नवे सूर ,नवे तराणे
बुधवार दि. ८ मार्च, २०२३ रोजी होलिकोत्सवानिमित्त या खास सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सावरकर केंद्र, विलेपार्ले या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सुगम व नाट्यसंगीत स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या कलाकारांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
यात आठवीतील अमृता घुमे हिने तुज मागतो मी आता, ज्योती कलश छलके, मी पुन्हा वनांतरी, गर्द सभोती इ. गीते सुरेख सादर केली.
तर नववीतल्या सिद्धांत पाटकर याने भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, कानडा राजा पंढरीचा, ब्रह्म मूर्तीमंत, कैवल्यगान हे अशी रागदारीवर आधारित गीते पेश केली.
काॅलेजमधे जाणाऱ्या सायली गद्रे हिने भावभोळ्या भक्तीची, मोगरा फुलला, बैया ना धरो सारखी गाणी मोठ्या तयारीने गायली. तसेच आज खेलो श्यामसंग होरी ही पारंपारिक रचना उत्तम रीत्या सादर केली.
शेवटी सर्व कलाकारांनी अवघा रंग एक झाला ही भैरवी एकत्र सादर केली.
अवधूत काकतकर याने तबल्यावर गाण्यांचा तोल सांभाळला. तर श्रीनिवास शेणाॅय याने उत्तम संवादिनी साथ करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
निवेदनाची बाजू कार्याध्यक्ष श्री. मुकुंद सराफ व कार्यवाह श्रीमती प्रतिभा सराफ यांनी सांभाळली.
यानंतर लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे श्री. सचिन गवाणकर यांनी खास महिला दिनानिमित्त चालु केलेल्या एका वेगळ्या योजनेसंबंधी माहिती दिली. तसेच त्यांच्या संस्थेतर्फे सभासदांना होळीनिमित्त पुरणपोळ्या देण्यात आल्या.
राष्ट्रगीताने या रंगतदार कार्यक्रमाची सांगता झाली.