श्रीगुरू: मम चित्ता शमवी आता
अज्ञानरुपी निबीड अंध:कारातून तेजोमयी शाश्वत ज्ञान प्राप्तीच्या दिशेने जे मार्गस्थ झाले आहेत, जे तिमिरातून तेजाकडे वाटचाल करत आहेत, अश्या मुमुक्षुंना, आत्मदीप(अंतरंगीचा प्रकाश), पथदीप (बाह्य प्रकाश)अशा दोन्ही दीपज्योतीनी मार्ग उजळून, इप्सित साध्य व्हावं, यासाठी सद्गुरु हे सतत मार्गदर्शन करत असतात. सुदैवाने भारतीय परिवेशात गुरु-शिष्य परंपरा, गुरूभक्तीचं माहत्म्य विषद करणाऱ्या अनेक घटना, उदाहरणं, कृती आढळतात. सद्गुरूंच्या कृपा दृष्टीस पात्र ठरलो, त्यांनी मस्तकी हात ठेवला, तर अवघा मानवी जन्मच कृतार्थ, सार्थक होऊ शकेल, अशी शक्ती त्यात सामावलेली असते. मात्र गुरुभक्ती ही सुद्धा सहेतुक असू नये. व्यवहारी जगण्यातल्या, देवाणघेवाणीच्या समिकरणाचा भाव त्यात असू नये, हे फार महत्वाचं. कदाचित म्हणूनच असं म्हटलं जातं की की गुरू हा करता येत नाही तो लाभावा लागतो. असं घडलं तर लौकिक, पारमार्थिक जीवन सफल, संपूर्ण होतं. अन्यथा गुरुबाजीच्या जाळ्यात गुरफटून त्यातच घुसमटणाऱ्या, गटांगळ्या खाणाऱ्यांची ही वानवा नाही.
इहलोकी जीवाला त्याच्या संचितानुसार, कर्मानुसार जीवनयापन करावं लागतं, अशी आपली श्रद्धा आहे. कर्म करत असताना प्रत्येक वेळी ती आदर्श आचारसंहिते प्रमाणेच घडतील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. कितीही भान राखलं तरी थोडेफार उणे अधिक हे घडायचेच. दैनंदिन जीवनात षडरिपूंशी प्रामाणिकपणे लढतांनाही भल्याभल्यांना ही पराभव पत्करावा लागतो. लाख प्रयत्न केले तरी अनेकदा त्यांची सरशी होते. अश्यावेळी हाकेला धावून येणारा, अशी महती असलेल्या करुणामयी श्रीगुरूचरणी लीन होऊन त्याच्याकडेच करुणा भाकली तर उद्धार शक्य आहे.

श्रीवासुदेवानंद सरस्वती
वैराग्य मूर्ती श्रीवासुदेवानंद सरस्वती जे टेंबे स्वामी नावानेही ओळखले जातात ह्यांचं व्यक्तीमत्व म्हणजे अनेक गुण वैशिष्ट्यांचा जणु समुच्चय. अनन्वित दत्तभक्क्ती बरोबरच तंत्र, मंत्र, वैद्य, ज्योतिषी, संस्कृत तसच मराठी साहित्य, कवी, वक्ते अशी बहुविध प्रतिभा त्यांना वश होती. दत्तसंप्रदाय परंपरेचे ते अत्यंतिक आदरणीय संत पुरूष. त्यांनी अष्टांग योगाभ्यास ही केला होता. एकप्रकारची सर्वज्ञताच त्यांना लाभली होती. श्रीगोविंदस्वामीं सारख्या ब्रह्मज्ञानी संन्याशाची कृपादृष्टी त्यांच्यावर पडली आणि त्यांना श्रीदत्तसंप्रदायाची दीक्षा व गुरुमंत्र मिळाला. त्यांचा विवाह ही झाला होता मात्र पत्नीच्या निधना नंतर त्यांनी संन्यास घेतला. स्वतः कर्म-भक्ती-योग-ज्ञान अशा उपासना मार्गांनं ध्येयसिद्धी साधल्यानंतर अनेक मुमुक्षुंना त्यांच्या कडून मार्गदर्शन मिळालं. सावंतवाडी (माणगाव) ते हिमालयापर्यंत अनवाणी प्रवास करून वैदिक धर्म व श्रीदत्तसंप्रदायाच्या प्रचारार्थ त्यांनी आजीवन कार्य केलं आणि लोककल्याणाचा मार्ग अनुसरला. त्यांनी विपुल स्तोत्ररचना व अभंगरचना केली. त्यांची त्या करुणाकराकडे करुणा भकणारी करुणात्रिपदी तर विशेष भावस्पर्शी असून अजरामर आहे. दत्त संप्रदाय हा ज्ञानमार्ग ही अवलंबणारा असला तरी प्रामुख्याने भक्तीमार्ग चोखाळणारा, कर्मप्रवण असा आहे. श्रीदत्त उपासकांसाठी श्रीक्षेत्र नारसोबावाडी हे अत्यंतिक पवित्र स्थान आहे. भूतकाळी या ठिकाणी असलेल्या पुजारी मंडळीं कडून काही अपराध घडल्याने मूलतः शांत स्वरुपी दत्त माऊली कोप पावली असता टेंबे स्वामींनी रदबदली करत श्रीदत्त महाराजांशी जो संवाद साधला तो म्हणजे ही करुणात्रिपदी असं म्हटलं जातं. अत्यंत करुर्णाद्र भावाने त्यांनी श्रीदत्त महाराजांना करुणा मूर्ती होऊन सर्व भक्तजनांच्या चुका पोटी घेण्यासाठी केलेलं हे आर्जव आहे. त्यानंतर नरसोबावाडीला सुयोग्य उपासना पद्धती ही स्वामींनी आखून दिली आणि ती आजही अनुसरली जाते असं सांगतात. गेली बरीच वर्ष घरात दत्त उपासनेची परंपरा असलेल्या आणि कर्माचे निष्ठापूर्वक आचरण करणाऱ्या सोयाऱ्यांशी ही या लेखा संदर्भात झालेला संवाद उपयुक्त ठरला.
।।करुणात्रिपदी।।
एक
शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।ध्रु।।
तू केवळ माता जनिता। सर्वथा तू हितकर्ता।।
तू आप्तस्वजन भ्राता। सर्वथा तूचि त्राता।। भयकर्ता तू भयहर्ता। दंडधर्ता तू परिपाता।
तुजवाचुनि न दुजी वार्ता। तू आर्ता आश्रय दत्ता (आश्रयदाता) ।। शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।१।।
हे श्रीगुरुदत्ता तुम्ही शांत व्हा आणि माझ्या चित्ताला ही शांत करा. अद्वैत तत्त्वज्ञाना नुसार आपण तर एकच आहोत मात्र मी स्वतःला तुम्हा पासून वेगळं समजल्यामुळे चित्ती वासनांचा कल्लोळ दाटला आहे. परंतु यामुळे तुम्ही रागावू नका. माझ्या अंतरीचे विकार तुम्ही शांत करावेत.
तुम्हीच माझे मात पिता आहात तेव्हा तुम्हीच माझी काळजी घ्या. तुम्हीच माझे आप्त स्वकीय आहात, बंधू आहात तेव्हा तुम्हीच माझे तारणहार व्हा.
भय निर्मिती आणि भय निवारण ही तुमचीच लीला आहे. शिक्षा देणारेही तुम्हीच आणि क्षमाशील ही तुम्हीच आहात तेव्हा तुम्हा शिवाय मी दुसऱ्या कुणाचा विचारच करू शकत नाही. भवतापाने मला गांजल आहे, आता तूम्हीच माझे आश्रयदाते व्हा. हे श्रीगुरुदत्ता तुम्ही शांत व्हावं आणि माझ चित्तही ही शांत करावं .
अपराधास्तव गुरुनाथा। जरि दंडा धरिसी यथार्था।। तरि आम्ही गाउनि गाथा। तव चरणीं नमवू माथा।।
तू तथापि दंडिसी देवा। कोणाचा मग करूं धावा? सोडविता दुसरा तेव्हां। कोण दत्ता आम्हां त्राता?
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।२।।
आमच्या गैर आचरणामुळे अनेकदा अपराध घडतात. ते घडू नयेत म्हणून म्हणून तुम्ही योग्य तेच शासन करता मग आम्ही नामस्मरण करून तुझ्या चरणी लीन होतो.
परंतु तू तरीही शासन केलच तर आम्ही काय बरं करावं? कुणाचा धावा करावा? त्या समयी दुसरा कोण बरं मदतीला धावेल? तेव्हा तुम्हीच तारणहार व्हा. हे श्रीगुरुदत्ता तुम्ही शांत व्हावं आणि माझ चित्तही ही शांत करावं .
तू नटसा होउनि कोपी। दंडिताहि आम्ही पापी। पुनरपिही चुकत तथापि। आम्हांवरी न च संतापी।।
गच्छतः स्खलनं क्वापि। असें मानुनि नच होऊ कोपी। निजकृपा लेशा ओपी। आम्हांवरि तू भगवंता।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।३।।
तू शांत स्वरुपी आहेस. त्यामुळे तुझ आम्हावर रागावणं हे खरं असू शकत नाही. आम्हावर रागवण्याचा निव्वळ अभिनय करून तू शासन करतोस हेच खरं. मात्र पुनःपुन्हा आमच्याकडून चुका घडत जातात हेही मान्य आहे पण तरी देखील तू संतापू नकोस ना.
या जड जगात कर्म करत असताना अश्या चुका होणारच असं गृहीतच धरून आम्हावर न रागावता तुझ्या अनुरागास पात्र नाही का करता येणार?
हे श्रीगुरुदत्ता तुम्ही शांत व्हावं आणि माझ चित्तही ही शांत करावं.
तव पदरीं असता ताता। आडमार्गीं पाऊल पडतां। सांभाळुनि मार्गावरता। आणिता न दूजा (दुसरा) त्राता।
निजबिरुदा आणुनि चित्ता। तू पतितपावन दत्ता। वळे आतां आम्हांवरता। करुणाघन तू गुरुनाथा।।
शांत हो । शांत हो श्रीगुरुदत्ता…… ।।४।।
हे पिता परमेश्वरा आम्ही तुझ्या पदरी लीन आहोत अशावेळी जर आमच्या कडून गैर वर्तन झालच, चुकीचं पाऊल पडलच तर, आम्हाला परत मार्गावर, तू नाही तर दुसरा कोण आणू शकेल?
करुणाघन, पतितपावन,भक्तवत्सल ह्या तुझ्या बिरुदांच तू विस्मरण नको होऊ देऊ आणि आमच्यावर तुझी कृपादृष्टीच सदैव राहू दे हीच आर्त प्रार्थना. हे श्रीगुरुदत्ता तुम्ही शांत व्हावं आणि माझ चित्तही ही शांत करावं
सहकुटुंब सहपरिवार। दास आम्ही हें घरदार। तव पदी अर्पू असार। संसाराहित हा भार।
परिहरिसी करुणासिंधो। तू दीनानाथ सुबन्धो। आम्हां अघ लेश न बाधो। वासुदे-प्रार्थित दत्ता।।
शांत हो श्रीगुरुदत्ता। मम चित्ता शमवी आता।।५।।
आम्ही सहकुटुंब, सहपरिवार, संपूर्ण घरदार सर्वच तुझे दास आहोत. हा जड संसार स्वहितार्थ तुझ्या चरणी अर्पण करत आहोत. हे करुणासिंधू, दीनानाथा माझ्या अत्यंत चांगल्या प्रिय अनुजा(भावा) तुझ्या अवकृपेचा लवलेशही आमच्या वाट्याला न येवो हीच वासुदेवाची(श्रीवसुदेवानंद सरस्वती/टेंबे स्वामी) श्रीगुरूदत्त चरणी प्रार्थना. हे श्रीगुरुदत्ता तुम्ही शांत व्हावं आणि माझ चित्तही ही शांत करावं
दोन
श्रीगुरुदत्ता जय भगवंता। ते मन निष्ठुर न करी आता।।ध्रु।।
हे दत्त दिगंबरा, हे प्रभो तुझा जयजयकार असो. विनंती आहे, तू आपलं मन निष्ठुर करू नकोस
चोरे द्विजासी मारीता मन जे। कळवळले ते कळवळो आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।१।।
वल्लभेश नामक व्यक्तीला चोरांनी मारलं तेव्हा जस तुमचं मन कळवळल तसच आताही ते कळवळू द्या!
(गुरुचरित्र अध्याय १०, श्लोक १३)
पोटशूळाने द्विज तडफडता। कळवळले ते कळवळो आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।२।।
पोटदुखी ने तडफडणाऱ्या(प्राणत्याग करत) व्यक्तीला पाहिल्यानंतर तुमचं मन जसं कळवळल तस आताही ते कळवळू द्या! (गुरुचरित्र अध्याय १३ श्लोक ९५ )
द्विजसुत मरता वळले ते मन हो की उदासीन न वळे आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।३।।
गंगाधर नामक व्यक्तीच्या पुत्र वियोगामुळे कृपशील झालात तसेच आताही व्हा. (गुरुचरित्र अध्याय २० श्लोक १०)
सतिपति मरता काकुळती येता। वळले ते मन न वळे की आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।४।।
पती निधना मुळे काकुळतीला आलेल्या त्या पतिव्रतेसाठी जसं आपलं मन कळवळून तिच्या पतीला जिवंत केलत तसच ते आता ही कळवळू द्या. (गुरुचरित्र अध्याय ३०, ३१ व ३२ माहूर, दत्तात्रय)
श्रीगुरुदत्ता त्यजी निष्ठुरता। कोमल चित्ता वळवी आता।। श्रीगुरुदत्ता जय भगवंता…..।।५।।
करुणाघन श्रीगुरुदत्ता कृपा करा. आपण निष्ठुरता सोडून द्यावी व आपल्या कोमल मनानं आमच्यावर आता कृपा करावी. हे भगवंता, श्रीगुरूदत्ता, आपला जयजयकार असो.
तीन
जय करुणाघन निजजनजीवन। अनसूयानन्दन पाहि जनार्दन।।ध्रु।।
निज-अपराधे उफराटी दृष्टी। होऊनि पोटी भय धरू पावन।।१।। जय करुणाघन …..।।
तू करुणाकर कधी आम्हांवर। रुसशी (रुससी) न किंकर-वरद-कृपाघन।।२।। जय करुणाघन …..।।
वारी अपराध तू मायबाप। तव मनी कोप लेश न वामन।।३।। जय करुणाघन …..।।
बालकापराधा गणे (गणीं) जरी माता। तरी कोण त्राता देईल जीवन।।४।। जय करुणाघन …..।।
प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव। पदी देवो ठाव देव अत्रिनन्दन।।५।। जय करुणाघन …..।।
अनुसूयेच्या पुत्रा, श्रीगुरुदत्ता; हे दयाळा; आमचं जीवनच तू आहेस. तेव्हा तू आमच्याकडे प्रेमदृष्टिने पाहा.
या भासमान संसाराला आम्ही सत्य मानून त्यात रंगून गेलो आहे. हा आमचा दृष्टिभ्रम आहे. या आभासी संसाराच्या भया पासून आमची सोडवणूक करावी.
हे करुणाकरा ईश्वरा आम्हावर कधी रुसू नकोस ना. तु तर वरदायी कृपामेघ आहेस. तू आमच्यावर नित्य कृपा वर्षाव करावा.
तू तर आमचा मायबाप आहेस. तुझ्या मनात आमच्या बद्दल राग कसा बरं असेल? आमच्या सर्व चुका तू पोटी घे.
आई कधी आपल्या मुलाबाळांच्या प्रमादाची मोजदाद, हिशेब ठेवते का? तद्वतच तूही आमच्या चुकांचा हिशेब करू नको नाहीतर आम्हला कोणी त्राताच उरणार नाही. तेव्हा हे दयाघना,श्रीगुरुराया वासुदेवाची(श्रीवासुदेवानंद सरस्वती/टेंबे स्वामी) ही प्रार्थना तू रुजू करून घ्यावीस. आम्हाला चरणी तुझिया वास देई बा हरी.
हरये नमः|हरये नमः|हरये नमःl
नितीन सप्रे,
8851540881
pc:google
टीप: लेखक श्री नितिन सप्रे हे भारतीय माहिती सेवेतील अधिकारी असून सध्या भारत सरकारच्या डी.डी.न्युज,(दूरदर्शन) नवी दिल्ली येथे उपसंचालक या पदावर कार्यरत आहेत. लेखातील मते त्यांची व्यक्तीगत आहेत.
त्यांचे लिखाण https://saprenitin.blogspot.com या ब्लॉगवरही उपलब्ध आहे.

