विलेपार्ले पोलीस स्टेशन टीमची दैदिप्यमान कामगिरी.

“सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय”।हे महाराष्ट्र पोलिस दलाचं ब्रीद वाक्य यथार्थ ठरवणारी विलेपार्ले पोलीस स्टेशन टीमची दैदिप्यमान कामगिरी.
विलेपार्ले पूर्व येथे घरफोडीची घटना घडली आणि सहा तासाच्या आत आरोपीला गजाआड करून, चोरलेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्याची अवघड कामगिरी विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस आयुक्त जॉर्ज फ़र्नांडीस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेणुका शुभराज बुवा, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले, पोलीस उपनिरीक्षक भरत गुरव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप उदागे, पोलीस शिपायी संतोष कांबळे/११३१५९, पोलीस शिपायी सचिन पुलाते/१११४८६, पोलीस शिपायी सचीन राठोड/ ११०४९८. या टीमने करून दाखवली.

ही कौतुकास्पद कामगिरी पार पाडतांना घडलेला घटनाक्रम असा…

दिनांक २२ जून २०२४ ला साधारण साडे अकरा वाजता रमा गुलाब अपार्टमेंट येथे केअर टेकर म्हणून काम करणा-या इसमाने, फ्लॅटचे मालक हिरेन हे सहकुटुंब गोव्याला गेलेले असल्याने, जवळच्याच बिल्डिंग मधे रहाणा-या, फ्लॅटच्या मालकाच्या आईला फोन करून, हिरेन यांच्या फ्लॅटच्या घरफोडीची बातमी दिली.

आपल्या मुलाच्या घरी घरफोडी झाली आहे हे समजताच जोशी हे वृध्द पतिपत्नी तात्काळ घटनास्थळी पोचले. केअर टेकरने सांगितल्या प्रमाणे घरातील कपाट उघड्या स्थितीत होते, कपाटातील काही वस्तू बिछान्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या स्थितीत होत्या. त्यात सोने चांदी ठेवण्याचे रिकामे बॉक्स दिसल्याने जोशी दांपत्याने ती माहिती पोलिसांना दिली.

विलेपार्ले पोलीस स्टेशनची टीम तातडीने घटनास्थळी पोचली. निरीक्षण, जाबजबाब, फिंगरप्रिंटस तसेच सी.सी. कॅमेरा फुटेज घेणे अशी सर्व कारवाई करण्यात आली. २१ तारखेला सकाळी ११ वाजता कामवालीने घराची साफसफाई केली होती तेंव्हा सर्व सुस्थितीत होते असं तिने सांगितलं होतं.

पोलीस टीमने अत्यंत बारकाईने सी सी टीव्ही कॅमेरा फुटेज तपासले. २२ तारखेला अगदी पहाटे कुणीतरी हॉलच्या खिडकीमधून प्रवेश केल्याचे लक्षात येताच. कॅमे-यात दिसणा-या व्यक्तीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करून तपासाची दिशा ठरली. बांधा, शरिराची ठेवण, चालण्याची लकब, तसेच अशा पध्दतीच्या घरफोड्या करणा-या संभावित गुन्हेगाराचे नाव लक्षात आले. तो मोबाईलचा वापर करत नाही हे ही पोलिसांना माहीत असल्याने, त्याचे वास्तव्य तसेच तो व्यसनपूर्तीसाठी कुठे जाऊ शकतो याचा अंदाज घेत शोध सुरू झाला आणि चोराला जेरबंद करण्यात आलं.

रोकड रक्कम तसेच मौल्यवान वस्तु अशी साधारण त्रेचाळीस लाख, पंच्याहत्तर हजाराची चोरी करून हा चोर अजमेर शरीफ दर्ग्याला जाणार होता. त्यासाठीचे त्याने तिकिटही काढले होते.

विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या टीमने अत्यंत जलद गतीने कामगिरी केली नसती तर चोर तसेच चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हाती येणं शक्य झालं नसतं. बुध्दी चातुर्य, अनुभव, कसोशीने तपास, गतीपूर्ण हालचाली करत झालेली कारवाई ह्यासाठी विलेपार्ले पोलीस स्टेशन टीमचे हार्दिक अभिनन्दन आणि कौतूक!

चारुलता काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu