राहणार नाही ह्याची काळजी घ्या. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरिया सारखे आजार पसरतात.

७] पावसाळ्यात कमी तहान लागते त्यामुळे आपोआप कमी पाणी प्यायले जाते. पण स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती साठी, शरीरातील toxins चा नीट निचरा होण्यासाठी शरीराला साधारण ३ लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे आठवण ठेऊन, गरज पडल्यास दर एक तासाचा अलार्म लावून दिवसभरात ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

८] पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक घरचे अन्नच खावे. भाज्या, फळे ह्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढायला, पचन चांगले व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्या रोजच्या आहारात भरपूर समावेश करावा. मसाल्याचे पदार्थ सुद्धा पचनाला मदत करतात. पण पावसाळ्यात खूप तिखट पदार्थ खाणे टाळावे.

ह्या बारीकसारीक सवयींची काळजी घ्या आणि निरोगी राहून ह्या वर्षा  ऋतूचा मनसोक्त आनंद लुटा. पुढील लेखात  आपण पावसाळ्यात नक्की काय काय आणि कधी खावे ज्यामुळे आपला पावसाळा निरोगी आणि आनंदी जाईल हे बघूया.

 

  • डॉ. अस्मिता सावे.
  • म्यानेजिंग डायरेक्टर ‘ रिजॉंइस वेलनेस’
  • होमेओप्याथ, आहारतज्ञ, अक्यूप्रेशर थेरापिस्ट
    PC:google
Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu