“ रफूला ठिगळ फॅशनचे”- अनुजा बर्वे

कुठलासा संगीताचा रिॲलिटी शो बघत होते. एकदम झकपक पोशाख केलेली सूत्रसंचालिका ( सोप्पं सांगायचं तर वेल ड्रेस्ड अँकर ) तावातावाने काही तरी सांगत होती. बोलतांना जवळ जवळ खांद्यापर्यंत आलेले तिचे झुमकेही तेवढ्याच गतीने डुलत  झगमग प्रकाश टाकत होते, उजाड गळ्यावर आणि   अर्ध-उघड्या खांद्यांवरही !

सध्या “अलंकारविरहित गळा अन् लंबेलांब कानातले” ही  ‘प्रचलित फॅशन’ आहे बहुधा. (थोडक्यात ‘उघडे असणं’ अपेक्षित असलेले कान झाकायचे आणि ‘उघडे नसणं’ अपेक्षित असलेला गळा मात्र……)

परंतु खांद्याजवळच्या आसपासच्या भागात एवढ्या उत्तम ड्रेसला ‘भगदाड’ का बरं करत असावेत?

 ड्रेसला तेवढाच जरा “खांदेपालट” म्हणून? की कसं ?

या विचारात असतानाच दारावरची बेल वाजली. दहावीच्या परिक्षेत, १००टक्क्याला दोनेक टक्के उणे इतक्के मार्कस् मिळवलेल्या सोसायटीतल्या दोन कन्यका पेढे द्यायला आल्या होत्या. त्यांचे पुढचे प्लॅन्स, काॅलेजला जाण्यापूर्वीच्या शाॅपिंग कथा ऐकण्यात १०/१५ मिनिटं मजेत गेली. त्यांच्या गोड चिवचिवाटाने घर एकदम भरून गेलं. पण…

त्या दोघींच्याही ड्रेसच्या खांद्यावरच्या ‘रिकाम्या’ जागेकडे माझं फिरून फिरून लक्ष जात होतं. शेवटी न राहवून बोलण्याच्या ओघात विचारणा केली, तेव्हा जाणीवपूर्वक ‘भगदाड’ पाडून केलेल्या या हल्लीच्या फॅशनचं नाव  “कोल्ड-शोल्डर” आहे असं कळलं.
ह्या अशा फॅशनमागचा काय विचार असावा या विचारात असतांनाच नकळत मी अनेक वर्षांपूर्वींच्या माझ्या अन् माझ्या आईच्या संवादात शिरले.

“अग्गं बाई, भर पटपट दप्तर !आणि शिवणाचा डबा भरलास का? कात्री, रीळ, सुई सगळं लावून ठेवलंय मी त्यात. आज तास आहे नं शिवणाचा ?”
“हो !”

“आणि शिवण वही भरल्येस ? नाहीतर मग आधी रफ वहीत नि मग परत फेअर वही, असा दुहेरी  उपद्व्याप होतो.”

“होग्गं आई,आठवणीने घेतलंय सग्गळं” माझं थोडं तिरसटलेलं उत्तर.

 मला आठवतंय इयत्ता सातवीपर्यंत ‘शिवणा’चा तास असे तेव्हा अभ्यासक्रमात. हा तास म्हणजे आमच्यासाठी सगळाच ‘बदल’ असायचा.

नेहमीचा वर्ग सोडून शाळेतल्या सगळ्यात वरच्या मजल्यावरच्या रूममध्ये ‘शिवण-तास’ भरत असे. बाक वगैरे काही नाही. टाईल्सच्या पांढरया छोट्या छोट्या तुकड्यांनी बनलेल्या जमिनीवर मस्त (अगदी फतकल घालून वगैरे) बसायचं. ते सगळं राज्य सुखटणकरबाईंचं असायचं.

हेम कशी घालावी, गव्हाचा टाका-साखळीचा टाका कोणत्या पध्दतीने घालावा,टीपेचा टाका कसा घालायचा (गलका करणारया शिष्यगणाला हे सांगतांना बाईंचा सूरही ‘टीपे’चा लागायचा) इथपासून सगळं सुखटणकर बाईंनी शिकवलं.

शिवणकाम शिकण्यासाठी ‘पांढरा रुमाल’  हे त्यावेळचं अत्यावश्यक साहित्य होतं. (ज्यांना प्रयत्न करूनही हे काम जमत नसे, ते नंतर शरणागती पत्करून ह्याच रूमालाचा वापर करून ‘पांढरं निशाण’ फडकवायचे.)

रफू आणि ठिगळ हे दोन प्रकार ‘महत्त्वाचे’  ह्या सदरातले, म्हंजे कॅटेगरीतले. (तसंही जरासं आखटलेला म्हंजे जरासा फटलेला ‘सदरा’ रफू करून  घालण्याची पध्दत रूढ होती तेव्हा.)
शिवणवहीत ओळी असलेल्या भागात सुवाच्च अक्षरात सगळी माहिती लिहायची आणि समोरच्याच पानावर कलाकृती जोडायची, अशी पध्दत असे.

पांढरया रूमालावर मध्यभागी चीर देऊन, रीळाचे पांढरे धागे उभे नि अडवे गुंफून बेमालूमपणे ती फाटकी जागा सांधण्याची कृती म्हणजे ‘रफू’ करणे, आणि..पांढरया रूमालाला मध्यभागी गोलाकार भोक पाडून ते परत पांढरया कापडाच्या तुकड्याने बेमालूमपणे बुजवण्याची कृती म्हणजे ‘ठिगळ’ लावणे, हे सगळं सुखटणकर बाई शिकवत असत अन् उत्तम रितीने करूनही दाखवत असत.

रफू करणं हे खरोखरच एक प्रकारचं कसब मानलं जायचं. जरासं डॅमेज झालेला पोशाख ‘रफूगारा’कडे देऊन वाचवण्याची (बेताची ऐपत असल्याने पैसेही वाचवण्याची) सर्रास पध्दत होती तेव्हा.
माझ्या मनात आलं, खरं तर ‘ठिगळ -रफू’ आता जवळ जवळ लोप पावलंय. सध्या ‘थ्रो अवे’ चा  जमाना आहे.

पण म्हणजे मग सरसकटरित्या ऐपत आणि रहाणीमान उंचावलंय म्हणावं तर ‘गुडघ्याच्या वर फाटलेल्या, ‘साइडवेज ठिगळ’ लावलेल्या आणि बाॅटमच्या दशा निघालेल्या ‘जीन्स ‘खूपच बोकाळलेल्या कशा?
‘जीन्स’च्या ‘दशा’ अन्  ती घालणारयाची ‘दशा’ यांचं “अर्था” अर्थी  व्यस्त प्रमाण अस्तं का ?
की –
जितकी ऐपत जास्त तितकी पॅंटची ‘ठिगळं’ अन् ‘झीजही’ जास्त आणि भारी ड्रेसच्या खांद्यावरचं ‘भगदाड’ही जास्त मोठ्ठं , असं असतं ?

थंडी  वाजली की ओढणी -पदर किंवा शाल लपेटून पहिल्यांदा खांदे झाकून घेतले जातात.मग जाणून-बुजून खांद्याचा भाग उघडा टाकणारया फॅशनला  ‘कोल्ड-शोल्डर’ हे नाव कसं?

ह्या सगळ्या विचारांच्या नादात माझ्या मनात विचार आला,
‘फॅशन’मागे खरोखरच काही ‘विचार’ असतो का ?
कि-
विचारशून्य भगदाडाला “फॅशन” नावाचं ठिगळ लावलेलं असतं ??

समस्त विचारांच्या भेंडोळ्यातून माझा रिॲलिटी शो बघायचा राहूनच गेला. आता ‘विचार बंद’ म्हणून TV बंद करायला रिमोट शोधतांना माझ्या मनात,

‘हे रिॲलिटी शो तरी कितपत रियल असतात ?’ हा विचार डोकावलाच.

अनुजा बर्वे.

पूर्वप्रसिद्धी : www.thinkmarathi.com 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu