ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशा भारदस्त आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं आज निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शन वरील बातम्यांची ओळख बनले होते.
श्री. केशव साठे यांनी प्रदीप भिडे यांच्याविषयी आपल्या लेखणीतून दिलेली विनम्र श्रद्धांजली !
प्रदीप भिड़े
आश्वासक अशा आवाजाच्या पाठबळावर यानी मराठी मधील किमान ६०% रेडिओ जाहिराती आपल्याला ३ दशके ऐकवल्या.
त्या वेळी मराठी साठी जाहिरातीची वेगळी संहिता लिहिली जायची..
कारण त्यावेळी भाषा समजणारे ,आणि आवाजावर मेहनत घेणारे याच्या सारखे निवेदक कार्यरत होते. (आता इंग्रजीचे मराठी भाषांतर करून वेळ मारुन नेतात )
१९७५ ते २००५ असा सलग ३ दशकांचा काळ दूरदर्शनच्या मराठी बातमी पत्रावर निवेदक म्हणून याच नाव ठळकपणे नोंदला गेलं.
कांदिवली ते चर्चगेट आणि अंधेरी ते कुलाबा असा स्टुडिओ चा प्रवास करताना ध्वनिमुद्रणाची वेळ त्यांनी कधी चुकवली असे ऐकले नाही.
‘सिंगल टेक ओके’ हे तर त्याच्याबाबत कायमच घडत आलं. आणि सर्वात घेण्यासारखा त्याचा गुण म्हणजे मिडिया क्षेत्रात असूनही कोणत्याही गॉसिपिंग मध्ये तो कधीच अडकला नाही .
कुणाबद्दलही तो खाजगीतही वाईट बोलल्याचे मला आठवत नाही , सगळे छान आहेत ही भावना मनात असायला ते स्फटिकासारखं असावं लागतं ते आमच्या मित्राकडं होतं .
भाषा ,आवाज ,उच्चार ,भावना आणि संहितेची गरज याचे उत्तम भान ठेवल्यामुळे इतक्या जाहिराती , बातम्या वाचूनही हा over exposed कधी झाला नाही.
बातम्या वाचता वाचत अनेक सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम यांनी रंगतदार केले.
पुणे फेस्टिव्हलचा मुख्य सूत्रसंचालक ही जबाबदारी त्यानी दोन दशके उत्कृष्ट सांभाळली.
सुशीलकुमार शिंदेंजी आणि हर्षवर्धनजी पाटील यांचं वैशिष्ट्य हे होतं की मुख्यमंत्री कोणीही असोत मंत्रिमंडळात यांची सीट पक्की…
याच्याबाबत हेच घडलं सर्व महत्वाच्या शासकीय कार्यक्रमांना पहिली पसंती यालाच मिळायची.
मग ते शरदराव पवार असोत विलासरावजी देशमुख असोत ,नारायणराव राणे असोत, वा देवेन्द्रजी फडणवीस.
सरकारी कार्यक्रमात डेकोरम सांभाळायचा असतो , प्रेक्षकांना हसवण्यासाठी अल्लड शेरेबाजी करायची नसते हे याला अचूक माहीत .
माणसातला चांगुलपणाच कायम लक्षात ठेवणारा ,आवाजालाही व्यक्तिमत्वाचे वैविध्यपूर्ण कंगोरे असतात याचा वस्तुपाठ देणारा सूत्रसंचालक, निवेदक …
प्रदीप भिडे
आज (७ जून )सकाळी ११ वाजता अंधेरीच्या राहत्या घरी त्याचे दीर्घ आजाराने निधन झाले . आत्ता संध्याकाळी ६ वाजता अंधेरीला त्याचे अंत्यसंस्कार होत आहेत.
विनम्र श्रद्धांजली !
लेखन :- केशव साठे

