विराटपर्व © मुकुंद कुलकर्णी
जर्सी नंबर 18
आपला विराट पस्तिसाव्या वर्षात पदार्पण करता झाला ! भारतीय क्रिकेटच्या अश्वमेधाचा वारू रोहितच्या समर्थ नेतृत्वाखाली विराटच्या बॅटच्या साथीने जग जिंकायला निघाला आहे . त्याला थोपवायची हिंमत आज तरी कुणामध्ये आहे असे दिसत नाही . आज भारत आणि दक्षिण आफ्रिका या गुणतालिकेतील आघाडीच्या दोन संघांमध्ये सामना होत आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ विराटला बर्थडे गिफ्ट देणार! सचिनच्या 49 शतकांचा विक्रम जर आज विराटने मोडला तर ते Icing on the cake ठरेल. विराटला चेस मास्टर म्हणतात, खडतर आव्हान चेस करणं विराट एन्जॉय करतो, मग ते आव्हान अठरा चेंडू 48 धावा असं अवघड असलं तरी . शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर सारख्या नव्या दमाच्या शिलेदारां सोबत लंबी रेसका घोडा, विराट नवनवीन क्षितिजं पादाक्रांत करतो आहे .
वानखेडे वरील लंके बरोबरच्या सामन्यात, सचिनच्या उपस्थितीत सचिनचा 49 शतकांचा विक्रम विराट मोडणार असे वाटत असतानाच शतकाला बारा धावा हव्या असताना विराट बाद झाला. It was really a very long walk towards pavilion. संथ गतीने विराट पॅव्हॅलियनच्या पायऱ्या चढत होता. अफाट उर्जेचा स्त्रोत असणाऱ्या विराटला एवढ्या संथ गतीने जाताना पाहायची अजिबात सवय नाही. सहाजिक आहे शेवटी माणूसच तो. खरंतर आता त्याला कुठलीही गोष्ट सिद्ध करायची किंवा साध्य करायची काहीही गरज नाही, तरीही विक्रम तो विक्रमच!
किंग एकच असतो आणि क्रिकेटचा किंग अर्थातच किंग कोहली! पाकिस्तानी, बाबर आझमला किंग म्हणतात, बाबरची तुलना विराट बरोबर केली जाते, पण विराट आणि बाबर यांच्या क्लासमधे जमीन आसमानाचा फरक आहे. विराट स्वतःच्या विक्रमासाठी कधीही खेळत नाही, तसं असतं तर या स्पर्धेत विराटची तीन शतकं दिसली असती. बाबर आझम स्वतःच्या वैयक्तिक विक्रमासाठी खेळतो. संघाचे हित डोळ्यासमोर ठेवून खेळत नाही.
ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात विराटचाही वाटा आहे.
विराट fitness freak आहे. जिम कधीही चुकवत नाही. अत्यंत काटेकोर आहार आहे त्याचा. फिटनेस जपण्यासाठी तो पूर्ण शाकाहारी झाला आहे. 35 व्या वर्षी सुद्धा तो वीस वर्षाच्या तरुणाला मागे टाकेल एवढा चपळ आहे. रनिंग बिटविन द विकेट कसे असावे, तर विराट सारखे. वासिम अक्रम तर त्याला एलियनच म्हणतो अर्थात चांगल्या अर्थाने! पाकिस्तानी खेळाडूंना विराटचा आदर्श ठेवण्याचा तो सल्ला देतो.
1983 च्या विश्वकरंडक स्पर्धेने भारतीय क्रिकेटला नव संजीवनी मिळाली . ऑलसो रॅन ते सुवर्ण पदक असा विस्मयजनक प्रवास होता तो . तेंव्हा पासून भारतीय क्रिकेटच्या यशाची कमान चढती आहे . आयसीसी रँकिंग नुसार आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात…. टेस्ट, ओडीआय, टी ट्वेंटी भारत नंबर एक वर आहे.
अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारताने विदेशी भूमीवर विजयाची चव चाखली .सुनील गावसकरच्या नेतृत्वाखाली अनेक संस्मरणीय विजय नोंदवले . कपिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामने जिंकायला शिकला . सौरवने टिट फॉर टॅट चा मंत्र शिकवला . लॉर्ड्सच्या बाल्कनीत टी शर्ट काढून जल्लोष करणे वगैरे केवळ सौरवच करू जाणे . विजिगिषू वृत्ती निर्माण झाली . कॅप्टन कूल धोनीने प्रतिपक्षाचा कोल्ड ब्लडेड खातमा सुरू केला . तिरंगा संबंध क्रिकेट विश्वात डौलाने फडकू लागला त्यावर कळस चढवला विराटने. हाच वारसा रोहित समर्थपणे पुढे नेत आहे. आज भारताशी पंगा घ्यायची हिंमत कुणातही नाही ऑस्ट्रेलियात सुद्धा नाही . आयपीएल ने क्रिकेट विश्वाला मांडलिक बनवले आहे . विराट सारखे खेळाडू आयपीएल चा दर्जा उंचावर नेऊन ठेवतात . T20 प्रकारात आयपीएल चे योगदान अभूतपूर्व आहे . ऑस्ट्रेलियात गतवर्षी पार पडलेल्या विश्व चषक स्पर्धेत याचे प्रत्यंतर आले . ती विश्वचषक स्पर्धा हवामानाच्या लहरीपणामुळे जशी अविस्मरणीय ठरली तशी विराटच्या सातत्यपूर्ण फलंदाजीसाठीही लक्षात राहिलं . पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हॅरिस राऊफ या गोलंदाजाला एकोणिसाव्या ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विराटने मारलेले षटकार हा त्या स्पर्धेचा उत्कर्ष बिंदू होता असे म्हणायला हरकत नाही .
रोहितचा आजचा संघ हा विश्वविजेता गुणवान संघ आहे . या संघाची पायाभरणी अजित वाडेकर , सुनिल गावसकर , कपिल देव , सौरव गांगुली , महेंद्रसिंग धोनी , विराट या दिग्गजांनी केली आहे . भारतीय संघात गुणवान खेळाडूंची वानवा कधीच नव्हती . अगदी चंद्रा , बेदी , प्रसन्ना पासून बुमरा, सिराज,शामी, कुलदीप, जडेजा पर्यंत . गावसकर , तेंडुलकर , द्रविड , लक्ष्मण , विरू ते रोहित , शुबमन, श्रेयस, सूर्या , हार्दिक, विराट पर्यंत . या सगळ्या शिलेदारांना सोबत घेऊन विश्वविजयाच्या मोहिमेवर निघालेल्या रोहित , विराट आणि कंपनीला अगणित शुभेच्छा , आणि या सगळ्या प्रवासात अनेक विश्वविक्रमांना विराट गवसणी घालणार हे नि:संशय ! 1983, 2011 नंतर 2023 ची विश्वचषक स्पर्धा जिंकून भारत हॅट ट्रिक साजरी करणार!
मुकुंद कुलकर्णी©

