उन्हाळ्यातील खवय्येगिरी

चैत्र महिना सुरू झाला की आपल्या कडे सुरु होती ती आंबाडाळ, छुंदा आणि पन्हे करण्याची लगबग तसे हे पदार्थ आपल्याकडे करण्याची प्रथा आहे. या वेळेला हिरव्यागार कैऱ्या यायला लागतात आणि एप्रिल, मे चा कडक उन्हाळा पन्ह्यामुळे जाणवत नाही. यावेळेस हे पदार्थ कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत…

आंबाडाळ

साहित्य – चणाडाळ- १ वाटी, कैरीचा कीस- अर्धी वाटी, हिरवी मिरची-१, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार साखर – मीठ, फोडणीसाठी तेल-३-४ टी स्पून, मोहरी- १ चमचा, हिंग-१ चमचा, हळद- १ चमचा
ओले खोबरे सजावटीसाठी (पाहिजे असल्यास)

कृती – डाळ बुडेल एवढ्या पाण्यात २-३ तास भिजवावी. भिजलेली डाळ,हिरवी मिरची,मीठ,साखर मिक्सर मधे वाटावी. (फार बारीक वाटू नये तसेच जास्त पाणी घालू नये.) त्यात कैरीचा कीस घालावा आणि नीट एकत्र करावे. तेल तापवून मोहरी, हिंग घालून खमंग फोडणी करावी. थोडी गार झाल्यावर त्यात हळद घालावी. ही फोडणी डाळीच्या मिश्रणात ओतावी आणि सर्व नीट एकत्र करावे. वरून चिरलेली कोथिंबीर घालावी. आवडत असल्यास खोबरे घालावे. थंड झाल्यावर खावी.
ही आबांडाळ चैत्र महिन्यात येणाऱ्या चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी काही ठिकाणी खास करण्यात येते.
ही आबांडाळ दोन तीन दिवसच टिकते त्यामुळे ही लवकरात लवकर संपवावी.

छुंदा

साहित्य : खोबरी जातीच्या कैर्‍या, हळद, मीठ चवीनुसार, लाल तिखट, साखर किंवा गूळ, जिरे.

कृती : कैर्‍यांची साल पूर्णपणे काढून त्या स्टेनलेस् स्टीलच्या किंवा पितळेच्या जाड किसणीने किसाव्यात. किसाला हळद व मीठ चवीनुसार लावून एक ते दोन तास ठेवावे. त्याला पाणी सुटते. नंतर तो कीस हातात घेऊन न दाबता जेवढे निघेल तेवढेच पाणी काढावे. त्यानंतर एक वाटी किसाला दोन वाट्या साखर अथवा गूळ या प्रमाणात घेऊन ती साखर किंवा गूळ त्या किसात घालावा. आपल्याला कमी किंवा जास्त गोड हवे असेल, त्याप्रमाणे कमी किंवा जास्त साखर अथवा गूळ घालावा.
नंतर एका उत्तम कल्हईच्या किंवा स्टेनलेस् स्टीलच्या पातेल्यात तो कीस घालून, पातेल्याचे तोंड फडक्याने घट्ट बांधून, ते पातेले चांगल्या उन्हात आठ दिवस ठेवावे. रोज सकाळी एकदा ते मिश्रण हालवावे. आठ दिवस झाल्यावर एक वाटी किसाला दोन चमचे लाल तिखट व जरा जाडसर कुटलेले जिरे एक चमचा या प्रमाणात घालावे. पुन्हा दोन दिवस ते पातेले फडके बांधून ठेवावे. नंतर बरणीत तो चून भरावा. हे चुंदा वर्षभर टिकतो. या चुनात हळद न घातल्यास हा चुंदा उपवासालाही चालतो.

कैरीचे पन्हे

साहित्य :- एक मोठी कैरी, पाऊण वाटी गुळ, अर्धी वाटी साखर, चवीप्रमाणे मीठ, वेलची पूड, थोडसं केशर

कृती :- एक मोठी कैरी कुकरला उकडण्यास लावावी. उकडलेल्या कैरीचा गर हलकेच काढून मिक्सरच्या जारमध्ये घालावा. फार सालाजवळचा आणि कोयीजवळचा गर घेतल्यास त्याची कडवट, तुरट चव पन्ह्यात उतरते म्हणून तो गर वगळावा. आवडीप्रमाणे एक वाटी गराला पाऊण वाटी गूळ व अर्धी वाटी साखर (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण बदलेल) व पाव चमचा मीठ गरात घालून ढवळावे. तसेच गुळ वा साखर या दोहोंपैकी कोणतेही एक घालू शकता. थोडे पाणी घालावे.
मिक्सरमधे एकजीव घुसळून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे केशर अथवा वेलची पूड घालावी.
आता चवीप्रमाणे थंडगार पाण्यात वरील गर घालून पन्हं तयार करावे.
कैरीचे पन्हे हे तीन ते चार प्रकारे बनवता येते. ही सर्वात सोप्पी पध्दत दिली आहे. करुन पहा व आम्हाला कळवा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu