प्लास्टिक पिशव्या विरोधात अभियान

आपली पार्ले नगरी ही मुंबईला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरावी, या साठी पार्लेकर नेहमीच प्रयत्नशील असतात. त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून लोकमान्य सेवा संघाच्या नागरिक दक्षता शाखेतर्फे “ प्लास्टिक मुक्त पार्ले “ हे अभियान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सुरु करण्यात आले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी “ फेरीवाले महासंघाचे “ अध्यक्ष श्री. राजेशजी गुप्ता यांनी विशष सहकार्य केले तर ठाणे जनता सहकारी बँकेच्या सौजन्याने फेरीवाल्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यांत आले.

या कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे, “आम्ही प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार नाही व इतरांनाही करु देणार नाही” अशा अर्थाची शपथग्रहण करणे हा होता. या शपथग्रहण कार्यक्रमास पार्ले येथील विविध संस्था व नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. मंगलाताई भागवत फौंडेशनच्या सौ. वीणा भागवत, साठये कॉलेजच्या प्राचार्य सौ. कविता रेगे, डॉ. श्रीमती मांडके, जैन मंदिराचे विश्वस्त श्री. धर्मेशजी जव्हेरी, ठाणे जनता सहकारी बँकेचे श्री. राजेश शेट्टी हे मान्यवरही उपस्थित होते.

उपस्थिताना संबोधीत करतांना सौ. रेगे म्हणाल्या की, साठये कॉलेजच्या विद्यार्थांचा अश्या कामांत नेहमीच पुढाकार असतो, काही काळापूर्वी साठये महाविद्यालयाच्या मुलांनी कापडी पिशव्यांचे वाटप केले होते. आमचे विद्यार्थी पर्यावरणविषयक जागृती निर्माण करण्यास नक्कीच मदत करतील.

सौ. वीणा भागवत यांनीही विलेपार्ले महिला संघाच्या वतीने संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले, तर डॉ. मांडके यांनी प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे आरोग्य विषयक समस्या कशा निर्माण होतात याचे विवेचन केले. श्री. धर्मेशजी जव्हेरी यांनी कार्यक्रमास शुभेच्छा देतानाच अधिक प्रसिद्धीची गरज असल्याचे सांगितले.

या अभियानाची पूर्वतयारी नागरीक दक्षता शाखेच्या कार्यकर्त्यांनी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर सुरु केली होती. विलेपार्ले परिसरातील फेरीवाल्यांना प्रत्यक्ष भेटून या अभियानाचे महत्व पटवून देण्यात आले. १३ एप्रिल रोजी आकाशवाणीवरूनही प्लास्टिक मुक्तीचा संदेश प्रसारित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम नागरिक दक्षता शाखेच्या कार्यकर्त्यांनी कसून प्रयत्न केल्यामुळे उत्तम तऱ्हेने पार पडला. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्यानी प्लास्टिक मुक्त, सुंदर, स्वच्छ पार्ले निर्माण करण्याचा निर्धार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu