रक्तदान शिबिर १३ ऑगस्ट २०२३
सन २०२१ मध्ये करोना कालावधीमध्ये रक्ताचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता. एक सामाजिक बांधिलकी म्हणून विलेपार्ले पोलीस ठाण्याचे तेव्हाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन उत्कर्ष मंडळ विलेपार्ले या ठिकाणी ९ मे २०२१ रोजी विलेपार्ल्यातील अराजकीय सामाजिक संस्था आणि विलेपार्ले पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्या रक्तदान शिबिराला कोरोना विषाणूचा धोका पत्करून सर्वसाधारण जनतेने अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता आणि एकाच दिवसांमध्ये 650 रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे त्यामध्ये तरुण रक्तदात्यांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश होता.
या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विलेपार्ले पोलीस ठाणे आणि विलेपार्लेतील अराजकीय सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोजी लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिर विलेपार्ले पूर्व , या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिरामध्ये त्यांना ७०० रक्तदात्यांचा सहभाग अपेक्षित आहे त्यामुळे प्रसिद्धीकरिता “अबकी बार ७०० पार” या टॅगलाईनचा उपयोग करण्यात येत आहे.
विलेपार्ले पोलिसांच्या या सामाजिक उपक्रमामध्ये पार्लेकर उत्साहाने सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.


