तुझे आहे तुजपाशी…

मी जेवायला बसणार, तोच माझा मोबाईल वाजला. असंसदीय भाषेचे विविध बोल अगदी सहजपणे माझ्या मुखकमलातून, राग बिघाडीमध्ये निघून गेले. प्रसादचा फोन होता. प्रसाद माझा इंडियन एयरलाईन्समधला मित्र.
“बोल भाड्या, सुखाने जेवायला पण देऊ नको!”
“अरे जेवतोस काय भ* , *मला एक गूड न्यूज द्यायची आहे. तू, मी, समीर, गौरव आणि शशी माथेरानला चार दिवसांकरता जातोय येत्या तीस तारखेला. तीस तारखेला डोंबिवलीला शशीच्या घरी सकाळी जमायचं. त्या दिवशी संध्यानंद साजरा करायचा. आणि मग दुसऱ्या दिवशी माथेरान काबीज. गौरवच्या मित्राचं कॉटेज आहे तिथे. केयर-टेकर मावशी स्वयंपाक वगैरे करतात. गौऱ्याने बुकिंग केलेलं आहे. मी बरोबर ‘बुढ्ढा साधू आणि सही रे सही’ आणणार आहे. तर तू येत्या तीस तारखेला सकाळी शशीकडे न विसरता येणे. अजून पंधरा दिवस आहेत. मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेव. अरे त्या शेफाली आणि नीलमपण येणार होत्या. पण आम्ही कांहीतरी थाप मारली आणि वेळ निभावून नेली.”

“प्रसाद त्यांना या पिकनिकबद्दल सांगण्याचा आगावूपणा कोणी केला ? अरे काय डोक्यावर पडला आहांत काय तुम्ही ? नसत्या भानगडी. आणि कोणी लेडीज वगैरे असतील, तर मी नाही येणार. अरे आमच्याकडे महाभारत होईल, नुसतं कळलं तर. ‘खाया पिया कुछ नही, गिलास फुटा बारा आना’ असं होईल. आताच्या परिस्थितीत मला दुसरं घर घ्यायलाही परवडणार नाही.” मी जाम वैतागलो होतो.

“अरे बाबा थांब ना आता. उगाच राईचा पर्वत करू नकोस. सगळं ठीक आहे. त्या येणार नाहीत. गौऱ्या चुकून बोलून गेला की आपण चाललोय म्हणून. जाऊ दे ! तू फक्त तीस तारखेला यायचं विसरू नकोस बाबा” प्रसाद अपराधी सुरांत म्हणाला.

कांहीही असलं तरी प्रसादच्या त्या फोनमुळे माझ्यासाठी जणू कांही रिचार्ज एनर्जी तयार झाली होती. मी बायकोला व माझ्या मुलीला माझ्या माथेरान सफरीबद्दल सांगून टाकलं. निवृत्तीनंतर दहा वर्षांचा काळ लोटला होता. इतक्या वर्षांत फक्त फोनवर संपर्क असणारे व चुकून-माकून कधीतरी तास-दोन तास भेटणारे आम्ही जुने सवंगडी, चार दिवसांकरता एकत्र असणार या कल्पनेनेच मी सुखावून गेलो.

माझ्या फोन संभाषणाला साधारण दहा दिवस झाले असतील. दुपारी दरवाज्याची बेल वाजली. दार उघडलं, तर एक कुरियर कंपनीचा माणूस उभा. अनिल रेगे इथे रहातात कां ?

या त्याच्या प्रश्नावर, हो ..अजून मला घराबाहेर काढलेला नाही.. असे मी उत्तर देताचं..
वा साहेब, ‘फू बाई फू’ बघता कां ?
भारी विनोद करता. आपल्यासाठी पार्सल आहे. जरा इथे सही करा” असे म्हणून त्याने भला मोठा मोबाईल माझ्यासमोर धरला. त्याने सांगितल्याप्रमाणे मी माझी तर्जनी (हे अंगठ्याजवळच्या बोटाचे संस्कृत नांव आहे.) सहीसारखी फिरवली व थँक यू म्हणत तो सज्जन गेला.
च्यायला कसलं पार्सल ..?
आणि मी केव्हा मागवलं ?

मला एकदम क्राईम पेट्रोल आठवलं. कोणीतरी मला गुन्ह्यांत तर अडकवत नसेल ? ह्या !! पण माझ्यासारख्या फालतू माणसाला कोण अडकवणार ? मी ते पार्सल काळजीपूर्वक उघडलं. त्या बॉक्समध्ये रॉयल बॉस्कोचे स्पोर्टस् शूज होते. त्याची किंमत बघून मी उडालो. शूजची किंमत पांच हजार असते ? “अरे हे कोणी पाठवले मला?” असं म्हणेपर्यंत माझी बायको आंतून बाहेर आली. “चिंगूने तुमच्यासाठी ऑर्डर केले होते”. तिच्या या ब्रेकिंग न्यूजवर काय प्रतिक्रिया द्यावी मला कळेना. जरा वेळाने पुन्हा बेल वाजली. हा पण कुरियरचाच माणूस होता. पण वेगळा होता. त्यानेही माझ्याकडे जरा मोठं पार्सल दिलं. त्याने सांगितल्याप्रमाणे मी मोबाईलवर बोट फिरवलं. पार्सल उघडलं तर आंत स्पायकीचे दोन प्रिमियम ट्रॅकसूट. किंमत दहा हजार. आता मात्र माझा संयम सुटला. मी तसाच माझ्या मुलीला फोन लावला. “ बबडी, तू माझ्या माथेरानच्या फालतू ट्रीपसाठी पंधरा हजार खर्च केलेस ? अग जरा विचार करायचास ना ? मी माथेरानला चाललो आहे. स्वित्झर्लंडला नाही. पांच हजाराच्या स्पोर्ट्स शुजमध्ये घालायच्या लायकीचा माझा पाय आहे कां ? आणि दहा हजाराचे ट्रॅकसूट ? मी अजून माझ्या युनिफॉर्मच्या पँण्ट वापरतो आरामात. मला कांही वाटत नाही. अग माझ्या लग्नातल्या सुटाची किंमत होती तीन हजार आणि इथे तू मॉर्निंग वॉकच्या ड्रेससाठी दहा हजार खर्च केलेस ?” मला पुढे शब्द सुचेना.

“बाबा तुझं बोलून झालं ? आता ऐक. ते ट्रॅकसूट अतिशय कम्फर्टेबल असतात. आणि तिथे तू खूप फिरणार. ते शूज पायांत असले की अजिबात पायांवर ताण येत नाही. आणि खर्चाबद्दल बोलायचं तर माझ्या पहिल्या वाढदिवसाला तू महागातले एवढे ढीगभर कपडे घेऊन आला होतास, आठवतं ? त्यांतले कांही तर वापरलेच गेले नव्हते. कारण एवढे सगळे कपडे एकदम वापरता येण्यासारखे नव्हते. पण तरीपण तू त्यासाठी खर्च केलासच ना ? डे-केयरमधून तू मला घेऊन घरी येताना, कांही वेळा मी बसमध्ये झोपायची. तेव्हा तू मला उचलून घेऊन घरी यायचास. तू मला कधीच जागं केलं नाहीस….. कां?…..” ती पुढे कांही बोलणार, एवढ्यांत मी तिला थांबवलं.
“बस्स बस्स !! तू आणखी कांही बोलू नकोस. तुझ्याशी कोणाचीच तुलना होत नाही. तू स्पेशल आहेस माझ्यासाठी.” मी कसंबसं म्हणालो.

डोंबिवलीला जायच्या आदल्या दिवशी माझ्या मुलीने मला विचारले “बाबा, तू कसा जाणार आहेस डोंबिवलीला ?”

मी म्हटलं “इथून घाटकोपरपर्यंत मेट्रोने. नंतर झुकझुक गाडी. तिथून ‘चाल चाल वाटे, पायी मोडले कांटे….’ करत आणि ‘सुहाना सफर और ये मौसम हँसी….’ म्हणत डोंबिवली पूर्वेकडून सरळ जाणार. मग पहाडीतल्या नदीवरून पाणी घेऊन येणारी मधुमती म्हणणार “बाबूजी, आगे मत जाईये | वहां ठाकुर्लीका घना जंगल है | उग्रनारायण के लोग चारों तरफ है | आप उजवीकडे वळो | और सरळ चलो | वहाँ तुम्हारे शशी का घर है |”
“ठीक आहे दिलीपकुमारजी. मला समजलं. मी ओला बुक केली आहे. ती सकाळी नऊ वाजता येईल. तुझ्या फोनवर ओटीपी नंबर येईल. तो त्या ड्रायव्हरकाकांना द्यायचा. त्यांना पत्ता सांगायचा. पेमेंट झालेलं आहे. एवढं राहील लक्षांत ?” तिने लष्करी आवाजांत सांगितलं.

“बबडी, मला हेच आवडत नाही तुमच्या पिढीचं. शंभर रुपयाच्या जागी तीन हजार रुपये खर्च करायची काय मस्ती आहे तुम्हां लोकांची ? त्या ओलाचे आपण देणेकरी आहोत काय ? सालं कोपऱ्यावर जायचं तरी तुम्हाला ओला लागते.” पण माझ्या या निषेधाचा कांहीच उपयोग झाला नाही.

ओलाचा ड्रायव्हर खरंच छान माणूस होता. त्याने अवघ्या दीड तासांत गाडी शशीच्या दारांत आणली. मी गाडीतून उतरत होतो, तोच प्रसाद म्हणाला “अन्या तू टॅक्सी करणार होतास तर बोलायचं ना. मी ठाण्याला उभा राहिलो असतो.”
“हे बघ पशा, माझ्या ठरवण्याने कांहीही होत नाही. ही गाडी माझ्या मुलीने आधीच प्रीपेड बुक केली होती. काल रात्रीच मला ते सांगितलं. च्यायला शंभर रुपयाच्या ठिकाणी तीन हजार खर्च करायचे ? साला मी काय नबाब आहे की बादशहा ?” माझ्या या वैतागावर प्रसाद फक्त हंसला.

बाकी सगळे पोचले होते. मी फ्रेश होऊन ट्रॅकपँण्ट चढवून दुपारीच संध्यानंद मेळाव्यात स्थानापन्न झालो, तोच गौरव म्हणाला “अन्या मस्त आहे रे तुझी स्पायकीची ट्रॅकपँण्ट. पण जाम महाग असेल ना रे ?”

बाबारे, माझ्या मुलीने ही जोडी मागवली ऑनलाईन. मी तर असल्या ब्रँण्डेड कपड्यांच्या वाटेला जात नाही. पण या मुलांना कोण सांगणार ? माथेरानच्या पिकनिकसाठी हे सर्व नखरे आणि ते बॉस्कोचे शूज.. मला सांग गौऱ्या, आपण बापजन्मांत पांच हजाराचे शूज वापरले आहेत ?
ती म्हणते, माथेरानला तुम्ही खूप फिरणार. या शूजमुळे पायाला अजिबात त्रास होत नाही. आता मी काय बोलू सांग”.

काय करते तुझी मुलगी ?
गौरवने विचारले.

“तिने मायक्रो-बायालॉजीमध्ये पीएचडी केलं नंतर पोस्ट डॉक्टरेट केलं. तिच्या संशोधन प्रबंधांवर आधारित, जर्मनीच्या लँम्बर्ट पब्लिकेशनने दोन पुस्तकं प्रसिद्ध केली आहेत. तिला जर्मनीत काम करण्यासाठी ऑफर होती. पण तिला आपल्याच देशांत संशोधन करायचं आहे. आता मी तरी काय बोलणार ? अशा बाबतीत, प्रत्येकाने स्वत:चे निर्णय स्वत: घेतलेले बरं नाही कां ?” माझ्या या बोलण्यावर गौरव एकदम गप्प झाला.

जरा वेळाने शशी, गौरव आणि समीर कांहीतरी आणायला म्हणून बाहेर गेले. मी आणि प्रसाद दोघेच घरांत होतो. प्रसाद मला म्हणाला, अन्या, तुला सुख बोचतं आहे कां ?

हा काय प्रश्न आहे प्रसाद ?
मला काही समजलं नाही.” मी गोंधळून म्हणालो.

तसं नाही मित्रा..
तू या ट्रॅकसूटच्या , शूज च्या किंमतीवरून, ओलाटॅक्सीच्या भाड्यावरून तुझ्या मुलीने केलेल्या खर्चावर नाराज झालास. म्हणून मला वाटलं, की तुला हे सुख बोचतं आहे कां ..?

अरे शशीचा मुलगा व सून इथून तीस किलोमीटरवर वेगळा फ्लॅट घेऊन रहातात. कधीतरी दिवाळीच्या निमित्ताने शशी फेरी टाकतो तिथे. ते नाही बोलवत. तो स्वत:च जातो. बापाचं काळीज आहे. रहावत नाही म्हणून.
माझा मुलगा बंगलोरला असतो. कधीतरी महिन्यातून एखाद वेळी फोनवर बोलणं होतं. बहुतेक वेळा मीच फोन करतो. गौरवचा मुलगा अमेरिकेला असतो. आपल्याला विमानाचा फ्री-पॅसेज मिळतो म्हणून पांच वर्षांपूर्वी तो मुलाकडे गेला होता. उत्तरपत्रिका कोरी टाकल्यासारखा चेहरा करून, पंधरा दिवसांत परत भारतात आला. तिथे म्हणे त्याला किचनमध्ये एंट्री नव्हती. जेवण बाहेर टेबलावर ठेवलेलं असायचं. ते जेवायचं. डिश धुवून स्टँण्डवर लावून ठेवायची. फक्त लिव्हिंग रूममध्ये तो टी.व्ही.बघत दिवसभर असायचा. संध्याकाळी घराजवळच पाय मोकळे करायला फिरायचा. बस्स !! झालं अमेरिका दर्शन.
समीरची बायको आणि मुलगा वेगळे रहातात. मला कारण काय, ते ठाऊक नाही. आणि विचारणं बरं दिसत नाही. अज्ञानात सुख असतं. आता तुझं बघ. तू नुसता माथेरानला मित्रांबरोबर फिरायला जातो आहेस, हे कळल्यावर तुझ्यासाठी ब्रँण्डेड शूज मागवणारी तुझी मुलगी….कां ? तर माझ्या बाबाच्या पायांना चालून चालून त्रास होऊ नये. तुझ्यासाठी प्रिमियम ट्रॅकसूट मागवणारी तुझी मुलगी. कां मागवले हे सर्व ? कारण तुला छान वाटावं. अरे अन्या, हे परमेश्वराचे ब्लेसिंग्ज आहेत रे तुझ्यासाठी.. .

आपण नोकरी करत असतांना सर्वच आपल्या मागे-पुढे नाचत असतात. आपला शब्द झेलण्यासाठी धांवतात. ऑफिसांत काय किंवा इतर ठिकाणी आपल्याला सलाम ठोकतात.पण आपली आपल्याला खरी ओळख होते ती आपण रिटायर झाल्यावर. तेव्हां आपण कोण आहोत…आपल्या आजूबाजूला ‘आपले’ म्हणता येतील असे किती आहेत ? त्याची आपल्याला खरी ओळख पटते. आज तुझी मुलगी, तू न बोलता, तुझा विचार करून, तुला कम्फर्टेबल कसं वाटेल, त्या गोष्टी करते. आणि तू ती करते त्या खर्चावर नाराजी व्यक्त करतोस ? मघाशी तू बोलल्यावर गौऱ्या एकदम गप्प झाला, त्याला कारण त्याची ती ठसठसणारी जखम आहे. हे माथेरानला जाणं केवळ एक निमित्त आहे स्वत:पासून दूर पळायचं. आभासी जगांत चार क्षण आनंदांत असल्यासारखे घालवायचे. ही ओल्ड मॉन्कची बाटली, ही सिग्नेचरची बाटली, हे केवळ आपल्या जवळच्या माणसांनी केलेल्या वंचनेवरचं मलम आहे. म्हणूनचं मघाशी ‘तू पिणार नाहीस’ असं म्हटल्यावर, मी तुला प्यायचा आग्रह केला नाही. कारण तुला असल्या बाजारातल्या नकली मलमाची गरजच नाही. कांही लक्षांत आलं कां, मी काय म्हणतो ते ?” थकल्यासारखा प्रसाद सोफ्यावर पडला.

मी माझ्या मुलीला फोन लावला.
“बाबा, कसा आहेस ? एंन्जॉय करतो आहेस ना ? धमाल करा….
सर्व काकांना ऑल द बेस्ट सांग..
तिच्या आवाजांत धबधब्यासारखा प्रचंड उत्साह होता.

“बबडी, थँक यू फॉर एव्हरीथिंग……”
माझा गळा भरून आला.

डोळ्यांत पावसाळी मेघांचा खेळ सुरु झाला. मला पुढे बोलताच येईना. बबडी हॅल्लो…हॅल्लो करतच राहिली.

  • अनिल रेगे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu