जय श्री राम…©मंदार जोग

लहानपणी हातातील एखादी खाण्याची गोष्ट खाली पडली की ती परत उचलून खायची की नाही हे आम्ही मुल एका प्रश्नाच्या उत्तरावरून ठरवत असू. तो प्रश्न होता “राम की भूत?” मित्र भूत म्हणाले तर वस्तूला हात न लावता निघून जायचं पण मित्र राम म्हणाले तर पडलेली वस्तू उचलायची, थोडी साफ करून, पुसून बिनधास्त तोंडात टाकायची. ह्यात मित्रांनी राम म्हटल्यावर मातीत पडलेल्या फळांच्या फोडी, गोळ्या अश्या वस्तूही फक्त चड्डीला पुसून तोंडात टाकलेल्या आहेत. पण रामाच्या विश्वासावर तोंडात टाकलेली कोणतीही वस्तू कधीच बाधली नाही!

मला लहान असताना बिल्डिंग मधील एका मुलाने चाळीच्या जिन्यात रामा गाड्याच भूत आहे सांगून प्रचंड भीती घातली होती. संध्याकाळी जिन्यातून चालायला मी घाबरत असे. हे आईला कळल्यावर ती आधी मला पिकेट रोड हनुमान मंदिर आणि नंतर गोऱ्या रामाच्या देवळात घेऊन गेली. हनुमानाचा गंडा गळ्यात घातल्यावर आणि लगेच काही वेळात त्याच्या तेजस्वी बॉस रामाला भेटल्यावर माझी भीती कायमची पळून गेली. ज्या जिन्यात मला भूत दिसायचं तिथे गोरा राम, त्याच्या पायाशी बसलेला चड्डीवाला हनुमान आणि त्या हनुमानाला त्याचाच गंडा घालून नमस्कार करणारा मी दिसू लागलो. त्या प्रसंगातून राम म्हटल्यावर भीती नष्ट होते, बलशाली हनुमानाचा बॉस राम म्हणजे काय ताकद असेल हे मनात कायमच कोरल गेलं. त्यानंतर आजतागायत भीतीच्या प्रसंगी क्षणभर डोळे मिटले की गोऱ्या रामाची मूर्ती नजरेसमोर तरळते आणि भीती नष्ट होते!

वय वाढत होतं तसा काहीही कळत नसताना आरती सप्रेम मध्ये “मिळोनि वानर सेनाsssss….,मिळोनि वानर सेना राजा राम प्रकटला” असे ओरडायची मजा देणारा प्रभू रामचंद्र विविध रुपात भेटत गेला. अधिकाधिक उमगत गेला. कधी चौपाटीवर होणाऱ्या रामलीला मधून, कधी रामनवमीच्या उत्सवामधून, कधी आजीकडून ऐकलेल्या रामाच्या कथांमधून, कधी गदिमांच्या गीत रामायणातून, तर कधी अनुप जलोटाच्या भजनातून. मग रामाची खूप जवळून आणि सखोल ओळख घडवली ती रामानंद सागरच्या रामायण ह्या मालिकेने. रामायणातील बारीक बारीक तपशील, फार माहीत नसलेल्या व्यक्तीतरेखा सदर मालिकेमुळे लक्षात आल्या. अरुण गोविलचा राम, दीपिका ची सीता, दारासिंगचा हनुमान, अरविंद त्रिवेदीचा रावण आणि सुनील लाहीरीचा लक्ष्मण देखील कायम स्वरूपी लक्षात राहिले! त्या मालिकेने संबंध देशाला रामायणाचा ह्याची देही ह्याची डोळा अनुभव दिला.

रामाच आणखी एक वेगळंच रूप दिसलं ते रामजन्मभूमी, रथयात्रा नामक एका चळवळीच्या निमित्ताने. अनेक कामात “जय श्री राम” किंवा “सियावर रामचंद्र की जय” ह्यातून चैतन्य, उत्साह, एखादी सुरुवात फुलवणारा राम स्मशानाच्या वाटेवर “जय राम…श्री राम” किंवा “राम नाम सत्य है” असा धीरगंभीर ऐकू आला की विश्वाची, आयुष्याची सुरुवात आणि शेवट तोच आहे ह्या वैश्विक सत्याची जाणीव करून देतो आणि अंगावर काटा येतो!

कधी साध्या रामराम मधून राम नाती जोडून देतो दृढ करतो, कधी दारावर, ट्रकवर लावलेल्या “श्री राम” अश्या स्टिकर मधून लोकांना प्रचंड आत्मविश्वास देतो, राम नावाने सुरू झालेल्या असंख्य शहरांच्या आणि गावांच्या नावात तो वसत असतो, आमच्या अनेक मित्रांच्या वडिलांच्या “रामचंद्र किंवा राजाराम” ह्या नावातून तो आम्हाला आठवत असतो. कधी तो सिनेमात “हाय रामा ये क्या हुवा? किंवा “रामा रामा गजब होई गवा है” असा विभत्स केला जातो तर कधी आमच्या कन्येच्या लहानपणी तिच्या बोबड्या बोलातून तो “अश्य श्ली लामलक्षा तोत्य मंतश्य” असा निरागस होऊन जातो!

पुत्र, बंधू, नवरा, बाप, राजा, देव, शत्रू, मित्र, योद्धा ह्या सर्व भूमिकात ज्याचा आदर्श ठेवावा असा राम आणि त्याच रामराज्य सद्य कलियुगात फारसं बघायला मिळत नाही. अनेक ठिकाणी रावण आणि रावणाचं उदात्तीकरण अनुभवायला मिळतं. पण विश्वाची निर्मिती, सुरुवात आणि अंत ज्याच्या हातात आहे तो राम वर बसून बघत असतो. जेव्हा जेव्हा रावणाचं पाप वाढत तेव्हा त्याला यायचं असत. पृथ्वीवर परत एकदा रामराज्य फुलवायच असत. त्याच्यावर विश्वास असणाऱ्या त्याच्या भक्तांना संकटातून, जाचातून मुक्त करायला तो येतच असतो. फक्त मनात श्रद्धा आणि तोंडात दिवसातून काही वेळ तरी “श्री राम” असावं!

जय श्री राम! सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

©मंदार जोग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu