गारगोटी खनिज संग्रहालय, सिन्नर, नाशिक

२० जानेवारी २०१० ह्या दिवशी सकाळी सात वाजता नाशिकहून पुण्याला जायला आम्ही कारने निघालो. नाशिकच्या नातेवाईकांकडे आमचा मुक्काम होता. त्यांनी नाश्त्यासाठी वाटेत संगमनेरला एसटी स्थानकाजवळ ‘आठवण पोहे’ नावाच्या स्टॉलवर आठवणीनं पोहे खाण्याची आठवण करून दिली. तसंच सिन्नरच्या गोंदेश्वर देवालयाबद्दलही माहिती दिली.

सिन्नरच्या घाटात, मालेगाव एम्.आय.डी.सी. विभागात आल्यावर, ‘गारगोटी’ असं लिहिलेल्या पाट्या रस्त्याच्या कडेला दिसू लागल्या. बायकोने आमच्या चालकाला त्या ‘गारगोटी’ पाट्यांचा माग काढत मार्गक्रमणा करण्यास सांगितलं, तेव्हा अस्मादिकांस अचंबा जाहला. त्याबद्दल विचारणा केल्यावर तिने आपण आता एक वेगळा म्युझियम पाहायला जात असल्याचं सांगितलं. ‘म्युझियममध्ये काय वेगळेपण असणार?’ ह्याचा मी विचार करेपर्यंत आम्ही ‘गारगोटी म्युझियम’च्या आकर्षक पण बंद प्रवेशद्वाराशी पोहोचलो. प्रवेशद्वार बंद असल्याचं पाहिल्यावर मी थोडा सुखावलो कारण म्युझियम किंवा वस्तुसंग्रहालय पाहायला मी तसा नाखूषच असतो. कितीही छोटा म्युझियम असला तरी तो तास-दिडतास तरी खातो आणि पायाचे तुकडे पडतात, ते वेगळे. त्याचा परिणाम पुढच्या पर्यटनावर होतो. त्यामुळे म्युझियम पाहायला मी ओढीनं जात नाही; खरंतर पाय ओढीतच जातो. ह्या पार्श्वभूमीवर, हा म्युझियम पाहण्याची योजना माझ्यापासून लपवून ठेवली गेली होती.

इमारतीकडे पाहिल्यावर उजव्या वरच्या बाजूस लाल रंगात, वळणदार इंग्रजीमध्ये ‘गारगोटी’ असं नाव दिसलं. त्यातून म्युझियमच्या व्यवस्थापनाच्या कलासक्ततेचा सहज परिचय झाला आणि माझं मतपरिवर्तन व्हायला सुरुवात झाली. सव्वाआठच वाजले होते. प्रवेशद्वार बंद असणं स्वाभाविक होतं. बंद प्रवेशद्वारावरच्या कॉलबेलचं बटण दाबावं की नाही ह्या विचारात आम्ही असतानाच प्रवेशद्वार उघडलं आणि एक इसम बाहेर आला. त्याला आम्ही मुद्दामहून म्युझियम पाहण्यासाठी आल्याचं व आम्हाला पुण्याला ठराविक वेळेत पोहोचायचं असल्याचं बायकोने सांगितलं. त्या माणसाने मग आम्हाला थोडं थांबायला सांगितलं. स्वतः आत जाऊन आम्ही आल्याची वर्दी दिली आणि पाचच मिनिटात प्रवेशद्वार आमच्यासाठी उघडलं गेलं. त्याने आत आमच्याबद्दल काय सांगितलं समजेना. आम्ही चकित झालो. आमच्यासाठी तो सुखद धक्का होता. आम्ही विशेष पाहुणे थोडेच होतो? आमच्यासारख्या आगंतुक अभ्यागतांसाठी, वेळेपूर्वी एखादं प्रवेशद्वार उघडण्याचा प्रसंग विरळाच होता. माझ्या मतपरिवर्तनाचा पुढचा टप्पा पार पडला.  माझ्या चेहऱ्यावरील भाव व देहबोलीतून बायकोने ते ताडलं असावं. रीतसर प्रवेशतिकिटांची खरेदी झाली. त्यांच्याबरोबर एक माहितीपत्रक होतं. पाच-सात मिनिटात एक ‘चुणचुणीत’ मुलगा आमचा मार्गदर्शक म्हणून आमच्याबरोबर देण्यात आला. 


‘गारगोटी’ नावावरून चटकन अर्थबोध होईना. आमच्या मार्गदर्शकाने आम्हाला इमारतीच्या तळमजल्यातल्या स्वागतकक्षात उभं केलं आणि माहिती द्यायला सुरुवात केली. ‘गारगोटी, द मिनरल म्युझियम (गारगोटी खनिज संग्रहालय), नाशिक’ ह्या त्याने सांगितलेल्या नावावरून थोडी कल्पना आली. त्यातील ‘मिनरल’ शब्दावरून, म्युझियम माझ्या शैक्षणिक ‘अकार्बनी रसायनशास्त्र’ ह्या विषयाशी संबंधित असल्याची जाणीव झाली आणि मतपरिवर्तनाकडून आता माझी अनुकूलतेकडे वाटचाल सुरू झाली. माहिती जाणून घेण्यासाठी मी माझ्या नकळत पुढे सरसावलो. आमच्या बाजूस असलेल्या, पृथ्वीच्या गोलाकार मॉडेलवर स्थित भारतमातेच्या भव्य मूर्तीकडे त्याने अंगुलीनिर्देश केला आणि आमचं बौद्धिक घ्यायला सुरुवात केली. ‘भारतमातेच्या उदरात दडलेल्या प्रसिद्ध आणि जगभर वाखाणल्या गेलेल्या ‘झिओलाईट’ नामक खनिजाच्या नैसर्गिक ठेव्याची माहिती भारतीयांना व्हावी, ह्या उद्दिष्टाने ह्या म्युझियमची स्थापना करण्यात आली आहे. त्यायोगे ह्या नेत्रदीपक आणि विस्मयकारक खजिन्याच्या संवर्धन व जतनासंदर्भात जनजागृती होईल.’ मुलाचं पाठांतर जरी बरं असलं तरी त्याचं ते जोडवाक्य ऐकूनच धाप लागली आणि पुढे सरसावलेला मी, परत मागच्या फळीत दाखल झालो. आमच्या आकलनाचा वेग कमी पडत असल्याचं आम्ही त्याच्या निदर्शनास आणलं. त्याने मग त्या जोडवाक्याची उकल करून आमची मागणी पुरी केली.

‘हा म्युझियम भारतातील पहिलाच रत्नं, खनिजं आणि जीवाश्म म्युझियम असून जगातील सर्वात मोठा अशाप्रकारचा ‘खाजगी’ म्युझियम आहे. आपल्याला येथे जगभरातून जमवलेले नैसर्गिक स्फटिक, झिओलाईट, इतर खनिजं, मौल्यवान व अर्धमौल्यवान रत्नं व विविध धातू तसंच जीवाष्म, पुतळे, हस्तकला यांचा संग्रह पाहायला मिळतो. म्युझियम सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत आठवड्याचे सर्व दिवस खुला असतो. कृष्णचंद्र पांडे यांच्या चाळीस वर्षांहून अधिक काळातील अथक प्रयत्नातून ह्या संग्रहाला मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे. ह्या म्युझियमचा विशेष म्हणजे भारतीय झिओलाईटचा जगभरातील सर्वात मोठा संग्रह येथे आहे. हे सर्व ह्या दुमजली इमारतीमध्ये, दोन वेगवेगळ्या दालनांमध्ये प्रदर्शित केलं आहे; डेक्कन प्लाटू (दख्खन पठार) गॅलरी (दालन) आणि प्रेस्टिज गॅलरी (दालन). ह्या म्युझियमचं उद्घाटन इ. स.२००१ साली माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं.’ मार्गदर्शकाने माहिती दिली.

त्याने आम्हाला डेक्कन प्लाटू दालनात नेलं. दख्खनच्या पठाराखाली मिळालेले पाषाणनमुने तिथे प्रदर्शित केले होते. आम्ही वेगवेगळ्या आकारातील व रंगांतील चमचमणारे झिओलाईट तसंच इतर खनिजं, स्फटिक पाहून शब्दशः भारावले गेलो. त्याने मग त्यातल्या एकेकाची माहिती सांगितली. आकर्षक कोंदणात बसवलेल्या दगडांची, खनिजांची शास्त्रीय नावं, त्यातील घटकपदार्थ, तो सापडलेलं ठिकाण असा तपशील प्रत्येकाशेजारी प्रदर्शित केला होता. महाराष्ट्र व आजूबाजूच्या प्रदेशातील उत्खननातून मिळालेली ही खनिजसंपदा होती. आकर्षक मांडणी, त्याला अनुकूल प्रकाश योजना; त्यामुळे स्फटिकांचे विविध आकार, त्यांचे मोहक रंग व त्यांची चमक पाहणं हा एक अत्यंत आनंददायी अनुभव होता. त्यानंतर त्याने आम्हाला काही जीवाष्म दाखवले. लोणारचे उल्कापात अवशेष, डायनोसॉरची अंडी, मौल्यवान व अर्धमौल्यवान रत्नांमधून कोरून तयार केलेल्या काही सुरेख मूर्तीदेखील तिथे होत्या. प्रतिदिप्तीशील किंवा स्वयंप्रकाशी खनिजांच्या विभागातून तर पाय निघत नव्हता. म्युझियम पाहायला पाय ओढीत जाणारा मी, तिथे बराच वेळ रेंगाळलेला पाहून आता बायकोस अचंबा जाहला. आम्हाला म्युझियम पाहून वेळेत पुण्याला पोहोचायचं असल्याची तिने मला आठवण करून दिली.

आमच्या मार्गदर्शकाने आम्हाला वरच्या मजल्यावर असलेल्या प्रेस्टिज गॅलरीत (दालनात) नेलं. नावावरून सूचित होत असल्याप्रमाणे, भारतात व परदेशात सापडलेली दुर्मिळ रत्नं, मौल्यवान धातू, चंद्रावरील खडक व भारतात सापडलेले अतिदुर्मिळ, किंमती, उत्कृष्ट प्रतीच्या झिओलाईट खनिजांचा अनोखा संग्रह तिथे पहावयास मिळाला. नैसर्गिक स्वरूपात खडकात अडकलेलं सोनं, चांदी व इतर मौल्यवान धातू तसंच इतर अनेक धातू; ज्यांची नुसती नामओळख होती, त्या सर्वांचं दर्शन तिथे झालं.  हिरे, माणकं, पाचू, निळा दुर्मिळ पुष्कराज, समुद्रात मिळणारे निरनिराळ्या रंगांमधील प्रवाळ देखील पाहायला मिळाले. झिओलाईट ह्या शब्दाचा अर्थ ‘उकळणारा दगड(बॉयलिंग स्टोन) असल्याचं त्याने सांगितल्यावर झिओलाईटच्या निर्मिती प्रक्रियेविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्याचीही माहिती त्याने थोडक्यात दिली. ‘साधारण सहा कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखी शांत होत असतानाच्या कालखंडात, घडलेल्या प्रक्रियांतून विविध प्रकारच्या दगडांचे विशिष्ट आकार, रंग तयार झाले.’ दोन्ही दालनात मार्गदर्शक माहितीपूर्ण समालोचन करत असल्याने, न राहवून मी त्याला त्याच्या शैक्षणिक पार्श्वभूमीविषयी विचारलं. तो बाजूच्याच परिसरात रहात होता आणि नुकताच रसायनशास्त्रात पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याच्या एकंदर विवेचनातील बारकावे, त्याची त्या विषयातील वेगळी समज दर्शवत होते. त्याला धन्यवाद दिले आणि आम्ही बाहेर पडलो.

दरवर्षी अनेक जण हा म्युझियम पाहायला जातात आणि आपल्या भूगर्भातील ठेव्याला दाद देतात. भूगर्भशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र ह्या विषयांच्या अभ्यासकांसाठी हा म्युझियम अतिशय उपयुक्त आहे. सर्वसामान्य अभ्यागतांसाठीदेखील पृथ्वीच्या पोटात दडलेल्या ह्या अमूल्य ठेव्याची झलक, नाविन्यपूर्ण माहिती देणारी ठरेल. थोडी वाकडी वाट करून नाशिकपासून बत्तीस किमीवरील, सिन्नर येथील ह्या म्युझियमला जरूर भेट द्यावी आणि एक ‘आगळं वेगळं’ ठिकाण पाहण्याचा आनंद घ्यावा.

डॉ. मिलिंद न. जोशी
संपर्क : ९८९२०७६०३१
milindn_joshi@yahoo.com          

Pc: google       

 
Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu