आपले सण आपली पक्वान्ने

आपल्याकडे प्रत्येक सणाचे फार महत्व आहे. त्या दिवशी पारंपारिक पद्धतीने ठराविक पक्वान्ने करण्याची प्रथा रूढ झाली आहे. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या कुटुंबाच विस्तारलेलं क्षितीज पाहता, काळाबरोबर धावण्याची स्पर्धा करीत असताना, आपली मुळ कुठ रुजली आहेत याच भान जाग रहाव हेच या सदरचे मुख्य उद्दिष्ठ आहे. स्वयंपाक घराशी केवळ गृहिणीचच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच अतूट नात आहे. ते अधिक सर्जनशील, नाविन्यपूर्ण, सहभागाच आणि आरोग्यदायी व्हावं यासाठीच आम्ही हा विविध पाककृतींचा यशस्वी उपक्रम या सदराद्वारे राबवीत आहोत.

खाण्याचा वैयक्तिक आरोग्याशी निकटचा संबंध आहे. हे पारंपारिक सत्य प्रकर्षाने आज नव्याने जाणवत आहे. आपण बायका कितीही जरी शिकलो – सावरलो , पुरुषांच्या बरोबरीने समाजात वावरू लागलो तरी घराच्या चार भिंतींच्या आत आल की आपल आणि पुरूषाच क्षेत्र भिन्न होत. हल्ली शिक्षणामुळे किंवा नोकरी धंद्यामुळे मुलींचा बराच वेळ घराबाहेर जातो. त्यामुळे स्वत:च्या आई किंवा आजीकडून विविध पदार्थ व त्यातील बारकावे शिकायला त्यांना वेळच मिळत नाही. आणि एखादा पदार्थ  शिकलाच आणि करून बघताना बिघडला तर आपल्या उत्साहावर विरजण पडत. अस होऊ नये म्हणून अनुभवसिद्ध पाककृती आम्ही आपल्यासाठी या सदरातून देत आहोत. या सदराने केवळ अनुभवीच नव्हे तर नवगृहिणींच्याही पक्कौशाल्यात निश्चितच भर पडेल हीच आमची सदिच्छा आहे.

चैत्र गुढीपाडवा (वर्षप्रतिपदा)

चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. या दिवशी नव्या पंचांगाला सुरुवात होते.याच दिवशी नवीन संवत्सराची सुरुवात होते तसेच शालिवाहन शकाचा प्रारंभ होतो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कामाला सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते.या दिवशी रांगोळी काढून गुढी उभारतात , त्याला साखरेची माळ घालतात.

जेवणापूर्वी कडू लिंबाचे चूर्ण खातात.

मीठ, हिंग , साखर किंवा गुळ, ओवा, मिरी आणि फुलांसह कादुलीम्बाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंचेत एकत्र करून थोडेसे खावे नंतरच जेवावे.

या दिवशी पुरणपोळी, कटाची आमटी, गव्हाल्यांची किंवा शेवयाची खीर , शेवग्याच्या शेंगांची कढी, वरण ,भात , बटाट्याची भाजी , पुऱ्या भाजी, पापड्या कुरादायांचे तळण, नारळाची चटणी , कोशिंबीर, पंचामृत अस स्वयंपाक करतात.

 

पुरण पोळी 

साहित्य : २ वाट्या चण्याची डाळ, १ वाटी गुळ, १ वाटी साखर, ६-७ वेलदोड्यांची पूड ,चिमुटभर जायफळ पूड, चिमुटभर हळद, २ चमचे तेल , अर्धा चमचा मीठ .

कृती :   डाळ धुवून त्यात ३ वाट्या पाणी, तेल हळद व मीठ घालून डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ शिजल्यावर ती चाळणीत टाकावी आणि पाणी निथळू द्यावे. गुळ किसून घ्यावा किंवा बारीक चिरावा.पातेल्यात डाळ गुळ व साखर एकत्र करावे पातेले गेस वर ठेवावे. गुळ वितळायला लागला की गेस बारीक करावा.मंदाग्नीवर पुरण शिजवावे. हे मिश्रण हलवत राहावे. उलथने पुराणात उभे केले असता सरळ उभे राहिले की पुरण शिजले असे समजावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की पातेले उतरवून ठेवावे. त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालावी. व पुरण गरम असतानाच पुरण यंत्रातून काढावे किंवा पाट्यावर वाटावे म्हणजे ते लवकर व बारीक वाटले जाते.

 पुरण पोळीसाठी कणिक भिजवणे :

साहित्य : १ वाटी गव्हाचे पीठ, एक वाटी मैदा, अर्धा चमचा मीठ, ४ चमचे तेल.

कृती : सर्व साहित्य एकत्र करून घडीच्या पोळ्यानप्रमाणे पीठ भिजवणे.मात्र थोडे सैलसर ठेवावे. भिजवलेले पीठ तासभर मुरु द्यावे. व नंतर पोळ्या लाटाव्यात.

 पुरण पोळी लाटणे :

मोठ्या सुपारी एवढा कणकेचा गोळा घ्यावा. पिठाच्या गोळ्याच्या तिप्पट पुरणाचा गोळा घ्यावा. कणकेची वाटी करावी व त्यात पुरण घालून मोदकाच्या आकारासारखा उंद करावा. तो चपात करून तांदळाच्या पिठीत घोळून पोळी अलगद लाटावी. पोळी लाटताना तांदळाच्या पिठीवरच लाटावी. शक्यतो बिडाच्या किंवा निर्लेपच्या तव्यावर पोळी भाजली तर पोळी तव्याला अजिबात चिकटत नाही. आणि करपतही नाही.तवा तापल्यावर मंडगीवर पोळी भाजावी . 

कटाची आमटी

साहित्य : चण्याच्या डाळीचा कट अंदाजे ७-८ वाट्या , चिंचेचा कोळ ३ चमचे, ३-४ चमचे बारीक किसलेला गुळ , पाव वाटी सुके खोबरे , १०-१२ कडीपत्त्याची पाने, २ मोठे चमचे तेल , मीठ .

 मसाला :

२ चमचे लाल तिखट , १ चमचा गोड मसाला, ४-५ लवंगा, २-३ तमालपत्राची  पाने, ४-५ दालचिनीचे तुकडे, १ चमचा जिरे.

कृती :
पुरणपोळी करण्यासाठी चण्याची डाळ आपण कुकरमध्ये शिजवतो तेंव्हाच कट काढावा. पुरण पोळीबरोबर कटाची आमटी फार छान लागते. चण्याची डाळ नेहमीपेक्षा दुप्पट पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ चांगली शिजल्यावर ती चाळणीत ओतून निथळायला ठेवावी. अर्थात हे पाणी पातेल्यात पडेल अशा रीतीने चाळणी ठेवावी.हे निथळलेले पाणी म्हणजेच डाळीचा कट.ह्या कटात आवश्यक तेवढे पाणी घालावे त्यात चिंचेचा कोळ घालावा आणि पातेले मंदाग्नीवर ठेवावे. खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. कीस व जिरे कुटून घ्यावे. दुसऱ्या पातेल्यात तेल घालावे. त्यात दालचिनी, लवंग, तमालपत्र , कडीपत्त्याची पाने फोडणीला द्यावे. त्यात पळीभर पातेल्यातील आमटी टाकावी आणि तिखट व गोड मसाला घालून परतावे. लगेच बाकी उकळलेली आमटी, गुळ व थोडेसे वाटलेले पुरण त्या मिश्रणात टाकून एखादी उकळी येऊ द्यावी.आवडत असल्यास एक कांदा व सुके खोबरे पातेल्यात वेगवेगळे भाजून घ्यावे , वाटून घ्यावे व तेही आमटीत घालावे. या आमटीची चव वेगळीच येते. पुरण पोळी बरोबर कटाची आमटी फारच छान लागते.

 उखाणा :

“पुरणपोळीचा चोहीकडे दरवळला सुवास, 
रावांच्या साथीने सुखकर होईल माझ्या संसाराचा प्रवास”

  – सौ. रश्मी मावळंकर

 

Main Menu