ऑर्किडच्या देशातून, जास्वंदींच्या देशात © डॉ. मिलिंद न. जोशी
मे २००९मधे दुसऱ्यांदा सिंगापूरला जाताना, सिंगापूर बरोबरच मलेशियाचाही व्हिसा घेतला होता. सिंगापूर पर्यटनाला जोडून मलेशियाला, मुख्यत्वे क्वालालंपूरला रस्त्याच्या मार्गाने जाण्याचं मनात होतं. व्हिसा जरी घेतला असला तरी माहिती मात्र अजिबात नव्हती. क्वालालंपूरमधील प्रेक्षणीय ठिकाणांचा ‘लसावि’ वेगवेगळ्या पर्यटन कंपन्यांच्या माहितीपत्रकांतून काढून त्याची यादी तयार केली होती. ‘सिंगापूरला पोहोचल्यावर मलेशिया पर्यटनाची माहिती मिळेल’ ह्या तिथे जाऊन आलेल्या (व कदाचित न जाऊन आलेल्याही) ‘माहितगारांकडून’ मिळालेल्या मौखिक माहितीच्या आधारावर भिस्त ठेवून, डोक्याला जास्ती त्रास करून न घेता सिंगापूरच्या विमानात चढलो. माहितगारांकडूनही खरंतर कोणतीही अधिकची माहिती मिळाली नव्हती. सिंगापूरला तेरा- चौदा वर्षांपूर्वी, एकदा जाऊन आलेलो असल्यामुळे, सिंगापूरबद्दल माहिती असल्याचा मात्र उगाच वेगळा आत्मविश्वास होता.
सिंगापूरच्या अगदी सक्काळी सक्काळी तिथे पोहोचलो. कस्टम, व्हिसा वगैरे औपचारिकता पार पडल्यावर, चांगी विमानतळावर थोडं रेंगाळलो. त्याला दोन कारणं होती. पहिलं कारण म्हणजे, आमचं हॉटेल बुकिंग केलेलं नव्हतं. हॉटेल शोधण्यापासून सुरुवात होती. राहण्याच्या हॉटेलांचा ‘चेक इन टाईम’ साधारणपणे दुपारी बारा पासून धरतात, त्याआधी पोहोचल्यास अधिकच्या दिवसाचं भाडं आकारलं जातं. दुसरं कारण म्हणजे सिंगापूर विमानतळ हे देखील सिंगापूरमधलं एक प्रेक्षणीय स्थळ असल्याचं मी मानतो. आलोच आहोत तर मुद्दामच पाय रेंगाळत, विमानतळावर फिरलो. बाहेर पडलो आणि सरंगून रोडसाठी टॅक्सी ठरवली. टॅक्सी चालक बोलका होता. त्याला सहजच आमच्या मलेशियाच्या संभाव्य पर्यटन शक्यतेबद्दल माहिती दिली. काही वेळा, आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक छान योग येतात. आम्ही ज्या विभागातून जात होतो त्याच ‘गोल्डन माईल कंपाउंड’ विभागात मलेशियाच्या पर्यटनासंबंधीची अनेक पर्यटन कंपन्यांची लहान लहान कार्यालयं त्याने आम्हाला दाखवली व हा विभाग सरंगून रोडवरच्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून जवळ असल्याचं सांगितलं. अशाप्रकारे आमच्या मलेशियाच्या कोऱ्या पाटीवर शुभाक्षरं उमटली आणि सिंगापूर मुक्कामाच्या तिसऱ्या दिवशी मलेशिया पॅकेजच्या चौकशीसाठी तिथे येण्याचं निश्चित केलं.
सरंगून रोडवर आलो आणि ‘महंमद मुस्तफा’समोर टॅक्सी सोडली. त्या विभागात भारतीय, मुख्यत्वे दक्षिण भारतीय उपहारगृह बरीच असल्यामुळे, उदरभरणाच्या सोयीच्या दृष्टीने, तिथेच एखाद्या हॉटेलात राहायचा विचार होता. आधीच्या वेळच्या अनुभवातून हॉटेल सहज मिळेल ह्या फाजील आत्मविश्वासाचा फुगा लगेचच फुटला. सरंगून रोडवरची सर्व हॉटेलं आरक्षित होती. मे महिना असल्याने जवळपास पंच्याहत्तर टक्के भारतीय प्रवासी व प्रवास कंपन्यांनी ती आगाऊ आरक्षित केली होती.(ही माहिती हॉटेलमध्ये संवादातून समजली.) सरंगून रोडला लागूनच्या बाबू लेन, किंटा लेन अशा त्याला काटकोनात असलेल्या लेनवर आता भिस्त होती. एका दक्षिण भारतीय उपहारगृहात इडली, डोशांचा ब्रेकफास्ट केला आणि हॉटेल शोधमोहिमेवर निघालो. कुटुंबीय महंमद मुस्तफासमोर थांबले. दीड तासाने हॉटेल शोधनाला यश आलं आणि एका बऱ्यापैकी हॉटेलमध्ये राहायची सोय झाली. ह्या सर्व गडबडीत बारा वाजून गेले आणि एक दिवसाचं अधिकचं भाडं द्यावं लागणार नसल्याचा आनंद उपभोगता आला. एव्हाना सरंगून रोड व त्याच्या काटकोनातल्या सर्व गल्ल्या ‘नजर’पाठ झाल्या होत्या, ब्रेकफास्ट जिरला होता आणि पाय शरीराला जडलेल्या व्याधीसारखे दुखू लागले होते. मी विरुद्ध कुटुंबीय यांच्यात ‘उभे राहून पाय अधिक दुखतात की चालून’ ह्यावर एक परिसंवाद(ज्याला लौकिकार्थाने ‘भांडण’ म्हणतात, ते) झडला आणि ‘चालूनपेक्षा, ‘एका जागी उभं राहून’ पाय अधिक दुखतात ह्यावर, मी अल्पमतात असल्यामुळे साहजिकच शिक्कामोर्तब झालं.
सर्वच चिक्कार दमलो होतो. त्यामुळे परत बाहेर पडून जेवण्याचा पर्याय एकमताने मागे पडला व जवळ ठेवलेल्या तहानलाडू,भूकलाडूंवरच वेळ भागवली. थोडी झोप झाली आणि मनातील पर्यटक जागा झाला. संध्याकाळनंतरच्या ‘सिंगापूर नाईट सफारी’ची माहिती, हॉटेलमधल्या माहितीपत्रकात मिळाली आणि त्याठिकाणासाठी प्रस्थान ठेवलं. नाईट सफारीहून हॉटेलवर परतताना ‘कमला विलास’ वा ‘कोमला विलास’ उपहारगृहात केळीच्या आडव्या मांडलेल्या पानांवर वाढलेल्या दक्षिण भारतीय जेवणावर आम्हीदेखील आडवा हात मारला.
दुसऱ्या दिवशी जुरोंग बर्ड पार्कला जाऊन आलो. आता जेवणाची काळजी नव्हती. ब्रेकफास्ट, डिनर वाढण्यासाठी ‘कोमला’ व ‘कमला’ तयारच होत्या. तिसऱ्या दिवशी ‘सॅन्तोसा बेटाच्या सफरीवर जाण्याआधी मलेशिया बुकिंगच्या चौकशीसाठी ‘गोल्डन माईल कंपाउंड’ला गेलो आणि सिंगापुरी की मलेशियी पर्यटन व्यवसायातील स्पर्धेची झलक अनुभवली. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एकापेक्षा एक सरस कौशल्यं वापरली जात होती. एका व्यावसायिकाने दिलेलं सहाशे सिंगापुरी डॉलरचं ‘पॅकेज’, दुसऱ्याकडे चारशे सिंगापूर डॉलरना मिळवून आम्ही आमच्या ‘बार्गेनिंग’ कौशल्याची झलक तिथल्या व्यावसायिकांना दाखवली. चौघांसाठीच्या पॅकेजमध्ये सिंगापूर-क्वालालंपूर लक्झरी बसने जाण्या-येण्याचा प्रवास, क्वालालंपूर येथे तीन रात्रींचा त्रितारांकित हॉटेलमध्ये, ब्रेकफास्ट सहचा मुक्काम अंतर्भूत होता. त्यासाठी दीड- दोन तास खर्ची पडले आणि ‘सॅन्तोसा’साठी सार्वजनिक वाहतूकीऐवजी टॅक्सीने कूच केलं आणि पॅकेज बार्गेनिंग मधून वाचवलेल्या डॉलरपैकी काही डॉलरची सिंगापूरला परतफेड केली.
तिसरा दिवस ‘शॉपिंग’साठी आधीच राखीव होता. ‘खरेदीदारांचा स्वर्ग’ अशी ओळख असलेल्या सिंगापूरला नाराज न करण्याचं धोरण कुटुंबीयांनी स्वीकारलं असल्याने त्यांना सतत, अजून मलेशिया बाकी असल्याची जाणीव देत होतो. अर्थात ‘शॉप टिल यू ड्रॉप’ ह्या सिंगापूरच्या ब्रीदवाक्याशी प्रतारणा केल्यास सिंगापूरच्या बाहेर काढतात; असा काहीतरी समज त्यांनी करून घेतला असावा, असं वाटण्यासारखी खरेदी चालली होती. शेवटी माझा खिसा हलका, हात जड झाल्याची आणि सामान उचलून माझी चाल मंद झाल्याची त्यांची खात्री झाल्यावर खरेदी थांबली. मलेशियासाठीचं चलन मी एका ‘चोर’कप्प्यात आधीच लपवून ठेवलं होतं, ह्याची त्यांना कल्पना नव्हती आणि मीदेखील ”चोरावर मोर’ असल्याचा त्यांच्या नकळत आनंद घेतला. ….(क्रमशः)
डॉ. मिलिंद न. जोशी
Email : milindn_joshi@yahoo.com
pc:google