स्वागत नववर्षाचे © मुकुंद कुलकर्णी
तर मंडळी….. कॅलेंडरचं आणखी एक पान उलटलं जाईल आणि सालाबादप्रमाणे आपलं नववर्षात पदार्पण होईल. 2023 मधून आपला प्रवेश 2024 मध्ये होईल नववर्षाच्या स्वागतासाठी सगळेच आपापल्या परीने सज्ज असतीलच! जल्लोष साजरा करायला आपल्याला आणखी एक निमित्त.
तसे आपण सगळे भारतीय उत्सवप्रिय , सगळे म्हणजे सगळेच , सगळ्या जाती धर्मातले सगळ्या आर्थिक स्तरातले . कुठलं तरी निमित्तच पाहिजे आपल्याला मजा करायला . तर अशा निमित्तातलं एक आवडतं निमित्त म्हणजे 31 डिसेंबर . मला जसं आठवतंय तस आमच्या लहानपणी हे 31 डिसेंबर वगैरे काही नसायचं . फार कशाला वाढदिवस सुद्धा यायचा आणि जायचा . आई वडील लाड करायचे पण तेवढंच . आता मिळेल त्या संधीचा आपण ईव्हेंट करतो .
इडियट बॉक्सचा जेंव्हा आपल्या रोजच्या दिनक्रमात प्रवेश झाला तेंव्हापासून नववर्ष स्वागताचा महोत्सव होण्याची सुरूवात झाली . तेंव्हा दूरदर्शनवर रात्री बारा वाजेपर्यंत रंगारंग कार्यक्रम व्हायचे आणि सिरियल्स, OTT वेब सिरियल्स, टीआरपीचा सावळा गोंधळ नसल्यामुळे हे कार्यक्रम मनोरंजक वाटायचे . मग ऑस्ट्रेलिया जपान अतीपूर्वेकडून नव वर्षाच्या स्वागतासाठी केलेली आतिषबाजी हे सगळं ठरलेलं असायचं .आपल्या घड्याळाचा काटा बारावर कधी येतो याची उत्सुकता.
खरं तर काही वर्षांपूर्वी आजचा जो मध्यमवर्ग आहे तो कनिष्ठ मध्यमवर्ग होता , कशीबशी महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी व्हायची . पहिला गोल्डन वीक ते अखेरचा पेपर वीक असे दिवस होते ते अखेरचा पेपर वीक म्हणजे अक्षरशः पेपर विकच असायचा ! हॉटेलिंग सुद्धा फार क्वचितच व्हायचं . पुण्या मुंबईकडे , कशाला , बहुतेक सगळीकडेच आजकाल वीकेंडला घरी जेवणारा प्राणी दुर्मिळ होत चाललाय .
दारू पिणे हे थोडंस वेगळच प्रकरण होतं , दारूला दारूच म्हणायचे ड्रिंक्स असं त्याचं नामकरण झालं नव्हतं ते अलीकडे झालं . 31 ची पार्टी ड्रिंकशिवाय हे समीकरण आता आजिबात जुळत नाही .
पण थोडासा उदारमतवादी दृष्टिकोन ठेवून या सगळ्याकडे गम्मत म्हणून पहायला काय हरकत आहे , आपल्या जिवलग माणसांसोबत जिवलग मित्रमंडळींच्या बरोबर क्वचित प्रसंगी चित्तवृत्ती उल्हसित होतील इतपत माफक पेयपान करून आपल्याला आवडेल ते सामिष , निरामिष चापायला काय हरकत आहे ! अर्थात तब्येत सांभाळून . स्टीलच्या ग्लासमध्ये व्हिस्की , बीयर तत्सम काहीतरी लपवून घ्यायचं आणि शहाजोगपणाचा आव आणायचा . मी नाही त्यातली कडी लावा आतली ! त्यापेक्षा थोडी गम्मत करून पहायला काही हरकत नसावी . तसं आजकाल सगळ्याच क्षेत्रात मग नोकरी असो अथवा व्यवसाय स्ट्रेस प्रचंड वाढलाय . आवडत्या काही लोकांसमवेत सुखाचे काही क्षण घालवणे या सारखा स्ट्रेसबस्टर नाही .अर्थात तसा हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न .
1 जानेवारी पासून सुरू होणारे नववर्ष आपले नाही , हिंदू नववर्ष गुढी पाडव्या पासून सुरू होते . नववर्षाच्या शुभेच्छा आता देऊ नयेत अशी भुमिका काही लोकांची आहे. हिंदू नववर्ष, गुढी पाडवा तर आपण घरोघरी मोठ्या उत्साहात साजरा करतोच मग नूतन कॅलेंडर वर्षाचा पहिला दिवस नववर्षदिन म्हणून साजरा करण्यात काय हरकत आहे . तसेही आपले सर्व व्यवहार आपण ग्रेगेरियन कॅलेंडर प्रमाणे करतो कुठल्याही करार मदारांवर , बँकेच्या चेकवर आपण इंग्रजी तारीखच वापरतो . श्रीमन्नृपशालिवाहन शक 1945 शोभन नाम संवत्सर मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी असे लिहित नाही . सर्वसमावेशक व्यापक दृष्टीकोनाची सहिष्णु शिकवण आहे आपली , जेथे जे काही वेगळे,चांगले ते आपण उदार मनाने स्वीकारतोच तसेच हे ही स्विकारायला हरकत नसावी. त्यामुळेच आज आपण प्रगती पथावर आहोत .
गतवर्षाकडे नजर टाकल्यास काही ठळक घडामोडी लगेचच आठवतात. चंद्रयान तीन चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लॅंडिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उदय, आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये डोनॉल्ड ट्रंप यांचे अमेरिका फर्स्ट हे आवाहन, अमेरिकेची अफगाणिस्तानातून माघार, कॅनडा बरोबर झालेला विसंवाद, युरोप बाहेर नाटोचा विस्तार, इराण सौदी मध्ये प्रस्थापित झालेले राजकीय संबंध, तुर्कस्थान अझरबैजान संघर्ष, कतार मधील आठ नौसैनिकांची मृत्युदंडातून सुटका, रशिया युक्रेन युद्धाचा नवीन पर्वात प्रवेश, हमासचा इस्राईल वर हल्ला इस्राईलचे प्रत्युत्तर, तैवान चीन धुमसणारी ज्वलंत राजकीय समस्या, आपल्यासाठी कौतुकास्पद म्हणजे भारताने भूषवलेले जी 20 चे अध्यक्षपद आणि यजमानपद, काश्मीर ची सर्वांगीण प्रगती, वसुधैव कुटुंबकम् आणि विश्वगुरु बनण्याची आपली कौतुकास्पद महत्वाकांक्षा, पाकिस्तानची सर्व क्षेत्रात अधोगती………
क्रिडा क्षेत्रात आपण बरंच काही कमावलं आणि गमावलंही. एशियन गेम्स मध्ये भारताच्या पदकांचा आकडा शंभर पार, ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदचा उदय, नीरज चोप्राचे आणखी एक सुवर्णपदक, भारतात मोठ्या दिमाखात पार पडलेली क्रिकेट विश्वचषक स्पर्धा, विराटच्या ओडीआय शतकांचे अर्धशतक, विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत एकही सामना न हरता भारताची स्वप्नवत वाटचाल, अंतिम सामन्यातील पराभवाने विश्वचषक जिंकण्याच्या स्वप्नाचा भंग, तसाच दारुण अपेक्षाभंग वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्यात, सर्व महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले, फुटबॉल मध्ये विशेष काहीही साध्य झाले नाही, हॉकी मध्ये एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफीवर पिछाडीवरून मिळालेला अद्भुत विजय, क्रिकेटमध्ये मात्र निर्णायक वेळेला अंतिम रेषेजवळ जाऊन अपयश हे आपलं गतवर्षातलं फलित, पुरुष आणि स्त्री दोन्ही संघांचे वर्षाच्या अखेरच्या सामन्यात अपयश, दक्षिण आफ्रिकेने कसोटी सामन्यात केलेला दारूण पराभव,ऑस्ट्रेलियाबरोबर जिंकत आलेला एकदिवसीय सामना कसा हरावा याचे आपल्या मुलींनी सादर केलेलं उदाहरण, कदाचित पुढील वर्षातील देदीप्यमान यशाची ही नांदी ठरेल अशी आशा करूया. थोडक्यात गतसालातील महत्त्वाच्या घटनांचा असा घेता येईल परामर्श.
हा कोविड-19 मात्र अजूनही आपला पिच्छा सोडत नाहीये. 2019 साली वर्षाला निरोप देताना याने चोर पावलाने प्रवेश केला आणि बघता बघता सगळे जग व्यापून टाकलं. पहिली लाट, दुसरी लाट अशा लाटेमागून लाटा येऊन गेल्या. डेल्टा लाट मात्र महाभयंकर होती. त्या लाटेत आपल्या जवळचं माणूस गमावलं नाही असं कोणी सापडणं विरळाच. लस निर्माण करणे शेवटच्या व्यक्तीपर्यंत लसीकरणाचा प्रयत्न करणे या गोष्टी भारताला कौतुकास्पद आहेत. आपल्या शास्त्रज्ञांचे हे अलौकिक यश आहे सरकारचाही भक्कम पाठिंबा त्याला लाभला. पुन्हा एकदा ओमायक्रॉनचा नवीन व्हेरिएंट डोकं वर काढतो आहे अशा बातम्या आहेत तेव्हा काळजी घ्यायला हवीच. नाहीतरी आपल्या हातात तेवढेच आहे.
गेलं वर्ष इतर वर्षांसारखंच ‘मिक्स्ड बॅग’ होतं. सगळं काही चांगलं नव्हतं, पण सगळं काही वाईट नव्हतं हे ही खरंच . काही पिकली पानं गळाली, नवी पालवी फुटली, सगळ्यांशी सुसंवाद साधला गेला, अगदी आपल्या स्वतःशी सुद्धा . परिवर्तनशील बदलले . मुर्खांच्या नंदनवनात राहणारे आणखीनच मूर्ख राहिले ! हे ही तितकंच खरं . संवेदनशील लोक मात्र आणखीन अंतर्मुख होऊन विचार करायला लागले . कुठलीही वाईट गोष्ट सर्वस्वी वाईट कधीच नसते . वाईटातूनही काहीतरी चांगलं निर्माण होतोच , ते शोधण्याचा संकल्प नववर्षात करू या ! HAPPY NEW YEAR!!
तर मंडळी , नववर्षाचे स्वागत आपापल्या आवडी प्रमाणे करू या . रात्रीची जमावबंदी इत्यादी शासकीय आदेशांचे पालन करत करू या . कुटुंबियांच्या सहवासात आनंदयात्री होऊ या .
सर्वांनाच नव वर्ष सुख समृद्धीचे , भरभराटीचे , आरोग्यसंपन्न , इच्छित मनोरथ प्राप्तीचे जावो !
कुठले पुस्तक कुठला लेखक
लिपी कोणती कसले भाकित
हात एक अदृश्य उलटतो
पानामागुन पाने अविरत
गतसालचे स्मरण जागता
दाटून येते मनामध्ये भय
पान हे नवे यात तरी का
असेल काही प्रसन्न आशय
अखंड गर्जे समोर सागर
कणाकणाने खचते वाळू
तरी लाट ही नवीन उठता
सजे किनारा तिज कुरवाळू
स्वतः स्वतः ला देत दिलासा
पुसते डोळे हसता हसता
उभी इथे मी पसरून बाहू
नवीन वर्षा तुझ्या स्वागता
– शांता शेळके
दुखभरे दिन बिते रे भैया अब सुख आयो रे
असा ये नववर्षा ! तुझे स्वागत !!
मुकुंद कुलकर्णी ©

