२० व्या पार्ले महोत्सवास स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग. नवजात बाळ ते जेष्ठ नागरिक ,महिला व पोलिसांचा ही सहभाग.
मुंबई दि. २४ : २० व्या पार्ले महोत्सवास दरवर्षी प्रमाणे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पहिल्या चार दिवसांत सुमारे सात हजार स्पर्धकांसह प्रेक्षकही मोठ्या संख्येने उपस्थित असून अंदाजे दहा ते बारा हजार लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. आता पर्यंत कबड्डी, व्हॉली बॉल, ओव्हर आर्म व बॉक्स क्रिकेट तथा गायन अशा पाच स्पर्धा सुरू झाल्या असून पुढील काळात होणाऱ्या स्पर्धांना असाच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
पार्ले महोत्सवात होणाऱ्या व्हॉली बॉल स्पर्धेमध्ये मुंबई व महाराष्ट्राबाहेरील स्पर्धक येण्याच्या असलेल्या परंपरेनुसार काल चेन्नईचा ‘चेन्नई स्पायकर्स’ हा मुलींचा संघ स्पर्धेत सहभागी झाला. तसेच भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक विरल शाह हे ही यावेळी उपस्थित होते.
याच प्रमाणे कबड्डी स्पर्धेमध्ये नवीन व होतकरू खेळाडूंना संधी मिळण्यासाठी प्रमुख्याने पार्ले महोत्सवात ‘ब’ गटाचे सामने खेळविले जातात. तसेच महिला गटातील स्पर्धेमध्ये कनिष्ठ श्रेणीतील राष्ट्रीय खेळाडूंचाही सहभाग होता.
तर गायन स्पर्धेत ९ वर्षाच्या स्पर्धकांपासून ८० वर्षाचे जेष्ठ नागरिकही सहभागी झाले. या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध संगीत संयोजक श्री. विकास भाटवडेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच ‘कराओके गायन’ स्पर्धेत गेल्या वर्षी पेक्षा २५ टक्क्यांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
तसेच २० व्या पार्ले महोत्सवात नवजात बाळ ते जेष्ठ नागरिक महिला व पोलिसांनीही सहभाग घेतला.
नवजात बाळ ते जेष्ठ नागरिक तसेच महिला, युवा व पोलीसांचा सहभाग २० व्या पार्ले महोत्सवाचे आकर्षण ठरत आहे. ‘प्रत्येकामध्ये आहे काहीतरी खास’ या महोत्सवाच्या घोषवाक्यानुसार प्रत्येकाच्या आवडीच्या स्पर्धांचा समावेश असण हेच पार्ले महोत्सवाच वैशिष्ट्य असल्याचे प्रमुख आयोजक पराग अळवणी म्हणाले. याच सोबत निकोप स्पर्धा व्हावी यासाठी अधिकाधिक वयोगट तसेच निपक्ष स्पर्धेसाठी नियमांच्या काटेकोर पालनामुळे व्यावसायीक स्पर्धकांसह हौशी स्पर्धकही महोत्सवात आवर्जून येतात असेही ते म्हणाले.
महोत्सवातील अत्यंत गोंडस (Cute) वैशिष्ट्य म्हणजे सुदृढ बालक स्पर्धेतील स्पर्धक असलेल्या नवजात बालकास त्याचे पालक व आजी आजोबा घेऊन येतात तर जेष्ठ नागरिक स्पर्धेतील स्पर्धकांसाठी त्यांची नातवंडे आवर्जून येतात. तसेच महिलांसाठीच्या स्पर्धेत त्यांचे कौतुक करायला त्यांचे पतीही हजेरी लावून महोत्सवात एक परिपूर्ण कौटुंबीक वातावरण निर्माण करतात.
सुदृढ बालक स्पर्धेमध्ये सुमारे २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला तर त्यांचे गुण ठरवण्यासाठी उंची, वजन, अन्य आरोग्य व वागण्यातील निकष तपासायला डॉक्टर्स तसेच नानावटी नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीही सहभागी होतात.
महिलांसाठी तसेच जेष्ठ नागरिकांसाठी वन मिनिट गेम्सच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच टीम्स पाडून काही समूह स्पर्धा घेण्यात येतात. अनेक दिवसांनंतर ‘धम्माल’ केली अशी प्रतिक्रिया यावेळी सर्व महिला स्पर्धक आवर्जून देतात. तर जेष्ठ नागरिक आपले वय विसरून बालपण जगण्याचा आनंद घेतात. मुख्य म्हणजे जेष्ठ नागरिकांना आनंद लुटताना पाहून प्रेक्षक व कार्यकर्तेही हरवून जातात.
यंदाचे अणखीन एक आकर्षण ठरले ते पार्ले महोत्सव मधील ‘पार्ले पोलीस ठाणे’ व ‘ओशिवरा पोलीस ठाणे’ यामधील खेळला गेलेला ‘प्रेक्षणीय क्रिकेट’ सामना. आपल्या सुरक्षेसाठी अहोरात्र मेहनत करणारे पोलीस आज स्वतःसाठी थोडा वेळ काढून खेळायला आले असल्याचे कळताच प्रेक्षकांनीही त्यांना जोरदार प्रोत्साहन दिले.









