पावसाळ्यात नक्की काय खावे काय खाऊ नये ?

पावसाळा आता छान सुरु झाला आहे. गेल्या आठवड्यात आपण पावसाळ्यात घ्यायच्या सर्वसाधारण काळजीबद्दल बोललो. पण डॉ. आणि आहारतज्ञ म्हणून माझे खूप लोकांशी भेटणे होते. हल्लीच माझ्याकडे आलेल्या एका आई आणि चिमुरडी च्या प्रश्नांमधून मला लक्षात आले कि पावसाळ्यात सर्वसाधारण काय काळजी घ्यायची हे माहित असले तरी ह्या ऋतू मध्ये नक्की काय खावे आणि ज्याचा शरीराला जास्तीत जास्त उपयोग होईल हे आपल्याला नीट माहित नसते. तर आज आपण पावसाळ्यातील आहाराबद्दल बोलूया.

जसे आपण गेल्या आठवड्यात म्हंटले त्या प्रमाणे ह्या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. सृष्टी बरोबरच शरीरात सुद्धा पाण्याचे प्रमाण वाढलेले असते. अचानक निर्माण झालेल्या दमट हवे मुळे त्वचेचे इन्फेक्शन होऊ शकण्याचे प्रमाण वाढलेले असते. पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते. त्यामुळे खाण्या-पिण्याकडे आपल्याला खास लक्ष देणे गरजेचे आहे.

१] रस्त्यावरील, उघड्यावरील पदार्थ खाऊ नका. पावसाळ्यात सर्वत्र बॅक्टेरिया , वायरसेस चे वाढलेले प्रमाण. तसेच अनेकदा हे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले पाणी नीट गाळलेले, उकळवलेले नसते त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. उघड्यावर ठेवलेल्या खाण्यावर माश्या बसून ते अन्न दुषित करतात. कचरा, घाणीवर बसल्याने माश्यांच्या पंखाना पायांना ते कण आणि जंतू चिकटतात आणि मग उघडयावर  ठेवलेल्या अन्नावर माश्या बसल्या कि ते कण अन्नपदार्थांवर पडतात.

२] पावसाळ्यात तुमच्या रोजच्या आहारात फळांचा भरपूर समावेश करा. फळांमुळे शरीराला भरपूर ताकद मिळते. योग्य ती जीवनसत्वे मिळतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच ऋतू अनुसार फळे खाल्ली तर त्याने आपल्या शरीराचे आतून cleansing होते. फळांमुळे त्वचेवर सुद्धा छान परिणाम होतो. पण ऋतू अनुसार फळे खाणे गरजेचे आहे. ह्या ऋतूमध्ये कलिंगड, टरबूज, खरबूज अशी फळे खाणे टाळावे. तसेच आंबे सुद्धा कमीच खावेत.

३] लसूण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे सर्दी खोकला, ताप अश्या पावसाळी आजारांपासून सहज संरक्षण मिळते. मसाल्याचे इतर पदार्थ देखील रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त ठरतात. तसेच मसाल्याचे पदार्थ जसे कि मिरपूड, आले, हिंग, हळद, कोथिंबीर, जीर लिंबू पचनसंस्था नीट काम करण्यासाठी देखील मदत करतात. पण पावसाळ्याच्या दिवसात अतितिखट अन्न खाणे शक्यतो टाळावे.

४] पावसाळ्यात कमी तहान लागते त्यामुळे आपोआप कमी पाणी प्यायले जाते. पण स्वास्थ्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती साठी, शरीरातील toxins चा नीट निचरा होण्यासाठी शरीराला साधारण ३ लिटर पाण्याची गरज असते. त्यामुळे आठवण ठेऊन, गरज पडल्यास दर एक तासाचा अलार्म लावून दिवसभरात २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. पण पाणी गळून उकळूनच प्या. नुसते गळल्याने पाण्यातील अशुद्धी निघून जातात पण पाण्यातील जीवजंतूचा नाश करण्यासाठी पाणी उकळणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात पाण्यातून पसरणारे संसर्गजन्य रोग फार प्रमाणात वाढतात. त्यामुळे काळजी घ्या.

५] पावसाळ्यात सर्वत्र आजारांचे, इन्फेक्शनचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे फळे आणि भाज्या काळजीपूर्वक स्वच्छ धुवूनच वापरा. अनेकदा फळे भाजीपाला ह्यावर साचलेले गढूळ पाणी, माती, चिखल लागलेले असते ज्या वाटे अनेक बॅक्टेरिया , वायरसेस आपल्या शरीरात जाऊ शकतात. आणि अक्षरशः पावसाळ्यात हे जंतू ओवरटाइम काम करत असतात असे म्हंटले तरी चालेल.

६] पावसाळ्यात त्वचेचे इन्फेक्शन टाळण्यासाठी जेवणात कडू भाज्यांचा समावेश करा. जसे कि मेथी, कार्ले, नीम इ. ह्या भाज्यांमधील रसायने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. ह्या पदार्थातील रसायनांचे अनेक फायदे शरीराला होतात.

७] पावसाळ्यात मिठाचे प्रमाण शक्य तेवढे कमी ठेवावे. तसेच चिंच, लोणच, चटणी अश्या आंबट गोष्टी टाळाव्यात. ह्या पदार्थांमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढून [ water retention] शरीराला सूज येण्याची शकता असते.

८] पावसाळ्यात तळलेले, मांसाहारी तसेच पचायला जाड पडणारे पदार्थ टाळा. कारण पावसाळ्यात पचनसंस्था थोडी अशक्त झालेली असते त्यात जर खूप क्लिष्ट आणि पचायला जड पदार्थ खाल्ले तर आजारी पडण्याची शक्यता असते.

९] ज्यांना सांधेदुखी चा त्रास आहे त्यांना पावसाळ्याचा दमटपणा सहन करणे जास्त त्रासाचे होते. त्यांनी सकाळी उठल्यावर उपाशी पोटी गरम पाण्यातून तुळशी आणि दालचिनी पूड घ्यावी. ह्याचा सांधेदुखी कमी करण्यास छान उपयोग होतो.

१०] दिवसभरात मधल्या वेळेत जेव्हा भूक लागेल तेव्हा गरम सूप, हर्बल टी, ग्रीन टी अशी पेय घेणे जास्त चांगले. पावसाळ्यात फ्रीझी एरीएटेड पेय घेणे टाळावे. फ्रीझी एरीएटेड पेय शरीरातील खनिज साठ कमी करतात त्यामुळे शरीरातील enzyme activity  कमी होते ज्यामुळे पचनसंस्थे वरचा ताण वाढतो.

ह्या खास पावसाळी पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करा आणि निरोगी राहून ह्या वर्षा ऋतूचा मनसोक्त आनंद लुटा.

  • डॉ. अस्मिता सावे.
  • म्यानेजिंग डायरेक्तर ‘ रिजॉंइस वेलनेस’
  • होमेओप्याथ, आहारतज्ञ, अक्यूप्रेशर थेरापिस्त.

 

Main Menu