कैकेयी… खलनायिका ?
वाल्मिकी, भास, गदिमांच्या लेखणीतून ……….
वाल्मिकींनी चितारलेली कैकेयी – नावात काय आहे असे म्हणणारे कधीही आपल्या मुलीचे कैकेयी नाव ठेवायला धजावले नाही. इतिहासाने तिच्या कृष्णकृत्याची, नावाची काळी नोंदच करून ठेवली आहे . केकय देशाची राजकन्या; सूर्यवंशीय इक्ष्वाकु कुलाची स्नुषा. ज्या कुलातील राजे दैदीप्यमान यशाने तळपणारे , निजी गुणांची खाण, कीर्ती च नव्हे तर रुंद बाहू, भारदस्त व्यक्तिमत्वाचे होते. ब्रह्मा,मरिची,कश्यप ,विवस्वान,वैवस्वत मनु,इक्ष्वाकु,दिलीप, रघु ,अज अशा कीर्तिवंत राजांचे गुणगान रामायणात वाल्मिकींनी –
आदिवंशविशुद्धानां राज्ञां परमधर्मिणाम् |
इक्ष्वाकुकुलजातानां वीराणां सत्यवादिनाम् || (बालकाण्ड,७०.४४)
शुद्ध कुळातील, वीर, धर्मपालक आणि सत्यवादी असे भरभरून केले आहे. प्रसिद्ध कुळाला साजेश्या अशाच पतिव्रता स्नुषा सुदक्षिणा, इंदुमती आदी कालिदासाने रघुवंश महाकाव्यात वर्णिल्या आहेत. तद्वत दशरथाच्या तीन राण्यात; पट्टराणी कौसल्या शांत तर सुमित्रा समजूतदार पण कैकेयी मात्र दुराग्रही, हट्टी,हलक्या कानाची असावी असा जनमानसाचा आजवर समज आहे. कैकेयी दशरथाची रुपगर्विता प्रिया कांता असावी. अत्यंत रूपवान तसेच बुद्धीची खाण, अशी ही सुंदर कैकेयी!! देवराज इंद्रास साहाय्य करण्यासाठी शंबर राक्षसाबरोबर झालेल्या युद्धात महाराज दशरथ जखमी झाले. युद्धातील तिचे सारथ्य कौशल्याने तिने दशरथाचे प्राण वाचविले होते. सारथी झालेल्या कैकेयीस सारथ्याचे प्रशिक्षण केकयनरेशाने विवाहपूर्व दिले असावे. ह्याच कौशल्यामुळे दशरथाने तिला वर दिले होते.
मंथरेच्या रामाभिषेकाच्या वार्तेने प्रथमतः ती हर्षभरीत होऊन रामाचे यौवराज्यपदअर्हता मान्य करते. मंथरेच्या वारंवार चिथावणी मुळे ती कोपभवनात प्रविष्ट होऊन वरांची आठवण करून देते. राम-राज्याभिषेकाच्या आनंदाला ग्रहण लागते. ज्येष्ठ पुत्रास बाजूला सारून अनुजास सिंहासनाधिकार देणारे अनेक दाखले ती परखडपणे रामायणातील अयोध्या कांडात सादर करते. राजनीतीज्ञा कैकेयी गुणांची खाण असताही तिच्या एका कृत्याने तिची काळी नोंद -एक खलनायिका म्हणून झाली.
रामाला होणारा अभिषेक मत्सरापोटी, लोभापोटी किंवा मंथरेच्या कान फुंकण्याने कैकेयीने स्थगित केला. बदललेली मनोभूमिका कैकेयीस नीच कृत्य करण्यास प्रवृत्त करती झाली आदी इतिहास सर्वास ज्ञात आहेच. भरताने तिचा धिक्कार केला ह्या पलीकडे इतिहास तिच्या विषयी काही सांगत नाही. दशरथमृत्युनंतर ह्या राणीचे पुढे काय झाले? शरमेने ती गृहत्याग करून अरण्यात निघून गेली वा राजवाड्यात राहिली. सगळेच प्रश्न अनुत्तरीत……
भासाने रंगवलेली कैकेयी- माणूस जन्मतः दुष्ट किंवा सुष्ट असतो का ? प्रत्येकाला आलेल्या अनुभवावरून ते ठरते. मृत्युंजय मधील कर्ण सहानुभूतीच्या परिघात आला, अशी काहीशी अनुभूती ‘भास लिखित संस्कृत नाटक- ‘प्रतिमा’ वाचल्यावर कैकेयी विषयी होते. असत्य, अधर्माची बाजू घेणाऱ्या कर्णाचा मृत्यू चटका लावतो. परिस्थिती मुळे योग्य-अयोग्य सगळेच वागतात! एक माणूस म्हणून त्याचे परिशीलन कोण काय करेल हे प्रत्येकाच्या चित्तवृत्तीवर अवलंबून असते. दुष्ट म्हणून चिरपरिचित असलेल्या कैकेयी मधील मानव्य भासाने वाचकांसमोर उलगडून दाखवले. त्यासाठी आधार घेतला श्रावण कथेचा, पुत्रशोक ह्या संकल्पनेचा अर्थबदल अन वराऐवजी स्त्री-शुल्क प्रदान !!
दशरथाच्या शराने श्रावणाचा मृत्यू झाला. पुत्रमृत्यूमुळे अंध मात्या-पित्याने शाप देऊन प्राणत्याग कथा विदित आहे. श्रावणाच्या मृत्यूने मात्या पित्याचा अंत झाला तसाच पुत्रशोकामुळे दशरथाचा अंत इथेही होणार हे विधिलिखित अटळ होते. तिन्ही राण्यास पुत्रशोक आणि पतिमृत्यू एका वेळेस दोन संकटांना सामोरे जावे लागणार होते !!
पुत्रशोक म्हणजे पुत्र-मुत्यु वाल्मीकीना अपेक्षित होता का ?कदाचित त्यांनाही वियोग हा अर्थ अपेक्षित असावा…..विरह तत्कालिक असो, चिरकालिक मृत्यू नको, आणि रामाचे वनवास निमित्ताने दूर जाणे ही नियती झाली.( हा अर्थ भासाने वाचकांच्या दृष्टीस आणला). पुत्रशोक म्हणजे पुत्रविरह !! वाल्मिकींना रामाचा चिरकालिक विरह अपेक्षित नव्हता. रामजन्म रावणवधासाठी झाला होता अन त्यासाठी पार्श्वभूमी आवश्यक होती. शोक हा पुत्रमृत्यू न करता त्यांनी पुत्राचा तत्कालिक विरह घडवून आणण्यासाठी रामायणात वराची तर भास नाटकात श्रावण कथेची पार्श्वभूमी घडवून आणली. कैकेयी ध चा मा करण्याइतकी धूर्त होती ?
भासाने नाटकात महत्वपूर्ण बदल नाटकात केला तो म्हणजे वरपूर्तीचा उल्लेख केला नाही. विवाह समयी पतीने पत्नीस स्त्रीशुल्क म्हणून जे मागेल ते देण्याची पद्धत होती असे भासाने नमूद केले. पती मृत्यू पश्चात योगक्षेमाची भविष्यकालीन तरतूद असावी. दशरथाने वचन रुपात कैकेयीच्या पुत्रास सिंहासनाधिकार कबूल केला होता. इक्ष्वाकु वंशीय राजे वचनपूर्ती साठी प्रसिद्ध. दशरथ ते न करता तर वंशाला काळिमा फासला गेल्याचे शल्य आयुष्यभर उरात बाळगता…कैकेयी कृत्यामुळे कुलकी लाज राखली गेली ..
राम तिचाही प्रिय पुत्र होता. भासाची कैकेयी आत्यंतिक मानसिक ताणात असताना रामास चौदा दिवस केवळ वनवासात पाठवू इच्छित होती, पण हाय… दिवस ऐवजी वर्ष मुखातून बाहेर पडले. चौदा दिवसाचा विचार करणारी परा वाणी, वैखरी रुपात चौदा वर्ष वदली. सुटलेला बाण ,गेलेला शब्द परत मागे घेता येत नाही ह्या न्यायाने कैकेयीने कितीही समजावले तरी तिच्या मुखातून नियतीच वदली त्याला प्रमाण मानून एकवचनी रामाने चौदा वर्षच वनवास पत्करला. भासाने कैकेयीस चतुर, पतीची अपकीर्ती होऊ नये म्हणून प्रसंगी स्वतःवर दोषारोप घेणारी, मौन धारण करणारी संयमी स्त्री म्हणून रेखाटली. कौसल्या, सुमित्रा, वसिष्ठ वामदेवादी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीना तिचा त्याग माहित होता. तिचे राजवाड्यातले वास्तव्य कोणी नाकारले नाही ना कलंकित होऊन गृहत्याग करावा लागला. ती व्यक्त झाली ते फक्त पुत्र भरताकडे!! आपल्या गुन्ह्यामागची पार्श्वभूमी सहाव्या अंकात स्वपुत्रास कथन केली. भरताने तिची क्षमा मागितली.
गदिमांची पद्यातली कैकेयी – ‘माता न तु वैरिणी’ भरताच्या त्वेशपूर्ण भावना मांडणारे गीत गदिमा, आधुनिक सिद्धहस्त वाल्मिकींच्या लेखणीतून झरले. सरते शेवटी ते ही लिहून गेले व्यक्ती दोषी नसते तर परिस्थिती अशी निर्माण होते. राममुखातून शब्द उमटतात –
माय कैकेयी ना दोषी, नव्हे दोषी तात
राज्यत्याग काननयात्र,सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा………
रामायणातील रामाच्या मानवातीत आदर्शवादाला ज्या अस्सल मानवी पात्रांनी तोलून धरलेलं आहे त्यापैकी एक पात्र कैकयीचं आहे. तिचं वागणं हे इतकं मानवी आहे की तेच रामादिकाच्या आदर्शवादी वागण्याला कोंदण देतं.
कैकेयीला दोषी न मानले वाल्मीकींच्या रामाने ,भासाने वा गदिमांनी …..
- डॉ.सौ.अपूर्वा निबंधे
मुंबई
पूर्वप्रकाशित – www.thinkmarathi.com