“कुंकुमार्चन”-©️ उज्ज्वला लुकतुके
सातव्या महिन्यात शिवानीच्या पोटात कळा येऊ लागल्या. आज सकाळपासूनच ती अस्वस्थ होती म्हणून तिने सी. एल. टाकली होती. घरातली सगळी कामं प्रियंवदाताई आणि स्वयंपाकाला लावलेली मंजुळा दोघांनीच आवरली. असं हल्ली नेहमीच व्हायचं. शिवानीचा मुड नसायचा……
दोन मुलां नंतरच तिसरं बाळंतपण तिला नको होतं. सुशांतला तर अजिबातच मान्य नव्हतं. पण एकट्या प्रियंवदाताई – शिवानीच्या सासुबाई खूष होत्या. आणि म्हणूनच तिला त्या डोळ्यासमोरच नको असंत. सुशांतही आईशी बोलणं टाळे. जितक्यास तितकं बोले.
पण कमाल होती प्रियंवदाताईंची. मैत्रिणींना, नातेवाईकांना ज्याला त्याला फोन करून त्या गुड न्यूज देत होत्या, तेवढा तेवढा शिवानीचा संताप वाढत होता.
अॅक्चुअली शिवानीनी ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली पाहिजे होती. कारण काही झालं तरी गर्भ वाढत होता तिच्या पोटात. त्यांचं दोघांचं मूल… तिसरं म्हणून काय झालं?…. त्यांचंच होतं ना ते!
प्रियंवदाताई म्हणूनच कदाचित मुलांनी, सुनेने राग राग केला तरी त्या शिवानी ची काळजी घेतच राहिल्या. रोज केशरयुक्त दूध देणे, घरात सात्विक संगीत लावणे, उत्तम उत्तम बाळांचे फोटो आणून दर पंधरा दिवसांनी बदलणे, घरात सगळीकडे फुलांचे सुवासिक बुके… देवाची पूजा तर अगदी महापूजेच्या थाटात होई! कसली कसली पोथी, नामस्मरण….. सारखं त्यांचं चालू असे.
एकदा मंजुळा म्हणाली सुद्धा, “ताई तुमच्या सुनेला दिवस गेलेत ना! दोन सोन्यावाणी लेकर आहेत की स्वरा आणि संपन्न! पण तुम्ही लय मनावर घेतलंय वहिनींचं! जणू तुम्हालाच दिवस गेलेत!”
“चल चहाटळ मेली! घरात रांगणारे बाळ मला खूप आवडतं. मला नवीन खेळणं मिळणार ना! म्हातारपणात माझे केस ओढणारं, चष्मा ओढणारे बाळ येईल ना! सगळं सुखरूप पार पडावं म्हणून माझी धडपड आहे हो!” …प्रियंवदाताई म्हणाल्या.
हे बोलणं शिवानीने ऐकलं की तेवढ्यापुरते तिला वाटायचं आपण उगाच राग करतोय, त्या आपल्याला मदत करायला किती धडपडत आहेत!
पण हे तेवढ्यापुरतंच. परत तिला त्यांचाच राग येई.
आणि आज शिवानीच्या पोटात सातव्या महिन्यातच दुखू लागल्यानं त्या कासावीस झाल्या.
म्हणाल्या,” चल लवकर जाऊ हॉस्पिटलला. मी ‘ओला’ बुक करायला सांगते शेजारच्या मराठ्यांना!”
“काही नको, तुम्ही थांबा घरातच! स्वरा- संपन्न येईल ना… मी सुशांतला फोन करते.” शिवानीने हेच वाक्य समजावणीच्या स्वरात सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण उभा दावा धरला होताना दोघांनी प्रियंवदाताईंबरोबर!
एवढ्या कठीण प्रसंगात सुद्धा तिच्या मनात खदखद होती.
“बरं.. बरं! तू इकडची काळजी करू नको! सगळं व्यवस्थित होईल. उमाशंकर सगळं तारून नेतील. आलेल्या बाळाचं फक्त स्वागत कर.” प्रियंवदाताईनी काळजीच्या स्वरात सांगितलं.
“इथे मी जगले तरी खुप झालं!” शिवानी ताडकन म्हणाली.
प्रियंवदाताईंचा चेहरा पडला तरी त्या म्हणाल्या “बाळे तुला तर काहीच होणार नाही. तू काळजी करू नको हे माझं क्रेडिट कार्ड ठेव.”
“अहो! सुशांत येतोय ना, त्याच्याकडे आहे ना कार्ड!” शिवानी कावली होती.
तेवढ्यात सुशांत आला. त्याने घाबरून शिवानीला धरली. तरी प्रियंवदाताईनी उकळलेल्या पाण्याची बाटली, थोडा खाऊ, फळं, नवीन टॉवेल्स…सगळं भरून पिशवी जय्यत ठेवली होतीच. देवापुढे दिवा लावून त्यांनी दोघांना प्रसाद दिला. नाईलाजानी दोघांनी खाल्ला. तिला दह्याचा चमचाही भरवला. तिनं झिडकारून टाकला नाही एवढंच. जाताना कडवटपणा नको म्हणून सुशांतनेही प्रकरण वाढवलं नाही.
“मला फोन करत राहा रे! मुलांची काळजी करू नका!” हे त्यांचं बोलणं दोघांनी ऐकलं की नाही कुणास ठाऊक?
दोघं लिफ्टमध्ये गेल्यावर मात्र प्रियंवदाताई मटकन खालीच बसल्या. बापरे! सातव्या महिन्यातील बाळंतपण! 35 साव्या वर्षी शिवानीला झेपलं पाहिजे! देवा काही कर… शिवानीला वाचव!.. आणि बाळ? …बाळ तर तुलाच हवं होतं ना?
अं.. हो…. मलाच हवं होतं… पण मी इतकी कठोर होते का परमेश्वरा! मी माझ्या लाडक्या सुनेचं जीणं हराम करणार होते का?
मला पण समजत होतं, दोन मुलांवर कशी ती घेईल चान्स?…. लोक काय म्हणतील? मुख्य म्हणजे तिचं वाढलेले वय….. या वयात झेपेल का तिला डिलिव्हरी? हे सगळे प्रश्न त्यांनाही भेडसावत होते. शिवाय स्वरा आणि संपन्न दोन गोजिरवाणी नातवंड आहेतच की आपल्याला!…..
तरीसुद्धा कसं कोण जाणे आपल्या तोंडून ते वाक्य बाहेर पडलच,….
आणि झालं!… सून आणि मुलगा यांना परकाच झाला!
जसं काही मीच जबाबदार होते दिवस राहायला!…
त्याही चमकल्या. खरंच की मी नाहीच आहे जबाबदार.
त्या एक एक प्रसंग आठवू लागल्या.
एकदा त्यांना पहाटे एक स्वप्न पडलं. स्वप्नात एक गुटगुटीत मुलगा त्यांना दिसला. रांगत रांगत तो देवघरात गेला आणि तिकडचं कुंकू त्यांनं देवावर उपडं केलं. जणू गणपतीवर, देवीवर कुंकुमार्चन!
पूर्वी त्या कुंकूमार्चन करून घेत. त्यांच्या खास मैत्रिणी श्रावण महिन्यात येत. मग सप्तशती, कधी रुद्र, अथर्वशीर्षाचे पाठ जोरात चालत!
प्रमोदना पण याच भारी अप्रूप. ते स्वतः रुद्र म्हणून कुंकूमार्चन करीत. प्रदोष वगैरे सांभाळत.
आपल्या माहेरी काही असले कर्मकांड नव्हते. पण त्या प्रमोदना साथ देत. घरात मंगल वातावरण होई. मैत्रिणींना हौसेनं कधी खव्याच्या, गूळ खोबऱ्याचा पोळ्या वेगवेगळे पॅटीस…वगैरे करत.
मैत्रिणीला पण त्यांच्या घरी यायला खूप आवडायचं.
पण आज कुंकुमार्चन का आठवलं? त्या बाळानं केलं म्हणून?
प्रियंवदाताईनी हसून तो विषय मनातून दूर केला.
पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटेच स्वप्न! दारावर नवीन पाटी – घाडगे यांच्या नावाची! त्यावर कुलदैवताचा मुखवटा आणि त्याच्या खालची नावं सुद्धा वाचता येत होती. पहिलंच नाव -प्रमोद घाटगे, प्रियंवदा घाटगे मग सुशांत घाटगे… स्वप्नातच त्या विचार करत होत्या, घरावर तर सुशांतने वेगळे पाटी लावली की आता! ‘घाडगेज’ अशी. मग प्रमोदच्या नावाची कशी येईल? त्याला जाऊन पाच वर्षे होतील! काय मला ही भलतीच स्वप्नं
पडत आहेत! त्यांनी कुलदेवतेचा अंगारा लावला!
त्या कावळ्याला दहीभात देत. आजही दिला. म्हणाल्या, “तुम्हाला मुक्ती मिळू दे! मी खुशाल आहे इथेच. सुशांत – शिवानी मला खूप मानतात.”
मग असेच पाच-सहा दिवस गेले. पुन्हा पहाटे स्वप्न….. शिवानी हसतहसत घरात आली… मागून एक वर्षाचं बाळ तिची ओढणी ओढतेय… मम्मी मम्मी म्हणून!
ते स्वरासारखं दिसत नव्हतं, संपन्न सारखं पण नव्हतं.
शिवानीनी बाळाला घेतलं तर ते माझ्याकडे झेपावलं.”शा.. शा” म्हणून त्याने कपाकडे बोट केलं. मी म्हटलं, “दूध प्यायचं सोडून तुला ‘शा’ कशाला रे”? आणि काय आश्चर्य बाळाचा चेहरा हुबेहुब प्रमोदसारखाच! मी स्वप्नातच चपापले. प्रमोदनाही चहा खूप आवडायचा. दिवसातून पाच – सहा वेळा तरी चहा व्हायचा. तरी कोणी आलं की चहाची ऑर्डर यायचीच. मी चपापले… स्वप्नातच…
हे कसे शक्य आहे! शिवानीला 35 वर्षे झाली आता!
माझ्या डोक्यातही असं काही नव्हतं. कुठून ही लागोपाठ तीन स्वप्न पडली? मला काही समजतच नव्हतं.
मी ह्या विचारांना… स्वप्नांना उडवून लावलं.
पण एक दिवस शेजारचे ‘मराठे’ “तुमच्या घरात पाळणा आहे का स्वराचा? आमच्या तेजस्विनीची डेट जवळ आली म्हणून विचारायला आलो.” म्हणाले.
तर मी पटकन म्हणून गेले, “घाटग्यांकडे पण पाळणा हलेल हं पुन्हा!”
शिवानी, सुशांत तिथेच होते. ते रागवले. “काहीही काय बोलतेस? नातवंडांची तुझी हौस भागली नाही का? आता तेजूच्या बाळाचं कर.” असं म्हणाले.
पण शिवानीनी पाळणा केव्हाच देऊनही टाकला होता त्यामुळे पुढे विषय नाही निघाला. मीही गप्प बसले
आणि नंतर दोन-तीन महिन्यांनी शिवानी मळमळतेय, कसंतरी वाटतंय… करू लागली. डॉक्टरकडे गेली तर तिला तीन महिने पूर्ण होऊन चौथा लागला होता. अघटीत घडलं होतं. मासिक पाळीही चुकली नव्हती त्यामुळे तिला कल्पनाच आली नाही.
मग मात्र मी म्हटलं “आता गर्भ धरला आहे तर अॅबॉर्ट करू नका.”
सुशांत एकदम खेकसलाच, “अगं आई, शिवानीचा विचार कर! डिलिव्हरी झेपली पाहिजे ना तिला!” म्हणून दोघे पुन्हा गायनाकॉलॉजिस्ट कडे गेले. त्यांनी म्हटलं “आता नाही करता येणारे अॅबॉर्शन! नाईलाज आहे.” दोघेही तणतणत घरी आली. सगळा राग माझ्यावर निघाला.
शिवानी म्हणाली, “आई तुमची बत्तीशी खरी झाली! नाही तरी कधी कधी तुम्ही म्हणालात, ‘शकुनचा फोन आला नाही. तर हटकून यायचा. एकदा म्हणालात, स्वरासाठी पेढे आण गं! तर त्याच दिवशी ती ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून शाळेतून निवडली गेली. असं बोलताना, विचार करून बोलत जा!
पण प्रियंवदाताईनी सुनेची मनस्थिती समजून घेतली. त्या दोघांवर अजिबात रागावल्या नाहीत. आपल्याकडून होईल तेवढं करत राहिल्या.
एकदम त्या भानावर आल्या. आपण कुठे त्याना आग्रह धरला होता? या दोघांचं काहीतरी चुकलं आणि पुन्हा घाटग्यांच्या घरात, पाळणा हालण्याचे शकुन दिसू लागले. पण “देवा, आता काय प्रसंग आणलास! 7 व्या महिन्यात डिलिव्हरी व्यवस्थित होऊन दे रे बाबा! बाळ आणि माझी शिवानी सुखरूप राहू दे!” मी देवाला पाण्यात नाही ठेवणार. उलट येणाऱ्या बाळाचं स्वागत करणार.” म्हणून त्या नामस्मरण करत रात्रीच्या डब्याच्या तयारीला लागल्या.
शेजारच्या मराठ्याना सांगून खारीक, डिंक, अळीव, बदाम वगैरे जास्तीचे मागवून घेतले. दारात रांगोळी काढली. कुलदैवतावर पूर्ण भाव ठेवून त्या नामस्मरणात मग्न झाल्या. फक्त फोन जवळच ठेवला होता. तो चार्ज करायला त्या विसरल्या नाहीत. इतक्यात स्वरा- संपन्न आले. त्यांचं खाण पिणं झालं. आई – बाबा नेहमीच त्यांच्या नंतरच येत, त्यामुळे त्याना प्रियंवदाताईनी काहीच सांगितलं नाही. एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. “आई! शिवानीने बाळाला जन्म दिला. सिजर करावं लागलं नाही. तू काळजी करत देवाला पाण्यात ठेवले असशील ना? त्यांना आधी बाहेर काढ! चार महिने केवढ्या ताणात होतो आपण!… आज खूप मोकळं वाटतंय. बाळ अगदी नॉर्मल आहे. डॉक्टर म्हणाले. ‘सात महिन्यांचे बाळ वाटतच नाही’. तरी इन्क्युबेटर मध्ये ठेवणार आहेत ते. पण शिवानीच्या रूममध्ये. शिवानीशी बोल आई!”
“आई! अहो आम्ही चुकलो! उगाचच तुमचा द्वेष करत होतो. आमच्या चुकीचे खापर तुमच्यावर फोडत होतो. पण आई बाळाचा चेहरा हुबेहूब आपल्या बाबां सारखाच दिसतो. बाबांच्या छातीवर बिल्वपत्र होतं ना, तसंच बाळाच्या पण आहे. कमाल आहे ना!” शिवानी दमली होती, तरी भरभरून बोलत होती.
त्यांचा कानांवर विश्वास बसत नव्हता.
“अगं! मी तुझ्या आवडीची धिरडी, चहा आणि नानकटाई घेऊन मुलांना बरोबर घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. तेव्हा बाकी सगळं बोलू.” आता चहा आणि नानकटाई तिने प्रमोदना आवडते म्हणून घेतली होती.
त्यांनी देवाला लोणी साखरेचा नैवेद्य दाखवला आणि मुलांना ही गोड बातमी सांगून हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या.
प्रियंवदाताई इन्क्युबेटर पाशी आल्या मात्र बाळ किलकिले डोळे करुन त्याच्याकडे पाहु लागले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.
सुशांत आईला विचारत होता, “आई मी लहान असताना तुझ्या मैत्रिणी येऊन कसले ते पाठ म्हणत, आणि कुंकुमार्चन करत… आता त्या करतील का ग? मला तेव्हा खूप आवडायचं!” “आता तुला कुठे अचानक आठवण झाली?” त्यानी आपल्या नास्तिक पुत्राला विचारलं.
“शिवानी बाळासह सुखरूप आहे ना! ही सगळी त्या परमेश्वराची कृपा आणि तुझ्या आशीर्वादाने!”
आपला नास्तिक मुलगा आस्तिक झाल्याचे पाहून त्यांना खूप समाधान वाटलं. घाडगे यांच्या घरात ‘कुंकूमार्चन’ प्रथा चालू राहणार तर!
त्यांनी इन्क्युबेटर मधल्या बाळाची दृष्ट काढली.
- उज्ज्वला लुकतुके.