‘उपवास विशेष ‘

धार्मिक कामे, उपासतापास करताना उपासाच्या दिवशी काय बर वेगळ करता येईल फराळासाठी ? हा प्रश्न कायमच पडत असतो. म्हणूनच तुमच्यासाठी खास उपवासाच्या रेसिपीज ……

साबुदाणा पुरी –
साहित्य – २ वाट्या साबुदाणे,२-३ उकडलेले बटाटे, पाव वाटी
शेंगदाण्याचा कुट, पाव लिंबू, १ चमचा मीठ, तळायला तेल , ६-७ ओल्या मिरच्या, पाव चमचा जिरे , २ चमचे साखर हे साहित्य पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे.
कृती :
वरील सर्व साहित्य एकत्र करून मिसळून घ्यावे.प्लॅस्टिकला तेलाचा हात लावून जाड , जाड पुऱ्या थापून मंद गॅसवर पुरीप्रमाणे तळा आणि चटणी बरोबर गरम गरम खायला द्या.

वरी तांदुळाचा शिरा –
साहित्य – १ वाटी वरी तांदूळ, २ वाट्या पाणी, अर्धी वाटी दुध, पाऊण वाटी साखर , १ चिमुट मीठ, २ चमचे तूप, ३-४ वेलच्या, ७-८ बेदाणे आणि केशर.
कृती :
दुध आणि पाणी एकत्र करून गरम करत ठेवावे. त्यात केशर घालावे. कढईत तूप तापल्यावर कोरडे वरी तांदूळ घालून गुलाबी रंगावर परतावे.
त्यात एकत्र केलेले उकळते दुध व पाणी ओतावे. झाकण ठेऊन मंद गॅसवर शिजू द्यावे. पाणी सुकल्यावर त्यात साखर, मीठ, वेलची पावडर , बेदाणे घालून चांगले परतावे. परत झाकण ठेऊन ३-४ मिनिटे शिजू द्यावे. मग गॅस बंद करावा.

फराळी डोसे –

साहित्य- १ वाटी वरी तांदूळ , १ वाटी साबुदाणा
कृती :
वरी तांदूळ व साबुदाणा वेगवेगळे रात्री भिजत घालावे. सकाळी पाणी काढून एकत्र बारीक वाटावे. बेताचे पातळ करून त्यात १/२ चमचा मीठ घालून डोशाच्या तव्यावर नेहमी प्रमाणे डोसे करावेत. ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खावयास द्यावेत.

उपवासाची चटणी –
साहित्य- १ वाटी किसलेले ओले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे , १ चमचा साखर, छोट्या सुपारीएवढी चिंच
कृती :सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून वाटावे व चटणी करावी.

शेंगदाण्याची चटणी-
साहित्य : १ वाटी शेंगदाणे, १ चमचा लाल तिखट, चवीला मीठ आणि साखर , २-३ कोकमाचे / चिंचेचे पाणी ओलसरपणा येण्याइतपत , जिरे
कृती : वरील साहित्य एकत्र करून मिक्सरमधून वाटावे आणि चटणी तयार करावी

फराळी पॅटीस-
साहित्य – १ किलो बटाटे , १ नारळ किसून , १ वाटी शेंगदाणा कुट , १ १/२ लिंबू , १ १/२ चमचा मीठ, ४-५ चमचे साखर , थोडे बेदाणे, तळायला तेल, १ वाटी साबुदाणा पीठ किंवा अरारुट
वाटणाचा मसाला : १२-१३ हिरव्या मिरच्या, १ १/२ चमचा जिरे एकत्र वाटा .
सारण- नारळ किसून त्यात वाटलेल्या वाटणातला अर्धा मसाला घाला, त्यात १/२ चमचा मीठ , साखर , शेंगदाणा कुट, बेदाणे , एका लिंबाचा रस घाला व हाताने कुस्करून चांगले एकजीव करा.
पॅटीसची कृती :
उकडलेले बटाटे गरम गरम कुस्करून हाताने मळा, गुठळ्या मोडून टाका.मग त्यात वाटलेले अर्धे वाटण, अर्धे लिंबू , १ चमचा मीठ , चिकटपणा येईपर्यंत साबुदाणा पीठ घालून मळा. मळलेल्या बटाट्यांना हाताला तेल लावून वाटीसारखे करा , त्यात नारळाचे सारण घालून वाटीचे तोंड बंद करा व गोल लाडूसारखे पॅटीस करून घ्या. तेल चांगले गरम करून मंद गॅसवर तळा म्हणजे तुमचे गरमा गरम पॅटीस तयार!
pc:google

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Main Menu