राजेश खन्ना ©मुकुंद कुलकर्णी

उपर आका नीचे काका !
” बाबू मोशाय , हम सब तो रंगमंचकी कठपुतलियां है , जिसकी डोर उपरवालेके हाथ मे है , कौन कब कहाँ उठेगा , कोई नही जानता . “
दहा वर्ष झाली काकाला आपल्यातून जाऊन . आमच्या पिढीला निखळ ‘ आनंद ‘ देणाऱ्या आनंदला भावपूर्ण श्रद्धांजली !
हिंदी चित्रपटसृष्टीला सुपरस्टार ही संकल्पना सर्वप्रथम राजेश खन्नाने दिली . साठच्या दशकाच्या उत्तरार्धात जेंव्हा दिलिप , राज , देव यांचा करिष्मा संपत आला होता , बॉलिवूडच्या या दिग्गज कलाकारांची कारकीर्द उतरणीला लागली होती , तेंव्हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या क्षितिजावर राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या ताऱ्यांचा उदय झाला होता . ती पोकळी या महान कलाकारांनी भरून काढली . गावसकर , विश्वनाथ यांची जागा जशी द्रविड , गांगुली यांनी भरून काढली तेच काम राजेश खन्ना , अमिताभ या जोडीने चित्रपटसृष्टीत केले . देवसाब यांची स्टाईल , राज कपूर यांचा साधा भोळा नायक , दिलिपकुमार यांची अदाकारी याचा सुरेख संगम राजेश खन्नामध्ये एकवटला होता .
देवआनंदसारखा सॉफिस्टिकेटेड असला तरी , काका सुटाबुटात फारसा रमला नाही . गुरु कुर्ता आणि बेल बॉटम पँट त्याचा ट्रेडमार्क झाला . प्रसंगी तो अमर प्रेम मध्ये टिपिकल बंगाली बाबूच्या वेशभूषेत दिसला , बावर्ची मध्ये खानसामा , घरगड्याच्या वेशभूषेत दिसला , सच्चा झूटा मध्ये संगीतात रमणारा गावाकडचा भोळाभाबडा तरुण तर प्रतिष्ठेचा बुरखा पांघरलेला शहरातील हिरेचोर या दुहेरी भूमिकेत दिसला . दो रास्तेमध्ये सालस कॉलेजकुमाराच्या भूमिकेत दिसला . आराधनामध्ये एअरफोर्स पायलटच्या दुहेरी भूमिकेत दिसला .कटी पतंगमध्ये आदर्श शेजाऱ्याच्या भूमिकेत दिसला . नमकहराममध्ये मालकाचा जिवलग दोस्त असलेल्या युनियन लिडरच्या भूमिकेत दिसला . आनंदमध्ये दुर्धर व्याधीने ग्रासलेल्या पण सदैव आनंद वाटत फिरणाऱ्या जिंदादिल युवकाच्या भूमिकेत दिसला . विविध प्रकारच्या भूमिकांना त्याने योग्य न्याय दिला .
गांगुली , द्रविड प्रमाणेच काका आणि बच्चन यांची शैली वेगवेगळी होती . उंचापुरा अमिताभ अँग्री यंग मॕनच्या भूमिकेत शोभून दिसला . देखणा राजेश खन्ना मर्यादशील , सभ्य प्रेमिकाच्या रोमँटिक भूमिकेत प्रेक्षकांना भावला . प्रसन्न चेहऱ्याच्या काकाचे स्मितहास्य तरुणींना घायाळ करत असे . त्याची एक झलक दृष्टीस पडावी म्हणून त्या वेडावून जात . मुमताज आणि शर्मिला टागोर या दोन नायिकांसोबत त्याची जोडी चांगलीच जमली रसिकांना आवडली . अनेक हिट पिक्चर्स दिले या जोडीने . राजेश खन्ना , किशोरकुमार आणि आर डी बर्मन या त्रिकुटाने तर हिंदी चित्रपटातील संगीतावर आपले अधिराज्य गाजवले . हिंदी चित्रपट संगीताचे ते प्रचंड लोकप्रिय काँबिनेशन सिद्ध झाले . मुमताज आणि शर्मिला टागोर यांच्याबरोबर चित्रित झालेली काकाची द्वंद्वगीतं रसिक कधीही विसरू शकणार नाहीत .
राजेश खन्नाचं बालपण गिरगावातल्या ठाकूरद्वारात गेलं . सुप्रसिद्ध सिनेस्टार जितेंद्र हा राजेश खन्नाचा सेबॅस्टियन गोवन हायस्कूलचा शाळासोबती . शाळेत असल्यापासूनच काकाला अभिनयाचे वेड . रंगमंचा विषयीचे त्याचे आकर्षण शालेय जीवनापासूनचेच . आंतरकॉलेज नाट्यस्पर्धांमध्ये त्याने अनेक बक्षिसे पटकावली होती .
इ.स.1962 साली अंधायुग या नाटकातील त्याची जखमी मूक सैनिकाची भूमिका खूप गाजली होती . ती पाहून काही मान्यवरांनी त्याला चित्रपट क्षेत्रात नशीब आजमवण्याचा सल्ला दिला होता . इ.स.1960 च्या पूर्वार्धात स्वतःच्या एमजी स्पोर्ट कारमधून नाटक सिनेमांमध्ये काम मिळवण्यासाठी धडपड करणारा नवागत होतकरू अभिनेता होता राजेश खन्ना .
कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाची पहिली दोन वर्षे काका नौरोसजी वाडिया कॉलेज पुणे येथे होता . नंतर त्याने केसी कॉलेज मुंबई येथून आपले शिक्षण पूर्ण केले . जितेंद्रला त्याच्या चित्रपटासाठीच्या पहिल्या ऑडिशनसाठी राजेश खन्नाने मार्गदर्शन केले होते . त्याने चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्याचे ठरवल्यावर त्याचे काका , के के तलवार यांनी त्याला राजेश हे नाव धारण करण्याचा सल्ला दिला . त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याला काका म्हणत . काका म्हणजे पंजाबीत गोंडस चेहऱ्याचा मुलगा .
युनायटेड प्रोड्यूसर्स आणि फिल्म फेअर ने इ.स.1965 साली आयोजित केलेली ऑल इंडिया टॅलंट स्पर्धा काका जिंकला . या पुरस्काराने हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले . बी.आर.चोप्रा , बिमल रॉय , जी.पी.सिप्पी , एच.एस.रावेल , नासीर हुसेन , जे.ओमप्रकाश , मोहन सैगल , शक्ती सामंता , सुबोध मुखर्जी असे दिग्गज त्या स्पर्धेचे परिक्षक होते .
बॉलीवूडच्या या पहिल्या सुपरस्टारने इ.स.1965 च्या चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत मधून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला . आखरी खत आणि त्यानंतर आलेला राज हे दोन्ही चित्रपट त्याच्या टॅलंट स्पर्धेतील यशाचे फळ होते . जी.पी.सिप्पी आणि नासीर हुसेन यांनी या स्पर्धेनंतर लगेचच त्याला करारबद्ध केले होते . रविंद्र दवे यांचा ‘ राज ‘ हा त्याचा नायक म्हणून पहिला मोठा ब्रेक . तेव्हाची सुप्रसिद्ध नायिका बबिता या चित्रपटाची नायिका होती . तिच्या समोर अभिनय करताना काका तणावाखाली असायचा . तेव्हा रविंद्र दवे यांनी त्याला आत्मविश्वास मिळवून देण्यात मोलाची मदत केली . बहारोंके सपने , औरत , डोली , आराधना आणि इत्तेफाक हे त्याचे नंतर आलेले उल्लेखनीय चित्रपट . लोकांचा प्रतिसाद बघून बहारोंके सपने या चित्रपटाचा शेवट बदालून दुःखांताचा सुखांत करावा लागला होता . आराघनापासून त्याची रोमँटिक हिरोची प्रतिमा प्रस्थापित झाली . या चित्रपटात शर्मिला टागोर आणि फरिदा जलाल या दोन नायिकांबरोबरचा त्याचा डबल रोल प्रेक्षकांना खूप आवडला होता . आराधनाने त्याला अभूतपूर्व प्रसिद्धी मिळवून दिली . त्याला सबंध भारतात मिळालेल्या या लोकप्रियतेमुळे सिनेपत्रकारांनी त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला सुपरस्टार हा खिताब बहाल केला . या चित्रपटापासून किशोरकुमार काकाचा पडद्यावरील आवाज बनला . ही जोडी किशोरकुमारच्या निधनापर्यंत कायम होती . खामोशी सिनेमातल्या प्रमुख भूमिकेसाठी वहिदा रेहमानने त्याची शिफारस आसित सेन यांच्याकडे केली होती .
इ.स.1971 साली राजेश खन्नाचा हाथी मेरे साथी हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला . देवर यांनी प्रचंड मानधन देऊन काकाला या चित्रपटासाठी करारबद्ध केले होते . या रकमेतून राजेश खन्नाने राजेंद्रकुमारचा कार्टर रोड येथील डिंपल बंगला एकतीस लाख रुपयांना विकत घेतला होता . नंतर त्याचे नामकरण आशिर्वाद असे करण्यात आले . इ.स.1972 पर्यंत काकाने सलग सत्रा सुपर डुपर हीट चित्रपट दिले होते . आजही हा विक्रम अबाधित आहे .
राजेश खन्नाने मुमताज बरोबर आठ सुपर हिट चित्रपट दिले होते . ते एकमेकांचे शेजारी होते . त्यांची केमिस्ट्री छान होती आणि ती पडद्यावर प्रतिबिंबित होत असे . ” I would pull his leg and tease him about his fan following ” असे एका इंटरव्ह्यूत मुमताज म्हणते !
कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर असताना तो कायम आपल्या चाहत्यांच्या घोळक्यात असायचा . त्याची कारसुद्धा लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची . अनेक मुलींनी त्याला स्वतःच्या रक्ताने लिहून पत्रे पाठवली होती . मान हलवून बोलण्याच्या त्याच्या स्टाईलवर प्रेक्षक फिदा होते . त्याचा गुरुशर्ट तरुणवर्गात कमालीचा लोकप्रिय होता . त्याच्या बंगल्याबाहेर चित्रपट निर्मात्यांच्या गाड्यांची रांग लागलेली असे . अमर प्रेम सिनेमातील एक दृश्य हावडा ब्रीजवर एका बोटीत चित्रित करायला स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली होती . त्याची लोकप्रियता एवढी होती की , त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांची एवढी गर्दी हावडा ब्रीजवर होईल की , त्यामुळे ब्रीजला धोका पोहचेल या भीतीने परवानगी नाकारली गेली . इ.स.1970 च्या दशकात राजेश खन्नाची शर्मिला टागोर , मुमताज , आशा पारेख , झीनत अमान , तनुजा आणि हेमा मालिनी या नायिकांबरोबरची केमिस्ट्री रसिक प्रेक्षकांना खूपच भावली होती . अभिनेत्री शर्मिला टागोर हिने त्याच्या लोकप्रियतेचे वर्णन इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका इंटरव्ह्यूत असे केले होते ,
” Women came out in droves to see kaka . They would stand in queues outside the studio to catch a glimpse , they would marry his photographs , they will pull at his clothes . Delhi girls were crazier for him than Mumbai girls . He needed police protection when he was in public . I have never seen anything like this before or since . “
संगीत हे काकाच्या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असे .आर.डी.बर्मन , कल्याणजी आनंदजी ,शंकर जयकिशन , लक्ष्मीकांत प्यारेलाल , एस.डी.बर्मन आदि सुप्रसिद्ध संगीतकारांसोबत तो गाण्याच्या ध्वनीमुद्रणप्रसंगी स्वतः उपस्थित असे . राजेश खन्ना , किशोर कुमार , आर.डी.बर्मन या त्रिकुटाने हिंदी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवले .
गुरुदत्त , मीनाकुमारी आणि गीता बाली हे त्याचे आदर्श होते . एका इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणतो , ” My inspirations include Dilip Kumars dedication and intensity , Raj Kapoors spontaneity , Dev Anands style and Shammi Kapoors rhythm . “
आनंद या चित्रपटाच्या उल्लेखाशिवाय राजेश खन्नाच्या चित्रपट कारकीर्दीचा लेखाजोखा अपूर्ण आहे . हृषिकेश मुखर्जी यांचा हा अतिशय गाजलेला चित्रपट होता . या चित्रपटासाठी हृषिकेश मुखर्जी यांची पहिली पसंती होती किशोरकुमार अथवा मेहमूद . काही गैरसमजामुळे किशोरकुमार आणि हृषिकेश मुखर्जी एकत्र काम करू शकले नाहीत . नंतर मेहमूदही या चित्रपटात काम करू शकला नाही . राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या गुणी कलाकारांनी हा चित्रपट समर्थपणे पेलला . आनंद हा निःसंशय राजेश खन्नाचा सर्वश्रेष्ठ चित्रपट होता . राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांच्या फिल्मी कारकीर्दीला निर्णायक वळण देणारा हा सिनेमा होता . दोघांनीही आपल्या भूमिका उत्कृष्टपणे निभावल्या होत्या . ” जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये . ” ” आनंद मरा नही आनंद मरते नही . ” हे आनंदमधील डायलॉग खूप प्रसिद्ध झाले होते .
दि.18 जुलै 2012 साली आशिर्वाद या राहत्या घरात राजेश खन्नाची प्राणज्योत मालवली . कॅन्सरशी त्याची झुंज अपयशी ठरली .
हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ह्या सुपरस्टारला भावपूर्ण श्रद्धांजली !

” आनंद मरा नही , क्योंकी आनंद मरते नही . ”

मुकुंद कुलकर्णी©
9421454888
mbkulkarni1957@gmail.com
www.townparle.in
www.thinkmarathi.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Please wait...

Subscribe Now

To get Articles, News, Events Updates Directly to your email !
Main Menu