शिवसेनेचे माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांचे निधन
विले पार्ले येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक शशिकांत पाटकर (६४) यांचं शुक्रवारी २२ मे २०२० रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. पाटकर यांच्या आकस्मिक निधानाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शशिकांत पाटकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, मुलगी असं कुटुंब आहे.
शुक्रवारी सकाळी शशिकांत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विले पार्लेच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. पंरतु हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांची प्राण ज्योत मालवली. दरम्यान, शशिकांत पाटकर हे विले पार्ले-अंधेरी वार्ड क्रमांक ८४ मधून शिवसेनेकडून दोनदा निवडून आले होते.त्यांनी आपल्या कार्यकाळात विभागात अनेक उपयुक्त कामे केली. नगरसेवक होण्याआधी शिवसेना शाखाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. विलेपार्ले येथे शिवसेनेचे लोकप्रिय नेतृत्व म्हणून ते परिचित होते.

