नाही चिरा नाही पणती………….
आज महिलादिनानिमित्त अनेक कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतील,मागील पिढ्यांतील अन्ययाविरुद्ध लढा देणाऱ्या महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल. मध्यंतरी सवंग प्रसिद्धीसाठी या देशांत असुरक्षित वाटते म्हणून हल्लाबोल करणाऱ्या पडद्यावरील तथाकथित स्टार महिला लक्षांत असतीलच. फुले,कर्वे आणि आगरकर ज्यांनी स्त्रीमुक्तीसाठी अथक प्रयत्न केले,त्यांना वंदन करून मी एका व्यक्तीला मनोभावे प्रणाम करते, त्या आहेत डॉक्टर रखमाबाई. कोण बरे असा बहुतेकजणांच्या मनांत प्रश्न येईल आणि तीच दुःख:दायी गोष्ट मला वाटते. खरं तर जिथे वरील त्रयीचे फोटो लावले आहेत तिथे यांचाही लावणे आवश्यक आहे पण स्त्रीमुक्ती चळवळ करणाऱ्यांनीसुद्धा त्यांची दखल कां घेतली नाही याचे मला आश्चर्य वाटते आणि तुम्हांलाही समजल्यावर तुम्हांलाही तसेच वाटेल हे नक्की.
आनंदीबाई जोशी याच्या संघर्षाची कहाणी सर्वश्रुत आहे. त्या डॉक्टर झाल्या, परंतु दुर्दैवाने लगेचच आजारपणात त्यांचा मृत्यू झाल्याने त्या डॉक्टरकी करू शकल्या नाहीत. रखमाबाई जनार्दन सावे (२२ नोव्हेंबर, इ.स. १८६४ – २५ सप्टेंबर, इ.स. १९५५) या भारतामधल्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ठरल्या. त्यांनी मात्र तहहयात डॉक्टरकी केली आणि निभावलीही. त्याचबरोबर समाजकार्याचा वसाही जपला.डॉक्टर होईपर्यंतची त्याची जीवनकहाणी म्हणजे एका बाणेदार स्त्रीचा अतिशय थरारक, धाडसी संघर्षच. तरीही इतिहासकारांनी तिची दखल कां घेतली नाही याचे कारण तेचजाणे.

रखमाबाई यांचे आजोबा हरिश्चंद्र यादवजी चौधरी इंग्रज सरकारच्या नोकरीत असल्याने त्यांना सरकारदरबारी मानमरातब होता. त्यांना जयंतीबाई नावाची मुलगी होती. तिचा विवाह वयाच्या १५व्या वर्षी १८६३ मध्ये मुंबईतील गोरेगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक जनार्दन सावे ह्यांच्याशी झाला.त्यांना जी मुलगी झाली तीच रखमा.
दुर्दैवाने जयंतीबाई १७ वर्षांच्या असतानाच जनार्दन सावे यांचं निधन झालं आणि जयंतीबाई रखमाला घेऊन वडिलांकडे आल्या.त्याकाळी विधवाविवाहाला विरोध नसला तरी बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून हरिश्चंद्र चौधरी यांनी आपल्या मुलीचा पुनर्विवाह डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी लावून दिला.हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे शल्यचिकित्साही शिकवत. ते आधुनिक विचारसरणीचे होते. डॉ. राऊतांनी छोट्या रखमाबाईंचासुद्धा स्वीकार केला व रखमाबाई ‘सावे’ऐवजी ‘राऊत’ झाल्या.त्या काळांतील हे एक धाडसाचे पाऊल. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी पालघर जिल्ह्यातील सफाळेजवळील दातीवऱ्याच्या दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी रखमाबाईंचं लग्न झालं.मुलीने वयात येईपर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा त्याकाळी होती. साहजिकच १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षणामुळे रखमाबाईंच्या विचारांची पातळी उंचावली होती. दादाजी निरुद्योगी होते. कुठलाच उद्योग, व्यवसाय करीत नव्हते उलट व्यसनं जडली होती. स्वतःचं घर नव्हतं; ते आपले मामा नारायण धर्माजी यांच्याकडे राहत होते. इतकंच नव्हे, तर ते आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मामांवर अवलंबून होते. त्यामुळे अशा निरुद्योगी माणसाच्या घरी राहण्यास रखमाबाईंनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे डॉ. सखाराम राऊतांनीही दादाजींना कळवलं की, प्रतिष्ठेने रहाता येईल असं वातावरण आपल्याकडे नसल्यामुळे मी माझ्या मुलीला आपल्याकडे पाठवू इच्छित नाही. खरंतर दादाजी अगदी सहज ‘गेलीस उडत’ म्हणून दुसर्या स्त्रीशी विवाह करू शकले असते. परंतु एका स्त्रीकडून आलेला नकार, तसेच जयंतीबाईंनी पुनर्विवाह केल्याने पूर्वपतीची रखमाबाईंच्या नांवे असलेली (दादाजींच्या मते २५०० रूपये मूल्य असलेली) इस्टेट, ह्या कारणांकरता त्यांनी – बायकोला सासरी पाठवावे – असा कोर्टात दावा ठोकला.
आपली बाजू मांडताना रखमाबाईंनी ‘मला हे लग्न मान्य नाही कारण हे लग्न झालं तेव्हा मी अतिशय लहान होते, आणि माझी संमती या लग्नाला नव्हती,’ असा युक्तिवाद केला.त्यावेळी, दादाजी यांच्यासोबत रहा किंवा तुरुंगात जा,असे कोर्टाने सांगितलं. रखमाबाईंना तुरुंगवास मंजूर होता पण संमतीशिवाय झालेलं लग्न नाही. आज स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती असे शब्द खूप सहजपणे वापरले जातात आणि ते महत्त्वाचेही आहेत. परंतु सव्वाशे वर्षांपूर्वी एका स्त्रीने आपल्या ज्ञानाच्या तुलनेत खूपच सामान्य असलेल्या नवऱ्याला नाकारणं ही त्या काळात क्रांतिकारी घटना होती. ह्या निर्णयामुळे बुजुर्ग मंडळी खडबडून जागी झाली. एका बाजूला खटला चालू होता, तर दुसऱ्या बाजूला समाजातून रखमाबाईंवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती.
ही टीका करणाऱ्यांमध्ये अग्रणी होते, बाळ गंगाधर‘टिळक.त्यांनी आपल्या ‘केसरी’ वर्तमानपत्रातून टीकेची झोड उठविली. नेटिव्ह ओपिनियन’ ह्या इंग्रजी दैनिकातून ही टीका करण्यात आली. मात्र रखमाबाईंचे वडील डॉ. सखाराम राऊत मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. परंतु ह्या प्रचंड धावपळीमुळे व मानसिक ताणामुळे वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी, १८ एप्रिल १८८५ रोजी त्यांचं निधन झालं. त्यानंतर दादाजी ठाकूर यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात अपील केलं. मुख्य न्यायाधीश फेरेन ह्यांच्यासमोर आलेल्या ह्या खटल्याच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ह्यावेळी मात्र हायकोर्टाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. न्यायमूर्ती फेरेन यांनी, निकालाच्या दिवसापासून एका महिन्याच्या आत रखमाबाईंनी नवऱ्याच्या घरी राहण्यास जायला हवं, असा निर्णय दिला. परंतु रखमाबाई आपल्या निर्णयापासून ढळल्या नाही.
२३ वर्षांच्या रखमाबाई तोपर्यंत सामाजिक बहिष्काराला व टीकेला सरावल्या होत्या. खंबीरपणे सामोरे जात होत्या. अन्यायाला विरोध करणाऱ्या त्या रणरागिनी बनल्या होत्या. परिणामी हा वाद चिघळत गेला. देशभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून ह्या विषयासंबंधी बातम्या येऊ लागल्या आणि न्यायमूर्ती रानडे, गोपाळराव आगरकर, डॉ. भांडारकर, रावसाहेब मांडलिक, तसेच पंडिता रमाबाई अशी विद्वान मंडळी रखमाबाईंच्या पाठिशी उभी राहिली. विदेशातील ‘लंडन टाइम्स’, ‘सेंट जेम्स् गॅझेट’ अशा अनेक प्रमुख वर्तमानपत्रांतून हा विषय गाजू लागला. इंग्लंडमध्येसुद्धा सामाजिक धुरिणांचा चर्चेचा विषय बनला. तेथील विचारवंत महिलांनी रखमाबाईंना सहकार्य करण्याचं आश्वासन पत्राद्वारे दिलं. इंग्लंडमधून अनेक स्त्रियांनी वर्तमानपत्रात पत्रे लिहीली.तिला वैयक्तिक पत्रेही आली, त्यात स्कॉटलंडहून 105 स्त्रियांच्या सह्यांचे एक पत्रदेखील होते. रखमाबाईं -समोर खटल्यातून सुटण्याचा आणखी एक मार्ग होता, तो म्हणजे ख्रिश्चनधर्म स्विकारण्याचा! परंतु त्यांनी ती वाट धरली नाही, हिंदू राहूनच हक्कांसाठी लढणं त्यांना आवश्यक वाटत होते.
खटला हरल्यावर रखमाबाईंनी थेट राणी व्हिक्टोरिया यांना पत्र लिहिले आणि न्यायाची मागणी केली.परिणामी हा खटला प्रिव्ही कौन्सिलसमोर पुन्हा नव्याने चालविण्याचं ठरलं. या खटल्याच्या खर्चासाठी प्रिन्सिपल वर्डस्वर्थ यांनी ‘रखमाबाई ए हिंदू लेडी डिफेन्स कमिटी’ या संस्थेची स्थापनाही केली. प्रत्यक्ष राणीने यांत लक्ष घातल्याचा परिणाम जबरदस्त झाला. हे सगळं पाहून रखमाबाईंचे पती दादाजी आणि मामा नारायण धर्माजी यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचं ठरवलं.
इंग्लंडमध्ये जाऊन लढण्याची त्यांची ताकद नव्हती. तसंच जनमत आपल्याविरुद्ध जात आहे याची जाणीव त्यांना झाली होती. शेवटी रखमाबाईंशी चर्चा करून असा निर्णय घेण्यात आला की लग्नाचा व कोर्टाचा खर्च म्हणून रुपये २०००/- दादाजींना देऊन कायदेशीर घटस्फोट घ्यायचा. त्याप्रमाणे ५ जुलै १८८८ मध्ये हा वाद मिटविण्यात आला. त्या काळी नवऱ्याने आपल्या बायकोला सोडणं फारच सामान्य बाब होती, पण रखमाबाई कदाचित भारतातल्या पहिल्या महिला होत्या ज्यांनी आपल्या नवऱ्याकडे कायदेशीर घटस्फोट मागितला. “नो मिन्स नो” हे त्यांनी १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं.
रखमाबाईंमुळेच भारतात, खास करून महाराष्ट्रात संमतीवयाबद्दल चर्चा, वाद सुरू झाले. पुढे त्यांच्याच खटल्यामुळे ब्रिटिशकालीन भारतात ‘संमतीवयाचा कायदा १८९१ ‘ लागू झाला.रखमाबाईंच्या आयुष्यातील एक संघर्षमय वादळ शमलं. त्यांचं अर्धं आयुष्य जीवनाशी संघर्ष करण्यात गेलं.

त्या काळात परदेशातसुद्धा स्त्रियांचे वैद्यकीय शिक्षण तितके सोपे नव्हते. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. तेथील अनेक स्त्रियांनी त्यांना मदतीचा हात दिला.त्यासाठी इंग्लंडमध्ये गेल्यानंतर वैद्यकीय कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक विषयाचा अभ्यास फक्त चार महिन्यांत पूर्ण करून रखमाबाईंनी ऑक्टोबर १८९० मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वूमन’ ह्या कॉलेजात प्रवेश घेतला.
लांब हाताचा ब्लाऊज, पांढरी साडी, कपाळावर मोठं कुंकू, असा त्यांचा पोशाख. १८९१ व १८९२ मध्ये अनुक्रमे पहिली व दुसरी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ‘रॉयल हॉस्पिटल’मध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी शवविच्छेदन व भूलतंत्र ह्या विषयांचा अभ्यास केला. त्यानंतर डब्लिन येथील ‘रोटांडो’ हॉस्पिटलमध्ये मिडविफ्री व स्त्रीरोगतज्ञ हा शिक्षणक्रम पूर्ण केला.
नॅशनल डेंटल हॉस्पिटलमध्ये दंतचिकित्सेचं शिक्षण घेतलं. तसंच ‘बाळंतपणातील शस्त्रक्रिया’ ह्या विषयात ‘लंडन कॉलेज ऑफ मेडिसिन’ येथे त्यांनी परीक्षेत ऑनर्स मिळविला. अशा विविध विषयांचा अभ्यास केल्यानंतर १८९४ मध्ये त्या शेवटची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. परंतु लंडन विद्यापीठाला वैद्यकीय पदवी देण्याचा अधिकार नव्हता.
रखमाबाई खचल्या नाहीत त्यांनी पुढील परीक्षेसाठी ‘जॉइंट बोर्ड ऑफ द कॉलेजस् ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ एडिंबरा’ येथे प्रवेश घेतला. येथे त्या उत्कृष्ट मार्कांनी परीक्षा उत्तीर्ण झाल्या नि त्यांच्या नावापुढे एम्.डी. आणि एल्.आर.सी.पी. अँड एस् (Licential of the Royal Collage of Physicians & Surgeons) ही उपाधी लागली.
‘डॉ. रखमाबाई सखाराम राऊत’ ह्या नावाने त्या डिसेंबर १८९४ मध्ये भारतात परतल्या. मुंबईत परतल्यानंतर आपल्या वैद्यकीय व्यवसायाची सुरुवात रखमाबाईंनी मुंबईतील ‘कामा’ हॉस्पिटलमधून केली.
ब्रिटीश काळात भारतीय महिलांच्या आरोग्याचं चित्र काय होतं?
एकदा देवीची महाभयंकर साथ आल्यानं हजारो महिला आजारी पडल्या. त्यांना औषधं कोण आणि कशी द्यायचं माहित आहे?
आजारी महिलेला पडद्याआड बसवलं जायचं. पुरूष डॉक्टर दुसर्या पडद्यामागे असायचा. त्याच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असायची. आजारी बाई पडद्याआडून आपला एक हात बाहेर काढायची. पडद्याआडून पुरूष डॉक्टर तो हात तपासायचा आणि इंजेक्शन द्यायचा. या कामावर देखरेख करायला चार हिजडे नेमलेले असायचे.
बाळंतपणात लाखो महिला मरायच्या. डॉ. रखमाबाई यांनी महिलांनी दवाखाण्यात येऊन बाळंत व्हावे म्हणून परोपरीनं लोकांना विनवलं. पण हॉस्पिटलमध्ये भूतबाधा होईल अशा अंधश्रद्धेमुळे एकही गरोदर महिला बाळंतपण करायला तयार नसायची.
डॉ. रखमाबाई यांनी हॉस्पिटलमध्ये पहिलं बाळंतपण कसं केलं असेल?
तर त्यांनी एका बकरीचं बाळंतपण या हॉस्पिटलमध्ये केलं आणि त्याच्या ठळक बातम्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्यावर महिलांची भिती कमी झाली. काही पारशी बायकांची अतिशय निगुतीनं बाळंतपणं त्यांनी केल्यावर मग हळूहळू हिंदू, मुस्लिम आणि इतर समाजातल्या गरोदर महिला या हॉस्पिटलमध्ये येऊ लागल्या.
मुंबई, दिल्ली, राजकोट, सूरत इत्यादी ठिकाणी त्यांनी लंडनमधील ‘डफरीन’ या संस्थेच्या सहकार्याने हॉस्पिटलची उभारणी केली. १८९६ मध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली तेव्हां त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने त्यांना ‘इंग्रज ए हिंद’ हा बहुमान दिला. डॉ. रखमाबाईंनी वैद्यकीय क्षेत्रात योगदान दिलं, तसंच सामाजिक कार्यातही. १९१७ मध्ये नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्त्रियांमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हाती घेतलं. विधवा स्त्रियांसाठी ‘वनिता’ या नावाने आश्रमाची स्थापना केली. १९३२ मध्ये त्यांनी गावदेवी मंदिर अस्पृश्यांना खुलं केलं. त्यांनी कामाठीपुरातील शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने आयोजित केली.
एक डॉक्टर म्हणून त्यांचे काम महत्त्वाचं, पण त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामेही केली आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानड्यांनी अध्यक्षपद भूषवलेल्या इ.स. १९०७च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केले, तर पुढे राजकोटला गेल्यावर ‘रेडक्रॉस सोसायटी’ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचे कार्य लक्षात घेऊन इ.स. १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आले.
स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकेच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने घडवून आणली. ‘असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय’, ही भावना त्यांना छळत असे.अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणे, तिला लिहायला वाचायला शिकवणे, ‘मिडवाईफरी’ची परीक्षा द्यायला लावणे अशी कामे त्या करत राहिल्या. स्त्रियांना बॅंकांमध्ये खाते काढायला लावून बचतीचे महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या.
जशा त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणार्या होत्या, तसेच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे – ‘बायकोचे पोट हे नवऱ्याच्या पोटात’ हे तत्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणार्या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा’. वरवर साध्या वाटणार्या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल.
रखमाबाईंनी पुनर्विवाह केला नाहीच आणि आयुष्यभर त्या लांब हाताचा ब्लाऊज, पांढरी साडी, कपाळावर मोठं कुंकू, या पोषाखातच कायम वावरल्या.
रखमाबाईंचा मूर्तिपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचे मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्याने देण्याची व्यवस्था केली. वयानुसार डोळ्यांनी दिसणे अगदीच कमी झाले तेव्हा आजूबाजूच्या मुलांची ‘बालसभा’ घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवाने रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.
वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या, आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत धडपडणाऱ्या रखमाबाईंनी २५ डिसेंबर १९५५ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
ऊर्जेची अखंड ज्योत निमावली! स्त्रीशक्ती विचारांचं घोंघावणारं वादळ रुढार्थाने शमलं. पण त्यांनी दिलेला लढा सर्वकालिन महिलांसाठी आदर्श आहे,
तरीही आजची स्त्री चळवळ आणि वैद्यकविश्व डॉ. रखमाबाईंना विसरून गेले. इतिहासकारांनी , स्त्रीमुक्तीवाल्यांनी उपेक्षिलेल्या बुद्धिमान, बाणेदार, धाडसी आणि सेवाव्रती, रुग्णसेवा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांना आजच्या महिलादिनी मनाचा मुजरा !
…..नीला बर्वे .

courtesy – Saptahik Janmangal
pc:google

