सफर चांद्रलोकाची
पृथ्वी आणि चन्द्र यांचे युग्म हे आपल्या सूर्यमालेतील न सुटलेलं कोडं आहे. या युगमाला “द्वैती ग्रह” असचं मुळी म्हणलं जातं. चंद्राएव्हढा अवाढव्य उपग्रह, पृथ्वीने कसा काय सांभाळला हे एक नवलच आहे. इतर सर्व ग्रहांचे उपग्रह त्यामानाने खुजे आहेत.त्यामुळेच आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी-चंद्र ही जोडी एकमेवाद्वितीय आहे.
मानवाचे दैनंदिन जीवन या चंद्राशी खूप निगडित आहे.आपले धार्मिक सण, उत्सव चंद्राच्या कलांवर म्हणजेच तिथींवर अवलंबून आहेत.
असा हा चन्द्र आणि त्यामुळे आपल्या सूर्यमालेत घडणारे विविध सृष्टीचामत्कार समजून घेण्याची सुवर्णसंधी खगोलप्रेमी व अभ्यासकांना येत्या रविवार,दि 20 नोव्हेंबर 2016 रोजी उपलब्ध होणार आहे.
आपणास विदित असेलच की जनसेवा समिती, विलेपारले आणि उत्कर्ष मंडळ, विलेपारले यांच्या संयुक्त विद्यमाने, सुप्रसिद्ध खगोलअभ्यासक व विज्ञानलेखक, प्रा.मोहन आपटे यांची, दर महिन्याला एक अशी सलग 8 व्याख्यानांची मालिका,”सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार-सफर ग्रहगोलांच्या अद्भुत दुनियेची” या शिर्षकांतर्गत सुरु आहे.आजवर सूर्य, बुध, शुक्र आणि पृथ्वी यांच्यावर आधारित 3 व्याख्याने खगोलप्रेमींच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाली आहेत.
याच मालिकेतील 4 थे पुष्प, प्रा. मोहन आपटे रविवार दि 20 नोव्हेम्बर 2016 रोजी सायंकाळी ठीक 5.30 वा.विलेपारले पूर्व येथील उत्कर्ष मंडळाच्या सभागृहात गुम्फणार आहेत.
वरती उल्लेखल्याप्रमाणे यावेळचा विषय पृथ्वीचा एकमेव उपग्रह अर्थात चंद्र यावर आधारित असून ते “*चांद्रलोकाची सफर*” या विषयाच्या माध्यमातून चंद्राच्या उत्पत्ती, त्याची वैशिष्टये, चंद्राच्या संशोधनासाठी आजवर धाडलेल्या मोहीमा, चंद्रानुभव, भविष्यातील चांद्रभूमीवरील वसाहती, चंद्र आणि पृथ्वी या जोडीमुळे होणारे विविध सृष्टीचमत्कार आदी मुद्द्यांचा परामर्श आपल्या व्याख्यानात आपटे सर घेणार आहेत.
थोडक्यात या व्याख्यानाच्या निमित्ताने चंद्राची रंजक परंतु संपूर्ण शास्त्रीय माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे.
सदरहू व्याख्यान सर्वांसाठी नि:शुल्क असून जास्तीतजास्त नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
सोबत जोडलेल्या पत्रक व पोस्टर मधून सविस्तर माहिती आपल्याला मिळू शकेल. अर्थात अधिक माहिती हवी असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
पराग लिमये- 9987565738
अंबरीश पवार- 9619194640

