ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिला वनिता पिसे.
अवघ्या १७व्या वर्षी लग्न, शिक्षण ९वी यत्तेपर्यंत.सासर, सातारा जिल्ह्यातील म्हसवड गांवी. शेजाऱ्यांशी बोलायला संकोच वाटणारी, आज ठिकठिकाणी, परदेशी सुद्धा अनेक महिलांना स्वावलंबनाचे धडे देत आहे.खरोखर वनिता पिसे यांची कथा प्रेरणादायी आहे!
म्हसवडमधील एका शेतकऱ्याशी लग्न झाल्यामुळे एका आठवड्यात वनिताला कुक्कुटपालनात सहभाग घेणे क्रमप्राप्त झाले. तिने यापूर्वी कधीही पोल्ट्री शेडमध्ये प्रवेश केला नव्हता. पण चिकाटीने तिने सर्व समजावून घेतले आणि मनापासून काम करू लागली. मात्र १९९७ मध्ये बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसाय बंद करावा लागला आणि कुटुंबावर ५५०००रुपये कर्ज राहिले. हताश न होता लगेच इतर लोकांच्या शेतात रोजगारावर काम करू लागली. यावेळी तिला ग्रामीण महिलांसाठी काम करणाऱ्या माणदेशी बँकेची माहिती झाली. तिने त्यांच्याकडे जाऊन म्हशीसाठी कर्ज मिळविले. वनिताच्या सुदैवाने,आठवडाभरात म्हशीने वासराला जन्म दिला.तिने दूध विकण्यास सुरुवात केली आणि सहा महिन्यांत कर्जाची परतफेड करता आली. आत्मविश्वास वाढला आणि दुसरे १५००० रुपये कर्ज घेऊन पेपर कप तयार करण्यासाठी मशीन विकत घेतले.कच्चा माल विकत घेऊन दररोज ५००० कप बनू लागले. कच्चा माल पुरविणाराच कप विकत घेत होता. सहा महिन्यांनंतर वनिताच्या यशाने प्रभावित झालेल्या तिच्या गावातील १०महिलांनी अशाच प्रकारची युनिट्स उभारण्यास मदत करण्यासाठी तिच्याकडे संपर्क साधला. तिने त्यांना त्यासाठी मदतही केली पण दुर्दैवाने कच्चा माल पुरविणाऱ्या कंपनीने तो पुरवणंच बंद केलं आणि सर्वच महिलांवर मोठं संकट कोसळलं. त्या हताश झाल्या पण वनिता पुण्याच्या दुकानदारांपर्यंत गेल्या. कच्चा माल कोण पुरवतो, तयार झालेला माल कोणत्या दर्जाचा असतो, किती किंमतीत विकत येतो, नक्की कोण घेईल या सगळ्याची माहिती एकटीने काढली आणि त्याप्रमाणे आखणी करून महिलांचा उद्योग सुरळीत सुरू झाला. यानंतर अनेक महिलांना एकत्र करून बचत गट(SHG) स्थापन करायला त्यांनी सुरुवात केली. आणि सहा महिन्यातच ३५ बचत गट स्थापन करून महिलांना उद्योग उभारण्यासाठी अर्थबळ मिळवून दिले.
काही कारणांमुळे त्यांचे काही उपक्रम यशस्वी होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे त्या महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र यामुळे खचून न जाता,त्यांनी माणदेशी बिझनेस स्कूलमधून आर्थिक व्यवस्थापनाचा कोर्स केला. पुन्हां कामाला सुरुवात केली आणि आपण समजावून सांगितलेली गोष्ट लोक ऐकतात, त्यांना ती पटते, त्यांच्या विचारांतही परिवर्तन होते म्हणजे आपली वाट बरोबरच आहे या विश्वासाने त्यांनी माणदेशी फाऊंडेशन स्थापन करून ‘फार्म टू मार्केट’ प्रकल्प सुरु केला. याअंतर्गत मागील काही वर्षांत सातारा परिसरातील १२०० हून अधिक लहान शेतकऱ्यांना आणि किरकोळ उत्पादकांना (ज्यापैकी ७० टक्के स्त्रिया आहेत) शेती करार, गट शेती, कमी खर्चात कशी शेती करायची यासंदर्भात प्रशिक्षण दिले असून विविध विदेश कंपन्यांशी शेतकऱ्यांचे करारही घडवून आणले आहेत.
यामधील बहुतांश महिलांचे शेतकरी म्हणून वर्गीकरण करण्याच्या कायदेशीर प्रक्रियेत अडचणी आल्या.संबंधित अधिकार्यांकडून सांगण्यात आले की, महिलांकडे शेतजमीन नसल्यामुळे त्यांना शेतकरी म्हणून वर्गीकृत करता येणार नाही.शेवटी जेव्हा पतींनी प्रमाणित केले की त्यांच्या बायका त्यांच्या जमिनीच्या पार्सलमध्ये कोपर्सनर आहेत तेव्हां त्या योजनांचा फायदा घेऊ शकल्या. पण वनिताजींच्या म्हणण्याप्रमाणे जरी महिलांनी अनेक क्षेत्रात खूप मोठी मजल मारली आहे, त्या शेतीच्या मुख्य आधार देखील आहेत, बहुतेक प्राथमिक कामे शेतात करतात तरीही त्या स्वतःला शेतकरी असल्याचा दावा करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे असलेली जमीन त्यांच्या नावांवर नाही. त्यांच्या पतीच्या नावावर आहे. यामुळे त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत मोठा फरक पडतो आणि अनेक अधिकृत विकास फायद्यांपासून त्या अपात्र ठरतात.पण प्रत्येकीला FPC मध्ये सदस्य म्हणून नोंदणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. एक टीम लीडर म्हणून सर्व कामांची आव्हाने स्वीकारून त्या यशस्वीही होत आहेत.

त्यांना कंपनीतील सर्व प्रमुख ऑपरेशन्सवर देखरेख करावी लागते. यांत शेतमालाचे एकत्रीकरण आणि बाजारपेठेत माल पाठवण्याच्या संपूर्ण मध्यवर्ती ऑपरेशन्स…. पुरवठा साखळीतील लॉजिस्टिकचे वर्गीकरण आणि प्रतवारी आणि व्यवस्था करणे समाविष्ट आहे. येथे महिला शेतकऱ्यांशी संपर्क साधला जातो आणि शेतमाल घेण्यासाठी त्यांच्या घरी वाहने पाठविली जातात. भाज्या आणि धान्यांव्यतिरिक्त हार्ड टॉफी, सिरप, विविध चटण्या उदा.कारळं,अळशी, शेंगदाणे इ., आवळा कँडी, लोणचे यासह इतर उत्पादनांसह प्रक्रिया आणि उत्पादनाचा व्यवहारही केला जातो.
कंपनी टिकाऊ आणि नाशवंत अशा दोन्ही प्रकारात व्यवहार करते. दररोज सुमारे चार ट्रक भाजीपाला मुंबईला पाठवला जातो आणि तो ५ स्टार हॉटेल्स आणि स्थानिक किरकोळ दुकानांना पुरवला जातो. MDFPC चा औपचारिक प्रवास सप्टेंबर २०१८ मध्ये अत्यंत अनिश्चित आणि अस्थिर पीक असलेल्या कांद्याने सुरू झाला. कांद्याच्या किमतीतील अनपेक्षित चढ -उतार आणि मागणीच्या स्वरूपातील बदल यांस तोंड देण्यासाठी एफपीसीने शेतकऱ्यांना उच्च प्रतीचा कांदा पिकवण्यास मदत केली जेणेकरून त्यांना चांगली किंमत मिळू शकेल. खूप संघर्ष केल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना अंशत: यश मिळालं. बाजारपेठ मिळणे अवघड होते कारण म्हसवड हे भौगोलिकदृष्ट्या मोठ्या शहरांशी थेट जोडलेले नाही आणि त्यांना अनेक लॉजिस्टिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो याचा वनिताजींना खेद वाटतो.
तरीही सर्व अडचणींवर मात करणे अथक सुरूच आहे त्यामुळे काही उद्योजक स्त्रिया मुंबईच्या बाजारपेठेत त्यांचे उत्पादन विकू शकल्या आणि त्यांना चांगली किंमतही मिळाली.
पण अधिकाधिक महिला शेतकर्यांच्या एकत्रितपणे नोंदणी करणे आणि त्यांना त्यांच्या पीक पद्धतीला बाजारपेठेशी जुळवून घेण्यास शिकविणे यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
अनुभवाने साऱ्या शिकत आहेत, त्यात कधीकधी नुकसानही होते. एकदा FPC ने भेंडीची निर्यात करू इच्छिणाऱ्या आघाडीच्या कंपनीसोबत करार केला. सदस्यांना संधी मिळाल्याने आनंद झाला आणि १६ महिला या प्रकल्पात सामील झाल्या. दुर्दैवाने म्हणा किंवा कराराचे महत्व लक्षांत न आल्याने एक गोष्ट दुर्लक्षित राहिली.या करारामध्ये कृषि शास्त्रज्ञ शेतकऱ्यांची भेट घेतील आणि त्यांना गुणवत्ता नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करतील, असे नमूद केले होते, पण त्याप्रमाणे त्यांना बोलाविण्यात आले नाही त्यामुळे FPC ला नुकसानभरपाई द्यायला लागली. पण त्यामुळे स्पर्धेत टिकून राहायचे असेल आणि समृद्ध व्हायचे असेल, तर गुणवत्ता राखली पाहिजे आणि करार नीट समजावून घेऊन त्याप्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत हा धडा कायमचा शिकला गेला. तसेच एकदा वेळेवर वितरण महत्वाचे आहे, हेही शिकायला मिळाले.याचा उपयोग लगेचच मिळालेल्या ऑर्डरसाठी उपयुक्त ठरला.एफपीसीला ११००० किलो डाळीची ऑर्डर मिळाली. प्रत्येकी ५०० ग्रॅमच्या २२००० पॅकेटमध्ये धान्य पुरवले जाणार होते. एफपीसीने लातूरमधील महिला शेतकऱ्यांशी संपर्क साधला. केवळ आठ दिवसांत, महिलांनी कापणी, एकत्रित करणे, पॅकेजिंग आणि इतर सर्व गोष्टी सांघिकरित्या पार पडल्या. शेवटच्या क्षणी, टीमला एका कार्टनमध्ये एक किडा सापडला. त्यांनी संपूर्ण मालाची पुन्हा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यात महिलांना एक संपूर्ण दिवस लागला, परंतु यामुळे त्यांनी मालाची गुणवत्ता जपली आणि विक्रेत्याची विश्वासार्हता मिळविली.

भव्य सुधारणांऐवजी शेतकर्यांसाठी त्यांच्या मूलभूत समस्यांवर व्यावहारिक उपायांची आवश्यकता आहे, असे त्या ठामपणे सांगतात. २००६ मध्ये वनिताजींना CII Women Exemplar पुरस्कार जाहीर झाला. विकास प्रक्रियेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या तळागाळातील, गरीब, वंचित समाज स्तरावरील लोकांसाठी कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येत असून, पुरस्कार प्राप्त करणार्या व्यक्तीचे मुख्य कर्तव्य म्हणजे इतरांना सक्षम करणे असेच असते. वनिता पिसे यांनी १८ एप्रिल२००६ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला. १ लाख रुपये, सुवर्णपदक आणि सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरूप आहे. पुरस्कार घेऊन गांवी येताच त्यांच्या फोटोचे भले मोठे बॅनर लावलेले त्यांना बघण्यास मिळाले. नातेवाईक, मित्र मंडळी, सरपंच,आमदार, खासदारांनी मोठ्या गाजावाजात कौतुक केलं.
हा प्रवास असाच सुरु ठेवायचा आणि आपल्या सर्व शेतकरी मैत्रिणीसाठी आणि शेतकरी वर्गासाठी उद्योग निर्माण करायचा हेच आता त्यांनी ध्येय ठरविले आहे.२००७ मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांना आमंत्रित केले आणि आजकाल अनेक कार्यक्रमांमध्ये बोलण्यासाठी, त्यांची कथा सांगून त्याच परिस्थितीत असलेल्या इतर महिलांना प्रेरित करण्यासाठी विविध ठिकाणांहून त्यांना निमंत्रित केले जाते.आज केवळ मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली येथेच नाही तर लंडनलाही वनिताजी आपली यशोगाथा, आपले प्रकल्प यांच्याविषयी सांगायला जातात. त्यावेळी लोकं त्यांचं शिक्षण नाही तर जिद्द, कर्तृत्व बघून टाळ्या वाजवतात याचं त्यांना अतिशय समाधान वाटतं.
वैयक्तिक स्तरावर सध्या त्यांच्याकडे कागदी कप बनवण्याची ११ मशीन्स आहेत.काहीजणांना त्यासाठी रोजगार देत आहे. FPC चे सारे कामकाज सांभाळून त्यांचा माणदेशी बिझनेस स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून सक्रियपणे सहभाग आहे. त्यांना ३ मुले असून सर्वांना शिक्षणासाठी प्राधान्य द्या असे सांगितले आहे. पतीचा संपूर्ण पाठींबा आणि सहकार्य आहे.
एक नववी पास स्वावलंबी मुलगी स्वतःच्याआत्मविश्वासाच्या जोरावर किती भरारी घेऊ शकते, तेही बरोबर अनेकांना घेऊन, याचे आदर्श उदाहरण म्हणजे वनिता पिसे!
माझ्या आजोळच्या गावची, म्हणून माझ्याच अंगावर मूठभर मांस चढल्याचा मला भास होतोय आणि आज माझी आई असती तर तिने नक्कीच वनिताची दृष्ट काढली असती!
…..नीला बर्वे,
सिंगापूर.


