यशोगाथा – प्रवासाचा संकल्प
संकल्प टूर्सच्या स्कॅन्डेनविआ मिडनाईट सन सहलीचा ग्रुप घेऊन विमान मुंबई विमानतळावरून आकाशात झेपावले. मागे सरणाऱ्या शहराचे लुकलुकणारे दिवे लहान लहान होत दिसेनासे होऊ लागले. जसे विमान ३०००० फुटावर तरंगू लागले तसे मन पण आठवणींच्या विश्वात तरंगू लागले. आयुष्याच्या – ‘संकल्पच्या’ विलक्षण खडतर प्रवासाची क्षणचित्रे भराभर डोळ्यासमोर तरळू लागली .
B.Sc. फायनल ईयर ला असताना पार्ले कॉलेजची सिल्वर ज्युबिली होती. GS म्हणून ग्रुप ऍक्टिव्हिटीचा जो श्रीगणेशा केला तो प्रवास अखंड आहे. B.Sc. झाल्यावर ट्रेकिंग चा नाद लागला. १० वर्षे ३०-४० कॉलेजच्या मुलामुलींचा ‘माऊंटन हॉक्स’नावाने हायकिंग ग्रुप चालवला. सह्याद्रीत १५० व हिमालयात ४ ट्रेक्स यशस्वी केले. सतत मुलांचा ग्रुप सोबत असायचाच. मोठ्या संस्थांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांना व्हॉलेंटियर्स म्हणून बोलावणी आली. त्यात एक विशेष मोठा इव्हेंट म्हणजे ‘पहिली जागतिक मराठी परिषद’. षण्मुखानंद हॉल व नेहरू सेंटर मधील सर्व कार्यक्रमांसाठी जवळ जवळ २०० व्हॉलेंटियर्स मॅनेज केले.
हे करीत असताना धर सोड करीत अनेक जॉब्स केले. ट्रेकिंग चालूच होते. पण सर्व दुनियादारी पद्धतीनेच चालले होते. सेटलमेंटचा मोठा प्रश्न होता. धाडस करून मित्रांच्या सोबत ट्रॅव्हल्स काउंटर सुरु केला. पार्ले स्टेशन समोर. अगदी गिरनार जवळ. चांगला चालू होता. शिर्डी, अष्टविनायक अशा छोट्या टूर्स व काश्मीर सहली पण केल्या. एक ४५ जणांचा मोठा काश्मीर ग्रुप सर्व बुकिंग झाल्यानंतर पुरामुळे कॅन्सल झाला. सपाटून मार खाल्ला. गुपचूप ट्रॅव्हल बंद करून जॉब पकडला.
केसरी ट्रॅव्हलमुळे खूप शिकायला मिळाले. केसरी पाटील भाऊ हे एक भारदस्त व्यक्तिमत्व जवळून बघायला मिळाले. भाऊंचा सर्वात आवडता आणि खास असिस्टंट म्हणून ओळख मिळाली. भाऊंचा आवडता नैनिताल सेक्टर , नंतर ४ वर्षे मेन टूर ऑपरेटर लीडर म्हणून सांभाळला. अभ्यास व मेहनतीने केसरीच्या Top Five Tour Manager मध्ये नाव आणले. ५ वर्षांत नैनिताल, चारधाम, राजस्थान, दक्षिण भारत ह्या सेक्टरवर मेन टूर लीडर म्हणून काम केले. अनेक असिस्टंट्स ट्रेन केले.
Advertisement (Continue Reading After Advertisement)

१९९९ साल माझ्या आयुष्यात मोठा टर्निग पॉईंट ठरला. वयाच्या ३६ व्या वर्षी आयुष्यात हवा तसा पार्टनर मिळाला. लग्न झाले आणि केसरीच्या युरोप सहलीसाठी नियुक्ती झाली. केसरीने इंटरनॅशनल टूर्स सुरु केल्या. युरोप ट्रेनिंगसाठी माझे नाव पुढे आले. खूप अभ्यास केला. युरोप सहली सुरु झाल्या. पुढच्या ५ वर्षात युरोप फिरलो. युरोपच्या प्राईम टूर्स सांभाळल्या. त्या काळात युरोप सहल मॅनेजर म्हणजे दिव्या होते. मोबाईल फोन्स, GPS नव्हते. जर्मन ड्रायव्हर्स खूप त्रास द्यायचे. रस्ते शोधणे व रूट सेट करणे. खूप मेहनत घेतली. आम्ही ५ जणांनी केसरीची युरोप टूर खूप पॉप्युलर केली. युरोप व्यतिरिक्त , केनिया , साऊथ आफ्रिका , सिंगापूर, मलेशिया, थायलंड सहली पण केल्या.
२००६ ला केसरी सोडून थॉमस कूक जॉईन केले. सुरुवातीला नॉन महाराष्ट्रीयन लोकांना मॅनेज करताना कठीण गेले. एका वर्षात SOTC जॉईन केले. पुढे ५ वर्षे SOTC युरोप सहली केल्या. २०११ साली पुन्हा मनात स्वत:चे ऑफिस दिसायला लागले. ६ महिने मित्रांच्या आग्रहाखातर त्यांच्या बॅनरखाली एक स्वतंत्र युरोप तूर लावली. आणि २८ जणांचा ग्रुप नेऊन यशस्वी केली. आत्मविश्वास उंचावला व धाडस करून पार्ल्यात श्रद्धानंद रोडवर जागा भाड्याने घेऊन संकल्प टूर्स चे ऑफिस सुरु केले. आता मात्र प्रचंड अनुभव पाठीशी होता. जिद्द होती, स्वप्न होते. हळू हळू प्रवास करत अडीच वर्षे गेली. पण आत्तापर्यंत संकल्पने स्वतंत्ररित्या ७ युरोप , दुबई व
स्कॅन्डेनेव्हिया विथ मिडनाईट सन ह्यासारख्या अनेक टूर्स संकल्पने यशस्वी रित्या पार पडल्या.
स्कॅन्डेनेव्हिया विथ मिडनाईट सन ह्यासारख्या अनेक टूर्स संकल्पने यशस्वी रित्या पार पडल्या.
हेलसिंकी येथे विमान लँड होताना … धक्क्याने तंद्री भंग झाली. चला हेलसिंकी आले … नवीन टूर सुरु होत आहे. … नवीन प्रवास … let’s enjoy… Bon Voyage.
२०१७ संपेल तेंव्हा संकल्प टूर्सला ५ वर्षे पूर्ण होतील. ५ वर्षात संकल्पची ओळख निर्माण झाली आहे. लोक विश्वासाने येऊ लागले आहेत. चांगली सर्व्हिस देऊन लोकांना पर्यटनाचा आनंद देणे हाच ध्यास आहे. संकल्प आहे.
श्री. सुनील तारकर
संकल्प टूर्स अँड ट्रॅव्हल्स
विलेपार्ले (पूर्व)

