ऋणानुबंध
२०११ च्या मे महिन्यांत इंदिरा गांधी विमानतळावर बऱ्याच वर्षांनी पाय ठेवला नि बघतच राहिले. आत्तापर्यंत तशी बऱ्याचवेळां आले होते पण आज एकदम बदलेलं रूप समोर आलं .नूतनीकरणानंतर प्रचंड मोठं स्वरूप प्राप्त झालेला हा विमानतळ ,मनमोहक आर्किटेक्चर , अत्यंत सुशोभित side walls ! थोडक्यांत पायतळापासून छतापर्यंत सारेच सुरेख, भव्य.बरीच बक्षिसे मिळविलेला हा, विमानातून उतरल्यापासून ,अतिसुंदर ,लांबलचक गालिच्यांवरून चालतांना प्रत्येकाला एक सुखद अनुभव देत होता. मला तर पहाटेपासून झालेली धावपळ क्षणांत विसरायला झाली. पुढच्या विमानासाठी जाईपर्यंत डोळे भरून पाहत होते सारे. एका भिंतीवरील प्रचंड आकाराच्या हस्तमुद्रा लक्ष तर वेधून घेत होत्याच पण रिलॅक्सही करत होत्या. चला , छान झाली सुरुवात.
बँकेच्या एका मिटिंगसाठी गुवाहाटीला निघाले होते. आई -वडिलांबरोबर बहुतेक भारत दर्शन झाले असले तरी हा भाग राहिला होता खरा. दोन विमानाच्या वेळांत दोन तास असल्याने विमानतळ छानपैकी बघून अडीच तासांच्या प्रवासानंतर गुवाहाटी विमानतळावर औसुक्याने उतरले. सुंदर सजावटीबरोबरच लक्ष वेधून घेत होती ती एकशिंगी गेंड्याची भव्य प्रतिकृती आणि हत्ती!
बाहेर येऊन सरळ आमचे हॉलिडे होम गाठले.बँक जरी हॉटेलमध्ये सोय करत असली तरी शक्य असेल तेव्हां मला आमच्या SBI ..च्या हॉलिडेहोममधेच रहायला आवडते. आपले तर वाटतेच पण स्टाफ ही बँकेचा असल्याने सहज गप्पा होतात ,थोड्याफार मिळणाऱ्या मोकळ्या वेळांत तिथल्या परिसराची , शहराच्या खासियतेची माहिती करून घेता येते. हॉटेलमध्ये आपण ग्राहक असतो केवळ , इथे समान धाग्याने जोडलेली सर्व आपुलकीने जवळ येतो. दुसऱ्या दिवशी मिटिंग होती , तेव्हां ठिकाणाची थोडीफार माहिती घेऊन , रसोई बंद झाल्याने , कुठे बरे जेवण मिळेल हे विचारून छानपैकी पाय मोकळे करून आले. रात्रीची वेळ, अनोळखी शहर , तरी एकटी फिरायला भीती नाही वाटली.पुष्कळशी दुकाने बंद झाली होती पण रहदारी बऱ्यापैकी होती.एका छोट्या हॉटेलमध्ये (फूड कोर्ट सदृश ) थुप्पा (Thukpa ) हा मूळचा तिबेटियन असलेला इथे स्ट्रीट पदार्थ ! व्हेज व नॉनव्हेज दोन्हीमध्ये उपलब्ध ! लेमनग्रास व आले भरपूर प्रमाणात नि सॉसमध्ये नूडल्स आणि बऱ्याच भाज्या.पहिल्या दिवशीच लोकल फूड खाल्ल्याचे समाधान नि बाहेरच्या व्यक्तीला आपली डिश खिलवितांना तो पोरगेलेसा कूक फुलारून गेला होता .माझ्या प्रश्नांना मोडक्या तोडक्या हिंदीत उत्तरे देतांना , त्याच्यापेक्षा नॉनव्हेज किती चविष्ट आहे नि मी नको , नाही म्हणतांना किती चांगल्या चवीला मुकत आहे याचे दु:ख त्याला होत होते. विशेष गिह्राईक नसल्याने तो आणि त्याचा मदतनीस आणखी काही लोकल फूड चे प्रकार ( काही ऐकून पोटात ढवळले ही) सांगत होता. पण त्याला मिळाला होता एक उत्तम श्रोता नि मला वेगळी माहिती देणारा लोकल गाईड !
दुसऱ्या दिवशी मिटिंग छानच झाली. लंचनंतर पुन्हां चर्चा , DGM भाषण , प्रश्नोत्तरे ….सारे काही वेळापत्रकानुसार आणि समाधानकारक. संध्याकाळी तिथेच ओळख झालेल्या दोघींबरोबर ( एक कलकत्त्याहून नि दुसरी चेन्नईहून )जवळ मार्केटमध्ये फेरी मारली नि मुक्कामावर आले. मिटिंग मनासारखी झाल्याने खूष आणि रिलॅक्स.आता दुसऱ्या दिवसाची उशिराची फ्लाईट होती ,तेव्हां मिळालेल्या वेळेचा छान उपयोग करून घ्यायचा होता. शोमनाथ (तिथला केअर टेकर ) शी बोलून , टॅक्सी बुक करायला सांगितली .त्याच्याकडूनही बरीच माहिती मिळाली. संस्कृत गुवाका या शब्दापासून असामी गुवा (Guva ) हा शब्द तयार झाला. Hati म्हणजे रांग ! म्हणून Guwahati म्हणजे the row of areca nut trees. सुपाऱ्याच्या झाडांची रांग ! हे कळल्यावर मी जरा खजिलच झाले . इतकी वर्षे आसाम म्हणजे चहाचे मळे नि wildlife हे समीकरण इतके डोक्यांत पक्के बसले होते की, गुवाहाटी (भूगोलाच्या पुस्तकांत तर गोहत्ती असे होते) म्हणजे हत्ती भरपूर, म्हणून हे नांव, असेच काहीसे वाटत होते. भरपूर पाऊस हि एकमेव गरज असलेल्या झाडांची विशेष काळजी घ्यायला लागत नाही. एकदा फळ देऊ लागले की ६० वर्षे निरंतर. सुपाऱ्यांना तर भरपूर मागणी आहेच पण त्याच्या सोयट्यापासून डिशेस, बाउल्स, चमचे इ. बनविण्याचा मोठा उद्योग तरुणांना आकर्षित करीत आहे. रोजगार नि पर्यावरणपूरक !!
खोलीत गेले नि इकडे मिटींग ठरल्यावरच आईची सर्वप्रथम आठवण आली होती ते तिचे शब्द पुन्हां मनांत रुंजी घालू लागले.”कधीतरी योग येईलच तुझा ,गुवाहाटीला जायचा , तेव्हां कामाक्षीचें दर्शन नक्की घे”. नकाशा घेऊन बसले नि यादीच करून टाकली , कुठे कुठे जायचे त्याची. अर्थात , वेळ तसा बेताचा हे लक्षांत घेऊन !
सकाळी साडेसहालाच निघाले तरी माझ्यासाठी म्हणून नास्ता तयार केला होता. मीही गोव्याचे काजू पॅकेट त्याला दिले तर बायको खूष होईल म्हणत तिलाच हाक मारली.गोड हसली . ( गोव्याहून निघतांना मी नेहमीच ४/५ पाकिटे जवळ ठेवते. कधीही , कोणालाही भेट द्यायला उपयोगी पडतात. ) त्यांचा निरोप घेऊन निघाले तर शोमनाथने ड्रायव्हरला, मॅडम आपल्या मेहमान आहेत , काळजी घे नि नीट विमानतळावर सोड , ” आपूनका responsibility ” च्या आविर्भावात सांगितले नि ड्राइव्हरनेही मुंडी हलविली.
सारा १०/१२ किलोमीटरचा प्रवास.पण आई बापूंची तीव्रतेने आठवण येत होती. किती स्थळदर्शनच्या आठवणी त्यांच्याबरोबरच्या. आणि जेव्हां मी नसे बरोबर त्यावेळी घरी आल्यावर इतके साग्रसंगीत वर्णन की प्रत्यक्ष डोळ्यासमोर सारे उभे. आताही तेच वर्णन आठवित चालले होते. सतीचे निर्जीव शरीर घेऊन भगवान शंकराने संतप्त होऊन जे तांडवनृत्य आरंभले त्याने सारे भयभीत झाले. त्याला शांत करण्यासाठी भगवान विष्णूला शरण गेले.त्याने आपले सुदर्शनचक्र सतीच्या निष्प्राण देहावर सोडले ज्यामुळे तिच्या देहाचे तुकडे होऊ लागले .असे ५२ तुकडे होऊन ते जिथे पडले ती तीर्थक्षेत्रे झाली. निलायाम पर्वतावर टॅक्सी आता नागमोडी वळणे घेत हिरव्यागार सृष्टीमधून वर निघाली नि मी आठवू लागले , आतापर्यंत या ५२ तिर्थक्षेत्रांपैकी कुठे कुठे बरं गेले मी ? सोलापूरला तिचे डोळे पडले नि महालक्ष्मी म्हणून प्रसिद्ध झाली. उज्जेन ला वरचा ओठ …महाकाली, कांची ला पाठ …कांची कामाक्षी , म्हैसूरला केस …चामुंडेश्वरी , मनगट वाराणसीला …विशालाक्षी , कटकला नाभी ….गिरिजादेवी ….पाहिलेली ही रूपे समोर येत असतांनाच कामाक्षी मंदिरासमोर पोहोचले. आपण बोलतांना जरी कामाक्षी म्हणत असलो तरी तिचे नांव कामाख्या देवी असे आहे.
मंदिराची सध्याची रचना अहोम काळात बांधली गेली आहे, पूर्वीच्या कोच मंदिराचे अवशेष काळजीपूर्वक जपले गेले होते. १४९८मध्ये निलंबरच्या कारकिर्दीत मंदिर नष्ट करण्यात आले आणि कोच घराण्याचे संस्थापक विश्वसिंग (१५१५-४० )यांना या मंदिराचे अवशेष सापडले होते, ज्यांनी त्या जागेवर उपासना सुरु केली; त्यांचा मुलगा नारायण (१५४०-८७ ) च्या कारकिर्दीत १५६५ मध्ये मंदिराची पुनर्बांधणी पूर्ण झाली. सध्याच्या संरचनेत वैशिष्ट्यपूर्ण शिखरे आहेत, बाहेरील बाजूने गणेश आणि इतर देवी-देवतांच्या मूर्ती आहेत.
हे सर्व पाहत मी प्रमुख मंदिरापाशी पोहोचले होते. इतक्या सकाळीही भलीमोट्ठी रांग होती दर्शनासाठी. कोणतीतरी सहल आली होती आणि भरपूर बायका रांगेत उभ्या होत्या. अर्थात इतक्या सकाळी ही प्रचंड कलकल चालली होती. इतकावेळ शांततेत गेल्यामुळे मी निरीक्षण करू लागले. खरंच यांना दर्शनाची ओढ होती कां? कुणी खात होत्या , कुणी मुलांवर करवदत होत्या .कोणी मोठमोठयाने गप्पा मारीत होत्या . मधेच एक दोन पुरुष येऊन साऱ्यांना चहा देऊन गेले. त्यांतही पुढे मागे नाचत माझ्याही अंगावर सांडला. ” अभी बिस्कुट भी दो” ,म्हटल्यावर फिदीफिदी हसू लागल्या नि एक मला म्हणते , “जरा पिछे जाव, अपना ग्रुप है “. मी काही बोलणार तितक्यात एक वयस्कर बाईने , माफ करो. नासमझ है …..म्हटले. तोच धागा पकडून मी , किती दूरवरून आलो आहोत दर्शनाला , तर देवाचे नांव घ्यावे असे पटवून सुरु केले , “उँचे डूंगर आप बिराजो उचेगढ़ बेराठ भवानी म्हारी जगदंबा”! ( गृप राजस्थानी होता.) मला एव्हढेच येत होते , पण माझे काम झाले. सगळ्या भजन म्हणू लागल्या , समेवर मी पुन्हां ! आतील गर्भगृहात जाईपर्यंत कलकल संपून सूर काही असू देत , एक भक्तिमय वातावरण तयार झाले खरे. मागे असलेल्या त्यांच्यातील एक आजी हळू हळू पुढे आल्या नि माझ्या डोक्यावर हात ठेवून काही पुटपुटली !(तिला कळले बहुतेक मी काय केले.) मी अवाक ! देवीचा आशीर्वाद इथेच मिळाला की दर्शनाच्या आधी की हेच दर्शन ?!! मी पटकन तिच्या पाया पडले.
रांग आता पुढे सरकली नि आम्ही एकदाचे एका गोलाकार मंडपात आलो. इथे भिंतींमध्ये नरनारायण, संबंधित शिलालेख आणि इतर देवतांच्या मूर्तिकृत प्रतिमा आहेत. मंदिरात तीन प्रमुख खोल्या आहेत. पश्चिम कक्ष मोठा आणि आयताकृती असून सामान्य यात्रेकरू उपासनेसाठी वापरत नाहीत. मधला खोली एक चौरस आहे, ज्यात देवीची छोटी मूर्ती आहे. नि मग एक गुहेच्या रुपात मंदिराच्या गर्भगृहात गेलो. इथे मूर्ती नसून सांगतात की इथे देवीच्या योनीचा भाग आहे,परंतु तो , फुलांच्या माळांनी , विविध फुलांनी आच्छादलेला असतो. हातातील फुले तिथे वाहून , मघाशी भेटलीस ना मला, असे म्हणून मी बाहेर पडले.
मंदिराभोवती फिरतांना एका मोठ्या जागेत बकरे सोडलेले दिसले.काही कोंबडेही. आणि सर्वांना गुलालाने माखलेले ! एकदम काटा आला अंगावर , आठवले इथे नवसाचे बकरे ,कोंबडे कापतात. पण हे तर बऱ्याच वर्षांपूर्वी वाचले होते , अजूनही सरकारने कायदा केला नाही या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ? मी अवसान आणून ऑफिसमध्ये गेले. नि याबद्दल चवकशी करण्यास सुरुवात केली….” वो बाहर जो बकरे रखे है गुलाल लगाके…”
” तुम्हारा बजेट कितना है ? हर एकका अलग किमत है . सब available नहीं, पहलेही रकम दी है ! “.माझं ऐकून न घेता सुरु .
” मुझे बली नहीं देनेका”…..
“तो ?” इधर प्रशाद नहीं , नीचे मिलेगा ”
” मैं पूछनेकेलिये आई हूं की ये बंद नहीं हुआ अभीतक ? हमने तो पढा था ….”
” ले , और आ गयी सोशल वर्कर . माताजी , इधर यहीं चलेगा”
“मगर भाईसाहब…”
त्याने संभाषण बंद करून पाणी पिऊ लागला. मला खूपच वाईट वाटले त्या बकऱ्यांकडे बघतांना. समोरून तिथल्या काही तरुण मुली येतांना दिसल्या. त्यांना थांबवून मी , हे किती वाईट आहे , असे म्हटले. त्यांनी माझे ऐकून घेतले , आणि इंग्लिश मध्ये , ” Yes Mam , we also dont like , but we are helpless ” असे सांगून तिथे मोठमोठे लोक सुद्धा यासाठी येतात देशभरातून , याची यादीच दिली. आणि ब्लॅक मॅजिक करायला बाहेरचेच जास्त येतात , हेही जरा चढ्या आवाजांत सांगितले.तशीच पुढे गेले तर तिथे एका मोठ्या दगडावर नुकतेच बोकड कापले असावे, कारण रक्त पडले होते. इतक्यांत समोरून काही तरुण मुले आली. तिथलीच वाटत होती. त्यांना थांबवून तेच विचारले की तुम्ही तरुणांनी तरी हे थांबविले पाहिजे . त्यांनाही तशीच उत्तरे दिली नि निघून गेले. आणि मग मागून हांक आली, “बाईजी” , थांबले तर एक जरा वयस्कर , पांढरी शुभ्र दाढी असलेली व्यक्ती समोर आली , ” सुनो. ये परंपरा है! नहीं बदलेगी, बहुत आये तेरे जैसे,और अभी जा इधरसे ,नहीं तो अभी सब देख रहे है , गुस्सेमे तुझेही बकरे जैसे काट लेंगे !” त्याने इशारा केलेल्या माणसाकडे मागे वळून पाहिले ,तो खाऊ की गिळू नजरेने माझ्याकडे बघत होता. आजोबांच्या दिशेने हात जोडून मी खिन्न मनाने बाहेर पडले पुन्हां इथे न येण्यासाठी.
मार्गस्थ झाल्यावर ड्रायव्हरने विचारले , सिटीमध्ये जायचे आहे कां? त्याची अपेक्षा कदाचित मी शॉपिंग करेन, जेवण , जवळपास लेक , वगैरे आणि विमानतळावर जाईन.पण मी सांगितले ,नवग्रह मंदिर आणि वशिष्ठ मुनींचा आश्रम बघायचा आहे,क्षणभर तो चकित झाला व इतुकेच म्हणाला , आप अलग है !”
नवग्रह मंदिर वेगळ्या वैशिष्ठयांसाठी वाचले होते , म्हणून बघायचे होते. गुवाहाटी मधील एकमेव ग्रहपूजन मंदिर,नवग्रह मंदिर. नवग्रह टेकडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चित्रसाल हिलवर अहोम राजा राजेश्वर सिंघाने १७५२ मध्ये बांधले .त्यातील काही भाग या भूकंपात खराब झाल्यामुळे १९२३ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले .काही पायऱ्या चालून गेल्यावर आपण मंदिराच्या मुख्य भागात प्रवेश करतो. आतमध्ये कुठेही निरांजनशिवाय कोणताही प्रकाश नाही त्यामुळे डोळे सरावण्यास काही वेळ लागतो नि मग दिसतो मोट्टा गोलाकार हॉल .नि त्यांत नऊ शिवलिंगे. प्रत्येक शिवलिंग एकेका ग्रहाचे प्रतिनिधित्व करते नि त्याप्रमाणे त्यांच्या रंगाचे वस्त्र त्यांनी परिधान केले आहे . दोन शिवलिंगामध्ये भरपूर जागा, मधोमध सूर्याचे प्रतिनिधित्व करणारे शिवलिंग , बाकी सारी सभोवती गोलाकार वसलेली. आतापर्यंत नवग्रह म्हटले की , देवळांत, विशेषतः मारुती वा शनीच्या देवळांत , एका बाजूला , एका दगडी चौथऱ्यावर काही इंचाच्या ग्रहांच्या मूर्ती गोलाकार मांडलेल्या ,हेच मनांत ठसलेलं त्यामुळे इतकी मोठी जागा, पूर्ण मंदिरच नवग्रहांचे नि शिवलिंग स्वरूप मिळालेलं ! सारंच अनोखं ! पूजा करायला ऐसपैस जागा. ज्याने त्याने आपापल्या ग्रहाची पूजा आरामांत बसून करावी.आपल्या निरांजनाचा तेव्हढा उजेड , त्यामुळे अत्यंत शांत वाटते. वाचले होते रोज २५०/३०० माणसे येतात इथे . कां कोणजाणे पण मी गेले तेव्हां कोणीही नव्हते .ड्रायव्हर तपन ही जेवायला गेला होता. दुपारी १२ चा सुमार .कोणी नाही म्हणून पुजारीबुवासुद्धा कदाचित जेवायला गेले असावेत नि देवळांत, भल्या मोठ्या गोलाकार दगडी सभामंडपांत मिणमिणत्या प्रकाशांत मी एकटी.इतके शांत वाटले सांगू !!कुठेही आवाज नाही,कितीतरी वेळ मी एकाचजागी शांत उभी राहिले.ती निरव शांतता चहूबाजूंनी पांघरून घेत होते जणुं !आकाशाच्या पोकळीत गेले की असेच शांत वाटेल कां ? विचारांच्या वावटळीत हरवले. मनाचे समाधान झाले असावे , कारण थोड्या वेळाने आपोआप शरीर हलले नि मग प्रत्येक ग्रहाला नमस्कार करीत गेले. सारे सारखेच मला. ना माझ्या कोणी राशीला वा मी ना कोणाच्या राशीला लागलेली ! मात्र डोळे भरून साठवत होते सारेकाही.म्हणूनच आजही तसेच्या तसे आठवत आहे.प्रथमत: सूर्याचा रथ ज्याचे एक चाक आणि सात घोडे रेखाटलेले आहेत, हातात कमळ , वस्त्र लाल. दुसरा चंद्र ज्याला पांढरे वस्त्र व पांढऱ्या फुलांनी सुशोभित केलेले आहे. तिसरा मंगळ अग्निमय लाल वस्त्र परिधान केलेला , तीन हातांत ‘गडा’, ‘सुला’, ‘शक्ती’ शस्त्रे आणि ‘अभय’ किंवा ‘वरदा’ मुद्रेत एक हात . तर, बुध हिरवे वस्त्र परिधान केलेले आहे, आणि तीन हातांत खडगा, ‘खेतका’ आणि ‘गडा’ आहेत आणि चौथा हात वरदा मुद्रेत. पाचव्या स्थानावर बृहस्पती आहेत सोनेरी पिवळ्या वस्त्रांत . ‘कमंडलु’, ‘अक्षमाला’, आणि ‘दंड’तीन हातांत आणि वरदा मुद्रा. त्यानंतर सहावा ग्रह, शुक्र,सफेद वस्त्रांत ज्याचे चार हात आणि बृहस्पतीच्या समान शस्त्रे असणारा. सातवा ग्रह, शनि हा काळ्या कपड्यांमध्ये आहे, त्याच्याकडे दोन शस्त्रे आहेत व वरदा मुद्रेमध्ये. आठवा म्हणजे राहू, जांभळ्या रंगाच्या वस्त्रात .शेवटचा, नववा ग्रह म्हणजे केतू गडद लाल रंगाचे वस्त्र ल्यायलेला.
विशेष म्हणजे हे नवग्रह मंदिर ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे संशोधन केंद्र आहे.
बाहेर येऊन पुन्हां दंडवत घातला , एक वेगळीच अनुभूती दिल्याबद्दल.वळले नि पुन्हां बाहेरच्या प्रखर प्रकाशला डोळे जरा बिचकलेच. कोणतीही सवय पटकन होते कां ?
डोंगरमाथा असल्याने मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालून सगळीकडून दिसणारे सुंदर दृश्य पाहत पुढच्या टप्प्याकडे निघाले.
गुवाहाटी शहराच्या सरहद्दीवर बेलिटोला येथे गरभंगा राखीव जंगल जे हत्ती आणि फुलपाखरांसाठी राखीव आहे , त्याच्याजवळ वसिष्ठ मंदिर आहे . अहोम राजा राजेश्वर सिंह नेच हेही मंदिर बांधले आहे १७५१ मध्ये. मेघालयाच्या पर्वतांमधून उगम पावणाऱ्या धारांच्या काठावर हे मंदिर स्थित आहे.पुढे या धाराच वशिष्ठ आणि भऱलू नद्या बनून शहरातून वाहत आहेत.वैदिक काळापासूनचा इतिहास सांगतो की इथे वसिष्ठ मुनींचा आश्रम होता , काही अंतरावर असलेल्या गुहेत ते ध्यान करीत .याच आश्रमांत त्यांच्या आयुष्याची इतिश्री झाली असे मानले जाते.
या ठिकाणी दगडी मंदिराचे पुरावे आहेत जे या ठिकाणी 1000-10000 च्या सुमारास उभे होते. पूर्वीच्या काळातील दगडी मंदिराच्या अवशेषांवर विटांचे मंदिर बांधले गेले आहे.हे शिवमंदिरही आहे , वशिष्ठ मुनींचा मोठा पुतळा आहे तसेच ब्रह्माजीचीही सुंदर मूर्ती इथे आहे. ब्रह्मदेवाची मंदिरे एकूण भारतातच कमी असल्याने हेही इथले एक वैशिष्ठ्य मानायला हवे. मंदिरे बघत असतांना समोरून दोन मुली आल्या . असतील २०/२२ वर्षांच्या. सहज माझ्याकडे बघून हसल्या.मी त्यांची साडी नेसण्याची स्टाईल बघत होते ते लक्षांत येऊन. मग मीही हसले नि ओळख करून घेतली. तिथल्या शाळेत शिक्षिका होत्या. मधल्या सुट्टीत आल्या होत्या . मग त्याच्या शाळेबद्दल , ड्रेस बद्दल गप्पा मारल्यावर , निघाले तर काय मनांत आले तिच्या, पिशवीतील हाफ सारी काढून माझ्या ड्रेसवरूनच कशी नेसायची ते दाखविले. मी खूष. किती निर्मल मनाची माणसे भेटतात नाही ?
पाण्याचा खळखळाट, प्रसन्न करणारी हिरवाई , पक्ष्यांचा किलबिलाट , सुखद वारे ….अतिशय निसर्गरम्य जागेमुळे मनाला आल्हाद तर वाटतोच पण प्रत्यक्ष वशिष्ठ मुनींचा इथे वास होता हे कळल्यावर मन थरारून जाते एक उच्च अध्यात्मिक वलय येथे असल्याचा भास होतो नि हात नकळत जोडले जातात.
पाण्याचे तुषार झेलत बसले असतांना , पुरी भाजी आणि कॉफी घेऊन आला तपन नि “खावो , कुछ खाय नही तुमने ! ‘
“अरे ,भूख ही नहीं लगी, सब देखके पेट भर गया ”
” ऐसा कैसा , बाबूजी गुस्सा करेंगे समझा तो.की ये नही चाहिये ? और कुछ मिला नही”
” अरे, नहीं , नहीं, देदो बाबा ,खाती हूं”
वाटेत त्याच्याशी बोलतांना आपले कोणीतरी ऐकते आहे तेही दुसऱ्या प्रांतातील याचा त्याला होणारा आनंद बघतांना छान वाटत होते.
तपन च्या सल्ल्याने स्टाफसाठी आसामची खास मिठाई पिथा घेतली नि काजूचे पॅकेट देताच त्याला झालेला आनंद टिपून घेतला.
एका दिवसामध्ये बरेच काही पहिले, ऐकले , अनुभवले म्हणत मी परतीच्या प्रवासास लागले.
विमानतळावर उतरतांना , “मॅडमजी, वापस आना और अकेले सुबह जैसा ना करना , आप अच्छी है ,लेकिन दुनिया खराब है !”
वळणारे माझे पाय थबकले . ओ ! हा खरंच लक्ष ठेवून होता तर ! मला भरून आले. काही लोक लांबून पण प्रोटेक्टिव्ह राहतात , तसा वाटला. त्याच्या डोक्यावर थोपटत म्हटले , yes , Boss . तर पटकन हसला . नक्की येईन पुन्हां म्हणून वळले नि हळूच डोळे टिपले.
कुठेही मंदिरात न जाता किती पुण्य कमावतो आहे साध्या निरपेक्ष स्वभावाने ! अजून एक ऋणानुबंध जुळला !!
******************************************************
.……नीला बर्वे .