गुगल-बाळंतपण ©️ अनुजा बर्वे.
सुनेची ड्यू-डेट जवळ आल्याने रागिणी अगदी वेळेवर अमेरिकेत येऊन दाखल झाली. लेकाच्या घरातल्या खिडकीतून बाहेर भुरभुरू पडणारा बर्फ,sorry snow,पहाण्यातली गंमत काही न्यारी होती. रागिणी ते मनापासून एन्जाॅय करत होती. इतक्यात लहान मूल रडण्याचा आवाज आला. एरवी फक्त वेगाने जाणारया गाड्यांच्या मेकॅनिकल साउंडच्या background वर हा ‘लाइव्ह’ आवाज तिला चकित करून गेला. न राहवून तिनं सुनेला,दिप्तीला विचारलं,
“लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय नं ?निरव शांतीत जास्तच स्पष्ट ऐकू येतोय”
“काssय? काय म्हणलात आई? कोण निरव शांती ? भावा-बहिणीची पेअर आहे का ?”
दिप्तीच्या चेहरयावरची भली मोठ्ठी प्रश्नचिन्हं पाहून रागिणीच्या चटकन् लक्षात आलं की ‘हे सगळे ‘काॅन्व्हेन्ट स्कूलींग’चे प्रश्न आहेत’.
“तसं बरोबरच आहे म्हणा,’निरव-शांती’ जोडीच आहे पण शब्दांची ! ‘रव’ म्हणजे आवाज आणि’निरव’ म्हणजे without आवाज.निरव हे ‘शांती’चं adjective आहे. पण आत्ता मुद्दा वेगळाच आहे,मी विचारतेय ते लहान बाळाच्या रडण्याबद्दल!शेजारी आहे का कुणी बाळ ?”
“अं ?हो हो! 4 months before शेजारच्यांना बेबी झालाय!”
“अच्छा ,म्हणजे तो मुलगा रडतो होय मधनं मधनं! डायपर ओला होत असावा ,त्याला आवडत नसेल बहुतेक !” रागिणीनं आपला आपला तर्क लढवून म्हटलं.
“आई,एक मिनिट,’बेबी’ म्हणजे मुलगा की मुलगी ते नाही माहित”असं दिप्ती सांगत असतानाच तिचा फोन वाजला.
रागिणीच्या मनात आलं, आपल्या सिंपल मराठीत ‘बाळ झालं’ असं म्हटलं जातं तेव्हा ‘तो’ किंवा ‘ती’ हे काहीही असू शकतं.पण….. हिनं ‘बेबी झाला’म्हटलं त्यात ‘झाला’ चा संबंध gender शी नाही हे नविनच ‘व्याकरण’ दिसतंय. आपल्या भारतात शेजारी-पाजारी ‘गुड-न्यूज प्रकरण’ कानी आल्यापासून ‘तो’ का ‘ती’ हे समजून घेणं हा जणू सर्वांचा प्रेमाचा हक्क असतो.४महिन्यांनंतरही शेजारी मुलगा की मुलगी बाळ आहे हे माहिती नसणं, हे आपण अमेरिकेत असल्याचं ‘व्यवच्छेदक’ लक्षण मानावं असा एक विचार तिच्या मनात येत असतानाच ,
“आई, इथे डायपर मस्ट आहेत एकदम !!ते technically advanced असतात,वेटनेस अजिबात फिल होऊ देत नाहीत.”
दिप्तीचा फोन संपल्याने संवाद परत सुरू झाला.
“अगं पण किती म्हटलं तरी बाळाला ‘बांधल्यासारखं’ होत असेल गं !त्यांना ‘मोकळं मोकळं’च जास्त आवडतं गं !” रागिणीनं जरा ठामपणे म्हटलं. भारतातून येतांना होणारया बाळाला सुरूवातीला comfortable व्हावं म्हणून रागिणीनं ‘बाळ-लंगेटांचं’ एक मोठ्ठं पॅकेट आणलं होतं त्याबद्दल सूनबाईंच्या मताची चाचपणी करायचीच होती नाहीतरी !!
“नाही पण बाळांना तश्शी सवयच करायची बिगिनिंगपासून !आणि खूप हायजेनिक असतात ते!मी गुगल-सर्च केलं तेव्हा डिटेलमध्ये वाचलंय !”
हळुहळु रागिणीला अमेरिकन मतांचा अंदाज येऊ लागला पण तरिही तिनं चिवटपणे म्हटलं,
“हो का ? मग कदाचित त्या शेजारच्या बाळाचं पोट वगैरे दुखत असेल म्हणून रडत असेल.बाळगुटी मध्ये खरं तर ही सगळी precautionary औषधं असतात.”
“नाही आई,इथे upto 6monthsब्रेस्टमिल्क खेरिज काही द्यायला allowed नसतं, अगदी पाणीही नाही.मी ‘ग्रोईंग बेबी’साठीचं एक अॅप डाऊनलोड केलंय, त्यात दिलंय सगळं “
रागिणीला नजिकच्या भविष्यकाळाचा अंदाज येऊ लागला.एकंदरीत -“गुगल हो माता, पिता हो गुगल,गुगल हो बंधु , सखाभी गुगल” च्या या जमान्यात खरया माता ‘मत’ गमावून बसल्याची रागिणीला जाणिव होऊ लागली या संवादाने !
“दिप्ती,पण गेल्या आठवड्यात ते बाळ रात्री पण रडत होतं गं ,मला तर बाळ रडतंय म्हटलं की हैराणी येते” रागिणीनं संवादाचा धागा परत पकडला.
“इथे बाळांना ‘self-sleeping’चं ट्रेनिंग द्यायची पध्दत आहे. रात्रीच्या विशिष्ट वेळापासून झोपेला suit होईल असं वातावरण तयार करायचं बेबीच्या रूममध्ये आणि फीड करून बाळाला पाळण्यात ठेवायचं ! सुरूवातीला काही दिवस बाळ रडलं तरी आपण strong रहायचं ! आपोआप आपलं आपलं झोपायला शिकतात इथे बेबीज्”!
“पण त्यांच्याकडे तर एक कुत्र्याचं पिल्लू सुध्दा आहे. त्याने जर आरडओरडा केला तर दचकणार नाही का ते बाळ रात्री-अपरात्री?”
रागिणीच्या जीवाला शंकांचा घोर लागून राहिला होता त्यामुळे तिच्या तोंडून प्रश्न निघून गेला.
“आई,इथले कुत्रे वेलट्रेन्ड असतात आणि generally मालकांच्या बेडमध्ये निवांत झोपतात ते” दिप्ती सांगत असतानांच तिला आॅफिसमधून काॅल आल्याने परत एकदा संवाद तुटला.
ह्या सगळ्या गोष्टी रागिणीच्या कल्पनेच्या बाहेर होत्या आणि digest व्हायलाही थोडा वेळ मिळायला हवा होता.विचारांच्या तंद्रीत ती खिडकीपाशी गेली अन् बाहेर दिसलेल्या द्रुष्याने ती खरोखर अचंबित झाली. तेवढ्या थंडीत ,बर्फ पडत असतांना ,सगळा जामानिमा करून शेजारची ‘आई’ कुत्र्याच्या पिल्लाला त्याच्या नैसर्गिक गरजेसाठी बाहेर ग्राऊंडवर फिरवत होती. त्याने केलेली ‘शी’ हॅण्डग्लोव्हज वगैरे घालून ‘प्लास्टीक पेपर’मध्ये कलेक्ट करून स्वच्छतेची utmost काळजी धेत होती.
ह्या सगळ्याच अमेरिकन पध्दती रागिणीच्या अंगावर आल्या परंतु सूनबाईंशी नुकत्याच झालेल्या ‘संवादा’मुळे ‘वाद’ टाळण्याची पध्दत आपली आपल्यालाच शोधून काढावी लागेल हे तिला पक्कं कळून चुकलं. इथे ‘गुगल-सखा’ मदतीला येण्याची शक्यताच नाहिये हेही समजलं. नकळत रागिणीची पावलं तिच्या रूमकडे वळली. “भारतीय बाळंतविडा” बॅगेच्या तळाशी आणि “आज्जीचे भावबंध” मनाच्या तळाशी लाॅक करून ती “गुगल-बाळंतपण” execute करायला सज्ज झाली.
– अनुजा बर्वे.

