लोकमान्य टिळक ©मुकुंद कुलकर्णी
एकांतवासाला कंटाळून तुरुंगात कैदी आत्महत्या करतात किंवा नैराश्याने मनावर परिणाम करून घेतात , पण या कर्मयोग्याने संपूर्ण जगाने दखल घ्यावी असा ‘ गीतारहस्य ‘ ग्रंथ लिहिला .
” स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध
मिळवणारच . “
Father of Indian unrest
दि.23 जुलै 1856 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म रत्नागिरी येथे मध्यमवर्गीय चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला . खरे तर टिळकांचे नाव केशव , पण पुढे बाळ गंगाधर टिळक हेच नाव रुढ झाले . लोकमान्यांचे वडील शिक्षक आणि संस्कृत विद्वान होते . लोकमान्य सोळा वर्षाचे असताना त्यांचे निधन झाले . टिळकांच्या आई त्यांना बाळ म्हणत हेच नाव पुढे रुढ झाले . वडिलांच्या मृत्यूपूर्वी काही महिने त्यांचा विवाह तापीबाई यांच्याशी झाला . इ.स.1877 साली लोकमान्यांनी गणित विषयात प्रथम श्रेणीत बीए ची पदवी मिळवली . डेक्कन कॉलेज पुणे येथून टिळक पदवीधर झाले . त्यानंतर एमए चा अभ्यासक्रम अर्ध्यात सोडून त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला . इ.स.1879 साली गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबी ची पदवी प्राप्त केली . डेक्कन कॉलेजात शिकत असताना त्यांना अनेक मान्यवर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले . प्रोफेसर वर्ड्सवर्थ आणि प्रोफेसर शूट यांच्यामुळे त्यांना अभिजात इंग्रजी साहित्याची गोडी लागली .गणिताचे प्रोफेसर केरुअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली . त्या काळात टिळकांनी प्रचंड वाचन केले . संस्कृत धर्मग्रंथ , इंग्रजीतील राजनीती आणि तत्त्वज्ञानावरील पुस्तके हेगेल , कांट ,स्पेन्सर , मिल , बेंथम , व्हॉल्लेअर , रुसो तसेच मराठीतील संत साहित्याचा त्यांनी अभ्यास केला . गणितातून बीए ची पदवी पहिल्या वर्गात मिळवल्यानंतर लॉ चा अभ्यास करण्याचा त्यांचा निर्णय धक्कादायक होता . त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले , ” ज्या अर्थी , मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करायचे ठरवले आहे , त्या अर्थी मला असे वाटते की , कायद्याचे ज्ञान मला उपयोगी पडेल . मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्य विरोधात संघर्षाशिवाय व्यतीत होईल . “
डेक्कन कॉलेजात असताना टिळक आगरकरांची मैत्री झाली . दोघेही प्रखर देशभक्त होते . पाश्चात्त्य विचारवंतांच्या राजनीती , अर्थशास्त्र , तत्त्वज्ञान आदि विषयांवरील पुस्तकांवर त्यांच्या चर्चा होत . डेक्कन कॉलेज सोडताना दोघांनी दोन निश्चय केले होते . सरकारी नोकरी करायची नाही आणि राष्ट्रकार्यासाठी जीवन अर्पण करायचे . टिळक आगरकर हे जिवलग मित्र होते , पण स्वातंत्र्य विषयक मतभिन्नतेमुळे दोघात अंतराय निर्माण झाला . स्वातंत्र्याआधी सामाजिक सुधारणा व्हायला हवी हे आगरकरांचे मत होते , तर स्वातंत्र्य आधी मिळायला हवे समाज सुधारणा पाठोपाठ होतीलच असे लोकमान्यांचे मत होते . या वादामुळे दोघांनी एकमेकांसमवेत काम करणे सोडले . ते एकमेकांपासून दुरावले .
समाज परिवर्तनासाठी शिक्षणाचे महत्त्व टिळकांनी ओळखले होते . विष्णूशास्त्री चिपळूणकर टिळकांचे आदर्श होते . चिपळूणकरांसमवेत टिळकांनी पुढाकार घेऊन दि.1 जानेवारी 1880 रोजी रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली . इ.स.1881 साली टिळक व आगरकर यांनी इंग्रजीतून मराठा व मराठीतून केसरी अशी दोन वृत्तपत्रे सुरू केली . केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले दि.24 ऑक्टोबर 1884 रोजी टिळक आगरकरांनी ‘ डेक्कन एज्युकेशन सोसायटी ‘ ची स्थापना केली . त्या अंतर्गत इ.स.1885 साली फर्गसन कॉलेजची स्थापना झाली . पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले . शैक्षणिक क्षेत्रात पुण्याला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवण्यात टिळक आगरकर या महापुरुषांचा सिंहाचा वाटा होता . स्वातंत्र्य आणि समाज सुधारणा या वादातून इ.स.1887 साली आगरकरांनी केसरीचे संपादकपद सोडले . केसरीतला आगरकरांवरील मृत्यूलेख लिहित असताना लोकमान्य घळाघळा रडले होते .
आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत स्वातंत्र्यासाठी लोकमान्य ब्रिटिशांशी अविरतपणे लढले . सबंध भारतात उदंड लोकप्रियता लाभलेले नेते होते लोकमान्य . त्यानंतर एवढी लोकप्रियता महात्मा गांधींना लाभली . स्वातंत्र्य लढ्यातील पुढाकारामुळे लोकमान्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला . मंडालेमध्येही त्यांना दीर्घकाळ कारावास भोगावा लागला .ब्रिटिशांनी टिळकांना ‘ भारतीय असंतोषाचे जनक ‘ असे संबोधले होते .
इ.स.1890 साली टिळकांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला . काँग्रेसच्या मवाळ धोरणाचा त्यांनी कडाडून विरोध केला . त्या काळात गोखले आणि टिळक हे दोघे काँग्रेसचे भक्कम जनाधार असलेले लोकप्रिय मराठी नेते होते . पैकी गोखले हे मवाळ तर टिळक हे उग्र , क्रांतिकारी , जहाल विचारसरणीचे नेते होते . इ.स.1905 ते इ.स. 1907 मध्ये झालेल्या स्वदेशी चळवळीपासून काँग्रेसमध्ये जहाल व मवाळ अशी फूट पडली . इ.स.1891 सालच्या
‘ एज कन्सेंट बील ‘ ला टिळकांनी विरोध केला होता . स्वतः बालविवाहाच्या विरोधात असूनसुद्धा हा कायदा हिंदुत्वाच्या विरोधात जातो , म्हणून त्यांनी विरोध नोंदवला होता .
टिळकांच्या कारकीर्दीला आणि अखेरपर्यंत चाललेल्या त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला इ.स.1899 नंतर अधिकच धार प्राप्त झाली . त्यावेळी राजद्रोहाची शिक्षा भोगून ते परत आले होते , आणि त्यांची लोकप्रियता परमावधीला पोहोचली होती . दि.4 जुलै 1899 रोजी केसरीमध्ये ‘ पुनश्च हरिः ॐ ‘ हा अग्रलेख लिहून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली .
दि,27 जुलै 1905 रोजी लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी जाहीर केली . संपूर्ण देशभर प्रक्षोभ उसळून उग्र आंदोलने झाली . स्वदेशी , बहिष्कार , राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुःश्रुत्रीचा टिळकांनी हिरिरिने पुरस्कार केला . फाळणी विरोधी चळवळ अधिक उग्र होत असताना राष्ट्रीय सभेत नेमस्त आणि जहाल यांच्यात मतभेद झाले . इ.स.1907 साली सूरत येथे भरलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात फूट पडली . काँग्रेस मधील या फाटाफूटीनंतर दि.24 जून 1908 रोजी लोकमान्यांना पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली मुंबई येथे अटक करण्यात आली . दि.12 मे 1908 चा ‘ देशाचे दुर्दैव ‘ व दि.9 जून 1908 चा ‘ हे उपाय टिकाऊ नाहीत ‘ हे केसरी मधील अग्रलेख त्याला कारणीभूत ठरले . सात इंग्रजी व दोन हिंदी गृहस्थ असलेल्या ज्यूरींनी सात विरुद्ध दोन मतांनी टिळकांना दोषी ठरवले व त्यांना सहा वर्षे काळे पाणी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली . त्यावर टिळकांचे धीरोदात्त उद्गार संस्मरणीय आहेत , ” ज्यूरींनी काही जरी निर्णय दिला असला तरी मी पूर्ण निर्दोषी आहे , अशी माझी धारणा आहे . न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल , पण वस्तुजाताच्या नियतीचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे . माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हाल अपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे , असाही परमेश्वराचा संकेत असेल . “
काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले . या बंदिवासात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या . गीतारहस्य या अत्यंत मौलिक ग्रंथाची रचना आणि पुण्यात 1912 साली पत्नी सत्यभामाबाई यांचे निधन . दि.15 जून 1914 रोजी त्यांची मुक्तता करण्यात आली .
इ.स.1915 मध्ये हिंदी स्वराज्य संघ या विषयावर चार लेख लिहून कोणत्या प्रकारची राज्य व्यवस्था इष्ट होईल याचे त्यांनी विवेचन केले . टिळकांनी 1 मे 1916 रोजी बेळगाव येथे होमरूल लीग , हिंदी स्वराज्य संघाची स्थापना केली . इ.स.1918 च्या मार्च मध्ये ते होमरूल लीग चे शिष्ठमंडळ घेऊन इंग्लंडला गेले होते . तत्पूर्वी इ.स.1916 च्या लखनौ अधिवेशनात त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला . या अधिवेशनात टिळकांच्या प्रयत्नांनी काँग्रेस – लीग करार झाला व स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर झाला . जहाल व नेमस्त आणि हिंदू मुसलमान एकीचे अपूर्व दृश्य दिसले . इ.स.1919 साली अमृतसर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात हिंदुस्थान आजच जबाबदारीच्या स्वराज्यास पात्र आहे असा ठराव मंजूर करण्यात आला . सर व्हॅलेंटाईन चिरॉल यांच्या इंडियन अनरेस्ट या पुस्तकात आपल्या विरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्या बद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता . निकाल विरोधात गेला तरी , त्यांचे भारतीय असंतोषाचे जनक हे गौरवास्पद अभिधान रुढ झाले .
इ.स.1916 च्या जूनमध्ये पुण्यात एका मोठ्या समारंभात टिळकांना षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने एक लाखाची थैली देण्यात आली होती . ती सर्व रक्कम त्यांनी राष्ट्रकार्यासाठी अर्पण केली होती .
टिळकांनी तन मन धन स्वातंत्र्य चळवाळीसाठी समर्पित केले असले तरी , त्यांची अनेक सामाजिक कार्ये चालू होती . पंचांगसंशोधन हा व्यासंग त्यांना लहानपणापासून होता . अधिक शास्त्रशुद्धपणे आपले स्वतंत्र पंचांग त्यांनी प्रसिद्ध केले होते . राजकीय क्षेत्रात असताना तुरुंगात व अन्य वेळात जशी उसंत मिळेल तसे त्यांनी संशोधनपर अमूल्य ग्रंथरचना केल्या . गीतारहस्य , ओरायन तसेच आर्क्टिक होम इन द वेदाज हे टिळकांचे अनमोल ग्रंथ आहेत . आधुनिक भारताच्या इतिहासात टिळकयुग हा फार महत्त्वाचा टप्पा आहे .
स्वातंत्र्य चळवळ सामर्थ्यवान करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना जागृत करून त्यांना सामील करून घेणे आवश्यक आहे , हे त्यांनी ओळखले होते . ही राजकीय जागृती राष्ट्रपुरुषांच्या उत्सवातून करता येईल या खात्रीने टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव सुरू केला , तसेच श्रीगणेश ही ज्ञानाची देवता . तिच्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रम , मेळे याचबरोबर , स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विषयांवर व्याख्याने करण्यासाठी राजरोस व्यासपीठाची सोय करता येईल या प्रमुख उद्देशाने त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला .
लाला लजपत राय , बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांचे लाल , बाल , पाल हे त्रिकूट स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी होते .
कलकत्ता येथील ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून टिळकांचे नाव पंडित मालवीय यांनी सुचवले होते . पण तत्पूर्वीच दि.1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत सरदारगृहात टिळकांचे देहावसान झाले .
स्वातंत्र्य लढ्यातील या महान क्रांतिकारी योद्ध्यास कोटी कोटी प्रणाम !
©मुकुंद कुलकर्णी

