तुमची मन:शांती हरवली आहे का???

आज प्रत्येक जण घाईत आहे .कोणत्या ना कोणत्या तरी स्पध्रेत अडकलेला आहे या सगळ्या गोष्टींमुळे शांतता ,आनंद या सगळ्या गोष्टींपासून खूप लांब गेलेला आहे आणि आपली मनःशांती हरवून बसलेला आहे .याचं कारण आहे बदलती जीवनशैली.  बदलती जीवनशैली म्हणजे काय तर पूर्वीच्या काळाच्या  आणि  आताच्या जीवनशैलीत असलेला फरक  .

पूर्वीच्या काळी पुरुष शेतावर काम करायचे त्यामुळे भरपूर चालणं ,शेतावरची कामं, महिलांचा दिनचर्येत सडा, रांगोळी, विहिरीतून पाणी काढणं ,पाट्या – वरवंट्यावर वाटणं अशा सर्व शारीरिक श्रमांतून सगळ्यांच आरोग्य आपोआपच राखलं जायचं. शिवाय एकत्र येऊन सण समारंभ करणं, रोजच्या व्यवहारात जात्यावर दळताना ओव्या ,श्लोक म्हणणं संध्याकाळचा पर्वचा अशा संस्कृत शब्दांच्या उच्चारामुळे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नादामुळे आपल्या अंत:स्रावी ग्रंथींचे आरोग्यही सुस्थितीत राहात असे, त्यामुळे बुद्धी जागेवर राहून मानसिक शांती प्राप्त होत असे .आत्ताच्या परिस्थितीचा विचार केल्यास आपल्या आजूबाजूला प्रत्येक क्षेत्रात  जीवघेण्या स्पर्धा सुरू आहेत त्यामध्ये आपण सगळे भरडले जात आहोत आणि याच गोष्टींमुळे माणूस मनःशांती हरवून बसला आहे.
सुशांत सिंग राजपूत सारखे सेलिब्रिटी असोत व  लोकांना ज्ञान देणारे  महाराज यांच्या आत्महत्या अगदी  काल वाचलेली  शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची बातमी.  
आजकाल खरोखर रोज वर्तमानपत्रांत तरुण मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचायला मिळतात.   या सगळ्यामागे काय कारणं असतील याचा विचार केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की आजकाल मुलांना नकार पचवता येत नाही, स्पर्धेला तोंड देता येत नाही,त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव आहे, अपयश आलं की नैराश्यात जाण्याची भावना निर्माण होते . पूर्वी  पालकांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद असायचा , लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जायचं – अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि त्यामुळेच कदाचित कधी अपयश आलं म्हणून काय झालं , पुढे नक्की यश येईल  ही भावना मनात नक्की असायची. पण सध्या आपण ज्या स्पर्धेच्या , नैराश्याच्या गर्तेत अडकलो आहोत , या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे असणारी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग .

योग ही कोणतीही  उपचार पध्दती नसून जीवनपद्धती आहे हे आपण आपल्या मनावर ठसवल पाहिजे. ज्याप्रमाणे रोज आपण अंघोळ करतो त्याप्रमाणे दिवसातला थोडा वेळ योगासाठी दिला पाहिजे.

याच योगा मधला मन:शांती मिळवणारा एक भाग म्हणजे श्वसनाचे नियंत्रण.

या सदासर्वदा अस्थिर असलेल्या मनाला स्थिर करून शांत करण्यासाठी माणसांनी युगानयुगे असंख्य उपाय आचरले आहेत या सगळ्यामध्ये योग ,नामस्मरण आणि ध्यानधारणा याला खूप महत्त्वाचे स्थान आहे.  
योग आणि ध्यानधारणा किंवा मेडिटेशन यामध्ये श्वासावर नियंत्रण ठेवणे श्वासाची गती कमी करणे, श्वास दीर्घकाळ रोखून धरणे यावर विशेष भर दिला जातो .
दीर्घ श्वसन  –
आपण साधारणतः दर मिनिटाला बारा ते वीस वेळा श्वास घेतो.धावलो, पळालो ,वजन उचललं किंवा व्यायाम केला की आपल्या श्वासाची गती वाढते.आणि त्याविरुद्ध आपल्याला जर हवे असेल तर आपण श्वासाची गती मंदही करु शकतो. श्वासाची गती मंद करण्यासाठी दीर्घ श्वास घेऊन आपण तो थोडावेळ रोखू शकतो. दीर्घ श् वसनाचे अनेक फायदे आहेत .
दीर्घ श्वसनामुळे आपल्या शरीरात प्रत्येक पेशीला भरपूर प्रमाणात अधिक प्राणवायू मिळतो त्यामुळे त्यांच्या कार्यात सुधारणा होते आणि आपले आरोग्य सुधारते.
मेंदूलाही दीर्घ श्वसनामुळे अधिक प्राणवायू मिळतो त्यामुळे त्याची सजगता आणि सतर्कता वाढते बौद्धिक कार्यात जास्त अचूकता येते आणि शारीरिक कार्य करण्याची क्षमताही वाढते.  मेंदूला प्राणवायूचा भरपूर पुरवठा झाल्यावर डोपामिन, सिरोटोनिन, ऑक्सीटोसिन आणि एन्डॉर्फिन हे हार्मोन्स स्रवून शरीरामध्ये आनंदाची भावना निर्माण होते.
दीर्घ श्वसनानं शरीरातील आकसून कडक झालेले स्नायू ही सैल होतात आणि त्यामुळे शरीरावरचा तणाव कमी होतो.शरीरावरचा तणाव कमी झाला की रक्तदाबही नियंत्रित राहतो.दीर्घ श्वसनानं फुफ्फुसाचे आरोग्यही चांगले राहतेफुफ्फुसांमध्ये वायू कोश जे इतरवेळी पूर्णपणे वापरले जात नाहीत आणि मिटलेल्या अवस्थेत राहतात ते दीर्घ श्वसनामुळे वापरले जातात त्यामुळे प्राणवायू जास्त शोषला जातो. या क्रियेमुळे श्वसन संस्था कार्यक्षम होते आणि श्वसनसंस्थेचे अनेक विकार नियंत्रणाखाली येतात. तसेच दीर्घ श्वासामुळे अधिक प्राणवायू मिळाल्यामुळे हृदयावर ताण पडत नाहीस्पंदनाची गती कमी होते आणि हृदय अधिक कार्यक्षम बनते .त्यामुळे हृदयाच्या अनेक आजारांवर ताबा मिळवता येतो.
मनावरचा ताण कमी करायला, चिंता नैराश्य, घबराट दूर व्हायलाही दीर्घ श्वसनाचा खूप उपयोग होतो . 
दीर्घ श्वसन, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या वेगवेगळ्या मार्गांनी आपण शरीरातील प्राणवायूचे प्रमाण वाढवू शकतो. आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखू शकतो.
अनुलोम विलोम कसे करावे  ?

नाडी शुद्धी म्हणजेच अनुलोम विलोम करण्यासाठी पद्मासन किंवा सिद्धासनात बसावे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यावा .दोन्ही नाकपुड्या बंद करून थोडा वेळ श्वास रोखून ठेवावा .मग डावी नाकपुडी बंद करुन उजव्या नाकपुडीने श्वास हळूहळू सोडावा.नंतर डावी नाकपुडी बंद करुन उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा .दोन्ही नाकपुड्या बंद करून श्वास रोखून ठेवावा.नंतर डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू सोडावा .
अशाप्रकारे एक चक्र पूर्ण होईल. असे  सुरवातीला तीन ते चार वेळा करावे नंतर हळूहळू वाढवत जावे.
एकदा हे जमायला लागल्यावर एका विशिष्ट लयीमध्ये  हे  करता येते.  
सुरुवातीला १:२:२ या प्रमाणात करावे म्हणजे ४ सेकंद पूरक (श्वास आत घेणे ) ८ सेकंद कुंभक (श्वास रोखून ठेवणे)  आणि ८ सेकंद रेचक   (श्वास बाहेर सोडणे).
खूप काळाच्या सवयी नंतर  हे प्रमाण १: ४: २  या पध्दतीने वाढवता येते.
म्हणजे जर ४ सेकंदांत श्वास आत घेतला तर १६ सेकंद तो रोखून ठेवायचा आणि ८ सेकंद तो बाहेर सोडायचा.
अनुलोम विलोम मुळे  फुफ्फुसाचे आरोग्य उत्तम ठेवता येते.प्राणवायूचा मुबलक प्रमाणात पुरवठा झाल्याने रक्तही उत्तमप्रकारे शुद्ध होते .परंतु ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी कुंभक न करता पूरक आणि रेचक करावे.
भ्रामरी प्राणायाम :   

भ्रामरी  या प्रकारचा प्राणायामही तुमच्या मेंदूला शांत करण्यासाठी खूप उपयोगी पडतो .
तुम्ही खूप चिंतेत,काळजीत असाल, किंवा कधी खूप राग आला असेल  तर भ्रामरी प्राणायाम करून मनाला शांत करु शकता.
भ्रामरी करण्यासाठी शांत हवेशीर ठिकाणी  सरळ ताठ बसावे डोळे बंद करावे तोंडावर थोडे हास्य ठेवावे.
तुमच्या हाताची अंगठ्याच्या शेजारील दोन्ही बोटे कान आणि गाल यांच्यामध्ये असलेल्या कानाच्या भागावर ठेवावीत.
लांब श्वास घेऊन श्वास सोडताना कानाच्या त्या भागावर बोटाने दाब द्यावा.आणि तो दाब देऊन किंवा मध्येच दाब देत- सोडत तोंडाने मोठय़ा आवाजात मधमाशीसारखा गुणगुणण्याचा आवाज काढावा.परत श्वास आत घेऊन ही प्रक्रिया करावी असे सहा ते सात वेळा करावे .हे करताना आणि करून झाल्यावर थोडा वेळ डोळे बंद ठेवावेत  .तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणि पूर्ण शरीरामध्ये शांत आणि चांगल्या लहरींची कंपने जाणवतील  .आणि आलेला राग काळजी सगळे निघून जाऊन मनाला शांत वाटेल.दिवसातून तीन ते चार वेळा तुम्ही भ्रामरी   करू शकता.

समर्थ रामदासांनी सुद्धा मनाला  सज्जना म्हणून पुकारून त्याला उपदेश केलेले आहेत.

मन हे कमालीचे चंचल असते जे प्रकाशाच्या वेगापेक्षाही गतिमान असते ते कधी आपल्याजवळ राहते कधी भूतकाळात जातं तर कधी भविष्यकाळात तरंगत राहत.  असंख्य चिंतेचे समुद्र आणि काळजीचे डोंगर यामुळेच उभे ठाकतात.मनाच्या चंचलतेमुळे काम, क्रोध, लोभ, मद ,मोह ,मत्सर हे षड्रिपू मनाला ग्रासून टाकतात.    

 म्हणूनच आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक तणावाचं नियोजन हा एक खूप महत्त्वाचा घटक बनला आहे. म्हणूनच या तणावातून बाहेर पडण्यासाठी दीर्घ श्वसन ,योग ध्यानधारणा ,नामस्मरण या गोष्टींचा उपयोग केल्याने थोडीफार मन:शांती नक्कीच मिळू शकते .
 
pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu