थंडीसाठी खास लाडू खा लाडू …

नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी… थंडीचे दिवस… उत्तम आरोग्याचे दिवस.. भरपूर व्यायाम करण्याचे आणि भरपूर खाण्याचे दिवस. खरंच या महिन्यांमध्ये खवय्यांची छान चंगळ असते. खूप भूक लागते. पोटभर जेवण जाते. कारण भरपूर खाण्यापिण्याची विविधता असते आणि खाल्लेलं पचायला आणि अंगी लागायला निसर्गाची साथ मिळते. 
थंडीच्या दिवसांतील खाता  येणाऱ्या विशेष पदार्थांपैकीच एक सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे लाडू …जो खाल्यान्ने तूप, साखर , ड्राय फ्रुट्स असे स्निग्ध , मधुर आणि पौष्ठिक पदार्थ आपल्या पोटात जातात .  म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वेगवेगळ्या प्रकारांच्या लाडवांच्या चटकदार रेसिपीज ….

डिंकाचे लाडू
साहित्य – चकचकीत स्वच्छ असा वाटाण्यासारखा बारीक डिंक अर्धा किलो,  खारीक पाव किलो, आळीव पाव किलो, खसखस पाव किलो,  सुके खोबरे १ किलो, गूळ, साजूक तूप,  बदामगर, वेलची पूड व जायफळ पूड,
कृती- डिंक तुपात फुलवून घ्यावा. खसखस भाजून घ्यावी. आळीव थोड्या तुपात भाजावा. खारीक भाजून घ्यावी. सुके खोबरे भाजावे. नंतर तळलेला डिंक खलबत्यात थोडासा कुटून घ्यावा. खमंगपणा येण्यासाठी खसखस मिक्सरवर वाटून घ्यावी. खारीकसुध्दा मिक्सरवर जराशी वाटून घ्यावी.(पीठ करू नये) व हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्यात बदामगर, वेलची व जायफळ पूड घालावी व मिश्रण हातानेच बारीक करावे.
लाडू करण्यासाठी पध्दत- लाडू करतेवेळी जेवढे मिश्रण असेल त्याची निम्मे गूळ घेऊन त्याचा गोळीबंद पाक करावा. पाक कोवळा करू नये. साधारण हातात त्याची गोळी करता आली पाहिजे. नंतर पाक खाली उतरून त्यात तयार केलेले सारण ओतावे व चांगले ढवळावे व भराभर लाडू करावेत.

मेथीचे लाडू
साहित्य – मेथीचे पीठ १ वाटी (मेथी दळून पीठ करावे किंवा बाजारात मिळते ते घ्यावे), सुके खोबरे २ वाट्या, गव्हाचे पीठ २ वाट्या, खसखस १ वाटी, खारीक १ वाटी, बदामगर १ वाटी, पिस्ता, वेलची, चारोळी, साजूक तूप व दळलेली पीठीसाखर.
कृती- पातळ केलेल्या गरम तुपात मेथीचे पीठ ३ दिवस भिजत ठेवावे व चौथ्या दिवशी लाडू करायला घ्यावेत. प्रथम थोडेसे तूप टाकून खसखस भाजून घ्यावी व ती मिक्सरमध्ये बारीक करावी. बदामगर चिरून ते तुपात तळून घ्यावेत व खसखशीबरोबरच मिक्सरमध्ये जरासे बारीक करावेत. नंतर १ वाटी तूप टाकून गव्हाचे पीठ चांगले भाजावे. त्यातच किसलेले खोबरे घालावे व जरा परतावे. नंतर ते पीठ खाली उतरावे व त्यात खसखस, बदाम, पिस्ता, खारीक व मेथीचे पीठ घालावे. पीठ भाजतानाच त्यात खारीक पूड टाकावी. मेथीचे पीठ मात्र भाजू नये. तुपात भिजलेले पीठ तसेच त्यात टाकावे. पीठ भाजल्यास कडवटपणा येतो. पीठ गरम असताना त्या सर्व सारणाच्या निम्मे दळलेली साखर घालून ठेवावी व नंतर थोड्या वेळाने लाडू वळावेत.

कणकेचे लाडू
साहित्यः  १ कप गव्हाचे पीठ, अर्धा कप तूप, पाऊण कप पिठी साखर, चिमूटभर वेलदोडे पूड, बेदाणे (ऑप्शनल)
कृती:
एका पॅनमध्ये तूप घेऊन ते गरम करत ठेवा. तूप गरम झाले की त्यात गव्हाचे पीठ घालून तूपावर परता.
५-१० मिनिटं मध्यम गॅसवर गव्हाचे पीठ अधेमधे परतून चांगले भाजून घ्या.
गॅस बंद करून त्यात साखर, वेलदोडे पूड घालून चांगले हलवून मिक्स करून घ्या.
मिश्रण लाडू वळण्याइतकं कोमटं झालं की लाडू करायला घ्या. प्रत्येक लाडू वळताना त्याला १ बेदाणा लावा.  असे सोपे आणि पौष्टीक लाडू तयार

 

अळीवाचे लाडू 
Aliv Laduसाहित्य:- २ नारळ खवून , ५० ग्रॅम अळीव , २ वाट्या चिरलेला गूळ , अर्धे जायफळ किसून, अर्धी वाटी साखर, ५-६ वेलदोड्यांची पूड
कृती-
अळीव स्वच्छ निवडून , नारळाच्या किसात मिसळून एका जाड बुडाच्या पातेल्यात ३-४ तास झाकून ठेवा
३-४ तासांनी फुलून आले की त्यात गूळ आणि साखर घालून मंद आचेवर शिजत ठेवावे….अधून मधून ढवळा
लाडू होत आले की कडेने मिश्रण सुटू लागेल…
जायफळ, वेलची पूड घालून नीट मिक्स करून खाली काढा
मिश्रण कोमट असतानाच तुपाचा हात लावून वळा

खजूर-ड्रायफ्रूट लाडू 
साहित्य – प्रत्येकी 100 ग्रॅम काजू, बदाम व पिस्त्याचे काप, 500 ग्रॅम कुस्करलेला खजूर. 
कृती – कुस्करलेला खजूर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा. नंतर त्यामध्ये काजू, बदाम, पिस्त्याचे काप टाकावेत. सर्व मिश्रण एकत्र करावे. त्याचे लहान लहान लाडू वळावेत.

खोबऱ्याच्या किसाचे लाडू 
साहित्य – 250 ग्रॅम ओल्या नारळाचा कीस, 100 ग्रॅम खवा, 50 ग्रॅम पिठीसाखर, तीन टेबलस्पून तूप. 
कृती – तूप गरम करावे. मंद आचेवर कीस साखर, कीस घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करावे आणि लाडू वळावेत.

चुरम्याचे लाडू 
साहित्य – चार वाट्या जाडसर कणीक, 3 वाट्या पिठीसाखर, कणीक भिजविण्यास दूध, 3 वाटी तूप, 2 टी स्पून वेलची पूड, आवडीनुसार बेदाणे, चारोळी. 
कृती – चवीपुरते मीठ टाकून व 2 टेबलस्पून तूप टाकून कणीक दुधात घट्ट भिजवावी. एक तासानंतर पिठाचे लहान मुटके करून ते खमंग तळून घ्यावेत. नंतर लगेचच मिक्सरमधून ते काढावेत. अशा तऱ्हेने सर्व मुटकुळे मिक्सरमधून काढावेत. (थोडे जाडसर) नंतर त्यात पिठीसाखर बेदाणे, चारोळी, वेलदोड्याची पूड घालून मिश्रण सारखे करून घ्यावे. नंतर तूप गरम करून त्यात घालावे आणि लाडू वळावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu