गाडी आणि दाढी

कुणी म्हणेल की लेखाच्या शीर्षकात लिहिल्याप्रमाणे, खरंतर ‘दाढी’ आणि ‘गाडी’चा काय संबंध? उगीच आपलं, यमक जुळवल्यासारखं वाटतंय. सकृतदर्शनी तसं वाटू शकतं किंवा एखाद्याला ‘चलती का नाम गाडी’ला जोडून येणाऱ्या ‘बढती का नाम दाढी’ ह्या ओळीची देखील आठवण त्यामुळे झाली असेल. पण ह्या लेखातली गाडी वेगळी आहे आणि दाढी वाढलेली नसून ‘करवून घेतलेली’ आहे.

चाळीसएक वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे. आंजरल्याहून परतताना, आंजरल्याची खाडी ‘तरी’तून पार करून, आम्ही ऐलतीरावर पोहोचलो. वेळ सकाळ-दुपारच्या मधली, मध्यान्ही पूर्वीची, साडेअकराची. महिना ‘मे’. ‘पुलं’नी म्हटल्याप्रमाणे ‘रामराणा जन्मला ती दुपारची वेळ’ व्हायला काहीच अवकाश होता पण टळटळीतपणा मात्र तसाच. गंधयुक्त नसले तरी मंद, अतिउष्ण वारे मात्र भट्टी पेटल्याचा ‘फील’ आणत होते. थोडक्यात, ऊन ‘मी’ म्हणत होतं आणि आम्ही ‘काय ऊन आहे’ म्हणत, तोंडाने सुस्कारेही सोडत होतो. असं केल्याने उन्हाळ्याचा त्रास कमी होतो असा एक सर्वमान्य समज आहे. आमची दुपारी सव्वाबाराची ‘एसटी’ बस होती. आमची म्हणजे, आम्ही ती बस पकडण्यासाठी तिथे पोहोचलो होतो. आंजरल्याहून दापोली आणि मग दापोली- बुरुंडी एसटी बसने आम्हाला संध्याकाळपर्यंत आमच्या मुक्कामी पोहोचायचं होतं.

बस यायला पाऊण तास अवकाश होता. एका पिंपळाच्या झाडाच्या भोवती बांधलेल्या पारावर सामानासकट बसलो. ‘वरच्या अंगाने’ म्हणजे बाजूच्या डोंगरातील घाटरस्त्याने बस येणार होती. आमचा मधलाच थांबा होता. त्यामुळे सर्वजण त्या दिशेला तोंड करून बसची वाट पाहत होते. कुठल्याही वाहनाच्या येण्याचा आवाज ऐकू आल्यास, आपलीच बस आली अशी समजूत करून घेऊन काही उत्साही प्रवासोत्सुक मंडळी पुढे होत व ती आपली बस नाही हे समजल्यावर मागे फिरत. असं चालू असताना बरोबर सव्वाबाराला बस आली. बस खच्चून भरलेली होती. तरी आम्ही सर्व मुंबईकर असल्याने, भरलेल्या मुंबई लोकलमध्ये जागा निर्माण करण्याचं कौशल्य आमच्या सर्वांकडे होतं. तो अनुभव कामी आला आणि आम्ही आमच्या सामानासकट सर्वात प्रथम आत शिरलो. नंतर इतर प्रवासी. बस एकदम ‘पॅक’. आत शिरल्यावर बरोबरच्या सामानाच्या नगांची ‘गिनती’ झाली आणि सर्व सामान आल्याचा निर्वाळा वेगवेगळ्या सुरात दिला गेला. मग एका काकांनी त्यांच्या सवयीप्रमाणे बरोबरच्या माणसांची ‘गिनती’ केली तेव्हा आमच्यापैकी एकजण कमी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तसं सांगितल्यावर कुणीतरी ते स्वतःला मोजायचं विसरले असणार, असा माफक विनोद देखील केला. त्यांनी मग खात्रीसाठी परत एकदा गिनती केली पण उत्तर तेच आलं. आता कोण बरोबर आलेलं दिसत नाही ह्याचा शोध घेताना एका मावशींना आपले यजमान दिसत नसल्याचं लक्षात आलं आणि त्या ‘आमचे हे’ राहिल्याचं सांगू लागल्या. तेव्हढ्यात बस कंडक्टरने बस चालू करण्याची ‘घंटा’ वाजवली आणि चालकाने बस सुरू केली. त्यांचे ‘हे’ खरोखरच बसमध्ये कुठेही दिसत नसल्याबद्दल सर्वांची खात्री पटली. त्यामुळे त्या काकांचा शोध घेणे ह्याला साहजिकच प्राथमिकता आली. मग काहीजण चालकाला बस थांबवण्यासाठी विनवू लागले. चालक आज्ञाधारक व नियम पाळणारा असावा; त्याचं चालकत्व कंडक्टरच्या घंटानादाशी जोडलेलं असल्यामुळे तो बस थांबवेना. त्याने तसं सांगितलंही. मग कंडक्टरच्या दिशेने मोर्चा वळला. तो लांब, दाराशी होता. एसटीच्या आवाजात आणि इतर कोलाहलात आमचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचण्यास जरा वेळ लागला. तिथपर्यंत त्याने दाराजवळच्या प्रवाशांची तिकिटं फाडायला सुरुवात केली होती.

आम्ही इतर प्रवाशांना सरकवत, लकटत सामानासह कसेतरी दारापर्यंत पोहोचलो. बसमध्ये सर्वात प्रथम आत शिरलेले आम्ही अचानक दाराच्या दिशेने का सरकत आहोत, हे इतरेजनांना समजेना. त्यात आम्ही प्रथम आत शिरण्याचं कौशल्य दाखवलेलं असल्यामुळे आमच्यावर काहींचा रोष होताच. ते आम्हाला दूषणं देऊ लागले. त्यामुळे एकच हल्लकल्लोळ माजला. ‘खाली राहिलेली तुमची व्यक्ती येईल की मागच्या गाडीनं’, असं म्हणून एकदोघांनी आम्हाला दिलासा देत, नंतरच्या गाड्यांची माहिती दिली. तेव्हढ्यात एसटीने पुढचं वळण घेतलं आणि प्रवासी एकाबाजूला कलले. एव्हाना कंडक्टरला काहीतरी बाका प्रसंग निर्माण झाल्याचं लक्षात आलं असावं. कंडक्टर दादांचा ‘दादापुता’ काढण्यालाही थोडं यश आलं. त्याच्या हृदयी दयेचा पाझर फुटू लागला असावा. त्याने चालकासाठी नेहेमीच्या अर्धीच घंटा वाजवली. तो बस रस्त्यात मधेच थांबवण्याचा इशारा होता. बस थांबली. आमच्यातली प्रमुख मंडळी दाराच्या दिशेने सरकली. त्यादरम्यान कंडक्टरला एकंदर परिस्थितीचं थोडंफार आकलन होऊ लागलं. पण तरीदेखील इतर प्रवाशांच्या सुरात आपला सूर मिसळत, ‘म्हूम्बईचे प्रवाशी बेशिस्त’ ह्यावर सार्वजनिक शिक्कामोर्तब झालं. आम्हाला ते सर्व निमुटपणे ऐकून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. कंडक्टरने दार उघडलं आणि आम्ही पोत्यातून बटाटे बाहेर पडावे तसे सामानासकट बसबाहेर पडलो. तिथपर्यंत बस साधारण अर्धा फर्लांग पुढे आली होती.

मग परत एकदा सामानाची आणि बसमधून बाहेर आलेल्या माणसांची गिनती झाली आणि बसमध्ये आमच्यापैकी कुणी मागे राहिलं नाही ह्याची खात्री केली गेली. रणरणत्या उन्हातून, सामान सांभाळत,पंधरा मिनिटांची पायी मार्गक्रमणा करत माघारी परतलो, तेव्हा पाऊण वाजायला आला होता. नशीबाने तो पिंपळाचा पार अजूनही आम्ही आरक्षित केल्यासारखा मोकळा होता. त्यावर सर्वजण विसावले. पण मुख्य मुद्दा अनुत्तरीतच होता, तो म्हणजे ज्यांच्यासाठी आम्ही बसमधून उतरलो ते काका कुठे गेले? तेव्हढ्यात एका गावकऱ्याने आम्हाला पोलिसस्टेशनचा पत्ता सांगून आमची धाकधूक वाढवली. ‘आता काकांचा शोध घेणे’ ह्या एककलमी कार्यक्रमास सुरुवात झाली. त्या अनोळखी वातावरणात एक-दोन जण डाव्या दिशेस, दुसरे दोन उजव्या दिशेस थोड्या अंतरापर्यंत जाऊन परत आले. आता खरोखरंच पोलिसात ‘हरवल्याची’ तक्रार नोंदवण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू झाली. ज्यांचे यजमान गहाळ झाले होते त्या मावशी मात्र त्यामानाने शांत होत्या. ‘येतील ते इतक्यात’ असं त्या म्हणायला आणि लांब अंतरावरून हरवलेले(?) काका दिसायला एक गाठ पडली.

मग सर्वांनी ‘हुश्श’ केलं. काका ‘फ्रेश’ दिसत होते. ते जवळ आले तशा मावशी त्यांच्यावर उखडल्या. त्यांच्या अशा अचानक ‘गुल’ होण्याचं रहस्य जाणून घ्यायला सर्वच उत्सुक होते. इकडे काकांना आमच्यादृष्टीने, ते ‘हरवले’ असल्याची कल्पनाही नव्हती. अजूनही बस न आल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि कोकणात एसटी बस कधीच वेळेवर येत नसल्याची त्यांनी माहिती दिली. मावशींनी त्यांना मग बससंदर्भात घडलेला सर्व प्रसंग वर्णन केला आणि त्यांच्या अशा अचानक नाहीसं होण्यामागचं कारण विचारलं. काकांनी त्यावर बस यायला वेळ असल्याने आणि काही अंतरावर सलून दिसल्याने, ते तिथे दाढी करायला गेले असल्याचं सांगितलं. ते म्हणूनच ‘फ्रेश’ दिसत होते पण इतरांचे चेहरे मात्र उतरले होते. मावशींना त्यांच्या ह्या ‘सलून दिसल्यावर, न सांगता दाढी करायला जाण्याच्या’ सवयीची कल्पना असावी; म्हणून त्या तशा शांत होत्या. नंतरची बस तीनची होती. त्या बसवर भिस्त ठेवून, आमचा त्या पारावरचा मुक्काम मात्र वाढला.

 

डॉ. मिलिंद न. जोशी 
Email : milindn_joshi@yahoo.com   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu