“ खादयसंस्कृती अस्सल पार्लेकरांची..
“ खादयसंस्कृती अस्सल पार्लेकरांची – अस्सल पार्ल्याची”
“पु. ल. देशपांडेनी म्हटल्याप्रमाणे. हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेल हे चिमुरडं उपनगर पार्ले ! या पार्ल्याला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे य पार्ल्याचे चोखंदळ खवैय्ये पार्लेकर!”
या आपल्या पार्ल्याने प्रत्येक प्रांतातलं वेगळेपण, वैशिष्टय आपल्यात सामावून घेतलयं, दक्षिणेकडला इडली डोसा आणि उत्तरेकडली समोसा कचोरी आपली मानलीयं; पण तरीही पुणेरी मिसळ, खमंग थालीपीठ, साबुदाणा खिचडी यांच वेगळेपण तेवढयाच प्रेमाने आपल वैशिष्टय म्हणून जपलयं.
सगळीकडचं चांगल उत्तम ते घेऊन त्यात आपली भर घालून एक रूचकर अन वेगळी अशी स्वत:ची खादयसंस्कृती तयार करण्याचं काम करायला इथल्या चोखंदळ पार्लेकरांनी खूप पूर्वीपासूनच सुरूवात केलीय.अगदी 50 वर्षापूर्वी पावनगडकरांचा विलेरी चिवडा याहून मोठी चैन देणारे पार्ल्यात हाँटेल नव्हते आणि पार्ल्यातल्या अविवाहितांना नामजोशांची खाणावळ हा एकमेव आधार होता.
खंरतरं पूर्वी बाहेर हाँटेलात जाऊन खाण्याची पध्दत फारशी प्रचलीत नव्हती. स्नँक्स, जंक फूड पेक्षा राईस प्लेट जास्त खपायची सकाळी 9ला जेवण सुरू आणि दुपारी 1 ला बंद अशी पध्दत होती. चहा, काँफी 1 आण्याला, मिसळ 2 आण्याला, मसाला डोसा 4 आण्याला आणि राईस प्लेट 6 आण्याला असा तो काळ होता. खिशात 10 रूपयांची नोट म्हणजे जणू श्रीमंतीच!
पुढे काळ लोटत गेला तसतसे पार्लेकरांच्या जीभेचे चोचले पुरवण्याचे नवनवीन मार्ग निघत गेले. यात आपला मराठी पार्लेकर मुळीच मागे नव्हता. 1951 मध्ये अप्पा जोगळेकरांनी सुरू केलेल हाँटेल ‘जीवन’ आजही पार्लेकरांच्या खादयसंस्कृतीत अग्रस्थानावर आहे. सुरूवातीला चहा, काँफी, भजी, राईसप्लेट पासून सुरूवात झाली पण काळाप्रमाणे बदलत गेल्याने आज इथे पंजाबी आणि चायनिज यासारखे पदार्थही सरळ उपलब्ध आहेत. पूर्वीचे 9 ते 1 च जेवण बंद होऊन आता पार्ल्याच्या कोणत्याही हाँटेलमध्ये अगदी दिवसभर हवे ते पदार्थ मिळू शकतात.
मराठी माणसांचं सांगाल तर कोथिंबीर वडी आणि मिसळ यांच्यासाठी फेमस असलेलं , साबुदाणा वडा स्पेशालिस्ट पणशीकरांचं हाँटेल हे सगळे आपलं वेगळेपण उत्तमपणे दर्शवतात.
पार्ले टिळकच्या बाबूचा वडापाव, शर्माची भेळपूरी आणि पार्ल्याच्या शाळा – काँलेजच्या गल्ल्यांमधील सँडवीच, दाबेलीच्या गाडया! नुसतं वाचूनच तोंडाला पाणी सुटतं. फक्त महाराष्ट्रीयनच नव्हे तर गुजराती, साऊथ इंडीयन, पंजाबी सार्याच डिशेस पार्ल्याच्या खादयसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनलेल्या आहेत. म्हणूनच तर इडली – डोसासाठी फेमस असलेलं पूर्वेचं रामकृष्ण वा पश्चिमेचं राधाकृष्ण, पावीभाजी स्पेशालिस्ट शिवसागर, डँफोडील्स असो किंवा अगदी दिमाखात मिरवत हाँटेलमध्ये जायचा शाँक असणार्यांसाठी फेमस असं पश्चिमेचं पाँपीलोन, प्राइम किंवा प्राईड सगळीच हाँटेल्स पार्ल्याची शान आहेत.
अहो यंगस्टर्ससाठी पार्ल्यात काही कमी नाही, अगदी मँकडोनाल्डसच्या बर्गरपासून कँफेकाँफी डे च्या काँफीसाठी तरूण – तरूणींची गर्दी असते आणि गोकुळचा चहा तर वर्षानुवर्ष काँलेजिअन्ससाठी गप्पांचा अड्डाच आहे. कोस्टल फूडसाठी पूर्वेचे ‘गजाली’ आणि पश्चिमेचे ‘मंगेश’ हाँटेल आहेच.


“ऑलिवा पिझ्झा तर पार्लेकरांच्या इतक्या पसंतीस पडत आहे की हनुमान रोड च्या कॉर्नर वर असणाऱ्या या रेस्टोरेंट मध्ये खवय्या पार्लेकर त्यांचा पिझ्झा, लाझानिया , पास्ता, सूप्स , सॅलड्स असे पदार्थ बोट चाटत चाटत खातात . सगळ्यांनी एकदा तरी इथे येऊन याची मजा चाखायलाच हवी!! “
हल्लीच खूप जास्त ट्रेंडिंग असणारे बरेच कॅफे पार्ल्यात उघडले आहे. तरुण पिढीसाठी जसे काही कॅफे संस्कृतीच तयार झाली आहे. टी विला , नॉट जस्ट कॅफे , फ्रेंड्स बेंच अशा विविध कॅफेस मध्ये इंडियनच नाही तर मेक्सिकन , इटालियन, लेबनीस असे पदार्थही मिळतात.
पश्चिमेला जुहूसारखं फिरण्याचं आणि उत्तम पोटपूजा करण्यासाठी दुसरे ठिकाण नाही! पाणीपूरी, भेळ्पूरी, आईसक्रिम ! एवढच नव्हे तर मक्याच कणीस खात आणि नारळपाणी पिता पिता संध्याकाळ कशी संपते ते कळतचं नाही. आणि मग गप्पा मारता मारता किनार्याशेजारच्या सेंटाँर, J.W. मँरीओट, सन & साईन या हाँटेल्समध्ये ट्रिट कोणाकडून दयायची हे बेत ठरायला लागतात.
अहो, हाँटेल्सच काय! इथले लग्ना-मुंजीसाठी उत्तम तयारी करून देणारे अन्नपूर्णा , राधाकृष्ण, धनश्री , अजय सारखे कँटरर्स आपल्याला जेवणाचे एवढे options देतात की, ‘पूर्वी आपल्या लग्नात फक्त बुंदीच्या लाडवांची पंगतच का होती? ‘ अशी हळहळ काही वृदध जोडप्यांना वाटल्यावाचून रहात नाही.
उत्तम घरगुती पदार्थही पार्ल्यात मिळणे अगदी सोपे! पूर्वेकडील चकली, चिवडा सारख्या पदार्थांसाठी फेमस असलेले ‘विजय स्टोअर्स’ , ‘प्रभू कृपा’, ‘फडके’, ‘रूची’, ‘चँपिअन’ किंवा पश्चिमेकडील वेगवेगळ्या पिठांसाठी प्रसिदध ‘हरीया स्टोसर्स’ आणि लोणचे स्पेशालिस्ट आपले ‘ठक्कर’ ही सारी दुकाने ओरडून सांगतात, ‘अहो! हे पार्ले आहे इथे खवैय्यांची आणि खायला घालणार्यांची कमी असेलच कशी?’
- Chanda Mantri

