भाड्याची सायकल…. ते उदयास येणारी नवीन सायकल संस्कृती. .
मग त्या सायकल वर ती मुलं- जणू काही गल्लीतले युवराजच आहेत अशा पद्धतीने स्वार व्हायची ,पूर्ण ताकदीने पायडल मारत , कधी हात सोडत बँलेंस करत , कधी खाली पडून पुन्हा उठून सायकल चालवायची.

तेव्हा भाड्याने सायकल घेणं , हे श्रीमंतीचे लक्षण होतं…स्वतःची लहान सायकल असणारे त्यावेळेस खूप रईसी झाडायचे…
जर का कुणाच्या घरी एखादी मोठी काळी अँटलस सायकल आणली गेली ,तरी तिला स्टँडवरुन काढणं आणि लावणं यातचं अर्धी एनर्जी वाया जायची आणि वरुन वडीलधाऱ्यांचा धाक…खबरदार हात लाऊ नको सायकलला , गुडगे फोडून येशील…तरी पण न जुमानता घरचे बाहेर गेले की , ती मोठी सायकल सुध्दा हातात घेऊन धुम ठोकली जायची … पायडल वर पाय ठेऊन बँलेंस करायचं…असं करत करत बरीच मुलं कैची ( हाफींग ) शिकली . नंतर नळी पार (फुल पायडल ) करुन नवीन विक्रम घडवला.. यानंतर सीट पर्यंत चा प्रवास एक नवीन अध्याय होता ,नंतर सिंगल, डबल, हात सोडून , कँरीअर वर बसुन चालवण्याचे सर्व स्टंट तेव्हाच करुन चुकली … खरं तर जीवनाची सायकल अजुनही चालू आहे. पण आता ते दिवस नाही…तो आनंद नाही….
आज सहज कंपाउंड मध्ये धुळ खात पडलेल्या मुलांच्या सायकल वर नजर गेली कि वाटतं एक काळ गाजवलेल्या सायकल ची किंमत अन् मजा यांची सर आता असलेल्या बुलेट ला पण येणार नाही. आता दिवस बदलले आहेत भाडय़ाची सायकल मिळत नाही तसे हल्ली अनेक लोक म्हणतात पण खरं म्हटलं तर आजकाल भाड्याच्या सायकलची दुकान जरी कमी दिसत असली तरी हल्ली लोक घरटी एखादी सायकल तरी घेताना दिसतात .
पूर्वी परवडत नाही म्हणून लोक सायकलचा वापर यायला – जायला करत असत पण हल्ली सायकलिंग हा व्यायामाचा आणि फिटनेससाठी एक महत्त्वाचा भाग बनला आहे .
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत . सायकल चालवणे हे अतिशय सोपे असून इतर वाहनांच्या तुलनेत तिची किंमतही कमी असते . ती वापरण्यास खर्च जवळजवळ नसतोच आणि इंधन लागत नसल्याने आजच्या प्रदूषणयुक्त वातावरणात सायकलींचा वापर नक्कीच पर्यावरण पूरक ठरतो. सायकल चालवल्याने शरीराला उत्तम व्यायाम होऊन स्नायू बळकट होतात आणि वजनही नियंत्रणात राहते .
अशी ही बहुगुणी सायकल कोणे एकेकाळी भारतातील बऱ्याच ठिकाणांची ओळख होती आणि महाराष्ट्रात खासकरून पुण्याची !
या काळात पुणं हे सायकलींचे शहर म्हणून ओळखल जायच, रस्त्यावर बहुतांश सायकलीच दिसायच्या.आजकाल स्कूटर ,मोपेड ,गाड्या आल्या असल्या तरी पुण्यामध्ये सायकलस्वारांचे प्रमाणही भरपूर आहे.
युरोपमध्ये ही बऱ्याच देशांत सर्रास सायकली वापरल्या जातात. बर्लिन ,प्राग ,ब्रसेल्स, बार्सिलोना ,डब्लिन, झुरिक या देशांमध्ये सायकलींचा भरपूर प्रमाणात उपयोग केला जातो. डेन्मार्कची राजधानी असलेले कोपनहेगन हेही सायकलींचे शहर म्हणून ओळखलं जातं . डेन्मार्क हा सायकलवेडय़ा लोकांचा देश आहे जिथं सायकल चालवणे हा डॅनिश लोकांच्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे .
भारतातही स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी सायकलिंग ट्रॅक बनवणे, पब्लिक सायकल ठेवणे असे उपक्रम सुरू केले आहेत. सायकलप्रेमींचे अनेक गट ठिकठिकाणी तयार झाले आहेत आणि ते सायकलवरून लांबलांबचे प्रवास करताना दिसून येतात .
हल्ली बाजारातही वेगवेगळ्या पध्दतीच्या सायकल्स उपलब्ध आहेत साध्या ,गिअर असलेल्या, फोल्डिंग सायकल्स अशा बऱ्याच प्रकारात वेगवेगळ्या देशी आणि विदेशी कंपन्यांच्या सायकल्स तुम्ही दुकानातून किंवा ऑनलाइनही खरेदी करु शकता .
सध्या ट्रेंडिग असलेल्या काही सायकल्सची माहिती, त्यांचे फीचर्स, त्या कुठे खरेदी करता येऊ शकतील अशी माहिती आम्ही पुढील भागात देणार आहोत . नक्की वाचा. तुमच्याही काही सूचना असतील किंवा याबद्दलची काही माहिती आम्हाला सांगायची असेल तर आम्हाला नक्की कळवा.