“ डिशवॅाशर -मैत्री पारंपारिकतेशी !!” ©️ अनुजा बर्वे .

“ विद्या , आज कागं बै उशीssर ?”

हा प्रश्न अर्थातच मी ( वाट बघायला लागल्यामुळे थोडी धाकधूक वाढलेल्या अवस्थेत 😔) कामवाल्या बाईला विचारला.

ह्या प्रश्नातल्या आज चं तसं काहीच वैशिष्टय नाहिये खरंतर !😛 हा शब्द, * काल , परवा* किंवा * उद्या परवा* ह्या कशानेही रिप्लेस होऊ शकतो असं अगदी सहज वागतात ह्या मोलकरणी.
शिवाय उशीरापाठच्या कारणांमधलं वैविध्यही, सगळं मटेरिअल सेम असूनही प्रत्येक गृहिणीच्या साबुदाणा खिचडीची चव नि पोत हयामधल्या * वैविध्या* इतकंच परिचयाचं ! 😄

“नाय बा , मी तर वेळेवरच आली होती. पण गेटातच मैत्रिण भेटली. ‘एका ठिकाणच्या कामात तिचा पगार कमी केला’ त्याची कथा सांगत होती. ती डिस्टप होती म्हणून थोडं आयकत राह्यले नि वरती यायला लेट झाला ताई ! अशावेळी आपणच सहाणुभूती दाखवायला पायजेल, नाय का ?”

आली होती, * आयकत, *पायजेल अशा तर्हेची हिची मराठी भाषा सहन करण्याची शक्ती मी वाढवत आणली होतीच पण गेल्या काही वर्षात प्रचलित झालेल्या मिंग्रजी मुळे * डिस्टप* लेट वगैरेचा हिचा सर्रास वापर माझ्या अंगवळणी पाडून घेण्याचाही माझा प्रयत्न चालू आहे.🤓त्यामुळे मध्येच * सहानुभूती* 😲वगैरे आलं की अगदी गहिवरून जायला होतं हो !

त्याचभरात नि शिवाय आजच्या जमान्यात मोलकरणीच्या पगारात कपात करणारया ‘त्या’ घरच्या माईच्या धैर्याचं( बॅालिवूडमुळे माई का लाल च्या धैर्याला दिलेलं आव्हान परिचयाचं होतं आत्तापर्यंत😉)मनोमन नवलच वाटल्याने माझा प्रश्न गेलाच.

“ अग्गं, पण कारण काय पगार कमी करण्याचं ?”🤔

“ डिशा धुवायचं यंत्र बसलं त्यांच्याकडे, मग काय फक्त केर-लादीचंच काम उरलं नं !
शिजवलेल्या नि खाल्लेल्या भांड्यांनी सगळं बेसिन पॅक असायचं म्हणे आधी. खूपदा हिला नाकाला पदर लावून सगळं साफ करावं लागे. आता म्हणे, मशिनला चालत नाही म्हणून मालकीणबाई बेस कशी सगळी भांडी धुवून लावते त्या यंत्रात ! ‘पगार कपात’ म्हंज्ये ह्या म्हागाईच्या काळात कस्काय जुळवायचं ते आमचं आम्हालाच म्हैत !” 😏

उत्तर देता देता एकीकडे विद्याच्या सूराचा नि झाडूच्या फरफरीचा वेग अंमळ वाढलाच नि दुसरीकडे मीही नकळत (माझ्यामाझ्या वेगाने😛) भूतकाळात शिरले.

माझं बालपण चाळीतलं. वातावरण एकदम
* लाईव्ह * ! विशेषतः गॅासिप्स असतील तर अधिकच रंगतदार ! बेधडक कुठल्याही घरी कुणीही जाऊ शकत असे , आपलं म्हणणं मांडू शकत असे ( ‘गृह ॲडमिनचं ॲप्रूव्हल’ वगैरे असं नै😀) . अर्थात् अपवादही असायचे. काही किरकोळ कारणांवरून किंवा पाण्यावरून वगैरे काही *वाजलं * असेल आपसात तर ………
‘ तोंडही बघायची इच्छा नाही’ पर्यंत मजल जाई नि मग मात्र दारं बंद एकमेकांसाठी !😔 ( तसं तात्पुरतंच हं! हीच तर चाळीची खासियत.)
होय !!

१९६२ ते १९७२/७३ पर्यंत आमच्या चाळीत तेव्हा पाणी-प्रश्न (नि ओघानेच तंटा देखिल 😠) रोजचाच ! कसरत करीत दुसरया दिवसापर्यंत पुरेल एवढं पाणी भरून ठेवण्याची तजवीज ( सोप्पं म्हणजे प्रोव्हिजन😀)करून ठेवावी लागे.
चाळीत म्हणजे जागेची, पाण्याची ‘टंचाई’ होती परंतु ‘मुबलक’ होत्या त्या गॅलरया. 😮त्याही लांबच्या लांब, पुढे नि मागे दोन्हीकडे! (हल्ली जर हे कुणी ऐकलं तर चंगळच वाटेल !😇)
आणि…..
मोलकरणीही दुपार-रात्र दोन्हीवेळा येत असत.😲
आत्ताच्या काळात हे विधान म्हणजे नवल-बॅाम्ब च आहे खरं तर !

“ एकदाच यीन मी . तुमच्याकडे तुम्ही दोघंच जणं असलात तरी रात्रीच्या जेवणाची भांडी असतील तर एक्श्ट्रा पैसे घीन”
अलीकडे, एका बाईंनं असं ‘टेसात’ दिलेलं उत्तरही अनुभवलंय मी !

ज्येष्ठ वयात एकभुक्त रहावं असं म्हणतात त्यापाठी ह्या कामवाल्यांचा हा ( न दिलेला) हातभार तर नसेल ? 🤔
असं वाटून गेलं तेव्हा क्षणभर !😉
तर…..
सांगत काय होते ?
हं !
त्याकाळी घरातल्या मंडळींची खाली ऐसपैस एकत्र बसून जेवणं होत असत.
डिश हातात घेऊन मनमर्जीनुसार एकेकानं जेवणं वगैरे त्याकाळी घरगुती संविधानात मान्यच नव्हतं. 🤓

घरातल्या * कर्त्या* ची आर्थिक घडी बसून थोडी प्रगती व्हायला लागल्यावर पुढे हळुहळु डायनिंग टेबल ( तेही फोल्डिंग बर्रका😛) वगैरे संकल्पनेची ओळख करून दिली जाऊ लागली.
टेबल मॅनर्स वगैरे तेव्हा खिजगणतीतही नव्हते पण ‘जेवणोत्तर मॅनर्स’ पाळले नाहीत तर मात्र आई-आजीचा ओरडा खायला लागून शरणागती पत्करावी लागत असे.

जेवण जमिनीवर होवो किंवा टेबलवर , जेवल्यावर त्याच हाताने ताट उचलणे हे साफ नामंजूर होते त्यावेळी !

“ अगं, अगं ! उष्टे हात धुवून झाल्यावर, आधी मीठ, तूप, कोरड्या चटण्या ,लोणचं – मिरचीच्या बाटल्या नि उरलं-सुरलं सगळं उचलून जागच्या जागी गेल्याशिवाय खरकट्या ताटांना हात घालून चालायचाच नाही, हे पक्कं ध्यानात ठेवायचं !
उचलतांना कुठे इथे तिथे ‘शीत’ पडायची ‘रीत’ च नाहीये आपली. ह्हो !! 👍नंतर चमचे, भांडी ह्यांना ‘स्व-वर्गात’ दाखल करून घ्यायचं. सरसकट सगळी भांडी मोलकरीणीकडे सोपवायचा उठवळपणा करायचा नाही. आता शेवटचं महत्त्वाचं ! खरकटी भांडी एखाद्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात ‘ एक विसळी’ करून मगच घासायला ठेवायची. * ‘ मोल’ करीण असली तरी ती देखिल माणूसच आहे नं . खरकट्या वासामुळे नाकाला पदर लावून भांडी घासायला लागता कामा नये तिला, काय समजलीस ?
शक्यतो भात शिजवलेलं पातेलं घेतलं तर कडेची करवड देखिल मऊ होऊन तेही पातेलं साफ होऊन जातं हातासरशी, काssय ?”

चुकूनमाकून ताटाला हात घातला गेला तर ह्या 👆अशा ( एकतर्फी) संवादाचा भडिमार होऊन घरच्या लेकीबाळींना ‘मोल’ करणींच्या निमित्ताने रितीभातींचं ‘अमूल्य’ ज्ञानामृत 👍पाजलं जाई.

(मराठीची परवड होत असलेल्या ह्या काळात करवड, वगैरे लिहणं म्हणजे तसं धैर्याचंच काम हं ! 😳पण… करता काय हो !
चपखल शब्दांची गंमत काही न्यारीच !!☺️)

२४/७ इतरेजनांचा (अगदी मोलकरणीचाही) विचार करणारया संवेदनशील ‘आई-आजी’ च्या रीतभाती ( अगदी आता ‘स्टारून’ ठेवतो तद्वत् 😃) मनात ठसल्यात नाही म्हटलं तरी !
नोकरी करून गृहिणीपद सांभळतांना, वेळेच्या टंचाईमुळे नि कालानुरूप पाण्याच्या उपलब्धेत मुबलकता आल्यानंतर ‘एकविसळी’ वगैरे मागे पडून वाहत्या नळाखाली भांडी साफ करण्यासारखे बदल केले गेले, नाही असं नाही!

“ इतके पैसे द्यायचेच नं, मssग बेधडक चमच्यापासून टाकावीत की भांडी कामवालीला ! तुमच्या इतकी स्वच्छता नै बै जमणार ! टाईम नि एनर्जी वाचवणं अधिक महत्त्वाचं! “
असं म्हणत भरलेली बेसिनं देखिल (🤫) बघितली

आणि…..

“ चमचे बिमचे धुणं नि प्लेटस् वगैरेही साफ करणं आपणच करायचं म्हटलं तर मग ठेवायचंच कशाला कामवालीला ?”

असे 👆*जनरेशन गॅप * वाले कमेंटस् ही झेलले . पण…
नोकरी सांभाळून ‘आई-आजी’ च्या पध्दती जमेल तितक्या सांभाळण्याचा प्रयत्न केला.
आज जेव्हा * मशिनला चालत नाही* हे वाक्य ऐकलं तेव्हा
‘आई-आजी’ ची तीव्रतेने आठवण झाली खरी !

मनात आलं ,
विद्याच्या मैत्रिणीच्या मालकिणबाईला आता मशिनने लावलेलं ‘वळण’ हे एकप्रकारे ‘आई-आजी’ च्याच ‘वळणावर’ की हो
गेलं !😄😄

‘ फक्त फॅशन चीच दुनिया नव्हे तर वॅाशिंगचीही दुनिया गोल(च)
आहे ‘ असं म्हणावं का ?

तुम्हाला काय वाटतं ?

©️ अनुजा बर्वे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu