ग्रँड पॅलेस परिसर, बँकॉक © डॉ. मिलिंद न. जोशी

आम्ही पाहिलेल्या शहरातील सर्वात विरोधाभासाचं शहर म्हणून बँकॉकचा उल्लेख करावा लागेल. राजकीय दृष्टीने लोकशाही स्वीकारलेली पण नामधारी राजेशाहीला असलेला मान; राजा, राणीच्या सर्वत्र दिसणाऱ्या चित्रांमधून दृगोच्चर होणारा. एकीकडे सामाजिक जीवनावर अमेरिकन जीवन शैलीचा प्रचंड पगडा; त्यामुळे सर्वत्र पाश्चात्य वेशभूषा व केशभूषा अंगिकारलेली तर दुसरीकडे पितवस्त्रधारी बौद्ध भिक्षूंचे गट पारंपरिक, धार्मिक आस्था निगुतीने जपणारे. तोकड्या कपड्यांचा वापर सर्रास दिसणारा परंतु बुद्ध मंदिरात प्रवेशासाठी मात्र संपूर्ण शरीर झाकणाऱ्या मर्यादशील कपड्यांचा वापर आवश्यक. सर्वत्र दिसणारे बौद्धमंदिरांचे सुरेख कळस, त्या बौद्धमंदिरांच्या प्रांगणात  वेदपठणासारखं भासणारं मंत्रपठण चाललेलं तर निषागारांची संख्याही कमी नाही. एकीकडे धार्मिक, अध्यात्मिक जीवनाच्या वाटचालींबरोबरच दुसरीकडे शौकिनांना खुणावणारं, ‘निशाजीवन’ उपभोगण्याची सोय(खरंतर तो मान ‘पट्टाया’कडे जातो). रस्त्यांवर अत्याधुनिक गाड्यांचा सुळसुळाट तर काही ठिकाणी अजूनही दिसणारी पाण्याच्या कालव्यातून होत असलेली बोट वाहतूक. दुकानांमधून विक्रीसाठी खुला जागतिक दर्जाचा सर्वच प्रकारचा माल तर त्याच कालव्यांमधून तरंगत्या बाजारातून होणारी भाज्या, फळं, मासे व इतर खाद्यपदार्थांची विक्री. प्रवृत्ती व निवृत्ती दोन्हीची सोय. सर्वच असं विरोधाभासाचं असलं तरी फारसा आडपडदा न बाळगता, ज्याच्या-त्याच्या प्रवृत्तीनुसार, प्रकृतीधर्माप्रमाणे, मर्जीप्रमाणे आणि काळवेळाप्रमाणे चाललेलं. जसं मॉरिशस म्हणजे फक्त समुद्रकिनारे व त्यावरील मौजमजा नव्हे तसंच बँकॉक म्हणजे फक्त निशाजीवन नव्हे. पण आधी उल्लेखलेल्या सर्वच विरोधाभासांमुळे बँकॉकचं प्रतिकचिन्ह म्हणून अमुक एकच स्थळ दर्शवलं जात नाही. सिंगापूरचं  छान, सुंदर किंवा हाँगकाँगचं ‘ग्लॅमरस’, तसं एका शब्दात बँकॉकचं वर्णन करणंही शक्य नाही. वेगवेगळ्या संकेतस्थळांवर वेगवेगळी ठिकाणं बँकॉकला दर्शवण्यासाठी वापरली जातात. तरीदेखील तेथील राजाला असलेला मान लक्षात घेता, चाओ फ्राया नदीच्या पूर्वकिनारी असलेला राजप्रासाद, त्यामधील वाट फ्रा क्यू (पाचूच्या बुद्धाचं मंदिर), जवळच असलेलं वाट फो व पश्चिम किनाऱ्यावर असलेलं वाट अरुण मंदिर, हा सर्वच परिसर बँकॉकचं प्रतिकचिन्ह म्हणून उल्लेखता येईल. बँकॉकच्या, पर्यायाने थायलंडच्या अठराव्या शतकानंतरच्या इतिहासाच्या दृष्टीनेदेखील ह्या परिसराला वेगळं महत्व आहे.

१९९३च्या जुलै महिन्यात आम्ही स्वतंत्रपणे बँकॉकला गेलो होतो. तो आमचा पहिलाच परदेश प्रवास होता. त्यानंतर २०१५च्या मे महिन्यात आम्ही परत बँकॉकला गेलो. दोन्ही वेळेस पहुरात विभागातील हॉटेलमध्ये आम्ही वास्तव्य केलं. त्या विभागात भारतीय खाद्यपदार्थ मिळणारी उपहारगृह असल्यामुळे उदरभरणाच्या दृष्टीने ते सोयीचं ठरलं. पहिल्या वेळी आम्ही दोन तासांवरच्या पट्टायाला जाऊन आलो होतो; पण एकंदर ते ठिकाण आम्हाला काही ‘पटलं’ नाही त्यामुळे दुसऱ्या बँकॉक वारीच्या वेळी आम्ही तिथे गेलो नाही. गुगलवरून व विविध प्रवासी कंपन्यांच्या महितीपत्रकांत दर्शवलेल्या ठिकाणांची माहिती वाचली व त्यानुसार आमचा चार दिवसांचा स्थलदर्शनाचा कार्यक्रम तयार केला.

बँकॉकला पोहोचल्यावर पहिल्या दिवशी दुपारी आम्ही वाट त्रैमित म्हणजे सोन्याचा बुद्ध असलेल्या मंदिराला भेट दिली. ५.५ टन वजनाची, ३ मीटर उंचीची चकचकीत बुद्धमूर्ती विलक्षण तेजस्वी दिसत होती. दुसऱ्या दिवशी ‘सफारी वर्ल्ड’ हे प्राणिसंग्रहालय पाहायला गेलो तर तिसऱ्या दिवशी ‘आयुथया'(अयोध्या) ह्या थायलंडच्या पूर्वाश्रमीच्या राजधानीला जाऊन आलो.

नंतरचा दिवस बँकॉक दर्शनासाठी राखीव ठेवला होता. हॉटेलवर ब्रेकफास्ट केला आणि चाओ फ्राया नदीच्या ऐलतटावरचं, प्रचंड आकाराची पहुडलेल्या बुद्धाची मूर्ती असलेलं वाट फो बुद्धमंदिर, राजप्रासाद, त्यामधील वाट फ्रा क्यू (पाचूच्या बुद्धाचं मंदिर) व नदीच्या पैलतटावरचं वाट अरुण मंदिर पाहायला निघालो. बँकॉकमध्ये सर्वत्र आढळणाऱ्या ‘टुकटुक’ रिक्षामधून वाट फोला पोहोचलो. ४६मीटर(१५१फूट) लांबीच्या, सोनेरी रंगाच्या, पहुडलेल्या बुद्धमूर्तीचं दर्शन नजरेच्या एका टप्प्यात होऊ शकत नाही; इतकी ती विशाल आहे. ह्या बुद्धमूर्ती बरोबरच अनेक बुद्धमूर्ती ह्या मंदिर संकुलात आहेत. थायलंडमधील, एका ठिकाणी सर्वात जास्त संख्येने बुद्धमूर्ती याच मंदिरसंकुलात असल्याचं तिथे समजलं. चक्री राजघराण्याचे संस्थापक राम पहिले ह्यांच्या कालखंडात राजधानी नदीच्या पैलतटावरून, थोनबुरीहून बँकॉकला हलवण्यात आली. वाट फो मंदिराच्या बाजूस ग्रँड पॅलेस ह्या राजप्रसादाची निर्मिती करण्यात आली. तसंच वाट फो मंदिर संकुलाची पुनर्बांधणी व नूतनीकरण करण्यात आलं. आयुथया व इतर ठिकाणांहून अनेक बुद्धमूर्ती वाट फो संकुलात आणण्यात आल्या. मंदिरसंकुल त्यातील वैशिट्यपूर्ण रंगसंगतीच्या, उंच कौलारू छतांच्या, कलात्मक इमारतींच्यामुळे  व सोनेरी शिखरांच्या मंदिरांमुळे तसंच अनेक उंच , निमुळत्या शिखरांच्या स्तुपांमुळे आकर्षक दिसतं. बँकॉकमधील एक जुनं आणि विस्तीर्ण बुद्धमंदिर संकुल म्हणून वाट फोला एक वेगळं महत्त्व आहे.

वाट फो नंतर आम्ही चाओ फ्राया नदीच्या पलीकडे असलेलं वाट अरुण मंदिर पाहण्यासाठी गेलो. नदीकिनारी पोहोचताच पलीकडे वाट अरुण मंदिर दिसू लागलं.  काही इमारतींचं बांधकाम खूपच आकर्षक वाटतं; ते मुख्यतः त्या बांधकामाच्या संरचनेमध्ये असलेल्या प्रमाणबद्धतेमुळे व लयीमुळे. नदीच्या अलीकडच्या किनाऱ्यावरून वाट अरुण संपूर्ण दिसतो; त्याच्या मध्यावरच्या मुख्य शिखर व चार बाजूस असलेल्या चार लहान मिनार सदृश्य शिखरांसह. हे पुराणातील मेरू पर्वताचं द्योतक असल्याची माहिती तिथे समजली. नदीतून पलीकडे जाण्यासाठी बोटसेवा उपलब्ध होती. त्यानिमित्ताने बँकॉकमधला नौकाविहार झाला. वाट अरुणच्या प्रवेशद्वारी पोहोचलो पण आम्हाला आत शिरण्यासाठी थोडी ‘वाट’ पाहावी लागली. त्यावेळी थायलंडची राजकन्या वाट अरुण मंदिरात दर्शनासाठी आली होती; असं समजलं. वाट अरुण मंदिर दर्शनाबरोबरच राजकन्येचंही दर्शन होण्याच्या शक्यतेने सुखावलो. अजूनपर्यंत जितीजागती राजकन्या प्रत्यक्षात पाहण्याचं भाग्य लाभलं नव्हतं. राजकन्या तिच्या इप्सित स्थानी पोहोचल्यावर एका वेळी ठराविक संख्येनेच इतरेजनांना आत सोडलं जात होतं; ते सुद्धा वेगळ्या ‘वाटे’ने. आम्हीसुद्धा मग सरळ वाटेच्या ऐवजी वाकडी वाट करून आत शिरलो आणि थक्कच झालो. आम्ही चक्क त्या राजकन्या व तिच्याबरोबर असलेल्या सख्यांच्या बाजूलाच पोहोचलो. अर्थात राजकन्येच्या बाजूला उभ्या असलेल्या सुरक्षारक्षकांमुळे राजकन्येची ओळख पटली. कारण मनात असलेल्या राजकन्येच्या प्रतिमेशी जुळणारी कोणतीच व्यक्ती त्या प्रौढ स्त्रियांच्या गोतावळ्यात दिसेना. तरी त्यातल्या त्यात भरजरी वस्त्रातली राजकन्या असावी असा समज करून वाट अरुणच्या दिशेने वाट चालू लागलो. वाट अरुणच्या मुख्य शिखराला बांधकामासाठी बांधतात तशी बांबूंची ‘परात’ बांधली होती. त्यावरून त्याचं दुरुस्तीचं काम काढलं असावं असा आम्ही अंदाज बांधला. त्यामुळे ‘सर सलामत’ राखण्यासाठी ‘पगडी’ नाही पण टोपी चढवली आणि मधल्या शिखराचं दुरूनच दर्शन घेतलं. वाट अरुणचा परिसर सुरेख राखला आहे. तिथे थोडा वेळ थांबलो आणि परतीची वाट धरली.

ऐलतटावर आलो. ‘ग्रँड पॅलेस’ पाहणं बाकी होतं. राजप्रासादाच्या दिशेने मोर्चा वळवला. परंतु त्याचा विस्तार आणि आमच्याकडे उपलब्ध वेळ ह्यांचं व्यस्त प्रमाण लक्षात घेता आमची धावती भेट झाली असं म्हणावं लागेल. ते इ.स.१७८२ ते १९२५ पर्यंत थायलंडच्या राजांचं अधिकृत निवासस्थान होतं. राम नववे व राम दहावे(सध्याचे) हे राजे जरी राहण्यासाठी अन्यत्र गेले असले तरी त्यांचे अधिकृत कार्यक्रम अजूनही तिथेच आयोजित केले जातात. चक्री राजघराण्याचे संस्थापक राम पहिले यांच्या कारकिर्दीत इ.स.१७८२ला ह्या राजप्रासादाच्या निर्मितीस सुरुवात झाली.  नंतरच्या काळात त्या संकुलामध्ये अनेक इमारती बांधल्या गेल्या, त्यामुळे वेगवेगळ्या रचनेच्या इमारती, बगीचे आपल्याला तिथे पाहायला मिळतात. सर्वंकष राजेशाहीच्या अस्तानंतर, इ.स.१९३२ पासून सर्व सरकारी कार्यालयं राजप्रासादाच्या बाहेर हलवण्यात आली. राजप्रासाद संकुलातील महत्वाचं स्थळ म्हणजे वाट फ्रा क्यू (पाचूच्या बुद्धाचं मंदिर). मंदिरात ध्यानस्थ बुद्धाची २६ इंची मूर्ती असून मूर्तीवर सोन्याची वस्त्राभूषणं आहेत. मूर्ती खरंतर पाचूची नसून जस्पेर या अर्धमौल्यवान रत्नापासून बनवलेली आहे. ह्या मूर्तीबद्दल थायलंडमध्ये थायलंडची संरक्षक किंवा तारक मूर्ती म्हणून पूज्यभाव जपला जातो. आम्ही मग राजप्रासाद संकुलाची बाहेरून परिक्रमा केली आणि परत ‘टुकटुक’ने पहुरात विभागातील आमच्या हॉटेलवर परतलो.

बँकॉक प्रवासात बँकॉकच्या ह्या प्रतिकस्थळ परिसराची सफर निश्चितच एक वेगळा आनंद देऊन जाते व बँकॉकचं एक वेगळं रूप आपल्या समोर येतं.

                                                       

 

डॉ. मिलिंद न. जोशी 
Email : milindn_joshi@yahoo.com     

पूर्वप्रसिद्धी – www.thinkmarathi.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu