`मिलन` उड्डाणपूल तयार!
पावसाची जोरदार सर आल्यानंतर मिलन सबवे येथे पाणी तुंबणार आणि वाहतूक विस्कळीत होणार हे आजवरचे चित्र आता इतिहासजमा होत आहे. मिलन सबवे येथे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेला उड्डाणपूल शुक्रवारी अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होऊन वाहतुकीसाठी खुला झाला. त्यामुळे मोठा पाऊस पडला तरी पश्चिम उपनगरातील वाहनधारकांना उड्डाणपुलावरून सुरळीतपणे प्रवास करता येईल.
या पुलाच्या पुनर्वसनात महापालिकेने मोलाची मदत केली आहे. त्याचा उल्लेख करून राज्य सरकार आणि महानगरपालिकेने सहकार्याने काम करून असे प्रकल्प मार्गी लावले पाहिजेत. दोघांनी काळजी घेतली तर रस्ते आणि पुलांवर खड्डेही पडणार नाहीत, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी नमूद केले. या उड्डाणपुलाचा ६१ मीटरचा भाग गर्डर टाकून रेल्वेमार्गावर बांधण्यात आला आहे. यासाठी प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी घेतलेल्या मेहनतीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच कार्यक्रमानंतर उड्डाणपुलावरून फेरीही मारली. तर इर्ला पम्पिंग स्टेशन आणि हाजीअली पम्पिंग स्टेशनचे काम महापालिकेने मार्गी लावले आहे, असे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले. या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाप्रसंगी नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, खासदार प्रिया दत्त, आमदार कृष्णा हेगडे आदी उपस्थित होते.
हा उड्डाणपूल ७०० मीटर लांबीचा असून चारपदरी आहे. स्वामी विवेकानंद मार्ग आणि पश्चिम द्रुतगती मार्गादरम्यानची वाहतूक त्यामुळे सुरळीत होणार आहे. या उड्डाणपुलावरून रोज ३५ हजार वाहने जातील, असा अंदाज आहे. २००९ मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. पुनर्वसन, रेल्वेच्या परवानग्या असे सर्वप्रकारचे अडथळे आल्याने या पुलाचे काम लांबले आणि त्याचा खर्च ४१ कोटी रुपयांवरून ८४ कोटी रुपयांवर पोहोचला. मिलन सबवे येथील हा उड्डाणपूल यंदा कोणत्याही परिस्थितीत पावसाळय़ाआधी पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला होईल, असे ‘एमएमआरडीए’ने वर्षांरंभी जाहीर केले होते. त्यानुसार हा पूल खुला करण्यात प्राधिकरण यशस्वी ठरले.

