रद्दी पेपरपासून फर्निचर बनविणारे आनंद भावे !

या जगामध्ये अक्षरश: लाखो छंद जोपासणारे कोट्यवधी लोक आहेत. त्यामध्ये कांही छंद हे वेगळेपण आणि उपयुक्तता या दोन निकषांवर अधिक ‘ लक्ष ‘वेधी ठरतात. घरात जमणाऱ्या रद्दी पेपरपासून, रोज वापरण्यासाठी मजबूत, टिकाऊ, हलके, आकर्षक आणि स्वस्त फर्निचर बनविता येते, यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण श्री. आनंद भावेंच्या घरी त्यांनी स्वतः बनविलेले असे फर्निचर पाहून थक्क झालो. मुंबईत राहून, एका महत्वाच्या आणि जबाबदारीच्या पदावर नोकरी करीत असतांना असा छंद जोपासणाऱ्याला सलामच करायला हवा. त्यात त्यांची पत्नी सौ. अंजली भावे यांची साथ असतेच.

सध्या पेपरलेस व्यवहारांचा खूप प्रचार होतो आहे. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षतोडीविरुद्ध जगभर चळवळी सुरु आहेत. तरीही आपल्या घरात रोजचे वर्तमानपत्र येतेच. महिनाभरानंतर आपण ही रद्दी विकून टाकतो. पण आपल्या घरी आलेल्या या पेपरसाठी झाडे तोडली गेलेली असतात. दुसरीकडे जेव्हा लाकडी फर्निचर बनविले जाते तेव्हा सुद्धा लाखो झाडे कापली जातात. यातील एकवेळची वृक्षतोड टाळता आली तर ? याचा विचार करून आनंद भावे यांनी यावर प्रयोग सुरु केले. त्यांनी घरातील रद्दी पेपर भिजत घालून त्याचा लगदा बनविला. त्यावर कांही प्रक्रिया करीत करीत त्यांनी फर्निचर बनवायला सुरुवात केली. हळुहळू यामध्ये यश आणि पत्नीची साथ मिळणे सुरु झाले. टेबल, खुर्च्या, आसने, चौरंग, पाट, ट्रे.. एकेक वस्तू साकारू लागली. या वस्तू खूप हलक्या, टिकाऊ आणि खूप मजबूत असतात. अगदी १०० किलो वजन सहन करू शकेल अशी टेबल खुर्ची त्यांनी बनविली. सर्वसामान्य किडे, पाणी यापासून ते सुरक्षित असते.

अनेकदा आपल्या घरात १०० / १५० वर्षे जुन्या पोथ्या, धार्मिक ग्रंथ, देवाची चित्रे असतात. त्याचे तुकडे पडायला लागलेले असतात. पण आजोबा पणजोबांचा स्पर्श झालेल्या या वस्तू टाकाव्याशा वाटत नाहीत. नदीत, विहिरीत विसर्जित केल्या तर तेथील प्रदूषण वाढते. त्यावर भावे यांनी एक उत्तम उपाय शोधला आहे. कांहींच्या घरातील अशा पोथ्या पुस्तकांच्या लगद्यापासून त्यांनी कांही सुबक चौरंग बनवून त्या व्यक्तींना दिले. या नवीन चौरंगावर नव्या पोथ्या ठेवता येतात, पूजा करता येते. तेव्हा पूर्वजांची स्मृती आणि देवाबद्दलची भक्ती अशी एक वेगळीच भावना आपल्या मनात भरून राहते.

रद्दीच्या लगद्यापासून बनविलेली एक खुर्ची त्यांनी, भारताचे स्वच्छता आणि पर्यावरण दूत अमिताभ बच्चन यांना दिली तेव्हा ते खूपच आश्चर्यचकित झाले. त्यांनी या पर्यावरण रक्षणाच्या अभिनव मार्गाचे खूप कौतुक केले. स्वतः आनंद भावे यांनी अनेक छंद जपले आहेत. ओरिगामी, चित्रकला, स्केचिंग, नैसर्गिक रंगांची निर्मिती, वनौषधी या छंदांसोबतच त्यांना भटकंतीचीही आवड आहे. विविध ट्रेकिंग, नर्मदा परिक्रमा, अनेक नैसर्गिक गोष्टी जमा करणे या गोष्टीही त्यांनी केल्या आहेत, करीत आहेत. दोरीच्या हजारो प्रकारच्या गांठी त्यांना लीलया मारता येतात. या सर्व गोष्टी ते आपली नोकरीतील जबाबदारी सांभाळून करतात हे विशेष ! त्यांनी अशा विविध छंद जोपासणाऱ्या छांदिष्टांचा ” छंदोत्सव ” हा गृप स्थापन केला असून, विविध छंदांची प्रदर्शने, कार्यशाळा, व्याख्याने आजोजित केलेली आहेत.

पर्यावरण रक्षण, वेगळेपण आणि उपयुक्तता जपणारा हा वेगळाच छंद जोपासणाऱ्या आनंद भावे आणि सौ. अंजली भावे यांना शुभेच्छा !
 
– मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu