पावसाळ्यात सुद्धा निरोगी आणि सशक्त राहण्याचे उत्तम मार्ग
पावसाळा छान सुरु झाला आहे आणि वजन कमी करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी येणारे खूप जण, “पावसामुळे व्यायाम बंद पडला आहे” असे कारण सांगत माझ्याकडे येत आहेत.
खरे बघायला गेले तर मीच काय पण सगळ्याच आहारतज्ञाना दरच वर्षी असा अनुभव येतो. मग “कधी करणार व्यायाम ? वेळच नाही मिळत पावसात सकाळी उठायला कंटाळा येतो.” “बाहेर चिखल च असतो. नको वाटते बाहेर जायला.” पासून ते “व्यायामाचे कपडे सुकलेच नव्हते. मग काय करणार.” पर्यंत विविध सर्जनशील [creative] सबबी ऐकायला मिळतात.
तसे पावसाची रिमझिम सुरु झाली की लगेच मी माझ्या सगळ्या पेशंटना, “पाऊस येऊ लागला आहे तर तुमच्या व्यायामात खंड नाही पडता कामा. थोडा वेगळा पण रोज व्यायाम कराच.” असे बजावायला सुरु करते. व्यायाम करण्याचे वेगवेगळे पर्यायसुद्धा सुचवायला लागते. तर आज म्हंटले आपल्या वाचकांपर्यंत सुद्धा हेच पावसाळी व्यायामाचे पर्याय पोचवावेत.
व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे किंवा वाढवणे हा व्यायामाचा हेतू नाही. व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्हीला मदत होते. व्यायामामुळे शरीरात जी रसायने आणि होर्मोनस निर्माण होतात त्यामुळे अनेक अवयवांना सुरळीत काम करण्यात मदत होते. तसेच मनाचा शीण जाण्यास आणि नवचैतन्य येण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम हा चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी गरजेचा आहे.
पावसाळ्यात बाहेर मोकळ्यावर व्यायाम करणे कठीण होते. कधी चिखल, कधी तुंबलेले पाणी तर कधी जोरात आलेली पावसाची सर. पण अश्या वेळी आपण घरात किंवा जिममध्ये व्यायाम करू शकतो.
१] घरात जर व्यायाम करायचा असेल तर सर्वात महत्वाचे म्हणजे रोजची व्यायामाची वेळ कायम ठेवा. अनेकदा घरीच करायचं तर करू नंतर असे म्हणून व्यायाम राहून जातो. त्याऐवजी रोज ज्या वेळ आणि जितका वेळ तुम्ही व्यायामासाठी बाहेर जाता नेमका तेव्हाच घरात व्यायाम करा.

२] व्यायामाची सुरवात सध्या सोप्या वॉर्म अप व्यायामाने, स्ट्रेचिंग व्यायाम प्रकाराने करा. ह्यामुळे सर्व सांधे आणि स्नायू मोकळे होतात. ह्यामुळे नंतर व्यायाम करताना स्नायूंचे दुखणे उद्भवत नाही.
३] घरातल्या घरात व्यायाम करायचा म्हंटले कि जागच्या जागी व्यायाम करणे आले. अश्यावेळी जागच्याजागी जॉगिंग, दोरीच्या उड्या, उठाबश्या, उभे राहून पायाचे अंगठे पकडणे असे व्यायामाचे प्रकार करावेत.
४] सूर्यनमस्कार घालणे हा अत्यंत उपयुक्त व्यायाम आहे. सुर्यानामस्कारामुळे शरीरातील सर्व अवयांना, सांध्यांना आणि स्नायुंना व्यायाम मिळतो. सूर्यनमस्कार घालताना आधी कृती नीट समजून घेऊन घालावेत. तर त्याचा सर्वाधिक उपयोग होतो.
५] घरातील किंवा इमारतीतील जिने चढ उतार करणे हा देखील उत्तम व्यायाम आहे. पण व्यायाम म्हणून ठरलेला वेळ हा व्यायाम सतत करायला हवा. भाजी आणायला बाहेर पडताना एकदा, कामाला बाहेर जाताना एकदा, मुलांना शाळेला सोडायला जाताना एकदा, घरी येताना एकदा असे जिने चढ उतार करण्याचा शरीराला व्यायाम म्हणून उपयोग होत नाही. सलग १५ ते २० मिनटे जिने चढ उतार करणे म्हणजे व्यायाम झाला असे म्हणता येईल. जिने चढ उतार करताना गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने व्यायाम होतो त्यामुळे ह्याचा शरीराला जास्त उपयोग होतो.
६] घरातल्याघरात योग , प्राणायम करणे हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. योगा आणि प्राणायामामुळे मन शांत होण्यासाठी सुद्धा छान मदत होते. शरीराचा रक्तप्रवाह उत्तम होतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यासदेखील मदत होते.
७] तुम्हाला जर नाच करायला आवडत असेल तर खुशाल तासभर मनसोक्त नाच करा. नाच करण्याने शरीराला तर उत्तम व्यायाम मिळतोच पण मन देखील प्रफुल्लीत होते. आसपासकोणी आहे कि नाही ह्याचा विचार सोडून नृत्यात रममाण होऊन जा.
८] घरातील बरीच कामसुद्धा आपल्याला छान व्यायाम मिळवून देऊ शकतात. खाली बसून केर काढणे, खाली बसून फडक्याने फारशी पुसणे, खाली बसून भांडी घासणे, घरातील समान पुसणे, कपाट खण आवरणे, माळ्यावारचे सामान आवरणे किंवा स्वच्छ करणे अशी अनेक काम व्यायाम म्हणून उपयोगाला येऊ शकतात.
९] तुमच्या घरात किंवा आजूबाजूला लहान मुल असतील तर त्यांच्याबरोबर घरातल्या घरात पकडापकडी, लपाछपी खेळणे किंवा चेंडूने खेळणे हा सुद्धा आनंद देणारा उत्तम व्यायाम असू शकतो. लहान मुले म्हणजे उर्जेची खाण असतात. आणि त्यांची हि उर्जा संसर्गजन्य असते. त्यामुळे तुमचा अख्खा दिवस छान ऊर्जामय जाईल.
१०] तुम्हाला घरी एकटे व्यायाम करायला कंटाळा येत असल्यास हल्ली इंटरनेट वर अनेक अएरोबिक व्यायामाचे छान व्हिडीओउपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या डॉ किंवा आहारतज्ञान विचारून तुमच्या शरीरासाठी योग्य तो व्हिडीओ शोधून घेऊन दररोज वापरू शकता. हे व्हिडीओ फार उत्तम असतात. ह्यात स्क्रीन वर दिसणारी माणसे आपल्याला व्यायाम करून दाखवत असतात. त्याच बरोबर ते हा व्यायाम कसा आणि का करावा हे सांगत सुद्धा असतात. आणि तुमच्या बरोबरीने ते तितका वेळ ते विविध व्यायाम करत राहतात.
११] जिम मध्ये जाणे हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. तिथे जाऊन स्ट्रेचिंग, फंक्शनल ट्रेनिंग, कार्डीओ, वेट लिफ्टिंग अश्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकता.
१२] तुम्हाला पाण्याची भीती नसेल, फार थंडी वाजत नसेल तर पोहणे हा फार उत्तम व्यायाम आहे. पोहण्यामुळे डोक्यापासून पायापर्यंत सगळ्या स्नायुंना उत्तम व्यायाम मिळतो. पाण्यात सांध्यांवर ताण येत नाही किंवा सांध्यांची झीज होते नाही. त्यामुळे पोहणे किंवा अक्वा एरोबिक्स हा व्यायामाचा उत्तम आणि मजेदार पर्याय तुम्ही निवडू शकता.
अश्या तर्हेने आता आपण पावसाळ्यात सुद्धा निरोगी आणि सशक्त राहण्याचे अनेक मार्ग शाधून काढले आहेत. तर तुम्ही ह्या पावसाळ्याचा छान आस्वाद घ्याल अशी मला खात्री आहे.
- डॉ. अस्मिता सावे.
- म्यानेजिंग डायरेक्तर ‘ रिजॉंइस वेलनेस’
- होमेओप्याथ, आहारतज्ञ, अक्यूप्रेशर थेरापिस्त.
PC: google

