सुमारे 30 हजार स्पर्धकांसह 23 व्या पार्ले महोत्सवाची 23 डिसेंबर रोजी सुरुवात
मुंबई दि. २२ : मागील अनेक वर्षांपासून आयोजित होत असलेला मुंबईतील सर्वात मोठा महोत्सव म्हणजे ‘पार्ले महोत्सव’ दिनांक २३ डिसेंबर पासून सुरु होत आहे. यंदाच्या २३ व्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व खासदार पूनम महाजन विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील.
दरवर्षी प्रमाणे यंदाही पार्ले महोत्सवाचे स्वरूप हे विविध स्पर्धांचे आयोजन असे असून, एकूण ३२ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतील. यातील विविध वयोगट धरून सुमारे ३९२ प्रथम पारितोषिकांसह एकूण २५०० पारितोषिकं बहाल करण्यात येतील. दिनांक २३ ते ३० डिसेंबर रोजी चालणारा हा महोत्सव विलेपार्ले मधील वामन मंगेश दुभाषी मैदान, पार्ले टिळक विद्यालय व साठ्ये महाविद्यालय तसेच सहार गाव मैदान अशा विविध ठिकाणी संपन्न होईल. सातत्याने २३ वर्ष आयोजित होत असलेल्या पार्ले महोत्सवातील ३२ प्रकारच्या स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक भाग घेणार आहेत. तर या महोस्तवास यशस्वी करण्यासाठी सुमारे ८०० पेक्षा अधिक कार्यकर्ते आहेत. प्रेक्षकांसाठी भव्य स्टेडीयम उभारलेल्या वामन मंगेश दुभाषी मैदानास कबड्डी क्षेत्रातील जाणते कार्यकर्ते कै. शंकर मोडक क्रिडा नगरी, कला विभागातील स्पर्धा होत असलेल्या साठ्ये महाविद्यालयास प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर तर नृत्य स्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात जेष्ठ व श्रेष्ठ अभिनेत्री चित्रमाऊली कै. सुलोचना दीदी नगर असे नाव देण्यात येणार आहे.
सातत्याने यशस्वीपणे होत असलेल्या या पार्ले महोत्सवाच्या आयोजन समितीच्या कोर कमिटी मध्ये मिलिंद शिंदे, श्रीकृष्ण आंबेकर, विनीत गोरे, विलास करमळकर, एन. सुरेशन, प्रवीर कपूर, राजेश मेहता, अशी मंडळी असून माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता व माजी नगरसेवक अनिष मकवानी व अभिजीत सामंत यांचाही सहभाग आहे.

