खवय्या मुंबईकरांसाठी पार्ल्यात ‘मिसळोत्सव’ !
पुणे, कोल्हापूर, वाई, संगमेश्वर, नाशिक, ठाणे इथल्या चमचमीत मिसळींवर ताव मारण्याची पार्ल्यात संधी
मुंबई – चमचमीत, झणझणीत आणि तर्रीबाज मिसळ म्हटलं की मुंबईकरांच्या तोंडाला पाणी सुटतं. एरवी गप्पांमध्ये ‘तू ठाण्याच्या मामलेदारांची किंवा कोल्हापूरच्या लक्ष्मीची मिसळ खाल्लीस का’, म्हणून विचारलं की मुंबईकरांच्या मनाला खूप वेदना होतात. कारण सगळ्या सुप्रसिद्ध मिसळी खायची मुंबईकराची इच्छा असली तरी प्रत्येकाला ते शक्य होतंच असं नाही. पण पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाने प्रत्येक मुंबईकराची ही अतृप्त इच्छा ओळखूनच खास एका ‘मिसळोत्सवा’चे आयोजन केले आहे.
महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या झणझणीत तर्रीबाज मिसळींची चव मुंबईकरांना एकाच छताखाली चाखता यावी, यासाठी विलेपार्ले परिसरात विविध सामाजिक तसंच साहित्यिक उपक्रम राबविणा-या लोकमान्य सेवा संघाने यंदाच्या डिसेंबर महिन्यात ‘मिसळोत्सवा’चे आयोजन केले आहे. हा ‘मिसळोत्सव’ चीन्ग्ज चायनीजने प्रायोजित केला आहे. या ‘मिसळोत्सवा’ मागची कल्पना अशी की लोकांना “ठाणे, डोंबिवली, पुणे, नाशिक, कोल्हापूर, वाई, संगमेश्वर येथील ख्यातनाम मिसळींची चव चाखायची प्रत्येकाची इच्छा असते. पण फक्त मिसळ खाण्यासाठी इतका लांबचा प्रवास करणं कुणालाच शक्य नाही. म्हणूनच आम्ही मिसळ प्रेमींनी या सर्व मिसळींनाच खवय्यांच्या भेटीसाठी घेऊन यायचं ठरवलं. ठाण्याची मामलेदार मिसळ असो वा कोल्हापूरची लक्ष्मी मिसळ, सर्वच प्रमुख ‘मिसळ’कारांनी या महोत्सवात सहभागी होण्याचं कबूल केलं आहे.”
विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघाच्या स्वा.सावरकर पटांगणावर,शनि आणि रवि दि.9 व 10डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते रात्रौ 9 वाजेपर्यंत हा मिसळोत्सव सर्व खवय्यांसाठी खुला असेल.
Advertisement


