फन स्ट्रीट – डहाणूकर कॉलेजच्या कल्चरल कमिटीने आयोजित केलेला अनोखा इव्हेंट

लगोरी , आबाधुबी , लंगडी , भोवरा , आंधळी कोशिंबीर ….. या आणि अशा छान विस्मरणात गेलेल्या खेळांनी आज पार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळा जवळचा रास्ता खुलून गेला होता. कारण होते डहाणूकर कॉलेजच्या कल्चरल कमिटीने आयोजित केलेल्या फन स्ट्रीट चे!

आपण लहानपाणी हे सगळे खेळ खेळले असू पण आता डिजिटल जमान्यात आपली मुले या सर्व गंमतींपासून वंचित होत चालली आहेत. याच खेळांना पुन्हा एकदा पुनर्रुज्जीवन देण्याचे काम डहाणूकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले. २९ जानेवारी रोजी भरवण्यात आलेल्या या फन स्ट्रीट मुळे पार्लेकरांची रविवारच्या दिवसाची सुरुवात एकदम झकास झाली. सागरगोटे , लगोरी , आबाधुबी अशा जुन्या खेळांची मजा पार्लेकरांना अनुभवता आली शिवाय झुंबा , रोड आर्ट , वन मिनिट गेम्स असे खेळही खेळता आले.

आजच्या इंटरनेटच्या आणि माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात मुले फक्त कॉम्पुटर आणि टी. व्ही. मध्येच रमलेली असतात. आपल्या लहानपणी खेळले जाणारे मैदानी खेळ आता फारसे खेळले जात नाहीत. हीच गोष्ट लक्षात घेऊन डहाणूकर कॉलेजच्या कल्चरल कमिटीने ‘फन स्ट्रीट’ चे आयोजन केले. यामध्ये जुन्या काळातले खेळ खेळण्याबरोबर सेल्फ डिफेंस , लाफ्टर क्लब , कराओके अशा विविध कार्यशाळांचाही समावेश होता. विलेपार्ले येथील उत्कर्ष मंडळ चौक ते चित्रकार केतकर मार्ग येथे रंगलेल्या ‘फन स्ट्रीट’ ने लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच खुश केले. लहानपणीचा गोडवा पुन्हा अनुभवता यावा आणि मैदानी खेळांकडे मुलांचा कल वाढवावा हा या इव्हेंटमागचा उद्देश होता. आणि खरोखरीच लहान मुलेच नव्हे तर त्यांचे पालकही अगदी लहान होऊन या खेळांमध्ये बेभान झाले होते आणि अशी पर्वणी दिल्याबद्दल खरोखरच आयोजकांचे आभार मनात होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu