पु. ल. देशपांडेनी म्हटल्याप्रमाणे हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं गोलाकारी मुंबईच्या पोटातून आलेल हे चिमुरडं उपनगर पार्ले ! खरतर विलेपार्ले हे एका छोट्याशा खेडे गावापासून इतक्या मोठ्या रूपात नावारुपाला आले आहे. पण अजूनही खरा पार्लेकर ते जुने पार्ल्याचे रूप आठवून अधिक सुखावतो. पार्ल्यातले ते छोटे छोटे बंगले , वाड्या , आजूबाजूला छान झाडे , छोट्या गल्ल्या , अगदी मस्त मनाला आनंद देणारे असे पार्ले गाव,आज भले मोठ्या मोठ्या इमारती आल्या , मोठी दुकाने , मॉल आले तरी इथल्या छोट्या गल्ल्यांमधून फिरताना आणि आजूबाजूच्या झाडांचा सुखद गारवा घेताना मन प्रसन्न होते.
याच पार्ल्याचे बदलते रूप , याचा शास्त्रशुद्ध इतिहास उलगडणारे सहित प्रकाशित आणि संदीप दहिसरकर लिखित ‘पारले : ज्ञात- अज्ञात’ पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले.
पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघ येथे शिलाहारा हेरिटेज सर्विसेस आयोजित या प्रकाशन समारंभामध्ये वासुदेव कामथ यांच्यासह चित्रकार सुहास बहुळकर व रघुजीराजे आंग्रे, लेखक संदीप दहिसरकर आणि प्रकाशक प्रतिनिधी सागर शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.
उद्योगधंदे वाढीस लागल्यापासून मुंबई झपाट्याने प्रगती करते आहे. शहरीकरणाच्या गजबजाट पारले मात्र आपली संस्कृती अजून जपून आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक शहराने आपली संस्कृती जपून नव्याची कास धरली पाहिजे. असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामथ यांनी केले.
पुनर्विकासाच्या नव्या लाटेमुळे हळूहळू हरवत व बदलत चाललेल्या जुन्या पारल्याच्या पाऊलखुणा ‘पारले: ज्ञात-अज्ञात’ या पुस्तकाच्या माध्यमातून, येथील नवी-जुनी छायाचित्रे, रेखाचित्रे, अभिलेखागारातील जुने दस्तावेज इत्यादीचा खजिना वाचकांना पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे. इतिहास जपण्याचे काम हे प्रत्येकाने आपल्या घरापासूनच केले पाहिजे, असेही यावेळी कामथ यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले.
यावेळी सुहास बहुळकर यांनी शहरांचे अशाप्रकारे करण्यात आलेल्या दस्तऐवजीकरणाचे महत्व विशद करत कलेच्या अनुषंगाने आणि इतिहास अभ्यासाच्या अनुषंगाने ‘पारले : ज्ञात- अज्ञात’ या ग्रंथावर विशेष प्रकाश टाकला. तर संदीप दहिसरकर यांनी या ग्रंथाच्या निमित्ताने केलेल्या एकूण अभ्यासाचा आणि पार्ल्याच्या एकूण कायपालटाचा आढावा घेतला. सागर शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
चौकट :
काय आहे या पुस्तकात?
सदर पुस्तक हा लेखसंग्रह असून साष्टी बेटावरील पारले गावाच्या प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळातील इतिहासाबरोबर त्याचे उपनगरात झालेल्या रूपांतराच्या प्रवासाविषयी अधिक चर्चा करणारे आहे. मुंबई उपनगरीय इतिहासात पारल्याची कामगिरी स्वातंत्र्य चळवळीतली असो, शैक्षणिक असो, सामाजिक किंवा सांस्कृतिक असो, ती कायमच महत्त्वपूर्ण राहिली आहे. अशा या टिळकप्रेमी उपनगरातील जुनी पिढी विसाव्या शतकात एका विशिष्ट शैक्षणिक व सामाजिक संस्कारांत वाढली आणि त्यांच्या अखंड प्रयत्नांतून मराठी संस्कृतीचा येथे उदय झाला. आज पुनर्विकासाच्या नव्या लाटेमुळे हळूहळू हरवत व बदलत चाललेल्या जुन्या पारल्याच्या पाऊलखुणा या पुस्तकाच्या माध्यमातून, येथील नवी- जुनी छायाचित्रे, रेखाचित्रे, अभिलेखागारातील जुने दस्तावेज इ.च्या सहाय्याने ‘पारले : ज्ञात- अज्ञात’च्या माध्यमातून वाचकांसमोर पहिल्यांदाच येत आहे.


डावीकडून: सहित प्रकाशनचे सागर शिंदे , चित्रकार वासुदेव कामथ, चित्रकार सुहास बहुळकर, रघुजीराजे आंग्रे व संदीप दहिसरकर.