|| मुंबईतील “आदिशक्ती ” ||
नऊ दिवस भीषण युद्ध करून दैत्यांचा करणाऱ्या महिषासुरमर्दिनीचा तसेच आदिशक्तीची आराधना वा तिचा जागर करण्याचा सण म्हणजे “नवरात्री उत्सव”. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या देवीचा उपासनेचा काळ. या नवरात्रौत्सवाच्या काळात घरोघरी वा मंडपात देवीची घटस्थापना करून, अखंड नंदादीप तेवून , वेगवेगळ्या फुलांची आरास, देवीचा पाठ आणि जागरण करून हे व्रत केले जाते . महाराष्ट्राप्रमाणे भारतामध्ये विविध राज्यात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजा, दिल्लीत रामलीला, पंजाबमध्ये जगराता, तर गुजरातमध्ये कलरफुल नवरात्री साजरी करताना दिसून येते . त्यातच खास म्हणजे मुंबईत साजरा होणारा नवरात्री उत्सव.
गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबईत वेध लागतात ते नवरात्रौत्सवाचे. देवी विविध रूपात अनेक मंडळात विराजमान झाली आहे . कुठे सिहासनावर, कुठे मोरावर, कुठे रुद्र रूप धारण केलेली देवी असे असे देवीचे अनेक विविध देवींची रूपे आपल्याला या मंडळात पाहायला मिळणार आहेत . चला तर मग भेटूया या आदिशक्तीच्या विविध रूपांचे दर्शन घडवणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध नवरात्रौत्सव मंडळांना..
१) जीएसबी सभा नवरात्रौत्सव:-
गेली ८ वर्षे मुंबईतील ५ लाख गौड सारस्वत ब्राम्हण सभा समुदाय एकत्र मिळून हा नवरात्रौत्सव साजरा करतात. शिक्षा, सामाजिक, सांस्कृतिक आणि स्वास्थसंबंधित सेवा ही गरजू लोकांपर्यंत पोहचवणे हा मंडळाचा मुख्य उद्देश. हा नवरात्र उत्सव सारस्वत कल्चरल आणि रिक्रिअशन सेंटर, एन. एल. कॉम्प्लेक्स, दहिसर-पूर्व येथे दरवर्षी पारंपरिक पद्धतीने पार पडला जातो. १९८६ साली धर्मगुरू श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वामीजी वाराणसी यांच्या हस्ते मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे नऊ दिवस देवीला दिली जाणारी नऊ विविध रूपे. यावर्षी क्रमश: १० ऑक्टोबरला – सरस्वती देवी, ११ ऑक्टोबरला – अन्नपूर्णा देवी, १२ ऑक्टोबरला – चामुंडेश्वरी देवी, १३ ऑक्टोबरला – महालक्ष्मी देवी , १४ ऑक्टोबरला – माता दुर्गापरमेश्वरी देवी, १५ ऑक्टोबरला – शांतादुर्गा देवी, १६ ऑक्टोबरला – चंडिका देवी, १७ ऑक्टोबरला – महाकाली देवी, 18 ऑक्टोबरला – वैष्णवी देवी, १९ ऑक्टोबरला – शारदा देवी अशी विविध रूपात देवीची पूजा केली जाणार आहे . देवीचे हे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमते. या सजावटीसाठी १०० प्रॉप्सचा वापर केला जातो. हि विविध रूपे साकारण्याचे काम हे मंगलोर, मुंबई वा या मंडळातील अनेक कार्यकर्ते करतात. या विविध रूपातील म्हणजेच सरस्वती देवीची वीणा,महालक्ष्मी देवीसाठी कमळ, अन्नपूर्ण देवीची आरास साकारण्यासाठी विविध भाज्यांचा वापर केला जातो, तसेच अन्नपुर्णा देवीसाठी वापरण्यात येणाऱ्या भाज्यांचा उपयोग हा महाप्रसाद मध्ये केला जातो. देवीला अर्पण करण्यात आलेल्या साड्या भक्तांना प्रसाद स्वरूपात दिल्या जातात. नवरात्रौत्सवमध्ये दररोज दुपारी व रात्री महाआरती तसेच दांडिया रास गरबा खेळा जातो. मंडळात दरवर्षी नवरात्री उत्सवात महिला भाविकांकडून देवीच्या नावाचा जप केला जातो. तसेच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, गरबा, भजन कीर्तन, सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम आयोजित केले जातात. भक्ताच्या देणगी रूपात येणाऱ्या पैशातून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर इत्यादी कार्यक्रम राबविले जातात.
२) अखिल भटवाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, घाटकोपर :-
घाटकोपर पश्चिमेस भटवाडी बर्वेनगर येथे असलेले प्रसिद्ध नवरात्रौत्सव मंडळ म्हणजे अखिल भटवाडी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ. हे मंडळ येथे स्थित असलेल्या माता महाकाली सेवा मंडळ संचालित आहे . अशा या मंडळाला प्राचीन इतिहास लाभला आहे. घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी येथे “माता महाकालीचे “मंदिर आहे. या मंदिराची उभारणी करण्यात स्वामी शामानंद यांचा मोठा वाटा आहे . कर्नाटक उडिपी येथून मुंबईत स्थायिक झालेल्या स्वामी शामानंद यांची देवी महाकालीवर अपार भक्ति होती. देवीचे मंदिर बांधण्याचा मानस असलेल्या स्वामींनी १९५३ ते १९५९ साली देवीचे मंदिर बांधले. मंदिरामध्ये आई महाकालीची अर्धाकृती चांदीची मुर्ती स्थापना करून ते नित्यनियमाने पूजाअर्चा करत असे . आजही नवरात्रौत्सवात पुजेची देवी म्हणून गंधफुल वाहण्यासाठी अंबेमातेसमोर स्थापन केली जाते. स्वामींच्या काळापासून मंदिर आवारात मकरसंक्रांती, दत्तजयंती आणि नवरात्रौत्सव असे अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत असे. कालांतराने मंदिराचा जीर्णोद्धार करून १९७३ साली मंदिरात महाकालीची चतुर्भुज पूर्णाकृती मुर्ती, आई अंबिका तसेच आई रेणुका अशा तीन संगमरवरी मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आईच्या मंदिरात गाऱ्हाणे, साकडे घातल्यामुळे आपल्या मनोकामना पुर्ण होतात अशी भक्तांची धारणा असुन नवरात्रीत हजारो भक्तगण परिवारासह दर्शनास येतात.
अशा या मंदिराच्या आवारात साजरा होणाऱ्या नवरात्रौत्सव विशाल रूप घेऊ लागला . कालांतराने नवरात्रौत्सव मंडळाची स्थापना १९६९ साली करण्यात आली. घाटकोपरची आई महाकाली म्हणुन प्रसिद्ध असलेल्या मंडळाचे यंदाचे ५० म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्ष. सुप्रसिद्ध मूर्तिकार कै. विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू यांनी देवीची मुर्ती साकारली असुन यंदाच्या महाकाली देवीच्या हातात वीणा व एका हातात कमळ आहे . देवीच्या प्रभावळी ब्रह्माची मुर्ती विराजमान आहे . मंडळाचे खास आकर्षण कु. अभिषेक आणि कु. ऋषिकेश ज्ञानेश्वर शेलार यांच्या कल्पनेतुन साकार झालेल्या श्री अष्टलक्ष्मी मंदिरात महाकाली विराजमान झाली आहे. मंडळाच्या परिसरात भव्य भटवाडी जत्रेचे आयोजनही केले आहे. मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टमीला होणारा होमहवन आणि रात्री बारानंतर साजरा होणार ” काळरात्र उत्सव “. या काळरात्री स्थानिक मुले भुतांची वेशभुषा करून हातात पेट्या मशाली आणि दिवट्या घेऊन मंदिराच्या सभामंडपाभोवती नाचवल्या जातात. स्वामी शामानंद यांच्यापासून सुरुवात झालेली हि परंपरा पाहण्यासाठी भाविक आतुरतेने वाट बघत असतात. त्याचबरोबर दांडिया रास, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच स्त्री शक्तीचा सन्मान व विविध कलाकारांचा सन्मान देखील केला जातो. विविध रुग्णालयातील डॉक्तरांतर्फे मोफत आरोग्य शिबिर राबविले जाते.
३) उमरखाडी सार्वजनिक गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव मंडळ :-
दक्षिण मुंबई उमरखाडी स्थित प्रसिद्ध असलेले नवरात्रौत्सव मंडळातील देवी ” उमरखाडीची आई ” म्हणुन प्रसिद्ध आहे. १९५६ साली स्थापन झालेल्या मंडळाचे ६२ वे वर्ष असुन गणेशोत्सवाप्रमाणे मोठ्या थाटामाटात नवरात्रौत्सव मंडळ साजरा केला जातो. मंडळाची स्थापना स्वातंत्र्य सैनिक कै. बाळू चांगु पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. त्यावेळी उमरखाडी विभाग हा इतर धर्मियांनी वेढलेला होता त्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तसेच स्वातंत्र्यानंतर सर्व बांधवानी व भगिनींनी एकत्र यावे व एकोप्याने सामाजिक कार्य करता यावे यासाठी त्यांनी या मंडळाची स्थापना केली.
या मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे देवीची मुर्ती. ४८ वर्षापुर्वीच घडवलेली देवीची मुर्ती नेत्रदीपक असते. १९७० साली वसईस्थित सिक्वेरा बंधू यांनी ७ फूट उंचीची अष्टभुज सिंहारूढ देवीची मुर्ती साकारली आहे. मुर्तीची विशेषतः म्हणजे देवीची संपूर्ण मुर्ती व सिंह हे चंदनाच्या खोडापासुन बनवली आहे. ही मुर्ती फोल्डिंगची असुन सिंह हे तिचे अखंड वाहन आहे . देवीची अशी घडवली आहे की ती दोन रचनांमध्ये स्थापन करता येते. ही देवी एक वर्ष उभी तर एक वर्ष सिंहावर विराजमान असते . यंदा देवी ही सिंहावर विराजमान आहे . देवीचे विलोभनीय रूप अविस्मरणीय असावे म्हणुन मुर्तीकाराने देवी व सिंहाचे आकर्षक नेत्र ऑस्ट्रेलियामधून आयात करून मूर्तीमध्ये बसवले आहे त्यामुळे जणू देवी प्रकट झाल्याचा आभास होतो. मूर्तिकार सिक्वेरा बंधू हे स्वतः ख्रिस्ती धर्मीय असुन ते सहकुटुंबीय देवीच्या दर्शनाला येतात. नवरात्रौत्सव दरम्यान गरबा, दांडिया, नृत्य स्पार्धा, सर्वांसाठी खुले वक्तृत्व स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, तसेच मार्गशीष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी महिलांसाठी मुंबई येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन घडवले जाते . तर २५ डिसेंबर रोजी दरवर्षी बालगोपाळांसाठी भव्य बाळमेळावा आयोजित केला जातो .
४) त्रिमुर्ती नवरात्रौत्सव मंडळ, शिवडी :-

शिवडी पश्चिम ठाकेरशी जीवराज मार्ग येथे असलेले प्रसिद्ध नवरात्रौत्सव मंडळ म्हणजे “त्रिमुर्ती नवरात्रौत्सव मंडळ “. १९८९ साली या मंडळाची स्थापना झाली असुन “शिवडीची माउली ” या नावाने प्रसिद्ध आहे. २९ व्या वर्षात पदार्पण केलेल्या मंडळातील देवीचे मूर्तिकार उमेश मोहिते असुन यांनी साकारलेली मुर्ती पाहण्याजोगी असते. १३ फूट उंच असलेल्या यावर्षी देवीची चतुर्भुज मुर्ती मयूर पंखांची प्रभावळ असलेली सुंदर अश्या मोरावर विराजमान झाली आहे. दरवर्षी विविध देखावा वा संदेश देणाऱ्या या मंडळात मुंबई अशा विशाल शहरातून लोप पावणाऱ्या चिमणी या पक्ष्याला वाचवण्याचा संदेश मंडळ देत आहे. मुंबई सारख्या विशाल शहरात वाढत्या शहरीकरणामुळे होणारी वृक्षतोड, काँक्रीटीकरण यांमुळे चिमणी, कबुतरासारख्या पक्ष्यांची घरटी शिल्लक राहिली नाही आहे. त्यामुळे ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्हणुन “या चिमण्यांनो परत फिरा रे…..”, “चिमणी वाचवा…निसर्ग वाचवा…” असा सामाजिक संदेश हे मंडळ यावर्षी देत आहे. त्याचबरोबर नवरात्रौत्सवात मंडळात गरबा, स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ, होम मिनिस्टर स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धा तसेच समाजोपयोगी कार्यक्रम म्हणजे आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन मंडळात केले जाते.
५) अमर मित्र मंडळ, फोर्ट ( फोर्टची इच्छादेवी माँ ) :-

मुंबईतील गजबजलेले आणि वर्दळीचे ठिकाण तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ठिकाण म्हणजे फोर्ट विभाग. या फोर्ट विभागातील प्रसिद्ध नवरात्रौत्सव मंडळ म्हणजे अमर मित्र मंडळ. १९७९ साली स्थापना झालेल्या मंडळाचे यंदाचे ४० वे वर्ष आहे . मंडळातील चतुर्भुज देवीची मुर्ती ही सुप्रसिद्ध मूर्तिकार रमेश रावले यांच्यातर्फे घडवली जाते. पूर्वी मंडळाच्या आवारात लहान अंबे मातेचे मंदिर होते आज या मंदिराला भव्य रूप प्राप्त झाले आहे. मंदिरातील अंबे मातेची देवी मोहक असुन ती नवसाला पावणारी आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण करणारी अशी भाविकांची श्रद्धा आहे . म्हणुन या देवीला ” इच्छादेवी माँ ” म्हणुन संबोधले जाते. यावर्षी मंडळात “भारतमातेच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या आमचा सलाम” असा सामाजिक संदेश देणारा आहे. भारतीय पोलीस, सैन्यदल, वायुदल आणि नाविक दल यांचा मान राखण्याचा यावर्षीचा मंडळाचा हेतू आहे. अंबे मातेच्या प्रभावळी भारताचे मुख्य सैनिक यांचे स्तंभ आहे. मंडळात नवरात्रौत्सव दरम्यान दांडिया रास, गरबा इत्यादी कार्यक्रम असतात. तसेच मंडळाचा विशेष कार्यक्रम म्हणजे प्रत्येक वर्षाच्या ३१ डिसेंबरला मंडळाच्या वतीने इच्छादेवी प्रीमियर लीगचे आयोजन केले जाते. यात खास ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. तसेच वर्षभर गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, विद्यार्थी गुणगौरव सोहळा, दहीहंडी इत्यादी कार्यक्रम राबवले जातात.
६) सिद्धेश्वर मित्र मंडळ, गुंदवली :-
मुंबई उपनगरातील अंधेरी पूर्वेला गुंदवली येथे प्रसिद्ध असलेले नवरात्रौत्सव मंडळ म्हणजे सिद्धेश्वर मित्र मंडळ. ” गुंदवलीची आईभवानी ” अशी ख्याती असलेल्या या मंडळाचे यंदाचे २२ वर्ष आहे . १९९६ साली स्थापना झाल्यापासून ते आतापर्यत देवीची यथासांग पुजा मंडळात पार पडली जाते. सामाजिक एकोपा आणि सामाजिक बांधिलकी दृढ व्हावी या हेतूने तरुणांनी या मंडळाची स्थापना केली आहे. २० फूट उंच अशी देवीची मुर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील यांनी घडवली आहे. मुंबई उपनगरतील नवरात्रौत्सव मंडळापैकी सर्वात उंच अशी देवी असुन यावर्षी अष्टभुज मातेची मुर्ती सिंहाच्या अंबारीत विराजमान आहे. मंडळात देखाव्यावर भर ना देता दरवर्षी देवीच्या विविध रूपांवर भर दिला जातो . देवीची मुर्ती ही मंडळाची आकर्षण बिंदू आहे. नवरात्रौत्सव दरम्यान मंडळात जागरण गोंधळ, विविध विभागातील महिलांच्या भजनाचे कार्यक्रम, महाप्रसाद, गरबा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन मंडळात केले जाते .
७) चिराबाजार ताडवाडी नवरात्रौत्सव मंडळ, मरीनलाईन्स:-

” दक्षिण मुंबईतील सर्वात उंच मुर्ती “असे ख्यातनाम असलेले मंडळ म्हणजे चिराबाजार ताडवाडी नवरात्रौत्सव मंडळ. १९६२ साली स्थापन झालेल्या मंडळाचे यंदाचे ५६ वे वर्ष आहे. मंडळातील १५ फूट उंच देवीची मुर्ती सुप्रसिद्ध मुर्ती ही रेश्मा खातू यांनी साकारली आहे. मंडळातील पूर्वजांनी नवरात्रौत्सवाची जी परंपरा सुरु केली आहे ती परंपरा मंडळातील तरुण कार्यकर्ते आजही चालवत आहे. यावर्षी मंडळातील चतुर्भुज देवीच्या प्रभावळी राजहंसाचे दर्शन घडून येत आहे. मंडळातील देवीच्या कपाळावरील प्रभा भक्तांच्या दृष्टीस पडताच एक विलोभनीय व आनंदाची छटा भक्तांच्या चेहऱ्यावर उमटते. देवीला अर्पण करण्यात आलेल्या साड्यांचे आदिवासी पाड्यात वाटप केले जाते. अष्टमीला होणारा होमहवन आणि गोंधळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तांची गर्दी असते. मंडळाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे अष्टमीच्या दिवशी आरती नंतर जो गोंधळाचा कार्क्रम आयोजित करण्यात येतो तो फेसबुक लाईव्ह द्वारे फेसबुक वर प्रदर्शित केला जातो जेणेकरून ज्या भाविकाला प्रत्यक्षदर्शनी मंडळात यायला जमत नाही ते यामाध्यमाद्वारे या कार्यक्रमाचा आनंद घेतात.
८) शिवालय प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, धारावी :-

सायन धारावीस्थित संत रोहिदास मार्ग पारशी चाळीत दिमाखात वसलेले सुप्रसिद्ध नवरात्रौत्सव मंडळ म्हणजे शिवालय प्रतिष्ठान सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ. १९४८५ साली स्थापना झालेल्या मंडळाचे यंदाचे ३३ वर्ष आहे. मंडळातील देवीला ” धारावीची कुलस्वामिनी ” म्हणुन संबोधले जाते . मंडळाने विविध कार्यक्रमातून समाज प्रबोधन व समाजोपयोगी कामे करून विभागात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यंदाची मंडळातील अष्टभुज शस्त्रधारी देवीची मुर्ती २२ फूट उंच असुन वाघांवर विराजमान झाली आहे . देवीची विलोभनीय मुर्ती ही मूर्तिकार कुणाल पाटील यांनी तयार केली आहे. मंडळ विविध सामाजिक संदेश देणारे फलक या उत्सवाच्या दरम्यान लावले जातात . दरवर्षी देवीच्या मूर्तीला भव्य व विलोभनीय असे रूप देउन मूर्तीबद्दल आकर्षण वाढवण्याचा कल हा मंडळाचा असतो. मंडळात नवरात्री उत्सवादरम्यान आरोग्य शिबिर, नेत्र चिकित्सा शिबीर असे कार्यक्रम त्याचबरोबर लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा, गरबा, दांडिया इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशा या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
९) नवजीवन मित्र मंडळ, कुर्ला (पश्चिम ) :-

कुर्ला पश्चिम सुंदरबाग येथे प्रसिद्ध असलेले नवरात्री उत्सव मंडळ म्हणजे ” नवजीवन मित्र मंडळ “. मंडळातील देवीला ” सुंदरबागची माताराणी ” या नावाने संबोधले जाते. १९७६ साली स्थापन झालेल्या या मंडळाचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे. ८ फूट उंच अष्टभुजाधरी देवीची मुर्ती रेश्मा विजय खातू यांनी साकारली आहे. यंदाची मंडळींची देवी आसनाधीश असुन देवीच्या मागे गजमुखांची प्रभावळ आहे. अशी सुंदरबागची माताराणी यावर्षी मंडळातील कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लाल महालात विराजमान झाली आहे. मंडळाची स्थापना समाजात एकोपा व आपली संस्कृती जपण्यासाठी या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या माताराणीच्या आगमन सोहळा पाहण्याजोगा असतो. नवरात्री उत्सवात मंडळात लहान मुलांसाठी वेशभुषा स्पर्धा, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच कोकणातील प्रसिद्ध शक्ती तुऱ्यांचा जंगी सामनादेखील असतो. त्याचबरोबर सुस्वर भजन, हनुमान जयंती आणि भंडारा, गोकुळाष्टमी इत्यादी कार्यक्रम वर्षभर मंडळातर्फे साजरे केले जातात.
-प्रसाद प्रभाकर शिंदे

