हिवाळ्यात खावाच असा पारंपरिक आणि पौष्टिक बाजरीच मलिदा; खास चवीची भारी गोष्ट

उत्तर भारत, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी बाजरीचा मलिदा खूप आवडीनं खाल्ला जातो. हिवाळ्यात हा ऊब देणारा चविष्ट पदार्थ म्हणजे थंडीतली खास स्वीट डिशच! करायला एकदम सोपा.

 
१)बाजरीच्या मलिद्यासाठी पीठ मळताना कोमट पाणी घ्यावं. 
२)मलिदा मऊ होण्यासाठी पीठ खूप वेळ मळावं लागतं.
३)हा मलिदा लाडू करुन किंवा तसाच मोकळा वरुन आणखी साजूक तूप घालून खावा.
 
कडाक्याच्या थंडीत शरीराला ऊब देणारे पदार्थ खावेसे वाटतात. या पदार्थांमधे सूप, पालेभाज्यांच्या पातळ भाज्या आणि भाकरी, डिंकाचे लाडू याप्रमाणे आणखी एक पदार्थ आहे. जो शरीराल ऊब देतो, पौष्टिकता देतो आणि थंडीतला गोड पदार्थ म्हणून सोपा पर्यायही ठेवतो. उत्तर भारत, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी बाजरीचा मलिदा खूप आवडीनं खाल्ला जातो. काही ठिकाणी हा मलिदा उडदाच्या तिखट आमटीत बुडवूनही खाल्ला जातो. हा मलिदा तयार करताना बाजरीचं पीठ, गूळ आणि साजूक तुपाचा वापर होत असल्यानं बाजरीचा मलिदा चवीला उत्कृष्ट लगतो तसेच आरोग्यासाठी लाभदायी ठरतो.
 
बाजरीचा मलिदा कसा करावा?
 
बाजरीचा मलिदा करताना 1 कप बाजरीचं पीठ, 1 कप चिरलेला/ किसलेला गूळ, 2 चमचे साजूक तूप, वेलची पावडर, 5 काजू आणि 5 बदाम आणि चिमूटभर मीठ एवढं साहित्य घ्यावं.
बाजरीच्या पिठात थोडं मीठ घालून कोमट पाण्यानं पीठ मळावं. पीठ हे एकदम मऊ मळलं गेलं पाहिजे. हातानं रगडून आणि पिठाचा अर्धा अर्धा भाग करत खूप वेळ हे पीठ मळून घ्यावं.पीठ मळून झालं की भाकरी करावी. भाकरी दोन्ही बाजूंनी भाजावी. फक्त भाकरी भाजतांना ती मऊ असली पाहिजे, कडक नको. भाकरी थोड्याशा गार झाल्या की हातावर रगडून त्याचा चुरा करुन घ्यावा . हातानं चुरायच्या नसतील तर मिक्सरमधे बारीक केल्या तरी चालतात.
भाकारीचा चुरा करुन झाला की त्यात गूळ घालावा. गूळ या चुर्‍यात व्यवस्थित मिसळणं गरजेचं असतं. मिश्रणात गुळाची गुठळी नसावी. नंतर या मिश्रणात वेलची पूड आणि गरम करुन पातळ केलेलं साजूक तूप घालावं. तूप चांगलं मिसळून घेतलं की काजू आणि बदाम बारीक तुकडे करुन घालावेत. अशा प्रकारे तयार झालेल्या मलिद्याचे लाडू करता येतात किंवा ह मलिदा तसाच मोकळा वरुन आणखी साजूक तूप घालून खाता येतो.

बाजरी ही ग्लुटेन फ्री असते. तसेच बाजरीमधे कॅल्शियम, मॅग्नीज, फॉस्फरस, फायबर, मॅग्नेशियम, ब जीवनसत्त्व आणि अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाणहे खूप असतं. तर मलिद्यातील गुळामधून प्रथिनं, पोटॅशियम, गुड फॅटस , फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, तांबं, झिंक आणि ब जीवनसत्त्वं शरीरास मिळतात. तसेच साजूक तुपातून स्निग्धता मिळते. बाजरीचं पीठ, गूळ, तूप आणि सुका मेवा यांच्या एकत्र मिश्रणातून आरोग्यास अनेक फायदे होतात. शरीरास उष्णता मिळते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते. मलिद्यामुळे पचनक्रिया सुधारते.

 
सौ. मानसी मंगेश सावर्डेकर.
नौपाडा ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu