दिवाळीची खरेदी पार्ल्यात कुठे आणि काय काय कराल ?

 
रोषणाईचा आणि लखलखाटांचा सण म्हणजे दिवाळी…. काही  दिवसांवर येऊन ठेपलेला हा सण भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. कोणी फराळ, नवीन कपड्यांच्या खरेदीसाठी तर कोणी फटाक्यांच्या खरेदीसाठी वा विविध वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले आहे. बाजरात आलेल्या नवनवीन गोष्टी या ग्राहकांना आकर्षित करत आहेत. लख्ख दिव्यांच्या सणात बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे.  याच काळात बाजारात नवीन आलेल्या व दिवाळीत उपयोगी वा महत्वाच्या असणाऱ्या गोष्टींचा या घेतलेला आढावा. 
या सर्व वस्तू पार्ल्यात तुम्ही कुठे व कशा खरेदी करू शकता याचा आढावा खास पार्लेकरांसाठी … 
 
• फराळ:-
दिवाळी सण लखलखटाबरोबर गोडाचा. दिवाळीत फराळाला महत्वाचे स्थान आहे. दिवाळीत पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान करून फराळाचा समाचार घेतला जातो. पूर्वी घराघरातून फराळ तयार केला जायचा. परंतु, सध्या नोकरी निमित्त गृहिणी घराबाहेर पडू लागल्या आहेत म्हणून हल्ली रेडीमेड फराळाची जास्त मागणी आहे. घराची चव असणाऱ्या या रेडीमेड फराळ प्रत्येक दुकानात दिसत आहे. त्याचबरोबर मधुमेह आणि हल्लीच्या तरुण वर्गासाठी बाजारात सुगर फ्री आणि डाएट फराळ बाजारात उपलब्ध झाला आहे. डाएट फराळात पदार्थ तळण्याऐवजी बेक केले जातात. सध्या बाजारात बेक करंज्या व शंकरपाळ्या, ऑईल फ्री चकल्या, शुगर फ्री लाडू, डाएट चिवडा उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर या सर्व डाएट फराळाचे बॉक्सही बाजारात आले आहेत.डाएट फराळ महाग असला तरी तो खरेदी करणाऱ्यांचा कल जास्त दिसून येत आहे.
पार्ल्यात फराळांसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध असणारी दुकाने म्हणजे फडके उद्योग मंदिर, प्रभू कृपा, रघूवीर स्टोर्स , विजय स्टोर्स ,आपले दुकान ,  विष्णू स्टोर्स अशी मराठी दुकाने तर प्रसिद्ध आहेतच पण रुची ,चॅम्पियन फूड्स, हिरसन्स हि दुकानेही ग्राहकांच्या उत्तम पसंतीस उतरली आहेत.  
चॅम्पियन फूड्स मध्ये मराठी फराळाबरोबरच मठिये, चोरफरी, असे गुजराती दिवाळीचे पदार्थ तर मलाई सॅन्डविच , रसगुल्ले , गुलाबजामून इ. मिठाई सुद्धा उपलब्ध असते.
पार्ल्याच्या या कोणत्याही दुकानातून खरेदी केलीत तरी तुम्हाला पदार्थ अगदी फ्रेशच मिळतील. 
Advertisement : Continue Reading After Advertisement (Sankalp Tours and Travels)
Sankalp tours Advt for townparle.in october 2017 issue
• उटणे:-
दिवाळी म्हटली कि अभ्यंगस्नान आलेच. या स्नानात सर्वात महत्वाचे स्थान म्हणजे उटण्याचे. बाजारात विविध उत्पादनाची उटणे बाजारात उपलब्ध झाली आहेत. मधुकर, बेडेकर, कुबल, मांगल्य यांनी तयार केलेली उटणे बाजारात पाह्यला मिळत आहेत. विशिष्ट सुवासिक पदार्थांपासून तयार केलेल्या लेपात चंदन, आंबेहळद, केशर, गुलाबाच्या पाकळ्या, वाळा, मुलतानी माती इत्यादी घटकांचा वापर केला जातो. हल्ली बाजारात तसेच विविध दुकानामध्ये सुगंधी उटणे, सुगंधी तेल, साबण हे सर्व वस्तू असणारे किट उपलब्ध आहेत. हे किट २०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तसेच उटण्याची पाकिटे २०-२५ रुपयांना मिळत आहेत. 

पार्ल्यात अतुल आयुर्वेदिक स्टोर्स , विजय स्टोर्स इ ठिकाणी चांगली वेगवेगळ्या प्रकारची उटणी उपलब्ध असतात तर पार्ले मार्केट मध्ये दिवाळीच्या काळात विविध फेरीवालेही वेगवेगळ्या सुगंधाची उटणी विकताना दिसतात. उटण्याशिवाय दिवाळीच्या अभ्यंगस्नानाला शोभा कशी येणार?

• रांगोळ्या:-

Rangoli Coloursदिवाळीच्या सणात पणती बरोबर महत्वाचे स्थान असते ते रांगोळीचे. दिवाळीनिमित्त बाजारात रांगोळी मोठ्या प्रमाणात दिसून येते . दादर, लालबाग मार्केट, क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर मार्केट रांगोळीने सजते.   पांढऱ्या दगडांना बारीक करून वा बारीक वाळूला रंग देऊन विविध रंगाच्या रांगोळ्या तयार केल्या जातात. सध्या रेडिमेड कलर रांगोळी मागणी वाढली आहे. या रांगोळीत पांढरी रांगोळी मिक्स करावी लागत नाही. रेडिमेड रांगोळीच्या तुलनेत रांगोळीत भरण्यात येणारे कलर हे महाग आहेत. भाववाढीमुळे सध्या रेडिमेड रांगोळी १५० ते २०० ग्रॅम १६ रुपये, संस्कारभारती रांगोळी ५५ रुपये किमतीला मिळत आहे. तसेच रांगोळ्यांच्या लहान पुड्या १० रुपये पासून उपलब्ध आहे. बाजारात रांगोळीचे स्टीकर मिळत असून छोट्या-मोठ्या आकारात हे रांगोळीचे स्टीकर एकदा लावले कि दिवाळी संपेपर्यंत टेन्शन नाही. हे १० रुपयापासून १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच रांगोळीची डिजाईन असलेली चाळणी बाजारात विविध आकारात आणि नक्षीत उपलब्ध आहे. या चाळणीवर रंगीत रांगोळी पसरवून चाळणीवरील नक्षी तुम्ही जमिनीवर वा जेथे काढायची आहे तेथे काढू शकता. ५ ते ५० रुपयांपर्यंत रांगोळीची ही चाळणी बाजारात मिळत आहे.    

रांगोळ्यासाठी पार्ल्याचे मार्केटही सजले आहे. पार्ल्यात मोंगीभाई रोडवर रॅम मंदिराच्या समोर असणारे ठेले आणि छोटी दुकाने यात तुम्हाला भरपूर वराईटीच्या रांगोळ्या , पणत्या , दिवे , रांगोळी पेन , कागद , रंग सर्व काही मिळेल. बस थोडे बार्गेन करता आले पाहिजे. सुरुवातीला तर भाव भरपूरच असतो जसजसे दिवस थोडे सारत जातात आणि दिवाळी एकदम जवळ येते इथे चांगले बार्गेन होऊ शकते. 

• फटाके:-

दिवाळीत सर्वात महत्वाची गोष्ट फटाके. लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांची फटाके फोडण्यास पसंती असते. कोरडे वातावरण असलेल्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रातील जळगावात आणि तामिळनाडू येथील शिवकाशी येथे बारमाही फटाके तयार केले जातात. मुंबईतील मस्जिद बंदर महमद अली रोडवरील फटाक्यांची गल्ली तसेच इसाभाई चे दुकान हे फटाक्यांसाठी प्रसिद्ध असून मुंबईत छोटे-मोठे किरकोळ फटाके विक्रेते मोठ्या प्रमाणावर आहेत. फुलबाजा, लवंग, लक्ष्मीबार, भुईचक्र, ताजमहाल, रॉकेटस अशा फटाक्याबरोबर आकाशात उंचावर जाणाऱ्या आणि कमी आवाजाचे चायना फटाके हे सर्वांचे आकर्षण आहे. तसेच बच्चे कंपनी फटक्याकडे आकर्षित होण्यासाठी त्यांच्या आवडीच्या कार्टून्स चित्र आणि नावे फटाक्यांना देण्यात आली आहे.

पार्ल्यात फटाक्यांच्या खरेदीसाठी भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. जवाहर स्टोर्स , शिवसागर समोरील फटाक्यांचे स्टोर, क्वालिटी स्टोर्स , आणि बरेच गल्ल्या गल्ल्यांमधील छोटी छोटी फटाक्यांची दुकाने तुम्हाला भरपूर वेगवेगळे फटाके बघायला आणि घ्यायला नक्कीच मदत करतील. 

तोरणे:-
सण कोणताही असो गणपती वा दिवाळी दारावर तोरणे ही हमखास बांधली जातात. पूर्वी, झेंडू-डहाळीची तोरणे दरवाजावर लटकवली जायची. परंतु, सध्या याची जागा नकली तोरणे, चायनीज तोरणांनी घेतली आहे. काच, कुंदन आणि गोंडे ची शैली असलेली राजस्थानी तोरणेही बाजारात उपलब्ध आहे. सध्या विविध रंगांचा लख्ख प्रकाश देणारे एलईडी तोरण बाजारात उपलब्ध झाले असून डमरू आणि पणत्यांचा आकार असलेल्या तोरणांची मागणी वाढली आहे. तसेच विविध रेडीमेड फुलांची तोरणे ही उपलब्ध आहेत. एलईडी तोरण ४५० रुपयांपासून उपलब्ध असून डमरू-पणत्यांचे तोरण ७०-१५० रुपयांपर्यंत मिळत आहे. सध्या बाजारात फटाक्यांचा आकार असलेली आणि आवाज करणारी तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. रिमोटचा वापर केल्यानंतर फटका फुटल्याचा आवाज होतो व कचराही होत नाही. याची किंमत २५० रुपयांपासून सुरु आहे. भुलेश्वर, दादर, लालबाग आणि भायखळा मार्केट येथील बाजारात ही तोरणे उपलब्ध आहेत.

पार्ल्यात तोरणासाठी हनुमान रोड  वरील इलेक्ट्रिक दुकाने , तसेच मार्केटमधील , दीनानाथमधील वेगवेगळी दुकाने तुम्ही बघू शकता. हनुमान रोड वर जनता सहकारी बँकेच्या समोर असणारी दुकाने , स्टेशन समोर रामकृष्ण हॉटेलच्या समोर व बाजूची दुकाने इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची इलेकट्रीक तोरणे उपलब्ध होतील तर काच , कुंदन , गोंडे यांची तोरणे तुम्हाला अगरवाल मार्केट मध्ये क्रंची मंची हॉटेलच्या बाहेर पाहायला मिळतील. 

• कंदील:-
दिवाळीत घर सजवण्या विविध वस्तूमध्ये सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे “कंदील”. पूर्वी घरोघरी कंदील बनवले जात असे. बांबू, काड्या इत्यादी गोष्टीपासून हे कंदील बनवले जात असे. हल्ली पर्यावरणपूरक कंदीलही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. हे कंदील १६०-३०० रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. परंतु, सध्या रेडिमेड कंदिलाची मागणी वाढली आहे. यात प्रामुख्याने चायनीज, फोल्डिंगचे रंगीबेरंगी कंदीले, प्रिंटेड, लोटस कंदील तसेच कापडापासून आणि बांबूपासून तयार केलेले कंदील, काचेचे कंदील छोटे छोटे प्लॅस्टिक कंदील, कलश, देवदितांचे फोटो असलेले कंदील या सर्व प्रकारांचा समावेश आहे. हे रंगीबेरंगी कंदील २०० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.  

कंदिलासाठी पार्ल्यात हनुमान रोडवर पार्ले टिळक शाळेच्या समोर बरीच छोटी दुकाने दिवाळीच्या वेळेत तयार होतात. त्यांच्यामध्ये तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीच्या कंदिलांपासून ते फोल्डिंगचे , प्लास्टिकचे , कापडांचे सर्व कंदील मिळतील. शिवाय मार्केट मध्ये ट्रेंड सेटरच्या समोर कंदील, रांगोळी, स्टिकर्स या सर्वांसाठी खास दुकाने तयार झालेली दिसतील . कदाचित भाजी मार्केटचे रूपांतर या दिवसात कंदील आणि दिवाळीच्या बाकी खरेदीसाठी होते असे वाटते. या दुकानांमध्ये तुम्हाला कंदील, पणत्या , मेणबत्त्या , दिवाळीचे स्टिकर्स , तोरणे , छापे अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या पर्यंत सर्व काही मिळेल. 

मग पार्लेकर्स लागताय ना तयारीला ??? 

Pc:Google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe to our newsletter

Want to be notified when our article is published? Enter your email address and name below to be the first to know.
Main Menu