साठ्येमध्ये रंगला ‘माध्यम महोत्सव’.

कोरोना काळानंतर पुन्हा एकदा नव्याने विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात दोन दिवसीय माध्यम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ‘शेर शिवराज’ फेम अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी उपस्थिती दर्शवली. तर दुस-या दिवशी अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेता आशुतोष कुलकर्णी आणि गायक मंगेश बोरगावकर यांनी महोत्सवास भेट दिली.
दरवर्षी साठ्ये महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे विविध संकल्पनांवर आधारित माध्यम महोत्सवाचे आयोजन होत असते. ‘माध्यमांची 75 वर्षे’ ही यंदाच्या दोन दिवसीय माध्यम महोत्सवाची संकल्पना होती. वृत्तपत्र,टेलीव्हिजन, रेडियो, अशा विविध माध्यमांमध्ये गेल्या ७५ वर्षांत घडलेली स्थित्यंतरं टिपणारे विविध स्टॉल्स हे या माध्यम महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
महोत्सवाचे प्रमुख अतिथी असणा-या चिन्मय मांडलेकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना आपल्या महाविद्यालयातील आठवणीना उजाळा दिला. तसेच चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावतानाचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चिन्मय मांडलेकर म्हणाले, “ माध्यमांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चांगले लेखक असतील तर त्यांना करीयरची उत्तम संधी उपलब्ध होऊ शकते.”
लेखन क्षेत्राचा करीयर म्हणून विचार करण्याचा सल्ला चिन्मय मांडलेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
चार चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज साकारताना त्यात वैविध्य राखण्याचे आव्हान, एकीकडे ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील दहशतवादी आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांची भूमिका अशा टोकाच्या भूमिका साकारताना घेतलेली मेहनत याविषयी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना चिन्मय यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली.
अदिती सारंगधर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या,” सध्या समाजमाध्यमं खूप प्रभावी झाली आहेत. एक रील तुमचं आयुष्य घडवू शकतं तसंच बिघडवू शकतं. कोरोनाने आपल्या सगळ्यांनाच खूप काही शिकवलं. नवीन संधी उपलब्ध करून दिल्या. अशा महोत्सवाला भेट दिली की कॉलेजचे दिवस आठवतात. आणि खूप सारी ऊर्जा मिळते.”

गायक मंगेश बोरगावकर आणि अभिनेता आशुतोष कुलकर्णी यांनी आपल्या कारकिर्दीतील संघर्षाविषयी विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित प्राचार्य माधव राजवाडे यांनी साठ्ये महाविद्यालयात होणा-या विविध अभ्यासक्रमांची माहिती देताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
माध्यम महोत्सवाच्या दोननही दिवशी विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कलापूर्ण कार्यक्रम सादर केले.. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, उपप्राचार्य दत्तात्रय नेरकर , उपप्राचार्य प्रमोदिनी सावंत तसंच माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
माध्यम महोत्सवाची संपूर्ण संकल्पना माहिती आणि आरेखनासह जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आणली. त्याकरता विभाग प्रमुख गजेंद्र देवडा, प्रा. रसिका सावंत, प्रा. स्मिता जैन, प्रा‌. सीमा केदारे, प्रा. गणेश आचवल यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. प्रसाद सावंत, संकेत सावंत, कृष्णाई सावंत, आदित्य जाधव, माधुरी सुकथनकर, दिपेश नारकर, सिद्धी जाधव, मिताली मोरे,राजश्री दहिफळे, तन्मय सांडवे, नमिषा पराते पुष्पेश पवार या विद्यार्थ्यांनी माध्यम महोत्सवासाठी विशेष मेहनत घेतली. दोन्ही दिवशी विद्यार्थ्यांसह रसिक प्रेक्षकांनी महोत्सवाला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला.“

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu